Thursday, July 31, 2014

दिल्लीतले जूतमपैजार!



एकाच कुटुंबात नांदणा-या, रोज एकत्र बसून प्रसंगी एकाच ताटात जेवणा-या आणि गळ्यात गळा घालून फिरणा-या कुटुंबातल्या माणसांत आपापसात देण्याघेण्यावरून हाणामारी व्हावी ह्यासारखा प्रसंग खेड्यापाड्यात अनेकदा घडतो. हा विषय पिंपळपारावर मोठ्या चवीने चघळला जातो. मुळात त्या हाणामारीला विशेष कारण नसते.  फक्त देणेघेण्याच्या बाबतीत दोघात फिसकटलेले असते. अशा प्रकारचे 'जूतमपैजार' देशभरातल्या खेड्यात पाहण्याची लोकांना सवय झाली असून त्याचे आता कोणाला काही वाटेनासे झाले आहे! असेल काही आपापसातला देण्याघेण्यावरून जुना तंटा, अशी लोकांची भावना असते. काळाच्या ओघात गरीबीची परिस्थिती आली म्हणून आता हे लोक एकमेकांच्या उरावर बसले आहेत! दिल्लीत माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंग ह्यांनी सोनिया गांधीना पंतप्रधान व्हायचे होते; परंतु राहूल गांधींना त्यांनी पंतप्रधान होऊ नये असे वाटत होते. ह्यावरून घडलेली नाट्यमय घटना नटवरसिंगांनी आपल्या पुस्तकात लिहीली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी पुस्तक लिहून सत्य काय आहे हे जनतेसमोर ठेवणार आहे असे प्रेसकॉन्फरन्स घेऊन सोनियाजींनी जाहीर केले. देशातल्या अनेक खेड्यात चालणा-या जूतमपैजार आणि दिल्लीत रंगलेल्या जूतमपैजार ह्यात एकच फरक आहे की हा जूतमपैजार फिजिकल नाही. मिडियातल्या रिकामटेकड्या पत्रकारांना बघे म्हणून बोलावण्याची काळजी नटवरसिंगानी घेतली!

काँग्रेससाठी त्याग केल्याचे सोनियाजींचे निव्वळ नाटक होते, असे नटवरसिंगांना म्हणायचे आहे. राहूल गांधींनी म्हणे सोनिया गांधींना स्पष्टपणे सांगितले की तुम्ही पंतप्रधान झालात तर मी रिव्हाल्वरने स्वतःवर गोळी झाडून घेईन! अर्थात ह्या प्रसंगी मनमोहनसिंग, ज्येष्ट पत्रकार सुमन दुबे, स्वतः नटवरसिंग, राहूल गांधी आणि सोनिया गांधी एवढी मोजकीच मंडळी हजर होती.  सोनिया गांधींकडे पंतप्रधान कार्यालयातून फाईलीही पाठवल्या जात असत असा आरोप नटवरसिंगांनी केला आहे. आपल्या पुस्तकातल्या मजकुराची कुणकुण लागताच तो मजकूर काढून टाकण्याची गळ घालण्यासाठी खुद्द सोनिया गांधी आपल्याला भेटायला आल्या होत्या, असे नटवरसिंगांचे म्हणणे आहे. सोनिया गांधींचे त्यांचे घरगुती संबंध ना!

दिल्लीतल्या ह्या जूतमपैजारचा हा झाला खासगी तपशील! त्याखेरीज नटवरसिंगांची परराष्ट्र मंत्रीपद देण्यास अमेरिकेचा विरोध लक्षात घेऊन त्यांच्या विरूद्ध अमेरिकी वर्तमानपत्रात बातम्या छापून आणण्यात आला, असा आरोप नटवरसिंगांनी मनमोहनसिंगाचे नाव न घेता केला आहे. इराककडून लाच खाल्ल्याचा नटवरसिंगांवर आरोप करण्यात आला. मूळ चौकशी अहवालात त्यांचे नाव नव्हते. परंतु नंतर बातम्या याव्या म्हणून ते घुसडण्यात आले, असा नटवरसिंगांचा आरोप आहे. दिल्लीत चालणारे या इरसाल राजकारण ज्यांना माहित आहे त्यांना ही कहाणी खरी वाटणार ह्यात शंका नाही. ह्या प्रकरणातल्या काही घटना सार्वजनिक रेकॉर्डचा भाग असल्यामुळे त्यात सत्यांश आहे. उदाहरणार्थ त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले, त्यांच्या विरोधात अमेरिकन वृत्तपत्रात बातम्या छापून आल्या, त्यात त्यंनी तेलाच्या बदल्यात अन्न हा करार करताना लाच खाल्ल्ल्याचा त्यांच्यावर आरोप आला ह्या गोष्टी प्रत्यक्षात घडल्या आहेत. परंतु त्या कशा घडवून आणल्या गेल्या ह्याचा नटवरसिंगांकडून पुरावा मिळण्यासारखा नाही.

सोनियाजींना पंतप्रधान होण्यास विरोध करताना राहूल गांधींनी आत्महत्येची भाषा ज्याप्रसंगी केली त्या प्रसंगाला अर्थात कोणी साक्षीदार नाही. त्यामुळे सोनिया गांधींनी पंतप्रधानपद नाकारले हे नाटक होते की खरोखरच त्यांची तशी भावना होती हे कोण सांगणार?  ह्या प्रसंगातले नाट्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिले असे नटवरसिंगाखेरीज कोणीच सांगणार नाही. तसेच पंतप्रधान मनमोहनसिंग हे सोनियांच्या हुकूमानुसार कारभार चालवत होते हा आरोप नवा नाही. अर्थात मनमोहनसिंगांनी ह्यवेळी त्या आरोपाचा इन्कार केला आहे. भाजपाच्या वर्तुळात हा आरोप गेल्या दहा वर्षांपासून केला गेला. नटवरसिंग आणि पंतप्रधान कार्यालयातले संजय बारूआ हे आरोप करत असतील तर त्यात नवे काही नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सपाटून मार खाल्यामुळे आता हे दोघे आरोप करायला पुढे आले आहेत. हा आरोप करताना नटवरसिंगाना सोनियाजींच्या बरोबरच्या घरोब्याचा विसर पडला तर संजय बारूआंना मनमोहनसिंगांच्या कार्यालयात ते मुकाट्याने नोकरी करत होते ह्याचा त्यांना विसर पडला.

नटवरसिंगांनी ज्या गोष्टीचा उच्चार केला नाही त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मनमोहनसिंगाप्रमाणे तेही परराष्ट्र खात्यात आएफएस अधिकारी होते. नटवरसिंग परराष्ट्र सचिवपदावरून परराष्ट्रमंत्रीपदावर आले तर मनमोहनसिंग हे रिझर्व्ह बँक आणि जागतिक बँकेत नोकरी करून थेट अर्थमंत्रीपदावर आले. कालालन्तराने सोनिया गांधींशी त्यांचा घरोबा नसतानाही त्यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली. नटवरसिंगांच्या मनात ह्या 'परागती'बद्दल खंत वाटणे स्वाभाविक असले तरी पुस्तक लिहीण्याचे निमित्त करून त्यांनी आपल्या मनातली मळमळ व्यक्त केली इतकेच! त्यामुळे एक झाले. मिडियाच्या आणि प्रवक्त्यांच्या गिरणीला काम मिळाले. लोकांची अनपेक्षित करमणूकही झाली!

पंतप्रदानांनी सरकारचे ध्येयधोरण, निर्णय पक्षास माहिती देण्याची पद्धत बहुतेक सर्व पक्षात प्रचलित आहे. भाजपा आणि काँग्रेस ह्या दोन्ही बड्या पक्षांत एक निश्चित पद्धत अवलंबली जाते. भाजपामध्ये नागपूरात जाऊन संघप्रमुखांच्या कानावर घालावे लागते तर काँग्रेस पक्षात कार्याकरिणीला विशावासात घ्यावे लागते. भाजपा नेत्यांना संघ सरचाकांची भेट घेऊन महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या कानावर घालाव्या लागतात. आता संघ सरचालक त्यावर पसंतीनिदर्शक मान डोलवतात की नापसंती व्यक्त करताना भुवया उंचावतात हे त्यांचे त्यांनाच माहित! काँग्रेसमध्ये पंतप्रधानपद आणि काँग्रेसचे अध्यक्षपद शक्यतो एकाच व्यक्तीकडे ठेवण्याचा प्रघात आतापर्यंत पाळण्यात आला होता. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक तीन महिन्यात एकदा भरत असल्याने जेव्हा बैठक होईल त्यवेळी बघू असा खाक्या आतापर्यंत काँग्रेसचा दिसून आला आहे. त्यामुळे पंतप्रधान दैनंदिन कामाचा अहवाल सोनियाजींना देत होते की नाही ह्या मुद्द्याला फारसे महत्त्व नाही. सरकार चांगले काम करत असेल तर सरकारचा प्रमुख पक्षप्रमुखाला जुमानतो की जुमानत नाही ह्याच्याशी लोकांना काही देणेघेणे नाही.

भाजपाची मंडऴी बोलून चालून सत्तेत नवी आहेत. काँग्रेस सत्तेत मुरलेला असला तरी सध्याचे नेते मात्र सत्तेत मुरलेले नाहीत. लोकशाहीतील तात्विक मुद्दे उपस्थित केल्याने सरकारमधल्या मंडळींना अलीकडे संकोचल्यासारखे वाटण्याचा संभवही उरलेला नाही. फक्त धमाल उडवून देण्यापलीकडे नटवरसिंग आणि सोनिया ह्यांच्यात झालेले आरोपप्रत्यारोपांच्या प्रकरणातून फारसे काही निष्पनन् होणार नाही. दिल्लीतले हे जूतमपैजार विस्मृतीत जमा होणार ह्यात शंका नाही!

रमेश झवर

भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

                                                                                                                                                                          ;

No comments: