Saturday, March 28, 2015

हम ‘आप’ के है कौन?

आम आदमी पार्टीला सत्तेवर येऊन जेमतेम महिना झाला असेल. आम आदमी पार्टी फुटली. अजून आपचे दिल्लीतले सरकार मात्र कोसळले नाही! कदाचित इतक्या लौकर कोसळणारही नाही. राजकारण भ्रष्टाचारमुक्त करून भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या देशातल्या बहुतेक सा-या पक्षांना नेस्तनाबूत करण्यासाठी एल्गार पुकारण्याच्या आपच्या वल्गना हवेत विरून गेल्या. क्रांतीचा वणवा पेटण्यापूर्वीच विझून गेला. तिकीट वाटपावरून सुरू झालेले यादव-भूषण आणि अरविंद-सिसोदिया ह्यांच्यात सुरू झालेले भांडण कित्येक दिवसांपासून तसे विकोपास गेलेलेच होते. हे भांडवण  मिटवण्यापेक्षा ते कसे धुमसत राहील ह्याचाच प्रयत्न दोन्ही बाजूकडून सुरू होता!
प्रस्थापितांविरूद्ध लढत असताना एकमेकांशी हमरातुमरीवर येत वाद घालण्याची जन्मजात खोड आम आदमी पार्टीतल्या अनेक नेत्यांना आहे. पक्ष स्थापन झाल्यापासून आपापसात वाद सुरू होतेच. सत्ता मिळाल्यानंतर ह्या सगऴ्यांना शहाणपण सुचेल आणि भ्रष्टारमुक्त कारभाराकडे आम आदमीची वाटचाल सुरू होईल असे देशातल्या ख-याखु-या आम आदमीला वाटत होते. देशातल्या राजकारणात नवे युग अवतरणार असेही भोळसर लोकांना आम आदमी पार्टीला यश मिळाल्याचे पाहून वाटू लागले होते. परंतु आम आदमी पार्टी असे जरी पक्षाचे नाव असले तरी ह्या पार्टीचा एकही नेता आम आदमी नव्हता आणि नाही हे काही जनतेच्या, खास करून दिल्लीच्या जनतेच्या लक्षात आले नाही. वस्तुतः अण्णा हजारेंच्या आंदोलनाकडे देशभरातले सगळे असंतुष्ट आत्मे राजकारणात पुढे येण्याची संधी म्हणून पाहत होते.  
इंदिरा गांधींच्या आत्मकेंद्रित हुकूमशाहीविरूद्ध जयप्रकाशजींनी लढाई पुकारली तेव्हा सर्व काँग्रेसविरोधक त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते. जनता आयी है सिंहासन खाली करो असा नारा त्यावेळच्या पक्षांनी दिला होता. अण्णांच्या भोवती एकत्र येण्यामागेही आताच्या मंडळींचा नेमका हाच हेतू होता. काँग्रेस आघाडी सरकारला खाली खेचण्यासाठी अण्णांच्या नेतृत्वाचा उपयोग होण्यासारखा आहे ह्या दृष्टीने हे सगळे असंतुष्ट आत्मे अण्णांभोवती जमले होते. अण्णांमुळे त्यांना आयते व्यासपीठ मिळाले. परंतु अण्णांनी एकाएकी आंदोलन संपवले. अण्णा राळेगण सिद्धीला माघारी निघाल्यामुळे अण्णांभोवती जमलेल्या ह्या सगळ्या स्वयंघोषितांची पंचाईत झाली होती! परंतु त्यांचे नशीब बलवत्तर. दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर होणार हे लक्षात येताच ह्या मंडळींनी आम आदमी पार्टीची स्थापना केली. निवडणूक लढवली. रीतसर दिल्लीची सत्ता काबीज करण्यातही त्यांना यश मिळाले.
सरकार स्थापन करण्यासाठी आणि मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी नको नको म्हणत केजरीवालांनी काँग्रेसचा टेकूही घेतला. पण काँग्रेसने टेकू काढून घेताच केजरीवालांनी राजीनामा दिला. त्यावेळी राजीनामा दिला तरी सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत केजरीवालांना तो फायदेशीर ठरला. लाईट बिल आणि पाणी पट्टीत सवलत कुणाला नको? शाळाकॉलेजात खर्चाविना प्रवेश कुणाला नको? भ्रष्ट सरकारी कर्मचा-यांवर करडी नजर ठेवणारा नेता कुणाला नको आहे? जनता ही नेहमीच वरलिया रंगास भुलणारी असते. आम आदमीचे नेते भोळसर जनतेला एकदम पसंत पडले नसते तरच नवल ठरले असते!
अहोरात्र भांडत राहणे हा आम आदमीच्या नेत्यांचा स्वभाव! त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. कंबरेत दुखत असेल तर छातीत दुखतेय् असे सांगायची त्यांची पद्धत! आपल्याला पक्षाचे प्रमुखपद हवे वा मंत्रिपद हवे हे भूषण किंवा यादव तोंडाने कसे सांगणार? म्हणूनच केजरीवालांवर घोडेबाजार करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. सत्तेत वा पक्षात एखादे उचित पद केजरीवालनी त्यांना दिले असते तर कदाचित गोष्टी ह्या थरापर्यंत गेल्या नसत्या. केजरीलांच्या ते लक्षात आले नाही असे नाही. सत्तेच्या राजकारणातले एक महत्त्वाचे तत्त्व असते. ते म्हणजे सर्व जणांनी मिळून सत्ता भोगायची असते. केजरीवालनी ह्या तत्त्वाकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले! तेच त्यांना नडले. परंतु पार्टीतले आणि सरकारमधले सर्वोच्च पद स्वतःकडेच ठेवायच्या प्रबळ इच्छेने केजरीवालांवर मात केली. विधानसभा निवडणूक प्रचाराची धुरा केजरीवालनी स्वतः एकट्याच्या ताकदीवर सांभाळली होती. आम त्यामुळे सत्तेचे श्रेय सोडून द्यायला ते सहजासहजी तयार होणे शक्यच नाही.
भूषण-यादव यांची राजकीय समितीतून हकालपट्टी करूनही केजरीवालांचे समाधान झाले नाही. अस्तनीतला हा निखारा शक्य तितका लौकर दूर केला नाही तर आपले नेतृत्व जळून भस्मसात होऊन जाईल हे लक्षात येताच यादव, भूषण ह्यांच्यासह चौघांची राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्याचा धाडसी निर्णय केजरीवालांनी घेतला. तो अमलातही आणला. आपली सर्व धुणी चव्हाट्यावर येऊनच धुतली पाहिजे असा आपमध्ये सामील झालेल्या मंडऴींचा अलिखित नियम आहे. त्यानुसार राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची इत्थंभूत हकिगत यादव-भूषण कंपनीने लगेच प्रेसकॉन्फरन्स घेऊन पत्रकारांना कथन केली. अरविंद केजरीवाल गटाच्या प्रवक्त्यानेही  यादव-भूषण ह्यांचे म्हणणे त्यांनी साफ खोडून काढले. ही धुणी आणखी बराच काळ धुतली जाणार हे उघड आहे.
ह्या भांडणांमुळे केजरीवालांच्या सर्वंकश सत्तेला खिंडार पडण्याची शक्यताही आहे. तरीही सरकार खळकन् कोसळू नये ह्याचा केजरीवाल आणि सिसोदिया हे दोघे कसून प्रयत्न करतील ह्यात शंका नाही. तरीही सामान्य माणसांच्या मनात एकच सवाल गुंजत राहणार, सत्तेवर असलेल्यांना आपल्याशी काही देणेघेणे आहे की नाही? हम आप के है कौन’? हा सवाल शक्य तितक्या लौकर विरून जावा असाच केजरीवालांचा प्रयत्न राहील! दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मिळालेल्या यशामुळे देशात उमटलेला आम आदमीचा आवाज मात्र आप पार्टीतल्या भांडणात विरून गेल्यात जमा आहे. अण्णांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेला जनिंचा प्रवाहो हळुहळू वेगवेगळ्या पक्षात मिसळून जाणार की त्या प्रवाहास आणखी वेगळी वळणे लागणार ते कोण कसे सांगणार?  एक मात्र निश्चित, नियती आपले काम पार पाडणार!

रमेश झवर
भूतवूर्व सहसंपादक, लोकसत्ता

www.rameshzawar.com

No comments: