Wednesday, October 26, 2016

रतन टाटांचा दणका!

टाटा समूहाच्या अध्यक्षपदावर विराजमान झालेल्या सायरस मिस्त्री ह्यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय टाटा समूहाचे रतन टाटा ह्यांनी जाहीर करून दणका दिला आहे. त्यांच्या दणक्याने खळबळ उडाली तर त्यात नवल नाही. वयाची पंचाहत्तर वर्षे पुरी झाल्यानंतर अध्यक्ष वा संचालकास निवृत्त करण्याची परंपरा टाटा उद्योग समूहाने घालून दिली असून खुद्द रतन टाटाही त्याला अपवाद नाही. त्यांच्या आधीचे अध्यक्ष जेआरडी टाटा ह्यांनीही वयाची पंचाहत्तर वर्षें पुरी होताच रतन टाटांना टाटा समूहाचे अध्यक्ष नेमले होते. रतन टाटा हे अविवाहित असल्याने त्यांच्या पश्चात अध्यक्षपदासाठी अन्य योग्य टाटा उपलब्ध नसल्याने टाटा समूहासाठी, विशेषतः अध्यक्षपदासाठी उमेदवार शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती रतन टाटांनी नेमली होती. त्या समितीनेच शापूरजी पालनजी कुटुंबाशी संबंधित सायरस मिस्त्री ह्यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी जोरदार शिफारस केली होती. मनात कोणत्याही प्रकारचा किंतु मनात न आणता रतन टाटांनी सायरस मिस्त्री ह्यांच्या नावाला मंजुरी दिली होती. वास्तविक पुण्यात नगर रोडवर असलेल्या ट्रेंट ह्या टाटांच्याच एका होलसेल रिटेल कंपनीचे अध्यक्ष नोएल टाटांच्या नावाची चर्चा समितीत झाली होती. परंतु समितीने नोएल टाटांच्या नावाची शिफारस केली नव्हती. त्यामुळे सायरस मिस्त्री ह्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली!
अध्यक्ष ह्या नात्याने सायरस मिस्त्रींच्या कारभाराला तीन वर्षे झाल्यानंतर सायरस मिस्त्रीच्या कारभार पाहून रतन टाटा व्यथित झाले. मिस्त्री ह्यांच्या तीन वर्षांच्या काळात टीसीएस आणि फोर्डची विकत घेतलेली एक वाहन कंपनी ह्या दोन कंपन्या सोडल्या तर बाकी अन्य कंपन्या तोट्यात चालत आहेत. टाटा कंपन्यांच्या शेअर्सची मालकी टाटांनी फार पूर्वीपासून स्थापन केलेल्या ट्रस्टकडे असून हे ट्रस्ट टाटा कंपन्यांचे सर्वात मोठे भागधारकही आहेत. ह्या ट्रस्टचा कारभारही नैतिकतेच्या चौकटीत चालत असतो. कोणत्याही परिस्थितीत अनुचित तडजोड करायची नाही म्हणजे नाही हे टाटांचे तत्त्व! म्हणूनच टाटा कॅन्सर हॉस्पिटल, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स किंवा टाट इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल सायन्स ह्यासारख्या नावाजलेल्या संस्था अस्तित्वात येऊ शकल्या. नरिमन पॉईंटवरील भव्य नाट्यगृह उभे राहिले. टाटा समूहातली एखादी कंपनी तोट्यात गेली तर त्याचा सर्वात जास्त फटका सर्वात मोठे भागधारक ह्या नात्याने टाटांच्या ट्रस्टनाच बसतो. अलीकडे टाटा ट्रस्टच्या कामात रतन टाटा जातीने लक्ष घालू लागले होते.
सायरस मिस्त्रींच्या काळात टाटा समूहास आलेला तोटा आला हे रतन टाटांपासून लपून राहू शकले नाही. अर्थात रतन टाटा ही तोट्यामुळे डगमगणारी व्यक्ती नाही. किंबहुना तोटा सहन करण्याइतपत सहनशक्ती रतन टाटांकडे निश्चित आहे. त्यांचा खरा आक्षेप निराळाच आहे. आधुनिक व्यवस्थापनात तोटा कमी करण्यासाठी कंपनीची अचल संपत्ती विकून टाकण्याचा निर्णय घेणे चुकीचेही मानले जात नाही. परंतु टाटांच्या तत्वज्ञानात कंपनीची संपत्ती विकून तोट्याच्या उद्योगातून अंशतः बाहेर पडणे सहसा बसत नाही. सायरस मिस्त्रींनी इंग्लंडमधील पोलाद कंपनी विकून टाकण्याचा निर्णय घेतला. मिस्त्रींचा हा निर्णय रतन टाटांना आवडलेला दिसत नाही. कंपनी चालवून तोटा कमी करण्याचा प्रयत्न का करण्यात आला नाही असा प्रश्न टाटांच्या मनात उद्भवलेला असू शकतो. सायरस मिस्त्रींना हा प्रश्न का पडला नाही असेही रतन टाटांना वाटले असेल.
पोलाद उद्योग हा टाटांचा जीव की प्राण आहे. जमशेदपूरला पोलाद कारखाना काढण्याची प्रेरण जमशेदजी टाटांनी स्वामी विवेकानंदांकडून अमेरिकेच्या दौ-यात असताना घेतली होती. स्वामींच्या प्रेरणेमुळेच अनंत अडचणी सोसून टाटा आयर्न अँड स्टीलटिस्कोही कंपनी टाटा समूहाने चालवली. टिस्कोकडे स्वतः जेआरडी टाटांचे लक्ष असायचे. ते स्वतः विमान चालवत जमशेदपूरला कारखान्यात जायचे. त्यांच्या पश्चात रतन टाटा आणि टिस्कोचे अध्यक्ष रूसी मोदी ह्यांचे वाजले होते. तरीही रतन टाटांनी रूसी मोदींचे कोणत्याही प्रकारे आर्थिक नुकसान न करता मोदींना मुदत संपल्यांतर निवृत्त केले. ताजचे अजित केरकर किंवा टाटा फायनान्सचे दिलीप पेंडसे ह्यांनाही सन्मानपूर्वक निवृत्त होता आले नाही.
उदारीकरणाच्या काळात पोलाद क्षेत्रात जगात टाटा पहिला क्रमांकावर असले पाहिजे असे रतन टाटांच्या मनाने घेतले होते. अंबानींना पॉलिस्टर धाग्याच्या क्षेत्रात जगात पहिला क्रमांक हवा आहे तर बिर्लांना सीमेंट आणि अल्युमिनियम क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असावे असे वाटते. त्यादृष्टीने टाटा, बिर्ला आणि रिलायन्स ह्या तिन्ही समूहांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या ध्येयात ह्या तिन्ही कंपन्यांना आजवर किती यश मिळाले हा मुद्दा निराळा! कदाचित् इंग्लंडमधली पोलाद कंपनी विकण्याच्या सायरस मिस्त्रींच्या निर्णयामुळे रतन टाटांच्या मनीमानसी बाळगलेल्या ध्येयावर पाणी पडले असेल. अन्यथा सायरस मिस्त्रींना ज्या कौतुकाने रतन टाटांनी अध्यक्षपदावर बसवले त्या कौतुकाचा विसर पडून सायरस मिस्त्रींची उचलबांगडी करण्याचा विचारही कदाचित रतन टाटांच्या मनाला शिवला नसता.
टाटा उद्योग समूहाबद्दल देशात कौतुकाची भावना आहे. टाटा उद्योगसमूहात लहर, मर्जी ह्यासारख्या भावनांना स्थान नाही. धंद्यात फायदा व्हावा म्हणून कुठलीही अनुचित तडजोड करायची टाटांची तयारी नाही. टाटांच्या कंपन्या स्थापन करताना त्या देशभक्तीच्या भावनेतून स्थापन झाल्या होत्या हे नव्या पिढीला माहित नाही. देशभक्तीची कास धरत कंपनीला स्वतःचा नफा टिकवण्यासाठी अनेकदा तारेवरची कसरतही टाटांना करावी लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत व्यवसाय करताना नीतीमत्तेला तिलांजली द्यायची नाही हेही ब्रीद टाटांनी बाळगले आहे. अशा ध्येयनिष्ठ उद्योगसमूहाने उराशी बाळगलेली जीवनमूल्ये सायरस मिस्त्रींनी बाजूला सारली की नाही हे सांगता येत नाही. मात्र, ती मूल्ये सायरस मिस्त्रींनी बाजूला सारल्याचा ग्रह रतन टाटांचा नक्कीच झालेला आहे. अशा परिस्थितीत सायरस मिस्त्रींना हटवणे आणि नव्या अध्यक्षांचा शोध सुरू करेपर्यंत स्वतः हंगामी अध्यक्षपद सांभाळण्यापलीकडे रतन टाटांसमोर पर्याय उरलेला नाही. कौतुकाने आणलेल्या अध्यक्षांची उचलबांगडी करण्याचा वेळ आली हा दैवदुर्विलास म्हटला पाहिजे.
टाटा समूहात घडत असलेल्या ह्या घटनेमुळे स्टॉक मार्केटमधील टाटा कंपन्यांचे भाव गडगडले आणि टाटांचे भांडवल-मूल्य सुमारे 11 हजार कोटींनी कमी झाले. 8.4 लाख कोटी रुपयांचे भांडवल-मूल्य असलेल्या टाटा समूहाला हा मोठाच फटका आहे. अर्थात ह्या फटक्यातून सावरण्याची क्षमता टाटा समूहात निश्चित आहे. तूर्त तरी सर्व 27 कंपन्यांच्या अध्यक्षांना त्यांनी चोख कारभार करा, कंपन्या होता होईल तो फायद्यात आणा असे आवाहन रतन टाटांनी केले ते योग्यच आहे.

रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: