Saturday, September 17, 2016

उत्तर प्रदेशात साठमारी

शिवपालकाकांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊन त्यांची खाती त्यांना परत द्यायला लावून समाजवादी नेते मुलायमसिंग यादव ह्यांनी तूर्तास वेळ मारून नेली असली तरी उत्तरप्रदेशात अखिलेश सरकारचे काही ठीक चाललेले नाही हे ह्या निमित्ताने स्पष्ट झाले. उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. ह्या भराभर बदलणा-या काळात काका-पुतण्यात तंटा उद्भवावा हे समाजवादी पार्टीच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही. श्रीपाल यादव ह्यांच्याकडे मंत्रीपद आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्षपद ह्या दोन्ही जबाबदा-या सोपवण्यात आल्याने त्यांचे पारडे निश्चितपणे जड झाले होते. नेमके हेच अखिलेश ह्यांना खटकत होते. म्हणूनच शिवपालकाकांना सरकारमधून मुक्त करण्याची खेळी अखिलेशनी केली. परंतु मुलाने केलेल्या खेळीमुळे गंभीर परिणाम होऊ शकतात हे लक्षात येताच मुलायमसिंगांना ह्या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. मेरे रहते समाजवादी पार्टी टूट नहीं सकती असे मुलायमसिंग सांगत असले तरी स्वतः नामानिराळे राहून अशा प्रकारची खेळी अखिलेशकडून खुद्द मुलायसिंगांना करवून घेता आली असती. तर पार्टी तुटण्याची वेळ येण्याचा प्रश्नच नाही! पण असे काही करणे हा मुलायमसिंगांचा स्वभाव नाही.  काकांच्या हडेलहप्पी स्वभावाला अखिलेश कंटाळले हेच खरे. अखिलेश आपल्या निर्णयावर अडून राहिले असते तर कदाचित सरकारमध्ये आणि समजवादी पार्टीत काकांमुळे निर्माण झालेली अडगळ दूर होऊन समाजवादी पार्टीची आणि सरकारची वाटचाल अधिक खंबीरपणे पुढे सुरू झाली असती असे मानणा-यांचा एक प्रवाह तेथल्या राजकारणात आहे. नव्या रक्ताला वाव द्यायचा की जुन्या खोडांना ते घालतील तसा धुडगूस घालू द्यावा असा हा संघर्ष आहे. वस्तुस्थिती काहीही असली तरी उत्तरप्रदेश, सपा आणि अखिलेश सरकारची भावी राजकीय परिणामातून सुटका होणार नाही.
समाजवादी पार्टीचा मोठा शत्रू कोण? भाजपा की मायवतींची बहुजन समाज पार्टी?  ह्या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. कारण, ब्राह्मण, ठाकूर, यादव, मागासवर्ग आणि मुस्लीम ह्या जातीय घटकास उत्तर प्रदेशातल्या राजकारणात असलेले अनन्न्यसाधारण महत्त्व लक्षात घ्यावेच लागते,  त्याशिवाय उत्तरप्रदेशचे राजकारण सकल, संपूर्ण होऊच शकत नाही. काँग्रेसचा तर ह्या राज्यात जवळ जवळ सफाया झाला आहे. त्यामुळे राजकीय समीकरणात काँग्रेसला महत्त्वाची भूमिका प्राप्त होणे जवळ जवळ शक्य नाही. राहता राहिला भाजपाउत्तरप्रदेशातल्या आता शमलेली यादवी विकोपाल गेली असती तर त्याचा लाभ जास्त लाभ बसपाला झाला असता. त्याखालोखाल भाजपाला लाभ झाला असता. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला प्रचंड यश मिळाले होते. परंतु विधानसभा निवडणुकीतही त्या यशाची पुनरावृत्ती होईल असे मानणे राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण आहे. बिहारमध्ये नितिशकुमारांनी भाजपाची डाळ शिजू दिली नाही. जम्-काश्मीरमध्ये भाजपा सरकारमध्ये सामील झाला तरी जम्मू-काश्मीर सरकार चालवणे भाजपाला जड जात आहे. महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर पूर्वापार युती आहे. शिवसेनेला जागा कमी जागा मिळाल्या हेही खरे. पण एवढ्या भरवशावर शिवसेनेवर दादागिरी करण्याचा भाजपाला हक्क नाही. सत्ता आली खरी; परंतु भाजपाकडे सौजन्य मात्र आले नाही. परिणामी हे सरकार अशक्तच आहे.
उत्तरप्रदेशात यादवी खरोखरच शमली का? मुलायमसिंगांच्या मते कटकटी संपल्या आहेत. परंतु सपातल्या कटकटी थांबणार नाही असे भाजपाने गृहित धरले आहे. ते काहीसे बरोबरही आहे. मात्र, यादव नेत्यातला बखेडा असाच सुरूच राहिला तर त्याचा फायदा नक्की कोणाला होणार ह्याबाबत भाजपा नेत्यांच्या कल्पना स्पष्ट नाही. भाजपा नेत्यांना असे वाटते की यादवांच्या दुफळीमुळे सपा आणि बसपा ह्या दोन्ही पक्षात थेट लढत होऊन दोघांची मते कमी होतील. दोन्ही पक्ष हे भाजपाविरोधी आहेत. त्याखेरीज. त्यात भाजपापेक्षा काँग्रेसचे नुकसान अधिक आहे. ह्या सगळ्यांचे नुकसान हाच भाजपाला फायदातर्कदृष्ट्या भाजपाचे विश्लेषण सकृतदर्शनी बरोबर वाटणारे असले तरी उत्तरप्रदेशातले राजकारण हे गुळगुळीत फर्शीवरून चालण्यासाऱखे आहे असा आजवरचा अनुभव आहे. त्याखेरीज मुस्लिम हा आणखी एक घटक तेथे आहे. खेरीज तर्कापेक्षा स्वार्थ हाच उत्तरप्रदेशाच्या राजकारणाचा पाया आहे. मुस्लीमांची मते एकत्रित झाली तर ती समाजवादी पार्टीच्या पारड्यात पडतील का काँग्रेसच्या पारड्यात पडतील हा एक प्रश्न आहेच.
मुख्यमंत्री अखिलेश यादव ह्यांना असे वाटते की पक्षाची आणि सरकारची सूत्रे आपल्याच हातात हवी. आगामी निवडणुकीत तिकीटवाटपाचा एकाधिकारही त्यांना हवा आहे. म्हणूनच अखिलेशनी सर्वप्रथम काका शिवपाल यादवांनाच मंत्रिपदावरून काढले. पुढच्या काळात पंचाईत होऊ नये म्हणून त्यांनी काकांविरुध्द हे पाऊल टाकले होते. परंतु त्यांच्या निर्णयामुळे चार दिवस उत्तरप्रदेशात गोंधळ सुरू राहिला. खरे तर, राज्यसभेचे समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव ह्यांनी बुध्द्या हा वाद सुरू केल्याचे शिवपाल यादवांचे म्हणणे आहे. परंतु ही शिवपालकाकांची सगळी सारवासारव आहे. भले रामगोपाल यादवांनी हा वाद प्रत्यक्ष सुरू केला नसेल. परंतु त्यांनी नेतृत्वाच्या वादास फुंकर घातली हे मात्र निश्चित. समाजवादी पार्टीच्या नेतेपदावर असलेले अखिलेशना हटवण्याची भूमिका रामगोपाल यादवांनी घेतली. अखिलेशजींचे सामर्थ्य खच्ची करण्याचाच हा प्रकार होता. त्यातून सपा नेत्यात साठमारीचा खेळ झाला. तो खेळ तूर्त संपला असला तरी त्या खेळाचे व्रण शिल्लक राहून गेले आहेत.
रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: