Saturday, January 15, 2022

‘उठापटक की’ राजनीती

उठापटक की राजनीती’ साठी प्रसिध्द असलेल्या  उत्तरप्रदेशात राजकारणाला सुरूवात झाली असून माजी मंत्री स्वामीप्रसाद मौर्य आणि धरमसिंग सैनी हे अखिलेश यादव ह्यांच्या समाजवादी पार्टीत दाखल झाले आहेत. मौर्य  ह्यांच्याबरोबर ६ आमदारांचा गटही  सपात  दाखल झाला. ह्या पक्षान्तरामुळे  विधानसभा निवडणुकीत भाजपाचे जातीचे गणित पार विस्कळीत झाल्याचा दावा सपाचे अखिलेश  यादव ह्यांनी केला आहे. योगी आदित्यानाथ सरकारच्या विकेटस्‌ धडाधड पडत आहेत, असे अखिलेश यादव ह्यांचे म्हणणे आहे. आता योगीजींनी  पुन्हा गणिताची शिकवणी लावलेली बरी, असे उपरोधिक उद्गार त्यांनी काढले. अलीकडेच मंत्रीपद सोडून बाहेर पडलेले दारासिंग चौहान हेदेखील रविवारी सपात दाखल होणार आहेत.

दरम्यान सपाबरोबर निवडणूक लढवण्याचा निर्णय  दलित नेते चंद्रशेखर आझाद ह्यांनी जाहीर केले. त्यांची आज चर्चा सुरू झाली. बदौन मतदारसंघातील खासदार मौर्या ह्यांची कन्या  संघमित्रा मौर्य ह्या मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्याशी  ’एकनिष्ठ‘ राहणार आहेत. एवढ्या  सा-या घटना  घडत  असताना  योगी  आदित्यनाथ  स्वस्थ  बसणे शक्यच  नाही. सर्वांच्या पक्षप्रवेशानिमित्त  आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास हजर असलेल्या  २५०० कार्यकर्त्यांविरूद्ध  तर कोविद  नियमान्तर्गत तक्रारी दाखल केल्याच; शिवाय उच्च वर्ण विरूद्ध मागासवर्ग ह्या नव्या मुद्द्यानिशी प्रचाराची तोफ डागली. एका दलिताच्या घरी मकर संक्रातीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सहभोजनप्रसंगी त्यांनी हा वाद सुरू केला  हा नवा मुद्दा त्यांनी काढला. सपाच्या  ह्या नव्या धोरणामुळे `सामाजिक न्याया’च्या सपाच्या वल्गना  निरर्थक ठरणार आहेत. मतदारसंघनिहाय तपशील देऊन योगी आदित्यनाथांनी अखिलेश यादवांच्या जोरदार टीकेला प्रत्त्युत्तर दिले.

२०२२ च्या निवडणूक ही उठापटक नाटकाची २०२४ मध्ये होणा-या लोकसभा निवडुणकीची रंगीत तालीम ठरेल हे सांगायला तथाकथित Aराजकीय निरीक्षकांची गरज नाही. उत्तरप्रदेश आणि बिहार ह्या दोन् राज्यात आयाराम – गयाराम रंगण्याची ही काही पहिली वेळ नाही. मुळात ‘आयाराम-गयाराम’ हा शब्दप्रयोगही पहिल्यांदा उत्तरप्रदेशातल्या राजकारणाला उद्देशून वापरला गेला होता. केंद्रात नरेंद्र मोदी ह्याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होताच ह्या आयाराम-गयारामांचा फायदा भाजपाला झाला. ह्या वेळी तो फायदा कोणाला होईल हे आताच स्पष्ट होणार नाही. केंद्रात सत्तापालट फक्त उत्तरप्रदेशच घडवून आणू शकतो ह्या अहंकाराने उत्तरप्रदेशातल्या नेत्यांना पछाडले आहे. भाजपा नेते नरेंद्द्र मोदींनी प्रथम राजनाथ सिंहांशी जुळवून घेतले आणि नंतरच पुढचे पाऊल टाकले होते. काँग्रेसला सत्ताभ्रष्ट  करण्यात भले मोदींना यश मिळाले असेल; परंतु बिहारमधील नीतिशकुमारांना ते सत्ताभ्रष्ट करू. शकले नाही. अखिल भारतीय राजकारणात कोणत्याही राजवटीला देशात एकछत्री साम्राज्य स्थापन करता आले नाही. एकछत्री साम्राज्य स्थापन करण्यात य़शस्वी झाले तरी त्यांचे साम्राज्य दीर्घ काळ टिकले नाही हे इतिहासावर ओझरती नजर जरी टाकली तरी सहज लक्षात येते !  

उत्तरप्रदेशात घडत असलेल्या राजकीय घडामोडींकडे तूर्त तरी सा-या देशाचे लक्ष लागले आहे. कदाचित्‌ लौकरच जगाचेही लक्षे वेधले जाईल.

 रमेश झवर