Sunday, May 27, 2012

मनमोहनसिंगांविरूद्ध उपोषण-शस्त्र!अण्णा कंपूचे स्वत:ला सर्वेसर्वा समजणारे अरविंद केजरीवाल ह्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग ह्यांच्यासह पंधरा केंद्रीय मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करून 25 जुलैपासून उपोषण करण्याची धमकी दिली हे ऐकून महाभारतातील राजसूय यज्ञप्रसंगी शिशूपालाने केलेल्या वक्त्व्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा अशी पृच्छा युधिष्टिराने भीष्माकडे केली तेव्हा भीष्माने अर्थात श्रीकृष्णाचे नाव सुचवले. भीष्माने श्रीकृष्णाचे नाव सुचवताच शिशूपालाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तसेच कोळसा व्यवहारातील अनियमिततेच्या संदर्भात ‘कॅग’ने पंतप्रधान कार्यालयाचा उल्लेख करताच केजरीवाल ह्यांचा भ्रष्टाचाराबद्दल संतापाचा पारा मस्तकापर्यंत गेला आणि त्यांनी मनमोहनसिंगांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. अण्णा हजारेंचे मुंबईतील उपोषण ढेपाळल्यापासून अण्णा कंपूंचे डोकेच फिरले आहे. विशेषतः अरविंद केजरीवाल ह्यांचे डोके तर साफ कामातून गेले आहे. त्यांना प्रत्येक राजकारणी भ्रष्ट दिसू लागला आहे. ज्याचे नाव आदराने घ्यावे अशी कोणतीच व्यक्तीच त्यांना स्वच्छ दिसत नाही. पंतप्रधानपदावर राहण्यात ज्यांना मुळीच स्वारस्य नाही त्या मनमोहनसिंगही केजरीवालांना ‘भ्रष्टाचारी’ वाटू लागले.

अलीकडे केजरीवाल आणि ‘अण्णा कंपूतील’ सगळे टगे गावगन्ना प्रेसकॉन्फरन्स घेत फिरतात. प्रत्येक प्रेसकॉन्फरन्समध्ये ही मंडळी भ्रष्टाराच्या संदर्भात तेच तेच बोलत असतात. मंत्री, खासदारादि लोकप्रतिनिधींवर सतत तीच ती टीका करत राहणे ह्यावर त्यांचा भर असतो. ‘अण्णा कंपू’तील ही मंडळी चेकाळली असून राजकारणातली प्रत्येक व्यक्ती त्यांना भ्रष्ट दिसू लागली आहे. एखाद्या बिघडलेल्या ग्रामाफोनच्या तबकडीप्रमाणे (हल्लीच्या पिढीला ग्रामोफोनची तबकडी कशी असते आणि ती बिघडते म्हणजे नेमके काय होते हे कळणार नाही हे मला मान्य आहे.) ‘अण्णा कंपू’तील अन्य मंडळी पुन्हा पुन्हा तेच ते बरळत असतात. जणू सर्वसामान्य माणसाला भ्रष्टाचार म्हणजे काय माहीतच नाही!

वास्तविक वर्तमानपत्रांनी, विशेषत: टी. व्ही. चॅनेल्सनी त्यांच्या वक्त्व्यास रोजच्या रोज प्रसिद्धी देण्याचे कारण नाही. पण पत्रकारितेत मेंढीपड संप्रदाय आजचा नाही. एखादी प्रेसकॉन्फरन्स कव्हर करण्यासाठी एखादा पत्रकार निघाला की बाकीचे पत्रकारही ती प्रेसकॉन्फरन्स कव्हर करायला जातात. मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे हे रोज सुरू असते. एक मेंढी गेली की तिच्या मागोमाग अन्य मेंढ्या चालत जातात. पुढे चालत गेलेली मेंढी विहीरीत पडली की बाकीच्या मेंढ्याही विहीरात पडताता! अलीकडे हा मेंढीपाड संप्रदाय वाढीस लागला आहे. परिणामी अनेक पत्रकार ‘नो-न्यूज’च्या विहीरीत पडताहेत! बहुतेक वर्मानपत्रात त्याचप्रमाणे चॅनेल्समध्येही हार्ड नोज्ड पत्रकारांची वानवा असल्यामुळे अण्णा टीमची ‘नो-न्यूज’ वक्तव्ये प्रसारित होत राहतात. चॅनेलवाल्यांना तेलाच्या घाण्याप्रमाणे ‘बातम्यांचा घाणा’ 24 तास चालवावा लागतो. ज्या बातम्या आपण प्रसारित करत आहोत त्यात नवा मुद्दा आहे का? असेल तर तेवढाच नेमका हेरून त्याची प्रमाणशीर बातमी देता येते. परंतु ‘मेंढीपड पत्रकारिते’मुळे प्रसारमाध्यमांतल्या डेस्कवरील पत्रकारांचाही नाईलाज होत असावा. जर बातम्याच नसतील तर ते बिचारे बुलेटिन कसे सादर करणार?

पंतप्रधान मनमोहनसिंग ह्यांच्यावर अरविंद केजरीवालांनी केलेला आरोपांचा आधार काय तर म्हणे कोळसा मंत्रालयाच्या संदर्भात पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयांबरोबर ‘कॅग’--लेखा परीक्षण महासंचालकांनी-- दिलेला अहवाल! वास्तविक कॅगच्या आक्षेपांचा भ्रष्टाचाराशी संबंध जोडणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार आहे. अलीकडे जनहितयाचिकांवर न्यायालयांनी दिलेले निवाडे, ‘गायडेड मिसाईल’सारखी (म्हणजे कोणातरी व्यक्तीने कोणाविरूद्ध अण्णांसारख्यां अर्धबावळट व्यक्तीस उपोषण करायला लावणे आणि योग्य वेळी ते ‘कळ’ दाबून ते मागे घ्यायला लावणे हा राजकारणातले गायडेड मिसाईलच!) उपोषणे, संसदेत हंगामा, बाहेर एखाद्याच्या तोंडाला काळे फासणे किंवा त्याच्या थोबाडीत मारणे ह्यासारखी लोकशाहीला संमत नसलेली शस्त्रे सध्या कोणाच्यातरी विरूद्ध परजली जात आहेत. केजरीवालांनी मनमोहनसिंगांविरूद्ध आता उपोषणाचे शस्त्र परजले आहे.

गेल्या काही वर्षांपासून सरकाच्या प्रशासकीय अधिकाराबाबत ‘कॅग’ची गल्लत होत आहे असे म्हणावेसे वाटते. कोणत्याही सरकारला आपल्या ध्येयधोरणानुसार राज्य करण्याचा अधिकार असून त्या अधिकारानुसारच मंत्री निर्णय घेत असतात हे ‘कॅग’ला मान्य नाही असे दिसते. वास्तविक निवडणूक आल्यावर एकदा सरकारमधील मंत्र्यांच्या प्रत्येक निर्णयाच्या हेतूबद्दल शंका उपस्थित करणे गैर आहे. खुद्द ‘कॅग’च्या अधिक-यांनाही बहुधा हे माहीत नाही असे म्हणता येत नाही. तरीही ‘कॅग’च्या अहवालाचा मसुदा बाहेर फोडण्याचा उपद्व्याप त्यांनी केला तो केजरीवालांसारख्यांचा धंदा चालावा म्हणून! केजरीवालांनी मनमोहनसिंगांवर आरोप करताना कॅगच्या अहवालाच्या मसुद्याचा हवाला दिला तो उगाच नाही! उपोषण सुरू करण्यापूर्वी तोफा डागल्याखेरीज वातावरण निर्मिती होत नाही हे त्यांना माहीत आहे. आपल्या उपोषणामुळे अण्णा खूष झाले तर दुधात साखर!

-रमेश झवर