Thursday, November 30, 2023

हिमालयाला पीडा

महर्षीणां  भृगुरहं  गिरामस्येकमक्षरम् 
यज्ञानां जपयज्ञोsस्मि स्थावराणां हिमालय:

हिमालय हे ईश्वराचेच दुसरे रूप असल्याचे गीतेच्या विभूतीयोग ह्या दहाव्या अध्यायात म्हटले आहे. परंतु तीर्थयात्रादी करून पुण्य गाठीशी बांधणा-या केंद्राने  प्रशस्त रस्ते, आवश्यक तिथे बोगदे बांधण्याचे काम सुरू आहे. ह्या प्रकल्पाविरूध्द अनेक तज्ज्ञांनी परखड मत नमूद केले असूनही केंद्र सरकारने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले.
सिल्क्यारा बोगद्याचे काम सुरू असताना हिमालयास पीडा देण्यास केंद्राने सुरूवात केली. बोगद्याचे काम करणारे ४१ मजूर खोल गर्तेत अडकून  पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी तज्ज्ञांच्या पथकाला अतोनात प्रयत्न करावे लागले तेव्हा कुठे ह्या जीवनसंकटातून ते कसेबसे बचावले. साक्षात्‌ ईश्वराच्या असंख्य  रूपांपैकी एक असलेल्या हिमालयाचीच ही कृपा म्हटली पाहिजे.
हिमालय हा पृथ्वीवरील सर्व पर्वतात तरूण पर्वत. अगदी सह्याद्रीचे वयदेखील हिमालयापेक्षा अधिक आहे. अशा ह्या हिमालयात सतत बदल सुरू आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. ती किती काळ चालू राहील हे कोणास सांगता येणार नाही. सतत बदलामुळे ह्या परिसरातील पर्यावरणातही बदल होणार हे ओघाने आले. हिमालयात रस्ते-बोगदे बांधल्यामुळे पर्यावरणातही बदल होणार हे निश्चित. त्याखेरीज जी कुठली जीवसृष्ठी ह्या परिसरात आहे त्या जीवसृष्टीला इजा पोहचण्याचीही भीती आहे. बद्रीनारायण, गंगोत्री, यमनोत्री आणि केदारनाथ ह्या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेणा-यांची संख्या वाढतच चालली असून हे राज्य आणि केंद्र सरकारचे म्हणणे बरोबर आहे. परंतु यात्रेचा कालावधी मर्यादित असून त्याच काळात मंदिराचे दरवाजे उघडतात. खुद्द पुजारीही तिथे राहत नाही. डोली वाहणारे नेपाळी मजूर हे त्यांच्या गावी परत जातात. त्याचप्रमाणे खच्चरमालकही त्यांच्या गावी परत जातात. ह्या वस्तुस्थितीकडे सरकारने लक्ष दिलेले नाही. किंबहुना सरकारला लक्ष द्यायचेही नाही असा निष्कर्ष सकृत दर्शनी काढावासा वाटतो.
देशात पर्यटन वाढते राहिले पाहिजे ह्याबद्दल दुमत नाही. पण पर्यटन क्षेत्राच्या मर्यादांचा विसर पडू नये. सार्वजनिक वातूक नीतिन गडकरी मात्र रस्त्यांच्या विस्तार प्रकल्पास अनुकूल आहेत. एरव्ही देशभरात हायवेचे जाळे विणले ह्याबद्दल गडकरींचे कौतुक करावेसे वाटते. हिमालयात रस्ते बांधण्याच्या प्रकल्पास विरोध करायचा नसेल तर त्यांनी विरोध करू नये, परंतु किमान दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने पाठिंबा तरी देऊ नये. विरोध करण्यापूर्वी जगभरात अन्य पर्वतांच्या बाबतीत काय स्थिती आहे हे जाणून घेऊन मगच गडकरींनी हिमालयातील रस्त्यांच्या रूंदीकरणासंबंधात मतप्रदर्शन केल्यास जास्त उचित ठरेल.
ह्या विषयावर तूर्त तरी एवढेच!

रमेश झवर