Tuesday, June 30, 2020

डिजिटल घुसखोरी


 चीनच्या ६७ अप ब्लॉक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने उशिरा का होईना घेतला टिक टॉक, शेअरईट, वुईचॅट कॅमस्कॅन, युसी ब्राऊजर इत्यादि अप ब्लॉक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला. विशेष म्हणजे ब्लॉक करण्यात आलेले अप चीनी आहेत असा उल्लेख करण्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हुषारीपूर्वक टाळले! ते काहीही असले तरी उशिरा का होईना सरकारला शहाणपण सुचले! चीनची ही डिजिटल घुसखोरी गेल्या काही वर्षांपासून बिनदिक्कत सुरू आहे. चीनी अप जास्त चांगले चालतात म्हणून मोबाईधारक ते सर्रास वापरतात. परंतु फेसबुक आणि इतर सामाजिक माध्यामांप्रमाणे चीनी अपदेखील भारतातली सारी माहिती चीनला पाठवत असतात. मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्याची गतिमान यंत्रणाही चीनमध्ये अस्तित्वात आहे. खरे तर, गलवान खो-यातील घुसखोरीपेक्षाही चीनची डिजिटल घुसखोरी गंभीर आहे
अवकाशात उपग्रह सोडण्याची चढाओढ सुरू झाली तेव्हा चीननेही उपग्रह सोडले. बरे, सोडले तर सोडले, पण उपग्रह सोडताना अन्य देशांच्या भ्रमणमान उपग्रहांपासून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून किमान अंतर राखले पाहिजे ह्याचीही चीनने फारशी फिकीर केली नाही. भारताशी आधी नकाशा युध्दसुरू करून झाल्यावर चीनची मजल १९९३ साली प्रत्यक्ष भारताच्या सीमेवर युध्द करण्यापर्यंत गेली. दरम्यानच्या काळात माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातही चीनने जोरदार मुसंडी मारली. नव्वदच्या दशकात जेव्हा जेव्हा विंडोच्या नव्या नव्या आवृत्त्या अमेरिकन बाजारपेठेत आल्या तेव्हा तेव्हा चीनच्या बाजारात विंडोच्या पायरेटेड आवृत्त्या मिळू लागल्या. फार काय, त्या काळात अमेरिकेत वापरल्या जाणा-या शंभर सॉफ्टवेअर्सचा समावेश असलेली एक सीडीच चीनने काढली. ती सीडी मुंबईत लॅमिंग्टन रोडवर मिळू लागली!
गेल्या वर्षींच चीनचे अध्यक्ष क्षींनी भारताला भेट दिली होती. त्यांनी केवळ भारतालाच भेट दिली असे नव्हे तर अर्जेंटिना, ब्राझील, जर्मनी, किर्गीलस्तान, फिलिपाईन्स, स्पेन, ताजिकीस्तान, उबेकीस्तान आणि व्हिएतनाम ह्याही देशांना क्षींनी दोन वेळा भेट दिली. फ्रान्स, भारत आणि इंडोनेशिया, कझाखस्तान आणि दक्षिण आफ्रिका ह्या देशांना त्यांनी तीन वेळा भेट दिली तर अमेरिकेला ४ वेळा भेट दिली. रशियाला क्षींनी तब्बल ८ वेळा भेट दिली. क्षींच्या परदेश दौ-यांमागे सुनियोजित तंत्र आहे. जगातल्या अनेक देशात आपला माल कसा खपवता येईल ह्याचे नियोजन करूनच क्षींनी निरनिराळ्या देशाचे दौरे केले. क्षी भारतात आले तेव्हाही भारता-चीन ह्यांच्यात मोठाले व्यापारी करार झाले. २०१९ साली ऑक्टोबरमध्ये भारतात चीनची एकूण गुंतवणूक ५.०८ च्या घरात गेली.
अनेक देशात व्यापारविस्तार करण्यासाठी चीनने नक्कीच संगणकीय विश्लेषणाची मदत घेतली असणार. माहितीतंत्रज्ञान क्षेत्रात आज घडीला चीनची धडाकेबाज आगेकूच सुरूच आहे. जगात इंटरनेट वापारात चीन पहिल्या क्रमांकावर आला असून भारत दुस-या क्रमांकावर आहे. अमेरिका तिस-या क्रमांकावर आहे. २०१७ पर्यंत जगभरात  ऑनलाईन राहणा-यांची संख्या ४९ टक्क्यांवर गेली. सध्या जागतिक इंटरनेट वापरदारांपैकी १२ टक्के वापरदार भारतात आहेत. चीनमध्ये २१ टक्के इंटरनेट वापरदार आहेत तर अमेरिकेत इंटरनेट वापरदारांची संख्या केवळ ८ टक्के आहे. गूगलच्या मदतीने भारतात २०१६ पासून रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सेवा सुरू झाली. व्होडाफोनच्या सुपरवायफायबरोबर रिलायन्सनेही ४ जी इंटरनेटमध्ये पदार्पण केले. परिणामी भारतात ब्राडबँड सेवा स्वस्त झाली. ट्रायच्या मते भारतात वायरलेस म्हणजेच मोबाईल वापरदारांची संख्या १.१६ अब्जाच्या घऱात गेली आहे.
सध्या भारतात लोक कितीतरी अधिक वेळ मोबाईलवर घालवतात खरा, पण तो वेळ गेम खेळण्यात आणि सिनेमा पाहण्यात अधिक खर्च होतो. सोशल मिडियावर वावरणा-यांची संख्या तर इतकी वाढली की तुलनेने प्रत्यक्ष वावरायला लोकांना वेळ नाही. मोबाईलसकट माणसेच मोठ्या प्रमाणावर हॅकझाली आहेत! म्हणूनच फेसबुकसारख्या माध्यमांचा ताबा जाहिरातदारांनी घेतल्यात जमा आहे. सायबर सिक्युरिटीचे तीनतेरा तर कधीच वाजले आहेत!  करीअरसाठी धडपड करण्याची उमेद संपल्यामुळे बेकारीत वाढत चालली आहे. भारतातली ही परिस्थिती चीनला लाभदायक ठरली असून ह्या परिस्थितीचा नेमका फायदा चीन उचलत आहे.
निर्यातीत चीन अग्रेसर होण्यामागे संगणकाचा चोख वापर हेच कारण आहे, चीनच्या मोबाईल शार्टफॉर्म व्हिडियोमुळे व्यापारवृध्दीस चालना मिळाली. चीनने तयार केलेले अनेक अप्स अमेरिकेच्या इन्स्टाग्रॅम किंवा स्नॅपचॅटपून सरस आहेत. ह्याचे कारण कुठलीही गोष्ट चांगल्या प्रकारे आणि झटपट करण्याचे तंत्र चीनने आत्मसात केले आहे. भारताने बंदी घातली तरी येत्या काही वर्षात चीनी अपचा धंदा वाढता राहील असा अंदाज आहे. बाईटडान्स अधिक प्रभावशाली होण्याच्या मार्गावर आहे. अलीबाबा आणि जेडी कॉम ह्या दोन दोन्ही ई कॉमर्स कंपन्यांचा पसारादेखील खूपच वाढला. पेमेंट बँकात चीनचा पैसा मोठ्या प्रमाणावर आला आहे. मनकी बातपेक्षा काम की बात हेच चीनचे वागण्याचे खरे सूत्र आहे! अपच्या निर्मिती आणि मार्केटिंग ह्या दोन्हीत अमेरिकेशी स्पर्धा करण्यात चीन यशस्वी झाला त्याचे रहस्य हेच आहे.
दक्षिण आशियातील चीन,  भारत आणि इंडोनेशिया ह्या देशांत इंटरनेट आणि अप हे दोन्ही बिझिनेस चांगलाच वाढला आहे. ब्राझिल, मेक्सिको आणि फिलिपाईन्स ह्या देशांतही हा व्यवसाय वाढता राहील हे बनियाबुध्दी चीनच्या  लक्षात यायला वेळ लागला नाही! चीनची ही आघाडी अर्थात दैनंदिन व्यवहारापुरती आहे असा समज करून घेण्याचे  कारण  नाही. लष्करी ताकद वाढवण्यासाठी चीनवे संगणक वापराचा धडाका लावलेला असू शकतो. मात्र, ते कुणाच्याही लक्षात येणार नाही. कारण, संरक्षण गरजांसाठी जगभर सर्फेस इंटरनेटऐवजी डीप इंटरनेटचा वापर केला जातो. चीनकडूनही संरक्षण गरजांसाठी डीप इंटरनेटचा वापर केला जात असेल तर ते जगाला कळणारही नाही. गलवान खो-यातली घुसखोरी गंभीर आहेच. परंतु चीनची विधीनिषेधशून्य संगणकीय प्रगतीदेखील तितकीच गंभीर आहे. भारत-चीन संबंधांच्या ह्या नव्या परिमाणांकडे दुर्लक्ष करणे परवडणार नाही. 
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

Monday, June 29, 2020

नरसिंह रावांचे काष्ठमौन


दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि नरसिंह राव ही दोन नावे माझ्या पत्रकारितेच्या करीअरशी निगडित आहेत. दोन्ही नावांशी माझ्या न्यूज करीअरचा विलक्षण संबंध आहे! इंदिरा गांधी ह्यांच्या दौ-याबरोबर माझे न्यूज करीअर सुरू झाले आणि नरसिंह रावांबरोबर केलेल्या ओमान दौ-यानंतर माझ्या न्यूज करीअरची अखेर झाली आणि सहसंपाद म्हणून माझे नवे करीअर सुरू झाले. सहसंपादक असतानाच्या काळात अग्रलेख लिहणा-यांच्या टीममध्ये माझा समावेश झाला. दोन्ही दौ-यात कर्तृत्वान पंतप्रधानांसमवेत झालेल्या प्रत्यक्ष वार्तालापाच्या आठवणी ही माझ्या आयुष्याची ठेव आहे.
इंदिरा गांधींच्या आठवणींवर मी मागे लिहलेच होते. गेल्या रविवारी पंतप्रधान नरसिंह राव ह्यांच्या ९९व्या जन्मदिनी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी हे वर्ष नरसिंह राव जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष एन. उत्तमकुमार ह्यांनी केली. आपल्या सरकारनियंत्रित अर्थव्यवस्थेचा मोहरा फिरवणआरा पंतप्रधान नरसिंह रावांना कमालीचे यश मिळाले. ही अवघड कामगिरी पाड पाडण्यासाठी रावांनी अर्थतज्ज्ञ मनोमोहनसिंगांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला. मनमोहनसिंगांना नरसिंह रावांनी केवळ अर्थमंत्रीपदच दिले असे नाही तर त्यांना संपूर्ण स्वातंत्र्यही दिले. नरसिंह रावांच्या रूपाने देशाला एक कर्तृत्ववान आणि जमिनीवर चालणारा समंजस पंतप्रधान लाभला.
नरसिंह रावांना मी समंजस हे विशेषण लावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील! परंतु नरसिंह रावांच्या समंजसपणाचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. 27 वर्षांपूर्वी त्यंच्याबरोबर ओमानचा दौरा करण्याची संधी मिळाली. टिकेरांनी कंपनीचे अध्यक्ष विवेक गोएंका ह्यांना माझ्या नावाचा प्रस्ताव पाठवला. विवेक गोएंकांनी माझ्या नावाला लगेच मंजुरी दिल्याचे त्यांचे एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी राजा राव ह्यांनी टिकेरांना आणि मला फोन करून कळवले.
ठरल्याप्रमाणे दौ-यात सहभागी होण्याच्या दृष्टीने व्हिसा, तिकीट वगैरे औपचारिकतेची पूर्तता करण्यासाठी मी दोन दिवस आधी दिल्लीस गेलो. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी मिळून आम्ही पंचवीस पत्रकार दौ-यात सहभागी झालो होतो. ह्या तीन दिवसांच्या दौ-यात पहिल्या दिवशी नरसिंह रावांना भेटण्याचा तर सोडाच त्यांची दृष्टीभेट होण्याचाही योग आला नाही. पत्रकारांना माहिती देण्याचे काम परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते प्रसाद ह्यंच्याकडे होते. चर्चेत कोणत्या विषयावर बोलणी झाली ह्याची माहिती प्रसाद हे स्वतः शेरेटन हॉटेलात खास स्थापन करण्यात आलेल्या मिडिया सेंटरमध्ये हजर होऊन देत होते. त्यानंतर बातम्या डेडलाईनच्या आधी ऑफिसला पाठवण्यासाठी आम्हा सगळ्यांची खूपच तारांबळ उडायची. मस्कतचे घड्याळ मुंबईच्या घड्याळापेक्षा अडीच तास मागे असल्यामुळे प्रत्यक्षातली साडेनऊची डेडलाईन सात वाजेवर आली!
दुस-या दिवशी नरसिंह राव ओमानमधील भारतीय उद्योपतींच्या मेळाव्यासा उपस्थित राहणार होते. त्या मेळाव्यास मात्र पत्रकारांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. त्यानुसार आम्ही सगळे पत्रकार मेळाव्यास हजर झालो. मेळाव्यात उपस्थित असलेले उद्योगपती आणि पत्रकार ह्या सा-यांनी ओळीने उभे राहून स्वतःच स्वतःचा परिचय नरसिंह रावांना करून दिला. ह्या कार्यक्रम सुरू असताना नरसिंह रावांना तेथल्या उद्योगपतींनी अडीअडचणी कथन केल्या. त्यांच्या अडीअडचणी पंतप्रधान लक्षपूर्वक ऐकून घेत होते. त्या अडचणी ऐकण्यात पत्रकारांना अर्थात रस होता. त्याहीपेक्षा पंतप्रधनांच्या प्रतिसादाकडेच पत्रकारांचे जास्त लक्ष होते. परंतु रावांचा प्रतिसाद नॉनकमिटल स्वरूपाचा होता. बोलघेवडेपणाही त्यांच्या स्वभावात नव्हता हे त्यावेळी माझ्या लगेच लक्षात आले.
परतीच्या प्रवासात मात्र ज्याची मी आतुरतेने मी वाट पाहात होतो तो प्रसंग समोर उभा राहिला. विमानाच्या मागच्या बाजूस प्रेसच्या आसनांपाशी पंतप्रधान नरसिंह येऊन उभे राहिले. क्षणभरात पत्रकारात शांतता पसरली. पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची हीच संधी असते हे सगळ्यांना माहित असते. योगायोगाने माझ्या आसनाशेजारीच आकाशवाणी प्रतिनिधीचे आसन होते. नरसिंह रावदेखील माझ्या आसनापाशी थांबताच आकाशवाणी प्रतिनिधीने पोर्टेबल टेपरेकॉर्डर ऑन केला. मी जवळच उभा असल्याने प्रश्न विचारण्याचा पहिला चान्स मीच घेतला!
ओमानच्या सुलतानांबरोबर चर्चा करताना पाकिस्तानचा, विशेषतः काश्मिरचा प्रश्न निघाला का?’
मराठीतून विचारलेला माझा प्रश्न कितपत योग्य-अयोग्य ह्याची मला कल्पना नव्हती. इम्प्रॉम्टू प्रेसकॉन्फरन्समध्ये पहिलाच प्रश्न विचारणे म्हणजे कॅरमचा स्ट्राईकर हातात घेऊन बोर्ड फोडण्यासारखे असते! प्रश्न योग्य की अयोग्य ह्याचा विचार करत बसलो तर पत्रकाराला कुठलाच प्रश्न विचारता येणार नाही. शिवाय प्रश्न विचारण्याची पुन्हा संधी मिळेल की नाही ह्याचीही शाश्वती नसते.
माझ्या प्रश्नाचे नरसिंह रावांनी मजेशीर उत्तर दिले. ते म्हणाले, असे प्रश्न चर्चेत निघत नसतात!’ थोडं थांबून ते म्हणाले, असे प्रश्न काढायचेही नसतात!’
त्यांचा सूर कमालीचा समजूतदारपणाचा होता... मुलाला एखादी गोष्ट समजावून सांगताना प्रेमळ वडिलधा-या व्यक्तीचा सूर जसा असतो तसाच सूर नरसिंह रावांचा होता. कुठेही चीडचीड नाही की अगांतुक शहाणपणाची झाक नाही. दोन देशांच्या संबंधाविषयी नेत्यांत होणा-या चर्चेचे एक महत्त्वाचे सूत्रच नरसिंह रावांनी जाता जाता सांगून टाकले! एखादा विषय काढण्याची गरज असेल तरच तो विषय काढायचा असतो. अन्यथा तो काढायचाही नसतो हेच त्यांनी मला हसत हसत सांगितले.
माझा प्रश्न मराठीत असल्यामुळे आकाशवाणीच्या प्रतिनिधीखेरीज तो कुणालाही समजला नाही. रावांनी माझ्या प्रश्नाला काय उत्तर दिले हे तर मुळीच समजले नाही. पत्रकारांत सुरू झालेली कुजबूज थांबली आणि नरसिंह रावांनी अनेक पत्रकारांच्या प्रश्नाला जवळ जवळ १० मिनीटे उत्तरे दिली. नरसिंह राव निघून गेल्यानंतर मी काय प्रश्न विचारला हे जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी माझा पिच्छा पुरवला. त्यावर त्यांनी  काय उत्तर दिले हेही सगळ्यांनाच जाणून घ्यायचे होते. नरसिंह रावांनी दिलले उत्तर थेराटिकल असल्याचे लक्षात आल्यावर पत्रकारांनी माझा पिच्छा सोडला!
ऑफिसमध्ये रुजू झाल्यावर नरसिंह रावांचे निर्णय, त्यांनी केलेली वक्तव्ये ह्यावर मी अनेकदा अग्रलेख लिहले. दिल्लीचे पत्रकार नरसिंह रावांना मौनी हे विशेषण लावायचे. मीही एकदोनदा नरसिंह रावांना मौनमूर्ती हे विशेषण लावले, माझे सहकारी शरद कारखानीस ह्यांनीही नरसिंह रावांना मौनभूषण हे विशेषण लावण्यास सुरूवात केली! एके दिवशी टिकेकरांना नरसिंह रावांचे खासगी सचिव राम खांडेकर ह्यांचा फोन आला. त्यांचे फोनवर काय बोलणे झाले मला कळले नाही. टिकेकरांनी मला फक्त एवढेच सांगितले की तुम्ही लावलेले मौनमूर्ती हे विशेषण नरसिंह रावांना बहुतेक आवडले नसावे. पुन्हा जेव्हा नरसिंह रावांच्या कुठल्या तरी निर्णयावर अग्रलेख लिहण्याची पाळी माझ्यावर आली तेव्हा मी अग्रलेखाचे सुरूवीतीचेच वाक्य लिहले,योगशास्त्रात मौन दोन प्रकारचे असते. एक आकारमौन आणि दुसरे काष्ठमौन! आकारमौनाचा अर्थ असा की मनात बोलायचे तर खूप आहे पण ते ओठांवर येऊ द्यायचे नाही. काष्ठमौनाचा अर्थ असा की मनात बोलायचे काहीच नसते. तेव्हा ते ओठांवर येण्याचा प्रश्नच नाही. नरसिंह रावांचे मौन हे काष्ठमौन आहे!‘ त्यानंतर पुढे वेगवेगळे मुद्दे लिहून मी अग्रलेखाचा शेवट केला.
नरसिंह रावांच्या स्वभावात रागाचा लवलेश नव्हता. वचा वचा बोलत राहण्याचाही त्यांचा स्वभाव नव्हता! जास्त बोलल्याने कार्यनाश होतो असे अनुभवान्ती त्यांचे मत झाले होते. त्यांचे स्वीय सचिव राम खांडेकरांनी लोकसत्तेत २०१८ साली लेखमाला लिहीली होती. ती खूपच आवडली हे कळवण्यासाठी राम खांडेकरांना मी ईमेल पाठवला. त्यात एका मेलमध्ये मी त्यांनी टिकेकरांना केलेल्या फोनचा विषय काढला. त्यावर खांडेकरांनी मला उत्तर पाठवले, नरसिंह रावसाहेबांना मी लावलेल्या मौनमूर्ती विशेषणाचा मुळीच राग आला नव्हता. फक्त कार्यनाश होऊ नये ह्या दृष्टीने कमीत कमी बोलण्याचा त्यांचा स्वभाव होता.
खांडेकरांच्या उत्तराने माझे समाधान झाले. एका पत्रात खांडेकरांनी दिल्लीतल्या पेड पत्रकारितेचाही उल्लेख केला. नरसिंह राव, यशवंतराव चव्हाण ह्यासारखे अनेक कर्तबगार नेते पेड पत्रकारितेचे शिकार झाल्याचे  मत खांडकरांनी मला लिहलेल्या एका पत्रात व्यक्त केले. राजधानीत काम करणारे पत्रकार म्हणजे काय चीज आहे हे स्पष्टपणे सांगणारी खांडेकरांइतकी दुसरी अधिकारी व्यक्ती मला तरी दिसत नाही.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

Tuesday, June 23, 2020

गलवानचे अंतिम सत्य

अधिकारी स्तरावर पुन्हा सुरू झालेल्या भारत-चीन चर्चेत चीनी अधिकारी ठार झाल्याचे चीनने मान्य केले आहे. म्हणून भारताने फुशारून जाण्याचे कारण नाही. अक्साई चीन किंवा अरूणाचलवरील मालकीचा दावा आणि डोकलामवरील ताबा चीनने सोडून दिलेला नाही. सोडूनही देणार नाही. भारत-चीन मैत्रीच्या संबंधात आपण भव्यदिव्य घडवून आणत आहोत हया मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी धोरणाच्या फुग्याला चीनने टाचणी लावली आहे. अर्थात ह्यात नवे असे चीनने काही केले नाही. असेच प्रकार चीन नेहमीच करत आला आहे. नेहरूंच्या काळात हिंदीचीनी भाईचे नारे लगावले जात असताना १९६३ साली चीनने आक्रमण केले. आक्रमणापेक्षाही त्यात भारताला बेसावध ठेऊन युध्दखोरी करण्याचा भाग त्यात अधिक होता. त्यावेळी चीनने एकतर्फी युध्दविराम जाहीर केला होता. युध्दचा पवित्रा चीनने सोडून दिला  खरा! पण  भारतामागे कायमस्वरूपी सीमातंट्याची भुणभुण मात्र चीनने लावून दिली!
त्यावेळी भारताबरोबरचा सीमातंटा उकरून काढण्यामागे पंडित जवाहरलाल नेहरूंचे जागतिक राजकारणात वाढत चाललेले वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न होता तर ह्यावेळी अक्साई चीनचा भाग असलेल्या गलवानच्या निमित्ताने सीमातंचा उकरून काढण्यामागे आशियाई राजकारणात भारताचे महत्त्व वाढू द्यायचे नाही हाच उद्देश आहे. शिवाय आशियाखंडात व्यापारविस्तार करण्याच्या मार्गातील एक एक अडथळा दूर करण्याचाही हेतू आहे! व्यापारविस्तारासाठी रस्तेबांधणी आवश्यक आहे. डोकलाम भागातील रस्तेबांधणी हादेखील चीनच्या व्यापारविस्ताराचाच एक भाग होता. आता गलवान भागातील घुसखोरीमागेही भारताच्या रस्तेबांधणीला अडथळा उत्पन्न करण्याचा भाग आहे.  हा अडथळा उत्पन्न केला की चीनला पाकिस्तान, चीन आणि भारत ह्या तिन्ही देशांच्या सीमेवर सहज पोहचणे सुलभ जाऊ शकते. आणि सीमा सहजपणे ओलांडणेही सोपे ठरते. चीनी माल विनाअडथळा युरोपमध्ये पोहचवणे हेच चिनचे अंतिम लक्ष्य आहे. ते जोपर्यंत दृष्टीपथाच येत नाही तोपर्यंत चीन स्वस्थ बसणार नाही. हे गळवण प्रकरणाचे अंतिम सत्य आहे.
अक्साई चीनची सीमा धगधगती ठेवण्यामागे चीनचा आणखी एक उददेश आहे. कसेही करून ट्रंप आणि मोदी ह्यांच्यात जुळलत चाललेले सूत विसकटून टाकून पॅसिफिक शांतता करारन्वये आकारास येणा-या भारताच्या सहभागात अडथळा उत्पन्न करणे! मोदी सरकारच्या बहुधा हे ध्यानात आले असावे. म्हणूनच चीनी नेत्यांशी बोलणी करण्यासाठी राजनाथसिंग रशियाला निघाले. रशियाला जाण्याचा निर्णय रातोरात घेण्यमागे रशियाशी असलेल्या भारताच्या संबंधांचे पुनर्ज्जीवन करण्याची तेवढीच संधी. चीनी नेत्यांबरोबर बोलणी करताना रशिया सोबतीला असलेला बरा! नाही म्हटले तरी वेळेवर आणि हुकमी शस्त्रपुरवठ्यासाठी ज्याच्यावर विसंबून राहावे असा मित्र भारताला नाही.
भारत-अमेरिका संबध, चीनी समुद्रातअधुनमधून डोके वर काढणारी चीन-जपान संघर्ष, अमेरिका-जपान संबंध, पॅसिफिक करार, डोकलामधल्या हालचाली, गलवानमध्ये नुकताच झालेला गोळीबार ह्या घटना वेगवेगळ्या आहेत.  आशियाई राजकारणाच्या दृष्टीने ह्या सा-या घटानांकडे जसे स्वतंत्रररीत्या पाहता येते तसे एकत्रितरीत्याही पाहता येते. स्वतंत्ररीत्या पाहिल्यास ह्या घटनांचा एकमेकांचा संबंध जोडता येणार नाही. आशियाई राजकारणाच्या दृष्टीने पाहिल्यास चीनचे विस्तारवादी राजकारण आणि व्यापार-कारण हे प्रकर्षाने जाणवल्याखेरीज राहात नाही. ते परराष्ट्र खात्यालाही जाणवलेही असेल. पण त्याचे प्रतितिबिंब नेत्यांच्या भाषणात पडलेले दिसत नाही.
चीनने गलवानमध्ये घुसखोरी केली नाही किंवा आपला लष्करी तळ ताब्यात घेतला नाही, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी विरोधकांच्या बैठकीत केले होते. तसेच भारताची एक इंच भूमीदेखील गमावणार नाही असे जाहीर विधान त्यांनी केले होते. ह्या दोन्ही विधानांमुळे काय साध्य झाले असेल तर ते एवढेच की गलवान खो-यावर हक्क सांगणा-या भूमिकेचा पुनरूच्चार करण्याची संधी चीनला मिळाली. गलवान खो-यावरील चीनच्या हक्कामुळे अक्साई चीनवरील भारताच्या मालकीहक्काला छेद बसतो. पंतप्रधान मोदींनी ठोकून देतो ऐसा जे वक्तव्य केले नसते तर गलवानसंबंधी पूर्वीचाच दावा पुन्हा करण्याची संधी चीनला मिळाली नसती, हा माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांचा मुद्दा निश्चितपणे महत्त्वाचा आहे. मनमोहनसिंगांच्या ह्या मुद्द्यावर नेमके भाष्य न करता मनमोहनसिंगाच्या काळात ६०० वेळा चीनने भारतीय सीमेत आक्रमण केले होते अशी मोलाची माहिती पुरवण्या भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा ह्यांनी धन्यता मानली! मनमोहनसिंगाच्या प्रतिक्रियेवर उताविळ भाष्य  करण्यापेक्षा परराष्ट्र खात्यातील अधिकार-यांशी चर्चा करण्याचा मार्ग नड्ड्नी पत्करला असता त्यांच्या परराष्ट्र धोरणविषयक ज्ञानात भर पडली असती!  कुरापतखोरी हा चीनचा खाक्या आहे हे भाजपा सरकारच्या अजूनही लक्षात आलेले नाही हे दुर्दैव!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

Sunday, June 21, 2020

ब्रह्मविद्यां योगशास्त्रे


योगशास्त्रावरील सर्वोत्तम ग्रंथ कोणता असा प्रश्न कुणी विचारला तर त्या प्रश्नाचे उत्तर पतंजली योगसूत्र असे बहुतेक योगमतानुयायी देतील. गोरक्षनाथ वगैरैच्या पुस्तकांची नावेही कुणी सांगतील. रूढ अर्थाने ते बरोबरही आहे. भगवद्गीतेतील अठराच्या अठरा अध्यायाच्या समाप्तीनंतर जी पुष्पिका दिलेली आहे. ती पुष्पिका अशीः ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्यु ब्रम्हविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे -----नाम ....अध्यायः ह्या शब्दरचनेत अध्याय क्रमांक आणि त्या अध्यायाचे नाव समाविष्ट करण्यात आलेले आहे. गीतेचे मुद्रण करणा-या कुठल्याही मुद्रकाने वा संपादकाने पुष्पिका वगळलेल्या नाही! पुष्पिकेत श्रीकृष्णार्जुन संवाद हा गीतेच्या मुख्य विषयाचा क्रम पहिला आहे. संवादात आलेल्या वेगवेगळ्या प्रश्नोत्त्तरानुसार अध्यायांना वेगवेगळी नावे देण्यात आली असून ती अत्यंत समर्पक आहेत. तरीही महत्त्वाचा मुद्दा असा की नैराश्यातून ऐन वेळी अर्जुनाला आलेले खोटे वैराग्य घालवण्याच्या दृष्टीने केलेला प्रयत्नात योगेश्वर कृष्णाला शंभऱ टक्के यश मिळाले आणि युध्द करण्यास अर्जून प्रवृत्त झाला. श्रीकृष्णाने केलेल्या युक्तिवादाला ब्रह्मविद्येअन्तर्गतल्या योगशास्त्राचा आधार आहे.
कोणते आहे ते ब्रह्मविद्येतले योगशास्त्र? थोडक्यात सांगायचे तर ईश्वरी शक्तींशी युक्त होणे हा अध्यात्म विद्येतील योगशास्त्राचा गाभा आहे.
सातशे श्लोकांच्या गीतेत धृतराष्ट्राच्या तोंडी १ तर संजयच्या तोंडी ४१ श्लोक आहेत. अर्जुनाच्या तोंडी ८४ तर श्रीकृष्णाच्या तोंडी ५७४ श्लोक आहेत. वरवर ही माहिती सामान्य वाटली तरी ती तितकी सामान्य मुळीच नाही. अदिती जमखंडीकरांनी गीताप्रश्नोत्तरी ह्या छोटेखानी पुस्तकात ती दिली आहे. गीतेचा उपदेश शिष्य झालेल्या अर्जुनाला केला असला तरी तो सामान्य माणसाचे शंकासमाधान करणारा आहे. ज्ञानेश्वरीतील स्वदेहा नाव अर्जुनु परदेहा नाव स्वजनु ह्या चरणाचा अर्थही नेमका हाच आहे.
ज्ञानेश्वरांना योगमार्गाची दीक्षा नाथ परंपरेने मिळाली होती. आदिनाथ, मत्यस्येंद्रनाथ, गोरक्षनाथ गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथ अशी संक्षेपात त्यांची गुरूपंरपरा आहे परंपरेचा हा उल्लेख ज्ञानेश्वरांनी अठराव्या अध्यायात केला आहे. पैठण येथील ब्रह्मवृंदांच्या पीठाकडून शुध्दिपत्र मिळालेले असूनही तीव्र अनुतापें करावे भजन। गो खर आणि श्वान वंदुनियांह्या आदेशानुसार आयुष्य व्यतित करायचे चौघा भावंडांनी पैठणमधून बाहेर पडतानाच ठरवले. त्यानुसार त्यांनी आयुष्याची वाटचाल सुरू केली. परत येताना नेवासे येथे आल्यावर निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना गीतेच्या भावार्थाचे विवेचन करण्याचा आदेश दिला. त्यातूनच ९ हजार ओव्यांचा भावार्थदीपिका हा ग्रंथराज सिध्द झाला. 
मूळ गीतेत ७०० श्लोकच असताना ज्ञानेश्र्वरांनी गीतार्थांचा विस्तार ९००० हजार ओव्यात का केला असावा?  ह्याचे साधे कारण नाथपरंरेतून त्यांना मिळालेल्या अमाप समाधीधनाशी गीतेची भूमिका मिळतीजुळती होती ! तांत्रिकदृष्ट्या पाहिल्यास गीतेतला फक्त सहावा अध्याय योगावर आहे. ह्या अध्यायात श्रीकृष्णाने स्वतःहून योग म्हणजे काय ते समजावून दिले. अर्जुनाने विचारलेल्या शंकांचे समाधानही केले आहे. सहाव्या अध्यायातील २७ शलोकांचा ४९४ ओव्यात विस्तार करताना ज्ञानेश्वरांच्या रसवंतीला बहर आला. अनेक अध्यायावरील विवेचन त्यांनी थोडक्यात आटोपते घेतले. ज्ञानेश्वर असे मानतात की गीता ही कांडत्रयिणी आहे. ज्ञानकांड, कर्मकांड आणि ईश्वरकांड हीच ती तीन सुप्रसिध्द कांडे! ज्ञानेश्वरांच्या मते, नवव्या अध्यायात गीतेचा प्रतिपाद्य विषय संपला. मग पुढचे अध्याय कां असा प्रश्न पडतो!
त्या प्रश्नांची उत्तरे योगसामर्थ्य प्राप्त करून घेत असताना आणि घेतल्यानंतरही योग्यांना मिळावी म्हणून पुढचे अध्याय लिहलेले असावेत असे वाटते. योगभूमिकेवर आरूढ होण्यापूर्वी आणि आरूढ झाल्यानंतर योग्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. योगी आपल्या मूळ प्रवृत्तींच्या आहारी जाण्याचा धोका असतो. तो धोका टाळण्यासाठी विशेष गुणसंपत्तीची गरज असते. त्या गुणसंपत्तीचे विवेचन करण्यासाठी १० पासून १७ पर्यंतच्या अध्यायांची रचना झाली आहे. ह्या अध्यायांचे स्वरूप नवव्या अध्यायातील श्लोकांची पुरवणी म्हटली तरी चालेल.  त्यांचे स्वरूप appendix  सारखे -– पुरवणीसारखे-- आहे. योगभूमीरूढ आरूढ होऊ इच्छिणा-यांच्या दृष्टीने हे अध्याय महत्त्वाचे आहेत.  भक्तु तोचि योगीवगैरेंनी कुणाचेही शंकासमाधान व्हावे अशा काही मार्मिक ओव्या जागोजाग विखुरल्या आहेत. योगसाधना काळात त्या ओव्या मार्गदर्शक ठरू शकतात. शेवटी गुरूरूपी ईश्वरच योग्यांचा योग सिध्दीस नेतो असा महत्त्वाचा सिध्दान्त ज्ञानेश्वरांनी मांडला आहे. एरव्ही दांभिकपणाखेरीज काही साध्य होत नाही   असे ज्ञानेश्वरांना वाटत असले पाहिजे. योगयाग विधी तेणे नोहे सिध्दी वायाचि उपाधी दंभ असा स्पष्ट इशारा त्यांनी हरिपाठाच्या अभंगात दिला आहे.
ज्ञानेश्वरीचे पारायण हे समूह शिक्षणाचे अतिशय महत्त्वाचे आहे. वारकरी शिक्षणसंस्थेत ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, नामदेव गाधा आणि एकनाथी भागवत ह्या चार ग्रंथांच्या अभ्यासास अतिशय महत्त्व आहे. शिक्षणानंतर पंढरपुरची वारी आलीच! विठ्ठलमूर्ती ही उभी असली तरी ती योग प्रकारातील आहे असे मूर्तीशास्त्राचे मत आहे. शंकराचार्यांनी तर पंढरपूरला योगपीठच संबोधले आहे. अहंता आणि ममता सोडल्याखेरीज योगाची प्राप्ती नाही असा स्पष्ट आशय ज्ञानेश्वरांना अभिप्रेत आहे. ज्ञानेश्वरांना संपूर्ण ईश्वरनिष्ठा अभिप्रेत आहेच. नुसत्या गुरूस्मरणाने बैसता क्षणी समाधीस्थिती प्राप्त होते असे त्यांनी सहाव्या अध्यायातील एका ओवीत म्हटले आहे.
ह्याचाच अर्थ गुरूकृपेखेरीच योगाचा खटाटोप व्यर्थ ठरतो असे संतांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक शतकात गुरूसंस्थेला जितकी महती प्राप्त झाली तितकीच ती बदनामही झाली. परंतु ती संपूर्ण लुप्त कधीच झाली नाही. तुकाराममहाराजांना बाबाजी चैतन्यांनी स्वप्नात अनुग्रह दिला. नामदेवांना विसोबा खेचरांनी दीक्षा दिली तर मुक्ताईंनी चांगदेवांना दीक्षा दिली. ज्ञानेवरांना मिळाली तशी दीक्षा आधुनिक काळातही अनेकांना मिळाली. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, नारायणतीर्थांसारख्यांनी त्याच प्रकारची दीक्षा अनेकांना दिली. अक्कलकोट स्वामी, साईबाबा, गजाननमहाराज, शंकरमहाराज अशी सिध्दयोग्यांची अनेक उदाहरणे आहेत. स्वरूपानंद, गुळवणीमहाराज इत्यादि अलीकडची उदाहरणे आहेत. जोगमहाराज, बंकटस्वामी, मामासाहेब दांडेकर, निवृत्तीबुवा देशमुख, स. के. नेऊरगावकर ह्या सगळ्यांना ज्ञानेश्वरांच्या परंपरेतील दीक्षा मिळाली होती. योगानंदांनाही अशीच दीक्षा मिळाली. योगानंदांनी वर्धा मुक्कामी गांधींजींना स्वतः योगमार्गाची दीक्षा दिली.
फार पुरातन काळापासून भारतात सुरू झालेला योगाचा प्रवाह अजूनही अखंड सुरू आहे. बाबा रामदेवांचा योग हा फक्त हटयोगावर आधारित आहे. स्वास्थ्यलाभ हा त्यांच्या योगपध्दतीचा फायदा म्हणता येईल. आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवणारे श्रीश्री रविशंकर ह्यांचा शिष्य परिवार मोठा आहे. योगदिनानिमित्त सुचलेले विचार मी ह्या लेखात मांडले आहे. ब-याचशा गोष्टींचा ह्यात समावेश झालेला नाही ह्याची मला जाणीव आहे.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

Wednesday, June 17, 2020

सहेतूक गोळीबार


हिंदी-चिनी सैनिकात लडाख सीमेवरील गलवन भागात झडलेल्या गोळीबाराच्या फैरीत आपल्या लष्कराचा एक कर्नल आणि २ सैनिक ठार झाले. ठार झालेल्यांचा आकडा कमीजास्त असू शकतो. ह्या गोळीबारात चीनी सैनिकही ठार झाले. कोणाचे किती सैनिक ठार झाले हा मुळी महत्त्वाचा मुद्दा नाहीच. गलवन भागात शांतता राखण्याच्या संदर्भात दोन्ही देशात मेजर जनरल पातळीवर चर्चा झाल्या. चर्चेत ठरल्यानुसार चीनी सैनिक थोड मागेही हटलेही. गेल्या ७५ वर्षांत भारत-चीन सीमेवर गोळीबार केला जाण्याची ही पहिलीच घटना आहे. सीमेवर असे काय घडले की ज्यामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांत परस्परांवर गोळीबार करण्याची वेळ यावी? भारत-चीन सीमा सुमारे ४ हजार किलोमीटर्स लांबीची आहे. भारत-पाकिस्तान-चीन ह्यांच्या सीमा या फक्त ७६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या सियाचीन ट्राय-जंक्शनला येऊन मिळतात. ह्यापूर्वी भूतानला लागून असलेल्या डोकलाम परिसरात चीनने रस्ता बांधायला घेतला होता. रस्ता बांधण्याच्या कामी सहकार्य देण्यास  भारताने नकार दिला होता. रस्त्याच्या बाबतीत भारताने चीनला सहकार्य देण्याऐवजी हिमालय परिसरात केदारनाथजवळून जाणारा रस्ता बांधण्याचे काम भारताने सुरू केले. ह्या रस्त्यात गौरीकुंड होत्याचे नव्हते झाले! हा रस्ता चीनहून थेट युरोपला जाणा-या रस्त्याला जाऊन मिळणार आहे म्हणे!
युरोपच्या बाजारपेठेत आपला माल पाठवता यावा म्हणून रस्ते बांधण्याचे चीनने मनावर घेतले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप ह्यांच्या अमेरिका फर्स्टधोरणाचा चीन-अमेरिका व्यापारावर विपरीत परिणाम झाला. अमेरिकेच्या धोरणाची चीनला झळ बसू नये म्हणून दक्षिण आशियाई व्यापार धोरणात आमूलाग्र बदल घडवून आणला. नेपाळ, श्रीलंका, माले आणि पाकिस्तान ह्या भारताच्या शेजारी देशांशी आर्थिकव्यापारी आणि राजकीय संबंध नव्याने प्रस्थापित करण्याचा जोरदार प्रयत्न चीनने चालवला आहे. मालेमध्ये सत्ता बदलताच चीनच्या नादी न लागण्याचे मालेने ठरवले. ह्याउलट नेपाळने प्राचीन काळापासून चालत असलेले भारताचे संबंध बाजूला सारून भारताबरोबर सीमातंटा उपस्थित केला. भारताच्या ताब्यात असलेल्या कालापानी, लिपुलेख आणि लिंफीयादुरा  या ३९७ चौ.किमीच्या 'ट्राय-जंक्शन' भूभागावर नेपाळने अवैध दावा केला आहे. नेपाळला चीनची फूस आहे  हे उघड आहे
भारतानेही लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देऊन पूर्व लडाख भागात लष्करी वाहनांना जाणअयायेण्सोयाच्या दृष्टीने  सोयिस्कर ठरतील असे रस्ते बांधण्याचा  कार्यक्रम हाती घेतला. भारताच्या ह्या कार्यक्रमात व्यत्यय आणणे हा चीनचा उद्देश असू शकतो. त्याखेरीज दक्षिण आशियात राजकीय आणि आर्थिक वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेत खोडा घालणे हाही चीनचा सरळ सरळ हेतू आहेच. दक्षिण आशियातील वर्चस्वामुळे वृध्दिंगत होणारे भारत-अमेरिका संबंघांनाही थोडेफार बळ प्राप्त होणार आणि हेच नेमके चीनला नको आहे. काही वर्षांपूर्वी भारत-अमेरिका ह्यांच्यात झालेला पॅसिफिक करारही चीनच्या नजरेतून सुटलेला नाही.
१९६२ साली झालेल्या भारत-चीन सीमायुद्धाची दोन्ही देशातल्या नेत्यांची आठवण पुसली गेली असली तरी जनमानसातली आठवण मात्र अजूनही  पुसली गेलली नाही! दोन्ही देशात युद्ध  सुरू होण्यापूर्वी  भारत चीन मैत्रीचे नारे लावले जात होते. खुद्द पं. नेहरू आणि चौ एन लाय ह्या दोघांच्या वैयक्तिक संबंधांबद्दलही त्या काळात खूपच गाजावाजा झाला होता! जगभऱातल्या अनेक देशाशी व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनीअनेक देशांचे दौरे केले.चीनचाही तीन वेळा दौरा केला. त्या दौ-यात आणि जागतिक संघटनांच्या निरनिराळ्या बैठकीनिमित्त  भाग घेण्याच्या निमित्ताने चीनी नेते क्षी ह्यांची मोदींनी जवळ जवळ १८ वेळा भेट घेतली! क्षी ह्यांच्याशी वैयक्तिक संबंध निर्माण करण्यासाठी असलेले आणि नसलेले सारे कौशल्य मोदींनी पणाला लावले. क्षींसमवेत झोपाळ्यावर बसून हिंदोळे घेतले. दक्षिणेत क्षींच्या मुक्कामांची सोय करून त्यांच्यासमवेत काही तास घालवले. परंतु क्षींबरोबरच्या वैयक्तिक संबंधांचे फळ काय? गलवन भागात गोळीबार! नेहरूंनी जागतिक  राजकारणात हिरीरीने भाग घेतला. सोविएत रशिया किंवा अमेरिकेच्या कळपात सामील न होता तटस्थ राष्ट्रांचा वेगळा  गट स्थापन केला. कितीतरी देशांशी परस्पर आर्थिक, सांस्कृतिक व्यापारी मैत्रीचे करार नेहरूंच्या काळात भारताने केले. त्या करारांचे यशापयश जोखण्याचा मुद्दा वेगळा! रशिया, क्युबा किंवा पॅलेस्टाईनच्या नेत्यांबरोबर वैयक्तिक संबंध निर्माण करण्यात इंदिराजीही कमालीच्या यशस्वी झाल्या. ह्या दोघांशी पंतप्रधान मोदी बरोबरी करू शकतील का असा प्रश्न विचारल्यास वावगे ठरणार नाही. लडाख सीमेवर झालेल्या गोळीबारामुळे परिस्थिती चिघळत जाऊन त्याची परिणती थेट भारतचीन युद्धात  होईल असे नाही. चीनलाही भारताबरोबर सध्या तरी युध्द कुठेहवे आहे ? कोरोनाशी झुंजत असलेल्या भारताला सहज जाता जाता चिमटा काढावा एवढाच माफक उद्देश चीनचा असू शकतो. कोरोना प्रकरणावरून चीनच्या विरोधात जागतिक लोकमत तयार होत असताना चीनविरोधी आवाज उठवण्याच्या भानगडीत भारताने पडू नये असा जणू इशारा तर  भारताला चीनने दिला नसेल?
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

Saturday, June 13, 2020

कोरोना संकट देशाचे!

कोरोनाचा प्रादुर्भावाने समूह संसर्गाची पातळी गाठली आहे का? देशातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मते कोरोना प्रादुर्भावाने जवळ जवळ समूह संकटाची पातळी गाठली आहे तर इंडियन मेडिकल कौन्सिल फॉर रिसर्च ह्या संस्थेच्या मते कोरोना प्रादुर्भावाने अद्याप समूह संसर्गाची पातळी गाठलेली नाही. थोडक्यात, देशातील कोरोना रूग्णांची संख्या ३ लाखांच्यावर गेली असून गेल्या २४ तासात कोरोनाबाधितांची संख्या साडेअकरा हजारांच्या घरात गेली! ही वस्तुस्थिती पाहता देशात कोरोनाची साथ आली आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. ज्येष्ठ डॉक्टरांत मतभेद होणे ह्यात नवे काही नाही. ब्रिटिश काळात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे जिल्हाधिका-यांनी जाहीर केल्याखेरीज साथीच्या रोगावर प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत नसे. त्याही काळी सिव्हिल सर्जन आणि गावातले विख्यात डॉक्टर्स ह्यांच्यात मतभेद होत असतच. अर्थात सिव्हिल सर्जनशी सल्लामसलत केल्याखेरीज साथ आल्याचे जिल्हाधिकारी सहसा जाहीर करत नसत. हीच पध्दत स्वातंत्र्याच्या पहिल्या १० वर्षात सुरू होती. साथीच्या रोगाच्या बाबतीत सरकारी यंत्रणेत नेहमी पाळला जाणारा संकेत पाळण्यात आल्याचे काही दिसले नाही. सगळे काही दिल्लीतून हाताळले जात असल्याचे चित्र दिसले. एवढ्या मोठ्या खंडप्राय देशाला हे चित्र शोभत नाही. डॉक्टर मंडळीत आणि इंडियन मेडिकल कौन्सिल फॉर रिसर्च ह्या संस्थेचा कारभार सुरू झाल्यानंतर साथीच्या रोगाच्या संदर्भात काही निश्चित धोरण ठरले असेल असे वाटत नाही. विशेषतः दैनंदिन प्रेसब्रीफिंगमध्ये भारतातली रूग्णसंख्या अन्य देशांच्या तुलनेने कशी कमी ह्यावरच भर दिला जात होता. कोविड-१९ च्या बाबतीतल्या धोरणावर जागतिक आरोग्य संघटनेकडून जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशांचीच छाप पडलेली दिसत होती. भारतात दिली जाणारी मलेरियाची औषधे कोरोनावर चालणारा नाही असे जाहीर करणा-या जागतिक आरोग्य संघटनेने मागाहून ती औषधे चालतील असे जाहीर झाला. भारतानेही तो सहर्ष जाहीर केला. रूग्णांवर इलाज करताना रूग्णाला लौकरात लौकर आराम कसा पडेल हेच लक्ष्य खासगी डॉक्टर्स डोळ्यांसमोर ठेवतात. वेगवेगळी औषधे ‘ट्रायल अँड एरर’ तत्त्वावर द्यायला मागेपुढे पाहात नाही. फक्त केस दगावता नये हे पाहिले की पुरे असाच बहुसंख्य डॉक्टरांचा दृष्टिकोन असून त्यात गैर काहीच नाही. कोरोनाच्या बाबतीत अनेक डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या प्रोटोकॉलचा वापर केला असेही गृहित धरण्याचे कारण नाही. एक मात्र खरे की कोरोनामुळे मृत्यू चालेल, पण रोजच्या जेवणाची आबाळ झाल्याने येणारा मृत्यू नको हा विचार बळावला. म्हणूच तीन वेळा लॉक़डाऊन जाहीर केल्यानंतर शेवटी केंद्र सरकारला आणि अनेक राज्य सरकारांना अन्लॉक-१ चा प्रयोग सुरू करावा लागला. १० टक्के कर्मचा-यांचा रोजगार सुरू झाली तरी अर्थव्यवस्था सावरण्यास मदत होईल हा अन्लॉकमागील विचार स्तुत्यच आहे. परंतु अर्थव्यवस्था कोसळू न देण्यात सरकारला यश येईल का? लॉकडाऊन्स फज्जा उडाल्याची दृश्ये लाखो लोकांनी वृत्तवाहिन्यांवर पाहिली. अन्लॉक-१ नंतरचे चित्रही फारसे उत्साहवर्धक नाही. मास्क किंवा रक्षित अंतराचा नियम पाळताना लोक दिसत नाहीत. कामावर जाण्यायेण्यासाठी वाहतुकीची साधन नाहीच. अनेक दुकाने सुरू झाली तरी त्यात अमुक एक जिन्नस मिळेल ह्याची खात्री नाही. दुकानांची ही स्थिती तर कारखानदारीची स्थिती कशी असेल ह्याची कल्पना केलेली बरी. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पुन्हा लॉकडाऊन घोषित व्हायला वेळ लागणार नाही असेच बहुतेकांना वाटते. कदाचित अधिकृत लॉकडाऊन जाहीर होणारही नाही. वेळोवेळी नियम बदलण्याचा स्थानिक प्रशसनास प्राप्त झालेल्या अधिकाराचा उपयोग करून स्थानिक दुकाने आणि लहानमोठे युनिटस् बंद करायला लावली जाऊ शकतात! कोराना संकटाचा बाऊ करून मागचापुढचा विचार न करता केंद्र सरकारने धडाधड लॉकडाऊनच्या घोषणा केल्या. दुस-या तिस-या लॉकडाऊनच्या वेळी विरोधी नेत्यांशी आणि राज्य सरकारांशी चर्चा केली तरी सरकारचा एककल्लीपणा लपून राहिला नाही. अशाच प्रकारची चर्चा जिल्हा स्तरावर मात्र झाल्या नाही. वास्तविक व्यापारी-दुकानदार ह्यांच्या बैठका जिल्हा कलेक्टरांना घेता आल्या असत्या. पण तशा बैठका एकाही जिल्ह्यात झाल्या नाही. झाले ते वेगळेच! कोरोनाचे काळे ढग आकाशात फिरत असूनही मध्यप्रदेशातले काँग्रेस सरकार भाजपाने पाडलेच. राजस्थान आणि महाराष्ट्रातील सरकारे पाडून आपली सरकारे आणण्याच्या दृष्टीने भाजपाचे राजकारण सुरू आहे. भाजपा सरकारच्या कार्यकाळास एक वर्षे पूर्ण झाले म्हणून जल्लोष केला नाही हे खरे, पण बिहारमध्ये आभासी सभा घेतल्या. कोरोना उपचारावर अधिक सखोल विचार करण्यासाठी डॉक्टरांबरोबर एखादी आभासी बैठक घेण्याचे मात्र केंद्र सरकारला सुचले नाही. फक्त केंद्राचे पथक पाठवले की काम संपले अशी केंद्राची समजूत दिसते. शंभर रुपये मोजून मास्क विकत घ्या आणि सॅनिटायझर्स खरेदी करा, सुरक्षित अंतर ठेवा अशा घोषणा करण्याखेरीज सरकारने कुठले पाऊल उचलले? मजुरांसाठी रेल्वे गाड्या सोडल्या हे खरे, पण सरकारचे फुकट खायला तयार नसलेले असंख्य स्वाभिमानी मजूर चालत गावी निघाल्यानंतर! हे सगळे पाहिल्यानंतर कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत असताना तो आटोक्यात आणण्याचे तंत्र सरकारला सापडले का ह्याबद्दल संशय वाटू लागलो. आता तर वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा स्वतःचा भिन्न अंदाज व्यक्त करण्याइतके खासगी डॉक्टर धीट झाले आहेत! खासगी डॉक्टर्स आणि मेडिल रिसर्चचे डॉक्टर्स ह्यांच्यात मतैक्य झाले पाहिजे असे मुळीच म्हणावयाचे नाही. परंतु देशातल्या आरोग्याच्या हिताचे दृष्टीने सरकारी आणि बिगरसरकारी डॉक्टर ह्यांच्यात किमान बाबींवर मतैक्य व्हावे एवढीच अपेक्षा! कोरोना हे देशाचे संकट आहे, एकट्या सरकारचे नाही.

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार

अत्रेसाहेबांना अभिवादन!

दि. १३ जून हा माझ्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा दिवस! १३ जून १९६९ रोजी रोजी आचार्य अत्रे ह्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. योगयोगाचा भाग असा की १३ जून १९६८ रोजी मी मराठात रूजू झाला. १३ जून ६८ ते १३ जून ६९ ह्या वर्षांत महापुरूषांच्या सावलीत सुखनैव वावरण्याचे भाग्य मला मिळाले. हे भाग्य मला मिळाले नसते तर कदाचित् दिशाहीन आयुष्यात मी भरकटत गेलो असतो. पण नियतीला माझे भरकटणे मान्य नसावे.
पत्रकारितेचे धडे गिरवण्याची मोठी संधी मला मराठात मिळाली. ती संधी मिळण्यासाठी मला करावी लागलेली वाटचाल मुळीच सोपी नव्हती. पत्रकारितेचा पूर्वानुभव नसल्यामुळे मी ट्रायल बेसिसवर काम करावे असे मराठाचे मॅनेजिंग डायरेक्टर व्यंकटेश पै ह्यांनी मला सुचवले. खरे तर, मी महाविद्यालयात असतानाच माझे लिखाण महाराष्ट्र टाईम्स’, ‘नवयुगदिवाळी अंक, ‘सोबत’, ‘हंस-मोहिनीइत्यादि नियतकालिकात प्रसिध्द झाले होते. स्मॉल कॉजेस कोर्टात मी तर्जुमाकार आणि दुभाषा पदावर काम करून माझ्या व्यावहारिक अनुभवातून तंटेबखेडे कसे उद्भवतात हे मला प्रत्यक्षच पाहायला मिळाले. पत्रकारितेच्या दृष्टीने हाही अनुभव मोलाचा होता. माझा  सगळा अनुभव बाजूला सारून ट्रायल बेसिसवर काम करण्याची पैसाहेबांची सूचना मी मान्य केली. कारण पत्रकारिता माझा ध्यास होता. माझ्या उमेदवारीस संपादकांची संमती मिळवण्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्यांनी मला साहेबांकडे इंटरव्ह्यूला पाठवले.
आचार्य अत्र्यांसमोर इंटरव्ह्यू देण्यासाठी उभे राहायच्या विचाराने माझी छाती दडपली गेली! मनाचा हिय्या करून मी त्यांच्यासमोर उभा राहिलो. त्यांनी एकदोन जुजबी प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची मी काय उत्तरे दिली हे माझे मलाही कळले नाही. मला म्हणाले, ठीक आहे. कामावर बसा!
लगेच खाली उतरून पैसाहेबांच्या केबिनमध्ये गेलो. त्यांना मी काही सांगण्यापूर्वीच ते म्हणाले, केव्हा तुम्ही येऊ शकाल? ‘ मी स्मॉल कॉजेस कोर्टात सर्व्हिसला आहे. तुमचं नेमणूक पत्र मिळाल्याखेरीज स्मॉल कॉजेस कोर्टात मला राजिनामा देता येणार नाही.
ठीक आहे. स्मॉल कॉजेस कोर्टातून सुटल्यानंतर संध्याकाळी येऊ शकाल?... ७ ते १२?’
चालेल.
अशा प्रकारे पत्रकारितेत माझी उमेदवारी सुरू झाली. कुमाऊं भागात पाऊस अशा किरकोळ बातम्या मी पहिल्या दिवशी लिहल्या. ट्रायल काळातच हेडलाईनची बातमी लिहण्यापर्यंत माझी मजल गेली. बाळाराव सावरकर, आत्माराम सावंत आणि व. मा. देशपांडे ह्या तिन्ही चीफ सब एडिटरबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. बाळाराव सावरकरांनी तर संस्थानिकांची तनखे हळुहळू कमी होणारही मी लिहीलेल्या बातमीची हेडलाईन केली. नेमणूकपत्र मिळण्यापूर्वी हेडलाईनची बातमी मला मिळाली. मला नेमणुकीचे पत्र मिळणे ही केवळ औपचारिकता उरली होती. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मला १ ऑगस्ट १९६८ पासून माझी उपसंपादकपदी नेमणूक करण्यात आल्याचे रीतसर पत्र मिळाले. त्यानंतर दुस-याच दिवशी मी जज्ज करंजेकर ह्यांची चेंबरमध्ये भेट घेऊन माझा राजिनामा सादर दिला. जज्ज करंजेकर ह्यांनीही शिताफीने माझा राजिनामा मंजूर केला. तो लागलीच रजिस्ट्राकडे पाठवला. शिताफीने म्हणायचे ते अशासाठी की मला कन्फर्म करण्याची शिफारस रजिस्ट्रार गावस्करांनी त्यांच्याकडे पाठवली होती. त्या पत्रावर सही न करता माझ्या राजिनाम्यावर त्यांनी आधी सही केली. शिफारसपत्रावर सही करून ते पत्र त्यांनी मुद्दाम विलंबाने रजिस्ट्रारकडे पाठवले.
माझे, ग्रहयोग बदलले असावेत! सप्टेंबर महिन्यात मला ऑगस्ट महिन्याचे दोन पगार मिळाले. स्मॉल कॉजेस कोर्टाकडून आणि मराठाकडून! पगार मिळताच मी मर्फीचा ट्रँजिस्टर विकत घेतला. पत्रकार हा २४ तास पत्रकार असतो, असा धोशा त्या काळात सिनियर पत्रकार लावायचे. पत्रकाराला सकाळीच सगळ्या वर्तमानपत्रातल्या बातम्या तर माहित असायलाच पाहिजे; त्याशिवाय त्याने रेडियोवरील बातम्याही ऐकल्या पाहिजे असा एक निकष  पत्रकारांच्या बाबतीत त्या काळात लावला जात असे.
माझ्या मनात वेगळीच खंत होती. महान नाटककार, नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक, आपल्या लेखणीच्या बळावर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी करून ती यशस्वी करून दाखवणारा झुंजार पत्रकार आणि गाजलेला वक्ता असा संपादक असलेल्या वर्तमानपत्रात मी काम करत असूनही साहेबांचा माझा पहिल्या दोनतीन महिन्यात एकदाही संबंध आला नाही. चीफ सब एडिटर आणि रिपोर्टर्स मंडळींचा अत्रेसाहेबांचा संबंध येत असे. मी चीफसब एडिटर आणि रिपोर्टर ह्यापैकी कुणीच नव्हतो. त्या परिस्थितीत माझा साहेबांशी संबंध येण्याची सूतराम शक्यता नव्हती हेही मला समजत होते.
कॉलेजमध्ये असताना थोरामोठ्यांच्या साहित्याचे वाचन केल्याने एक लक्षात आले होते की आयुष्यात आपण जे समजून चालतो तसेच घडते असे मुळीच नाही. एके दिवशी अत्रेसाहेबांशी संबंध येण्याची संधी अचानक माझ्याकडे चालत आली. त्या संधीतून पुढे खुद्द आचार्य अत्र्यांकडून पत्रकारितेचे धडे गिरवण्याचाही योग आला. पाटील-फर्नांडिस निवडणूक खटल्याच्या अपिलाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडियात झळकली. ही बातमी आपल्याकडे का नाही, अशी पृच्छा साहेबांनी केली. संपादक खात्याने साहेबांना कळवले की पीटीआयने मुळातच ही बातमी आपल्याला दिली नाही. साहेबांनी लागलीच पीटीआयला फोन करून विचारणा केली. स्थानिक बातम्या सोडून जगभरातल्या बातम्या देण्याच्या कराराकडे पीटीआयच्या मॅनेजरने साहेबांचे लक्ष वेधले. लगेच युएनआयला फोन करून साहेबांनी ती बातमी देण्याची विनंती केली. युएनआयनेही ती बातमी उशिरा का होईना मराठाला पाठवण्याचे मान्य केले. सुनावणीची बातमी आपल्याकडे सविस्तर आली पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्या.
माझा कोर्टातल्या नोकरीचा अनुभव लक्षात घेऊन ती बातमी मी चांगल्या प्रकारे करू शकेन असे संपादक खात्याने सर्वानुमते ठरवले. वृत्तसंपादक पिंगळे ह्यांनीही त्याला संमती दिली. कोर्टात साक्ष नोंदवण्याचे काम संपले की इंटरप्रिटरला काहीच काम नसायचे. इच्छा असेल तर बाहेर चक्कर मारायला जायचे किंवा युक्तिवाद ऐकत बसायचे! युक्तिवाद ऐकत बसण्याचा मला छंद जडला. न्यायालयीन युक्तिवादाची धाटणीही माझ्या आपोआप लक्षात येत गेली. अवचितपणे त्या युक्तिवाद ऐकण्याचा फायदा होण्याची वेळ आली. पाटील-फर्नांडिस खटल्याच्या अपिलाची सुनावणीच्या बातमीसाठी  मला कायम रात्रपाळी देण्यात आली.
रोज संध्याकाळी ऑफिसला आल्यावर युएनआयचे क्रीड शिपाई मंडळी माझ्या हातात ठेवत. २०-२२ टेक वाचून बातमी करायची हे एक मोठे आव्हान होते. कॉलेजमध्ये असताना साहित्य विश्वातले अनेक वाद मी वाचलेले होते. त्यामुळे बातमी लिहताना वाक्यरचना करण्याची मला अडचण नव्हती. फक्त काही कठीण इंग्रजी शब्दांचा नेमका अर्थ मला कळत नव्हता! वेळेत काम पुरे होण्याच्या दृष्टीने पाच कॉप्या लिहून झाल्या की त्या कंपोजला पाठवायच्या असे मला चीफनी सुचवले. त्या काळात मराठात कंपोज झालेल्या मजकुराचे तीन प्रूफे निघत. एक प्रत प्रुफ रीडरला, दुलरी प्रत चीफसबकडे आणि एक प्रत थेट साहेबांकडे!
दुस-याच दिवशी साहेबांचा शिपाई घाडी मला बोलवायला आला. तुम्हाला साहेबांनी बोलावलंय्. माझ्या सहका-यांनी तर माझ्याकडे अशा नजरेने पाहिले की जणू काही मी वधस्तंभाकडे निघालोय्! त्यांच्या नजरेने मी अधिकच घाबरून गेलो. आपल्या हातून अशीच भयंकर मोठी चूक झाली असली पाहिजे. आता नोकरी गेल्यात जमा आहे असे मला वाटू लागले. भेदरलेल्या अवस्थेत मी साहेबांसमोर उभा राहिलो.
तुम्हाला इंग्रजी येतं का?’
त्यांच्या ह्या प्रश्नाने मी आणखीच घाबरून गेलो. इंग्रजी येतं असं म्हणावे तरी पंचाईत आणि येत नाही असं म्हणावं तरी पंचाईत! परंतु त्यांना माझ्याकडून उत्तर अपेक्षित नव्हते.  दुस-या क्षणी ते म्हणाले, हे बघा मराठीत लिहताना नेहमी डौलदार मराठीत लिहलं पाहिजे. मी लिहलेल्या एका वाक्यावर खूण करून त्यांनी मजकुराच्या बाजूला असलेल्या जागेवर तेच वाक्य त्यांनी पेनने लिहले. माझ्या बातमीतील अनेक वाक्ये त्यांनी रिराईट केली. ती वाक्यं त्यांनी मला मोठ्याने वाचायला लावली.
आता समजला न फरक?’
माझ्या नशिबाने त्यांच्यातला शिक्षक जागा झाला. ते म्हणाले, ‘आपण लिहलेलं वाक्य मोठ्याने वाचून पाहायचं. ते कसं लिहलं गेलंय हे आपल्याला लगेच समजतं.
त्याक्षणी माझ्यातली भीती पळून गेली. एका जातिवंत शिक्षकाकडून, उत्कृष्ठ दिग्दर्शकाकडून आपण धडे घेतोय ह्या आनंदाने मी मोहरून गेलो. मोहरलेल्या अवस्थेतच मी खाली आलो. सगळ्यांचा एकच सूर होता, साहेब माझ्यावर भडकले असणार! वस्तुस्थिती मात्र वेगळीच होती. तुम्हाला इंग्रजी येतं का, असा प्रश्न साहेबांनी मला विचारल्याचे मी पुष्पा त्रिलोकेकरांना सांगताच त्या म्हणाल्या, हा प्रश्न साहेबांनी प्रत्येकाला विचारला आहे. मात्र, प्रश्नाचे उत्तर त्यांना अजिबात अपेक्षित नसते. ते रागवतात. थोड्या वेळाने शांतही होतात असं पुष्पाने सांगताच माझ्या जिवात जीव आला! तीनचार वेळा त्यांनी मला वर बोलावून घेतले आणि प्रत्येक वेळी त्यांनी क्रीडमधल्या मूळ इंग्रजी वाक्याचे मराठी रूपान्तर कसे करावे हे नीट समजावून सांगितले.
झुंजार पत्रकार अशी आचार्य अत्र्यांची महाराष्ट्रात प्रतिमा होती. श्रोत्यात हास्याचे धबधबे निर्माण करणारी भाषणे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व ह्यामुळे महाराष्ट्र भारावून गेला होता. परंतु माझ्या दृष्टीने जर्नालिस्ट क्राफ्ट शिकवणारे ते महान संपादक होते. नाशिकला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे त्यांनी नवयुगसाठी केलेले रिपोर्टिग नंतर मला वाचायला मिळाले. तो रिपोर्ट वाचल्यानंतर ते एक मातब्बर रिपोर्टरही आहेत अशी माझी खात्री पटली. नंतर मला अधुनमधून सांजला ड्युटी मिळायची त्या ड्युटीत अनेकदा बातम्या लिहून घेण्यासाठी बोलावणे यायचे. ब-याचदा टाईम्स ऑफ इंडियातील बातम्या स्वतः भाषान्तर करून खाली पाठवत असत. टाईम्य आणि नवाकाळ हे त्यांच्या आवडीची वर्तमानपत्रं होती. सकाळी उठल्याबरोबर ती वर्तमानपत्रे ते वाचायला घेत. अखेरच्या आजारापर्यंत त्यांचा हा नित्यक्रम होता. त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले त्या दिवसापर्यंत हा क्रम सुरू होता. त्यांना वाचवण्यासाठी ब्लड ट्रान्सफ्युजनचा डॉक्टरांनी प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही.
त्यांचे शव शिवशक्तीत दर्शनासाठी ठेवण्यात आले तेव्हा मराठाच्या संपादक मंडळींनी त्यांच्या पायावर मराठाचा ताजा अंक ठेऊन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. दिवसभर अंत्यदर्शनासाठी लोकांची रीघ लागलेली होती, त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाचे नाव मराठाच्या बातमीत आले पाहिचे असे ठरले. अंत्यदर्शन आणि सांत्वनासाठी आलेल्यांची नावे टिपण्यासाठी आम्ही सर्वांनी आळीपाळीने दोन दोन तासांची ड्युटी लावून घेतली. दोन तासांची ड्युटी करताना माझी पंचाईत झाली. कारण अनेकांना मी प्रत्यक्ष ओळखत नव्हतो. तेव्हा, सरळ त्यांचे नाव विचारून घेण्याचे मी ठरवले. एकेक नाव ऐकताना ती नावे मी अनेक वेळा बातम्यत लिहली असल्याचे माझ्या लक्षात आले! संपादक खात्यात आलेला एक फोन मी घेतला. लाईनवर पोलिस कमिश्नर होते. त्यांना अंत्ययात्रेचा रूट हवा होता, मला ही तो माहित नसल्यामुळे मी तुम्हाला फोन करून कळवतो असे सांगून फोन बंद केला. पुढे रूट कळवण्याचा निरोप मी वरिष्ठांना दिला.
संपादक खात्याच्या कामात महिन्यातून एकदा पैसाहेबांच्या केबिनमध्ये संपादक खात्याच्या सभाससदांची मिटींग हेही एक काम होते. त्या मिटींगची आम्ही सगळे उत्सुकतेने वाट पाहात असू. कारण मिटींगमध्ये कोणाचीही फिरकी घेण्याचे स्वातंत्र्य होते. त्या मिटींगमध्ये पैसाहेब सगळ्यांचे मार्मिक निरीक्षणही नोंदवत. एकदा संपादक खात्यातल्या प्रत्येकाच्या राजकीय मतांचा विषय निघाला. माझ्याबद्दल कोणी काही बोलण्याच्या आधीच पैसाहेब म्हणाले, ही इज लेफ्ट टू दि सेंटर!
आचार्य अत्र्यांचा मृत्यूपूर्वी मी माझ्या आजोबांचा मृत्यू पाहिला होता. पण आचार्य अत्र्यांसारख्या महापुरूषाचा मृत्यू आणि त्यांच्या मृत्यूनंतर उसळेला शोककल्लोळ पाहण्याचा माझा आयुष्यातला पहिलाच प्रसंग. आज तेरा जून उजाडला तेव्हा मराठातल्या दिवसांच्या आठवणींनी माझ्या मनात गर्दी केली. ती मी लेखनबध्द करत आहे. अत्रेसाहेबांना आदरांजली
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

Tuesday, June 9, 2020

शहरयोगीः कोरोनाचे साक्षीदार!

कोरोनासह जगणे म्हणायला जितके सोपे आहे तितके ते कोरोनासह जगणे सोपे नाही! निदान अन्लॉक-१च्या तिस-या दिवशी  कोरोना प्रादुर्भावाचे जे चित्र आले करूणाजनक आहे. देशात कोरोना मृतांची संख्या दर दिवशी २०० झाली ही चिंतेची बाब आहे. जगातही कोरोना संपूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. आपल्याकडे कोरोनाबाधितांची आणि कोरोना मृतांची संख्या पाहता कोरोना चाचण्यांच्या विश्वासार्हतेबद्दल जनमानसात संशय आणि भय उत्पन्न झाले असेल तर त्याबद्दल त्यांना दोष देता येणआर नाही. कोरोना प्रादुर्भाव पसरू नये आणि कोरोना मृत्यूला आळा घालण्याच्या ह्यादृष्टीने भारतात योजण्यात आलेली उपाययोजना जगभरातल्या सरकारांकडून केल्या गेलेल्या उपाययजोनांपेक्षा अधिक प्रशंसनीय आसल्याचा दावा सरकारकडून वारंवार करण्यात आला. अजूनही तो दररोज करण्यात येत आहे.  पाश्चात्त्य देशातील लोकांची प्रतिकारशक्ती, तेथले हवामान वगैरे बाबी आणि भारतातील लोकांची प्रतिकारशक्ती, येथले हवामान वगैरे बाबींची तुलनाच होऊ शकत नाही. भारतीय माणसांच्या तुलनेने अमेरिकन आणि युरोपीय माणसांची थोडी कमीच असल्याचे जवळ जवळ सर्वमान्य आहे. म्हणूनच पाश्चात्त्य देश आणि भारताची कोरोना प्रादुर्भावा संदर्भात तुलना प्रस्तुत ठरते.
देशभरातल्या महानगरांतली कोरोना स्थिती अन्य शहरांपेक्षा आणि ग्रामीण भागांच्या तुलनेने अधिक चिंताजनक आहे. दाट लोकसंख्या, १० X १५ किंवा १५ X २० आकाराच्या खोल्यात राहणारी १०-१२ माणसे हे चित्र भारतातल्या महानगरातले आहे. त्याचप्रमाणे तथाकथित वन बेडरूमचा आकारही गेल्या २५-३० वर्षांत आक्रसत चालला आहे. ५०० चौरस फुटांचा फ्लॅट हा प्रत्यक्षात ४६० फुटांचाच असतो हे वास्तव आहे. सुरक्षित अंतर राखण्याचा नियम अशआ घरात राहणारी माणसे पाळू शकत नाही. ह्या परिस्थितीत राज्य सरकार केवळ विरोधकांचे आहे म्हणून राज्य सरकारवर कोरोनाचे खापर फोडणे बरोबर नाही. म्हणून की काय, देशभरातील ५० महानगरातील कोरोना स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे खास पथक पाहण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून काय निष्पन्न होईल हे दिसेलच.
अनेक वर्षांपूर्वी घरापासूनच सुरू झालेल्या फसवाफसवी सुरू झाली होती. ती आता कोरोना परिस्थिती सुधारण्याच्या कामी मोठाच अडथळा होऊन बसली आहे. सत्तेच्या गलिच्छ राजकारणाची त्यात भर पडली आहे. स्थितीच अशी आहे की घरापासून सुरू झालेली फसवाफसवी कोरोनाच्या बाबतीतही सुरूच आहे. बहुतेक महापालिकांत बेमुर्वतखोर बिल्डर आणि पालिका अधिकारी ह्यांच्या संगनमतामुळे घरे लहान झाली. ती लहान घरेच कोरोना संकटाचे मुख्य कारण होऊन बसली आहे. घर सोडून स्वतःच्या गावी जाण्याचा विचार अनेक मजुरांच्या डोक्यात आला. ते निघालेसुध्दा! शेवटी मजुरांना आपल्या गावी जाता यावे म्हणून गाड्या सोडणे रेल्वेला भाग पडले. स्टेशनवर आणि डब्यात सुरक्षित अंतर राखणे, तोंडावर मास्क लावणे इत्यादि नियमांचे प्रवाशांकडून पालन झाले की नाही हे खात्रीलायकरीत्या सांगता येत नाही. ह्या पार्श्वभूमीवर जगात कोरोना प्रसाराच्या बाबतीत देशाचा नंबर वर सरकला असेल तर त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कोरोना वाढीचे वास्तव जसजसे लोकांच्या समोर येईल तसतसे लोक नैराश्याच्या आहारी जाणार हे उघड आहे.
कोरोना चाचण्यांचे प्रोस्युजरही कितीतरी राज्यात बदलण्यात आले. अर्थात ते आवश्यकही असेल. एक गोष्ट मान्य करायला हवी की राज्यांनी हे बदल आपल्या मनाने केले नाही. केंद्रीय आरोग्य यंत्रणेने स्वतः केलेल्या बदलानुसारच राज्यांनी ते बदलले. त्यामुळेही कोरोनाबाधित आणि कोरोनामुक्त ह्या दोन्हींच्या संख्येत तीव्र बदल होत झाला.  भाजीपाला, फळे, दूध, अन्नकधान्य ह्यापुरते आतापर्यंतचे तिन्ही लॉकडाऊन अनेक ठिकाणी शिथील करण्यात आले हे खरे, पण लोकांची झुंबड उडताच शिथिलीकरण रद्दही  करण्यात आले. झुंबडचे एक वेल समजू शकते. परंतु मालवाहतूक म्हणावी तितकी सुरळित झाली नव्हती हे नजरेआड करता येत नाही. मुंबईतल्या मालवाहतूक व्यवसायात ड्रायव्हर, चालक, मालक ह्यात प्राधान्येकरून परप्रांतियांचा भरणा अधिक आहे. पहिल्याच लॉक़डाऊननंतर ड्रायव्हर्स आपापल्या गावी निधून गेले. ठप्प झालेल्या मालवाहतुकीचा जबरदस्त फटका मोठ्या उद्योगांपासून ते छोट्या दुकानदारांपर्यंत सा-यांना बसला. काही मालवाहतूकदारांनी माल आणला, पण वाढीव दर मत करून घेऊन!
आताच्या अन्लॉक-१ मध्ये आळीपाळीने दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परवानगी देण्याचा हा नियम सद्यस्थितीत बरोबर असला तरी कामाच्या ठिकाणी जाण्यायेण्यासाठी लोकल सेवा उपलब्ध नाही. खासगी बसप्रवास खर्चिक आहे. कामावर जाऊ इच्छिणा-या १० टक्के लोकांच्या दृष्टीने विचार केल्यास ही व्यवस्था तुटपुंजी आहे. अनेक कारखान्यात आणि मोठे व्यापा-यांकडे कर्मचारीवर्ग पूर्ण संख्येने कामावर हजर होऊ शकलेला नाही. हे सगळे सुरळित कसे करावे ह्याची संबंधितांना वाटणारी चिंता आहे. कामावर जाऊ इच्छिणा-यांची सोय केले पाहिजे हे स्थानिक प्रशासनास मान्य आसले तरी प्रवासी वाहतुकीची बाब त्यांच्या अधिकारक्षेत्रातली नाही.
अन्ल़ॉक - १ ची घोषणा ठीक, अर्थव्यवहार यंत्रणेचे कुलूप गंजलेले नसले तरी कडीकोयंडे मात्र गंजलेले आहेत! केंद्राच्या आणि राज्यांच्या वरिष्ठ पातळीवर सगळे आलबेल अस्लयाचे चित्र चर कनिष्ठ पातळीवर मात्रे सारेच बिनसलेल्याचे चित्र!  लोक कोरोनाग्रस्त, पोलिस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा गा-हाणीग्रस्त!! प्राप्त परिस्थितीत भाबड्या लोकांनी आपल्या प्राक्तनाला बोल लावला तर त्यांना दोष कसा देणार? सोसून सोसून लोक दुःखाला सरावलेले आहेत. त्यांना  शहरयोगीसंबोधायला हरकत नाही. जनिंचा प्रवाहो सुरूच आहे. ह्या जनिंच्या प्रवाहाचे शहरयोगी साक्षीदार आहेत.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार