Tuesday, July 25, 2023

शिरीष कणेकर

ज्येष्ठ पत्रकार आणि सिनेमा, क्रिकेट ह्या विषयांवर मिष्कील शैलीत लिहणारे लेखक आणि पत्रकार शिरीष कणेकर ह्यांच्या निधनाचे वृत्त वाचून मला धक्काच बसला. कणेकर एक्स्प्रेसमध्ये वार्ताहर म्हणून आणि मी लोकसत्तेत उपसंपादक म्हणून नोकरीला लागण्यापूर्वीपासून त्यांची आणि माझी मैत्री होती. माझे मित्र प्र. ना. शेणई ह्यांचे बंधू दत्ताराम शेणई ह्यांनी माझी कणेकरांशी ओळख करून दिली होती. ते १९६७-१९६८ साल असावे. त्यांची ओळख होताच मी त्यांना विचारले, दंगलीत तुमच्या मोटार सायकलीची मोडतोड कुणी केली?

दंगलखोर कोण होते हे मी कसे सांगणार?’

नंतर मला लगेच आठवले की शिरीष कणेकर हे कायद्याचे पदवीधरही आहेत. त्यामुळे माझ्या प्रश्नाला त्यांनी दिलेले उत्तर विटनेस बॉक्स उभ्या असलेल्या साक्षीदाराने द्यावे तसे होते. ते म्हणाले, खरे तर चूक माझीच आहे. दंगलग्रस्त भागातून मी जायलाच नको होते. फाजील आत्मविश्वास मला नडला!

त्यानंतर माझी आणि कणेकरांशी भेट झाली ती माझे इंडियन एक्स्प्रेसमध्ये ते एक्सप्रेसमध्ये वार्ताहर होते. मी लोकसत्तेत उपसंपादक होतो. सुरूवातीला आम्हा दोघांनाही किरकोळ बातम्या करायला दिल्या जात. बीएसव्ही राव हे त्यांचे बॉस तर माझे बॉस तुकाराम कोकजे. तो काळ आम्हा दोघांच्या उमेदावारीचा होता. ह्याची जाणीव कणेकरांनाही होती तशी मलाही होती. आम्हाला कुठला बीट असा नव्हता. सगळे महत्त्वाचे बीटस् हे राखीव होते. वर्तमानपत्रात तुम्हाला कुठलीही बातमी लिहायला सांगितल्यावर ती तुम्ही मुकाट्याने लिहून देणे हे आम्ही जाणून होतो. वरिष्ठांचे काहीही मत असले तरी चीफ सब एडिटरला आम्ही लिहलेल्या कॉपीवर कधी बॉलपेन फिरवावा लागला नाही ह्यावर आम्ही खूष होतो. परंतु वर्तमानपत्रातले वातावरण इतके साधे अन्‌ सरळ असत नाही. तुमची इमेज काळवंडली पाहिजे असाच चंग काही लोकांनी बांधलेला असतो.  त्यांच्या टीकेला तुमच्याकडे उत्तर नसते. कारण, हे सगळे तुमच्या समोर चालत नाही. कोणी विशिष्ट व्यक्ती तुमच्याविरूध्द ते चालवत असते असेही नाही. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार ट्रायल इन इन ब्सेनिशिया! यशाचा जसा पिंजरा असतो तसा अपयशाचाही पिंजरा असतो. अपयशाचा पिंजरा तुम्ही कधीच भेदू शकत नाही.

शिरीष कणेकरांची आणि माझी जेव्हा खासगीत भेट होत असे तेव्हा मनातले हे दु:ख आम्ही एकमेकाकंडे व्यक्त करत असू. अर्थात कालान्तराने ह्या दु:खातून आम्ही दोघेही सावरलो. ह्याचे सगळ्याचे मोठे कारण म्हणजे एक्सप्रेसमधले राधाकृष्णन्, संपत आणि मेन्झिस हे तिघे चीफ सब. तिघांनी कणेकरांना सांभाळून घेतले. मला लोकसत्तेत सदानंद पालेकर, लक्ष्मीदास बोरकर आणि श्रीपाद डोंगरे ह्या तिघा चीफसबनी सांभाळून घेतले. सुरूवातीला कॉपी स्वत : तपासून मगच बातमी चीफ सबच्या हातात द्यायची हे मी ठरवून टाकले. हातात बातमी आली की त्यावर मल्लीनाथी न करता सरळ त्या बातमीला भिडणे असा शिरस्त मी ठरवून टाकला. कणेकरांनीही बहुधा तेच ठरवले असावे. आमच्या विरूध्द असलेले वातावरण हळुहळू पालटले.

मी अमेरिकेला जाऊन आल्याचे त्यांना कळताच माझ्याजवळ येऊन त्यांनी विचारले,

तुम्हाला कोणत्या संस्थेचे निमंत्रण मिळाले होते ?’

मला कोणीच निमंत्रण दिले नाही. पासपोर्ट कार्यालयात जाऊन मी रीतसर पासपोर्ट मिळवला. अमेरिकन भुलाभाई मार्गावरील वकालतीत जाऊन अमेरिकेचा व्हिसा मिळवला. व्हिसा कसा मिळाला ह्याची तपशीलवार हकिगत मी कणेकरांना सांगितली. विशेषत: व्हिसा अधिका-याबरोबर माझा संवाद कसा झाला हेही मी कणेकरांना तपशिलवार सांगितले. तो संवाद असा-

 तुम्हाला व्हिसा कां हवा आहे?

मी देशभर हिंडलो आहे. पर्यटणाची मला हौस आहे. म्हणून सर्वप्रथम अमेरिकेला जायचे माझ्या मनात आले

माझे म्हणणे व्हिसा अधिका-याला पटले असावे.

ओके यू विल हॅव इट. कम आफ्टर थ्री ओ क्लॉक अँड कलेक्ट युवर पासपोर्ट.

माझी ही संपूर्ण स्टोरी मी कणेकरांना सांगितली. शेकहँड करून त्यांनी माझा निरोप घेतला.

मला अधुनमधून रविवार लोकसत्तेत लेख लिहण्याची संधीही मिळत गेली. कणेकरांनाही रविवार लोकसत्तेचे संपादक विद्याधर गोखले ह्यांनी लिहण्याची संधी दिली. त्या संधीचा आम्ही दोघांनी भरपूर उपयोग करून घेतला. सिनेमा आणि क्रिकेट हे कणेकरांचे आवडते विषय तर द्याल तो विषय आणि सांगाल ते काम हे माझे धोरण!

ह्या आमच्या नव्या धोरणामुळे आमच्या डोक्याची कटकट कायमची मिटली. आयुष्याच्या लढाईची एक वेगळीच गंमत आहे. एक कटकट मिटली की दुसरी कटकट हमखास सुरू होते. शिरीष कणेकर आणि मला हाच अनुभव आला. सिनेमा आणि क्रिकेट ह्या दोन विषयांवर खुसखुशीत शैलीत लिहणारा लेखक अशी त्यांची नवी प्रतिमा तयार झाली. जैन मुनींपासून ते झोपटपट्टीत राहणा-या गरीब लोकांच्या समस्या अशा कुठल्याही विषयावर मी लेख लिहीत राहिलो. फुटक्या अवयवांची झोपडपट्टीह्या कुष्ठरोग्यांच्या वसाहतीवर लिहलेल्या माझ्या लेखावर वाचकांच्या पत्रांचा अक्षरश: पाऊस पडला. कणेकरांच्या बाबतीत हेच घडले. यादोंकी बारात, शिरीषासन, मुद्दे आणि गुद्दे माझी फिल्ल्मबाजी इत्यादी सदरातील लेखांना वाचकांनी अभूतपूर्व  दाद दिली. लायनो ऑपरेटरही त्यांचे लेख ऑपरेट करण्यापूर्वी वाचून पाहात आणि मगच ऑपरेट करायला घे. खुद्द फोरमन त्यांचे लेख वाचून मग तो ऑपरेट करायला देत !

अशा माझ्या ह्या प्रिय सहका-याने काल अचानक इहलोकाचा निरोप घेतला. त्याला माझी श्रध्दांजली.

रमेश झवर

Monday, July 24, 2023

धगधगत्या मणीपूरचा इशारा

 मणीपूरमध्ये दोन जमातीमधील कलहामुळे पेटलेला संघर्ष शमण्याची चिन्हे अजून तरी दिसत नाही. दोन स्त्रियांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्याचा प्रकार वास्तविक गेल्या मे महिन्यात घडला होता. त्याचा व्हिडियो  प्रसिध्द झाल्यानंतर देशाचे तिकडे लक्ष वेधले गेले. विशेष म्हणजे ह्या राज्यात भाजपाची सत्ता असून मुख्यमंत्र्यांची नेमणूक केंद्रीय अर्थात केंद्रीय नेत्यांशी चर्चा करण्यात आल्यानंतरच झाली  झाली असणार हे उघड आहे. म्हणूनच मणीपूरमधल्या घडामोडींकडे केंद्रीय नेते लक्ष द्यायला तयार नाहीत. मध्यंतरी गृहमंत्री अमित शहांनी मणीपूरमधील परिस्थितीत थोडे लक्ष घातले; परंतु त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसले नाही. ह्याचा अर्थ असा की केंद्रीय सत्ताधारी पक्ष स्वार्थापलीकडे जाण्यास तयार नाहीत. भाजपाशासित अनेक राज्यात खिंडार पडल्याचे हे चित्र आहे. जे राजकीय निरीक्षकांना दिसते ते केंद्रीय नेत्यांना दिसत नाही हे दुर्दैव आहे.

एका बाजूला मणीपूरची सीमा असामला लागून तर दुसरी सीमा बंगला देशाला लागून आहे. ही वस्तुस्थिती ध्यानात घेतल्यास मणीपूरमध्ये धोकादायक परिस्थिती अधिक काळापर्यंत चालू राहणे देशाच्या दृष्टीने योग्य  नाही. पण हे केंद्रीय नेत्यांना कोण समजावून सांगणार? कुणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी भाजपा नेते त्यांचे मुळीच ऐकणार नाहीत! उलट सांगणा-यावर प्रत्यारोप करून ते मोकळे होतील. सर्वोच्च   भाजपा नेत्याला असे वाटते की अशी प्रकरणे २०२४ लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच्या काळात ह्या काळात उपस्थित होणे भाजपाला निश्चित धोकादायक ठरू शकते. म्हणूनच दोन महिने तिकडे त्यांनी लक्ष दिले नाही.

कर्नाटकात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता आली. मध्यप्रदेश, राजस्थान. छत्तीसगड, तेलंगण ह्या राज्यातही चालू वर्षात निवडणुका होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे ईशान्य भारतात त्रिपुरा, मेघालय, नागालँड आणि मिझोरम ह्या राज्यात निवडणुका जाहीर होणार आहेत. ह्या सा-या  राज्यात सत्ता मिळाली तरच भाजपाचा आगामी लोकसभा निवडणुकीत निभाव लागेल. त्यामुळे मणीपूरमधली अस्वस्थता भाजपाला परवडणारी नाही. त्याच बरोबर हिंदुत्वाचा जाणूबुजून पसरवण्यात आलेला ज्वर ओसण्याची भीती भाजपा नेत्यांच्या मनात आहेच. सबका साथ सबका विकासह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी केलेल्या घोषणेचा फोलपणा एव्हाना जनतेच्या लक्षात आला आहे. मोदी  आडनावाविषयी काँग्रेस नेते राहूल गांधी ह्यांनी कोलार येथे काढलेल्या गाफील उद्गाराचे निमित्त करून त्यांच्या लोकप्रतिनिधित्वचा अधिकार मोदी सरकारने संपुष्टात आणला. राहूल गांधींवर कोर्टकचे-या करण्याची पाळी आली. आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यांच्या विरोधात गेल्यास राहूल गांधींच्या राजकारणात आडकाठी उभी करण्यात भाजपाला यश मिळाल्यासारखे होईल हे खरे; परंतु नेहरू परिवारातल्या व्यक्तीविरूद्ध  सूड उगवण्याचाच हा प्रयत्न असल्याचीच भावना जनमानसात रुजली  त्याचे काय?

आंतरराष्ट्रीय राजकारणात बलाढ्य लोकशाही देशाचा नेता अशी आपली प्रतिमा असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचा समज झाला आहे. हा त्यांचा समज निव्वळ भ्रम असल्याचे लौकरच स्पष्ट होईल अशी चिन्हे दिसू लागील आहे. समजा त्यांची प्रतिमा चांगली असली तरी त्याचा फायदा विदेश व्यापारातील्या वृध्दीखेरीज फारसा होणार नाही. आणि भारतातल्या जनसामान्यांना भारतीय लोकशाहीविषयक परदेशातल्या मतप्रवाहाशी काही देणेघेणे नाही. सामान्य शेतकरी, गरीब कष्टकरी नोकरदार आणि सुखवस्तु मध्यमवर्ग ह्यापैकी कोणालाही देणेघेणे नाही. मला पामोलीन तेल मिळते की नाही, अंगभर वस्त्र मिळते की नाही शेती पिकली की नाही ह्या सा-याची चिंता दूर होणे महत्वाचे असते. जनतेच्या ह्या आघाडीवर फसवणूक चालत नाही. खपवून घेतली जात नाही. रोकडा व्यवहार पाहण्याचा हा नियम काँग्रेस काळात दिसून आला. म्हणूनच काँग्रेसला त्याचा फटका बसला होता. हा नियम आगामी लोकसभा निवडणुकीत दिसणार हे स्पष्ट आहे.

धगधगत्या मणीपूरचा हा इशारा आहे! तो ओळखण्याची हीच वेळ आहे.

रमेश झवर

Sunday, July 2, 2023

पुन्हा उपमुख्यमंत्री

Ajit Pawar - Ajit Pawar added a new photo.

गेल्या खेपेस  ८० तास उपमुख्यमंत्रीपद सांभाळून स्वगृही परतणारे अजितदादा पवार पुन्हा राष्ट्रवादीचे घर सोडून गेले आहेत. कदाचित्‌ संधी मिळताच त्यांना मुख्यमंत्रीपदाचे आमिषही दाखवण्यात आले असेल. फुटीर शिवसेना नेते एकनाथ शिंदे ह्यांना केंद्रीय भाजपाने मुख्यमंत्रीपद दिले होते ह्या पार्श्वभूमीवर अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची बढती अजितदादांना देण्यात आले नाही. बाकी शिवसेना न फोडता  मविआ सरकारमध्ये नगरविकासमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे देण्यात आले. सत्तेचा तोच फंडा अजितदादांच्या बाबतीतही अवलंबण्यात आला. मात्र, त्यांना बढती न देता ! अर्थात २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांना थांबावे लागणार.  काही गडबड झाली असे आहे असे केंद्रीय नेत्यांना वाटले तर राष्ट्रपती राजवट जारी करण्याचा पर्याय त्यांना उपलब्ध आहे. प्रॉमिसरी नोटेवर आकडा किंवा अक्षरी संख्येची जागा रिकामी ठेवून सह्या घेण्याचा प्रघात असतो. तोच प्रकार तूर्त तरी अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद देताना केंद्राने अवलंबला आहे. ह्याचा अर्थ अजितदादांकडे पर्याय नाही असे नाही. त्यांच्याकेडही अनेक पर्याय आहेतच !

अजितदादादेखील काकांविरूद्ध राजकारण करू शकतात. देवेंद्र फडणवीस ह्यांच्या कारभारात थेट ढवळाढवळ करणार नाहीत ; पण विनंती न करता कागद पास ऑन करू शकतात. सामान्यत : पासऑन करण्यात आलेल्या कागदवरील विनंती कोणी नाकारत नाही. ह्याचे कारण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एकमेकांचे हितसंबंध सांभाळावेच लागतात. दोघांनीही एकमेकांचे हितसंबंध सांभाळण्यालाच सत्तेचे राजकारण म्हणतात! ज्यावेळी हितसंबंध सांभाळण्याच्या बाबतीत गफलत होते त्यावेळी राजिनाम्याचे खंजीर खुपसायला दोघेही मोकळे असतात. खुद्द शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची कथा आधी मंत्रालयात आणि नंतर वर्तमानपत्रात खूप वर्षे गाजली होती.

एकदा गमावलेली संधी पुन्हा मिळत नाही असेही नाही. राजकारणात संधी मिळाली नाही असे नाही. संधी मिळत नसते, ती हिसकावून घ्यावी लागते. आज तरी अजितदादांनी संधी हिसकावून घेतली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शर पवार ह्यांना मात्र पुन्हा दौरे करणे आले. आज शरदरावांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण ह्यांच्या समाधीस्थळी जाऊन येण्यासाठी ते निघाले आहेत. किती खासदार-आमदार अजितदादा पवार ह्यांच्या बाजूने आहेत किंवा किती फुटू शकतात ही चर्चा चालू घडीला तरी निरर्थक आहे. कोर्टकचे-याही अर्थशून्य झाल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुका किंवा राज्याच्या विधानसभा निवडणुका जेव्हा घोषित होतील तेव्हा पाठिंब्याच्या मुद्दा महत्त्वाचा ठरेल.

 थोडक्यात, अजितदादांचे सत्तेत पदार्पण पाहता  महाराष्ट्र राज्याचा बिहार किंवा उत्तरप्रदेश झाला आहे !

रमेश झवर