Thursday, November 30, 2023

हिमालयाला पीडा

महर्षीणां  भृगुरहं  गिरामस्येकमक्षरम् 
यज्ञानां जपयज्ञोsस्मि स्थावराणां हिमालय:

हिमालय हे ईश्वराचेच दुसरे रूप असल्याचे गीतेच्या विभूतीयोग ह्या दहाव्या अध्यायात म्हटले आहे. परंतु तीर्थयात्रादी करून पुण्य गाठीशी बांधणा-या केंद्राने  प्रशस्त रस्ते, आवश्यक तिथे बोगदे बांधण्याचे काम सुरू आहे. ह्या प्रकल्पाविरूध्द अनेक तज्ज्ञांनी परखड मत नमूद केले असूनही केंद्र सरकारने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले.
सिल्क्यारा बोगद्याचे काम सुरू असताना हिमालयास पीडा देण्यास केंद्राने सुरूवात केली. बोगद्याचे काम करणारे ४१ मजूर खोल गर्तेत अडकून  पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी तज्ज्ञांच्या पथकाला अतोनात प्रयत्न करावे लागले तेव्हा कुठे ह्या जीवनसंकटातून ते कसेबसे बचावले. साक्षात्‌ ईश्वराच्या असंख्य  रूपांपैकी एक असलेल्या हिमालयाचीच ही कृपा म्हटली पाहिजे.
हिमालय हा पृथ्वीवरील सर्व पर्वतात तरूण पर्वत. अगदी सह्याद्रीचे वयदेखील हिमालयापेक्षा अधिक आहे. अशा ह्या हिमालयात सतत बदल सुरू आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. ती किती काळ चालू राहील हे कोणास सांगता येणार नाही. सतत बदलामुळे ह्या परिसरातील पर्यावरणातही बदल होणार हे ओघाने आले. हिमालयात रस्ते-बोगदे बांधल्यामुळे पर्यावरणातही बदल होणार हे निश्चित. त्याखेरीज जी कुठली जीवसृष्ठी ह्या परिसरात आहे त्या जीवसृष्टीला इजा पोहचण्याचीही भीती आहे. बद्रीनारायण, गंगोत्री, यमनोत्री आणि केदारनाथ ह्या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेणा-यांची संख्या वाढतच चालली असून हे राज्य आणि केंद्र सरकारचे म्हणणे बरोबर आहे. परंतु यात्रेचा कालावधी मर्यादित असून त्याच काळात मंदिराचे दरवाजे उघडतात. खुद्द पुजारीही तिथे राहत नाही. डोली वाहणारे नेपाळी मजूर हे त्यांच्या गावी परत जातात. त्याचप्रमाणे खच्चरमालकही त्यांच्या गावी परत जातात. ह्या वस्तुस्थितीकडे सरकारने लक्ष दिलेले नाही. किंबहुना सरकारला लक्ष द्यायचेही नाही असा निष्कर्ष सकृत दर्शनी काढावासा वाटतो.
देशात पर्यटन वाढते राहिले पाहिजे ह्याबद्दल दुमत नाही. पण पर्यटन क्षेत्राच्या मर्यादांचा विसर पडू नये. सार्वजनिक वातूक नीतिन गडकरी मात्र रस्त्यांच्या विस्तार प्रकल्पास अनुकूल आहेत. एरव्ही देशभरात हायवेचे जाळे विणले ह्याबद्दल गडकरींचे कौतुक करावेसे वाटते. हिमालयात रस्ते बांधण्याच्या प्रकल्पास विरोध करायचा नसेल तर त्यांनी विरोध करू नये, परंतु किमान दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने पाठिंबा तरी देऊ नये. विरोध करण्यापूर्वी जगभरात अन्य पर्वतांच्या बाबतीत काय स्थिती आहे हे जाणून घेऊन मगच गडकरींनी हिमालयातील रस्त्यांच्या रूंदीकरणासंबंधात मतप्रदर्शन केल्यास जास्त उचित ठरेल.
ह्या विषयावर तूर्त तरी एवढेच!

रमेश झवर

Thursday, September 21, 2023

महिला आरक्षणाचा जुमला

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांसाठी एकतृतियांश मतदारसंघ राखून ठेवण्याची तरतूद करणारे विधेयक लोकसभेत ४५४ विरूध्द २ मतांनी संमत झाले. ओवायसीच्या २ खासदारांनी ह्या ठरावाविरूद्ध मतदान केले. मतदारसंघाची पुरर्चना केल्याखेरीज ह्या ठरावाची अमलबजावणी करता येणे शक्य होणार  नाही हे स्पष्ट करण्याचे सरकारने टाळले. महिलांसाठी राखीव मतदारसंघ कोणते हे ठरवण्यासाठी प्रथम जनगणना होणे आवश्यक आहे. कोरानाच्या कारणामुळे २०२१ साली जनगणना करण्यात आली नव्हती. जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत महिला उमेदवारांचे आरक्षण अमलात आणता येणार नाही हे उघड आहे. ह्याचाच अर्थ महिलांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आरक्षण देणारा ठराव हाही एक जुमला ठरण्याची शक्यताच अधिक. विरोधकांनी मात्र ह्या ठरावाला विरोध न करता पाठिंबा देण्याचे शहाणपण दाखवले.

पुलवामा प्रकरण, नोटबंदी इत्यादि अनेक प्रकारचे निर्णय सरकारने घेतले खरे, परंतु त्यामागे सच्ची भावना किती   आणि दाखवण्यासाठीची भावना किती ह्याबद्दल जाणकरात संशयाची भावना उत्पन्न झाली तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ह्या समस्येवर भाष्य करण्याचे टाळून भाजपा हाच एकमेव पक्ष आहे ज्याने ओबीसी वर्गातल्या व्यक्तीला पंतप्रधानपद दिले, हा मुद्दा गृहमंत्री अमित शहा ह्यांनी ठरावावर बोलताना मांडला. वास्तविक  विरोधी पक्षांनी संसदेत वा संसदेबाहेर हा मुद्दा कधीच उपस्थित केला नाही. स्थानिक नेत्यांनी उपस्थित केला असला तरी राष्ट्रीय पातळीवर तो उचलला गेला नाही हे वास्तव आहे. खरे तर, अनेक महिला उमेदवारांविरूद्ध बदनामी करण्याच्या मोहिमा संघपरिवारातील संघटनांनी राबवल्या. मुंबई महापालिकेत विजयी झालेल्या अलका देसाई ह्यांच्यापासून ते पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांच्यावर्यंत अनेक महिला उमेदवारांविरूद्ध निंदाव्यंजक विधाने सर्रास केली जात होती ह्याची आठवण आजही लोकांच्या मनात आहे.

मोदी ह्या आडनावाच्या संदर्भात राहूल गांधी ह्यांनी कोलार येथे बोलताना केलेल्या टिपणीची दखल घेण्यात आली. त्यांच्यावर गुजरातेत तिन्ही न्यायालयात खटले गुदरण्यात आले. त्या खटल्यांच्या निकालाचा एकच परिणाम झाला. तो म्हणजे राहूल गांधींना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली. त्यांना खासदार म्हणून मिळालेले निवासस्थान खाली करण्यास भाग पाडण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सरकारला माघार घ्यावी लागली आणि त्यांचे संसदेत पुरागमन झाले. त्यांना खासदाराचे निवासस्थान पुन्हा बहाल करण्याचा अनवस्था प्रसंग सरकारवर आला!  राहूल गांधींचे हे प्रकरण आता सुंपष्टात आले असले तरी ते इतिहासात सूडनाट्य म्हणून नोंदले गेलेच. इतिहासाची पाने सरकारला फाडता येणार नाही. अगदी पुनर्लेखन केले तरी मूळ इतिहास बदलणार नाही.

ह्या सगळ्या प्रकरणांचा विचार केल्यास एक मुद्दा मान्य करावा लागतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील बहुतेक राज्यांच्या विधानसभात महिला आमदारांची संख्या कमी आहे. महिला आरक्षण विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणातात त्याप्रमाणे क्रांतीकारक असेलही, विधेयक मांडण्यामागे सरकारची कळकळ कमी आणि जुमला जास्त असे म्हणणे भाग आहे. ह्या विधेयकावर बोलताना  सुप्रिया सुळे ह्यांनी स्वत:च्याच निवडणुकीचे उदाहरण दिले. त्या वेळी निवडणूक प्रचारात भाजपा नेत्याने सुप्रिया सुळे ह्यांची खिल्ली उडवली होती. ती पाहिल्यावर भाजपा नेत्यांच्या मनोवृत्तीचा पर्दाफाश  झाल्याशिवाय राहात नाही.  आपल्या सरकारविरूद्ध एकूणच राजकीय वातावरण पालटत चालल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे उजवे हात अमित शहा ह्यांच्या चांगलेच लक्षात आले आहे. म्हणूनच संसदेत एकूण भाजपाचो ८५ खासदार आणि २९ मंत्री असल्याचा उल्लेख अमित शहांनी ठरावावरलचर्चेला उत्तर देताना केला. परंतु ह्या संदर्भातली वस्तुस्थिती अशी आहे की सा-याच राजकीय पक्षात  तिकीट वाटप करताना निवडणूक मेरिटहा एकनिकष लावला जातो. ह्या बाबतीत राजकीय पक्षांसमोर सध्या तरी पर्याय नाही. एक पर्याय आहे. तो आजवर कोणीच अवलंबला नाही. तो पर्याय म्हणजे महिला उमेदवारांची नावे पाठवा असे धोरण प्रत्येक पक्षाला त्यांच्यापुरते ठरवता आले असते. खुद्द सत्ताधारी भाजपाही त्या भानगडीत पडला नाही.

महिला आरक्षणाची तरतूद केल्याखेरीज पर्याय नाही असे आता भाजपाला अलीकडे का वाटू लागले? गंमतीचा भाग म्हणजे २०२४ च्या निवडणुकांत हे सूत्र लागू करण्यासाठी मोदी सरकारला कुणी रोखले आहे? अजूनही ते पक्ष कार्यकारिणीत ठराव संमत करून आगामी निवडणुकीत महिला आरक्षण राबवू शकतात. हे विधेयक संमत करून विरोधकांना कामाला लावायचे ह्यासाठीच सरकारचा हा सारा खटाटोप आहे.

रमेश झवर 

Monday, September 4, 2023

महाराष्ट्र पूर्वीचा आणि आजचा

सहज  कुतूहल  म्हणून केतकरांच्या ज्ञानकोश चाळला. महाभारतातील भीष्म पर्वात तत्कालीन भारतातील वेगवेगळ्या राजांच्या राज्यांची नावे आली आहेत. त्यात विदर्भ हे नाव आहे, परंतु महाराष्ट्राचे नाव नाही. दक्षिणेतील ही सारी  राज्ये पयोष्णी म्हणजेच नर्मदा नदीच्या दक्षिणेला आहेत. सौराष्ट्र आणि आनर्त ( सध्याचे गुजरात )च्या पलीकडे वसलेल्या भूभागाला  अपरान्त आणि परान्त अशी नावे होती.  ही दोन्ही नावे सध्याच्या कोकणची आहेत. ह्याचा अर्थ सध्याच्या भूप्रदेशाचे महाराष्ट्र हे नाव त्या काळी नव्हते. ह्या प्रदेशातील लहान लहान भूभागांना रूपवाहित, अश्मक, पांडुराष्ट्र, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र ही नावे होती. गोपराष्ट्र हा नाशिकला लागून होता. ह्याचाच अर्थ खानदेशाला लागून होता. खानदेशच्या सीमा आजही विदर्भाला आणि मध्यप्रदेशाला लागून आहेत.

सहाव्या शतकात हूण भारतात आले. गुप्त साम्राज्य आणि हूण ह्यांच्यात सतत  लढाया झाल्या. मिहीरकुल ह्या हूण राजाबरोबर मगध साम्राज्याच्या लढाया झाल्या.  दक्षिणेत चालुक्य राजा पुलकेशी दुसरा ह्याची सत्ता होती.  सातव्या शतकात हर्षाचा काळ सुरू झाला. हर्षाचे त्याच्या राज्याचा हिमालयापासून नर्मदेपर्यंत त्याच्या राज्याचा विस्तार केला. नेपाळचे राजे काठेवाडचे राजे हर्षाचे मांडलिक होते. हर्षाच्या साम्राज्यानंतर प्रबळ राजा उरला नाही.

भारतातील राज्ये ह्या  विषयावर लिहणे आवघड आहे ह्याची मला जाणीव आहे, ह्या लेखातील  अनेक त्रुटी मला मान्य आहेत. ब्रिटिशपूर्व काळात एकमेकांची राज्ये जिंकून आपल्या राज्याला जोडण्याचे आणि तेथील राजाला मांडलिकत्व पत्करण्यास भाग पाडण्यात आले. मांडलिकाकडून खंडणी वसूल करण्याचा शिरस्ता देशभर सुरू होता. मुसलमानी आक्रमणानंतर  भारतातील राज्ये पुन्हा पुन्हा बदलत गेली. मोगल राजवट भारतात स्थिरस्थावर झाल्यानंतर राज्ये जिंकण्याचा त्यांनी सपाटा लावला. 

मोगलांपूर्वी खिलजी, गुलाम इत्यादी घराण्यांनी दक्षिणेतला प्रदेश जिंकला.तेथे त्यांनी त्यांची सत्ता प्रस्थापित केली.  विजयनगरचे साम्राज्य बुडवण्यासाठी वेगवेगळे सुलतान एकत्र आले. त्यात ते यशस्वीही झाले. मराठा लढवय्यांपुढे मुस्लिम सत्ताधा-यांची जहागिरी पत्करण्याखेरीज मार्ग उरल  नाही.  शिवाजीमहाराजांचे वडिल शहाजीराजे हे बंगलोरचे जहागीरदार होते. शिवाजीमहाराजांना जहागीरदारीत रस नव्हता. स्वराज्य स्थापन  करण्याची त्यांना प्रबळ इच्छा होती. अखेर त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले!  दक्षिणेतील वेगवेगळ्या सुलतानांशी गनिमी काव्याच्या बळावर झुंज देत असतानाच मोगल बादशहा औरंगजेबाचे आव्हान त्यांच्यासमोर होतेच. गनिमीकाव्याच्या जोरावर त्यांनी स्वराज्य वाढवले. शेवटी सिंहासनाधिष्ठित राजा म्हणून शिवाजीमहाराजांचा लौकिक हिंजुस्थानभर पसरला खरा. परंतु स्वराज्याच्या स्थापनेनंतर त्यांचा अंत झाला. त्यांच्यानंतर स्वराज्याची काही अंशी पीच्छेहाट झाली खरी, परंतु शिवाजीमहाराजांचे पुत्र संभाजी आणि राजाराम ह्या दोघांनी स्वराज्याचा लढा सुरूच ठेवला. मोगलांच्या कैदेतून सुटका झाल्यानंतर संभाजीमहाराजांचे पुत्र शाहूमहाराजांनी बाळाजी विश्वनाथच्या मदतीने मराठा राज्याची सूत्रे हाती घेतली. त्यासाठी त्यांना स्वकियांशीही लढा द्यावा लागला. त्यात ते विजयी ठरले. बाळाजी विश्वनाथाच्या मुलास म्हणजेच पहिल्या बाजीरावाला पेशवाईची वस्त्रे दिली. नंतरच्या काळात पेशवाईची वाटचाल मराठा कॉन्फेडरेशनच्या दिशेने सुरू झाली.  इंग्रजांनी  १८१८ मध्ये  पेशवाईचे राज्प संपुष्टात आणले. त्याचप्रमाणे

इंग्रजांनी फ्रेंच आणि डच ह्यांची सत्ता संपुष्टात आणली होती. पुढे ब्रिटिश संसदेने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात आणला. ब्रिटिश मंत्रिमंडळात भारत मंत्री नेमण्यात आला. त्या मंत्र्याशी सल्लामसलत केल्यानंतर भारतात गव्हर्नर जनरल उर्फ व्हायराय नेमण्यात आले. हे व्हायसरायच भारताचे खरे सत्ताधारी होते.

ब्रिटिशांच्या पारतंत्रातून मुक्त होण्यासाठी देशात हळुहळू आंदोलन सुरू झाले. ह्या आंदोलनात सशस्त्र क्रांती करू इच्छिणा-यांपासून सनदशीर लढा देण्यासाठी अनेक चळवळी सुरू झाल्या. १९४२ साली मुंबईत गोवालिया टँक मैदानावर भरलेल्या सभेत चले जावघोषणा देण्यात आली. अनेक लोकांनी स्वातंत्र्य लढ्याच्या ह्या अखेरच्या पर्वात भाग घेतला. स्वखुशीने तुरंगावास पत्करला. शेवटी १५ ऑगस्ट रोजी १९४७ ह्या दिवशी भारताची सत्ता खुद्द भारतीयांच्या हातात सोपवून ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड माऊंटबॅटन हे इंग्लंडला निघून गेले. घटना समितीचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ह्या समितीने तयार केलेल्या घटनेला मंजुरी देण्यात आली. राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद हे पहिले राष्ट्रपती झाले तर पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान झाले. १९४७ पासून १९६४ पर्यंत पंतप्रधानपदावर राहिलेल्या पं. जवाहरलाल नेहरूंना  अफाट लोकप्रियता लाभली. अमेरिका आणि सोव्हएत ह्या दोन्ही महासत्तांपासून सम अंतर राखण्याचा त्यांचे धोरण होते. त्यांचे धोरण बव्हंशी यशस्वीही झाले. चीनी आक्रमणानंतर मात्र ते खचून गेले. 

त्यांच्या काळी राज्यपुनर्रचना करण्याचा देशासमोर राजकीय प्रश्न  प्रामुख्याने होता. राज्यपुनर्रचनेच्या संदर्भात विस्तृत शिफारशी करण्यासाठी नेहरू सरकारने फाजल अली कमिशन नेमले. मोरारजीभाईंचा मुंबईवर डोळा होता. म्हणून त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची सांगड घालायला नेहरूंना भाग पाडले.  परिणामी महाराष्ट्र आणि गुजरात मिळून असे नवे व्दिभाषिक राज्य अस्तित्वात आले. आचार्य अत्रे ह्यांच्या नेतृखाली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी लढा देण्याची घोषणा आचार्य अत्र्यांनी केली. हा लढा इतका तीव्र होता की स्वतंत्र महाराष्ट्राची मागणी मान्य करणे भाग पडले. अर्थात त्यासाठी त्यांनी इंदिराजींना महाराष्ट्रात पाठवले. महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावाच लागेल अशी शिफारस इंदिराजींनी केली. शेवटी १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाले.

रमेश झवर


Wednesday, August 30, 2023

चांद्र मोहिम फत्ते

चंद्रावर उतरण्याच्या दृष्टीने विक्रम लँडरसज्ज झाले असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ते उतरवण्याची घडी समीप आली आहे. हे लँडर चंद्रभूमीवर विशिष्ट जागी उतरवण्यासाठी चांद्रायानाचा वेग कमी करावा लागतो. श्रीहरीकोटा अवकाशयान केंद्रावरील शास्त्रज्ञांनी यानाचा वेग शुक्रवारपासून कमी करत आणला. ह्या मोहिमेतील सारे टप्पे यशस्वीरीत्या ओलांडण्यात आले. आता हा अखेरचा टप्पा. लँडर विशिष्ट जागी उतरवणे महत्त्वाचे असते. ह्या वेळी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले जाणार आहे. ते एकदाचे नियोजित स्थळी आणि नियोजित वेळी उतरले की चांद्र मोहिम यशस्वी झाली असे म्हणता येईल.

चंद्रभूमीवरील मातीचे परीक्षण करण्याच्या उद्देशाने ही मोहिम राबवण्यात आली आहे. सत्तरीच्या दशकात अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग ह्याने जेव्हा चंद्रभूमीवर पाऊल टाकले तेव्हा मी सांजमराठाचा संपादक होतो. चंद्रा तुझे एकाकीपण संपलेअशी बॅनर हेडलाईन सांज मराठाच्या अंकाला दिली होती. नील आर्मस्ट्राँगला मी पृथ्वीपुत्र नील आर्मस्ट्राँग ह्याने चंद्रभूमीवर पाऊल ठेवले ह्या वाक्याने बातमीची सुरूवात केली. काही बावळट पोथीनिष्ठ वाचकांचे फोन आले. अमेरिकन अंतराळवीरम्हणण्याऐवजी तुम्ही पृथ्वीपुत्रच म्हणणार! मराठा हा कम्युनिस्टांचा पेपर आहे ना ! तुम्हाला मालकाचे ऐकणे भागच आहे. वर्तमानपत्रात बातमी लिहताना पत्रकाराची वैयक्तिक मते किंवा भूमिकेचा काही एक संबंध नाही. मराठाचे संपादक ह्यांच्या आम्हाला कोणत्याही सूचना नव्हत्या. मूळ पीटीआय किंवा रॉयटरच्या बातमीनुसार बातमी लिहावी हेच उपसंपादकांकडून अपेक्षित असते. मी लिहलेला इंट्रो बरोबरच होता. एक आवश्यक मुद्दा नव्या पिढीतील वाचकांच्या लक्षात यावा म्हणून मी जुन्या काळातील बातमीचा उल्लेख केला.

 चांद्र मोहिम राबवण्यामागे अनेक कारणे आहेत. खरे तर, जगातील सर्वच अंतराळ संशोधन संस्थांचा मंगळावर जाण्याचा इरादा आहे. मंगळावर यान पाठवताना चंद्र हे पहिले स्टेशन राहणार आहे. तिथे थोडा वेळ थांबून यान मंगळाच्या प्रवासाला निघेल. मंगळ प्रवासाच हा कार्यक्रम जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांनी ठरवला आहे. म्हणून चंद्राच्या भूगर्भात कुठल्या प्रकारची खनिजे आहेत ह्याची अद्यावत माहिती भारताकडून मिळवली जात आहे. इस्रोच्या मोहिमातले हे लॉजिक आहे अनेकांना माहित नाही. परंतु अंतराळ संशोधकांना, शास्त्रज्ञांना ते निश्चित करावेच लागते. त्यानुसार तूर्त तरी मातीपरीक्षण हा उद्देश ठरवण्यात आला आहे. हे लक्षात घेता विक्रमचे दि. २३ रोजी होणारे लँडिंग महत्त्वाचे राहील. ते एकदा यशस्वी झाले की भारताची ही चांद्रयान-३ मोहिम फत्ते झाली असेच म्हटले पाहिजे !

रमेश झवर

कल्पनेची बाधा

माणूस कल्पनेच्या बाधेत अडकतो म्हणजे नेमके काय? समोर दिसणारे ढळढळीत वास्तव त्याला दिसत नाही.विशेष म्हणजे नेहमी अद्वैत तत्तवज्ञानाच्या गप्पा मारणा-यांनामनातले हे सुप्त व्दंद्वध्यानात येत नाही.अध्यात्मात  मुरलेल्या माणसाला मात्र हे व्दंद्व लगेच समजते. अध्यात्म म्हणजेतरी काय? अध्यात्मशास्त्र  माणसाला आरशाप्रमाणे वास्तवाचे प्रतिबिंब दाखवते. रोजचे जीवन कसे जगत असताना येणा-या अडचणींचे निराकरण कसे करावे  हेही उलगडते. एखादी वस्तु लख्ख प्रकाशात जसजशी स्वच्छ दिसू लागते तसतसे अडचणही दिसते. त्यावरचा उपायही दिसतो.  म्हणून परिस्थिती कितीही विपरीत असली तरी तो मुळीच अस्वस्थ होत नाही. ह्याचे कारण  परिस्थिती अनुकूल असली तरी ती हळुहळू बदलणार हेही त्याच्या ध्यानात  येत असते. त्याच्या हेही ध्यानात येते की, विपरीत परिस्थितीदेखील कायम बसून राहणार नाही.  ह्या सत्याची मला वारंवार प्रचिती येत गेली.

एक लाख श्लोकांचे महाभारत किंवा २५ हजार श्लोकांचे रामायण वाचणे संस्कृत विषय घेऊन एमए झालेल्या  माणसाला शक्य नाही. मग सर्वसामान्य माणसाची काय कथासाधी ७०० श्लोकांची गीताही लोकांना समजत नाही. म्हणूनच गुरू निवृत्तीनाथांच्या आदेशावरून  ज्ञानेश्वरांनी गीतेचा भावानुवाद नेवासे येथे मोहिनीराजांच्या मंदिरात श्रोत्यांसमोर सादर केला. नामदेवांनी  स्वतंत्र  अभंग रचना केली तरी त्यांच्या अभंगाला रामायण, महाभारत आणि भागवत पुराणांचा आधार आहे. नामदेवांच्या १४ अभंगांचा तर शिखांच्या गुरूबानीमध्ये समावेश करण्यात आला आहे. शीख लोकही पंढरपूरला नामदेव पायरीवर मत्था टेकण्यासाठी येतात. एकनाथांनी भागवत आणि भावार्थ रामायण तर लिहलेच; शिवाय भारूडे, गवळणी लिहून सामान्य जनांना आध्यात्मिक वाट दाखवली. समर्थांनी देशभर भ्रमण करून लोकांना तत्त्व आणि व्यावहारिक मार्गांचा मेळ घालण्याची शिकवण दिली. अकरा मारोतींची स्थापना करून दक्षिणेवर होणा-या  औरंगजेबाच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी प्रेरणा दिली! त्यातूनच पुढे मराठेशाही साम्राज्य स्थापन झाले.

 मी जेव्हा एकटा बसलेला असतो त्यावेळी बाराव्या शतकापासून अठराव्या शतकांचा चित्रपट  माझ्या डोळ्यांसमोरून सरकतो. ज्या अल्पसंख्यांक माहेश्वरी समाजात मी जन्मलो त्या समाजातील ७२ कुळांचे पूर्वज रजपूत सरदार  होते. ऐतिहासिक काळात कुठले तरी युध्द ते हरले. त्यामुळे  त्यांच्यावर रानावनात पळून जाण्याची पाळी आली. त्या वनवासातच भगवान महेशाने त्यांच्यावर कृपा केली. वणिग्‌ वृत्तीने आयुष्य जगण्याची प्रेरणा दिली. भगवान महेशांच्या कृपेने त्यांच्या भाल्यांची लेखणी झाली. ढालींचे तराजू झाले ! सणावळ्या पाठ करणे म्हणजे इतिहास नाही. इतिहासाचा जिवंत चित्रपट आपल्या डोळ्यांपुढून सरकतो तेव्हाच आपल्या मनातले नैराश्याचे मळभ दूर होते! इतरांचे मला महित नाही, परंतु मनातले नैराश्य दूर होण्याच्या प्रक्रियेचे हे दर्शन मला वेळोवेळी झाले. भरकटलेले मन आपोआपच स्थिर होते गेल्याचा अनुभव आला.

माझ्या सध्याच्या आयुष्याची पार्श्वभूमी पुरेशी स्पष्ट व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे तपशील मी मुद्दाम नमूद करत आहे. मी जळगावात मोठा झालो. जळगावात नदी अशी नव्हती. जळगावात जी मेहरूणी नामक लहानशी नदी होती. तिचे रूपान्तर कधीच नाल्यात झालेले होते! तापी आणि गिरणा ह्या दोन नद्यांचे वरदान जळगावला मिळाले खरे ; परंतु ह्या दोन्ही नद्या जळगाव शहरापासून  तशा लांबच. तापी स्नानासाठी ममुराबाद किंवा इदगावपर्यंत  बसने जावे लागायचे. सूर्यग्रहणाच्या दिवशी माझे वडिल गिरणा स्नानाला जात असत. मी थोडा मोठा झाल्यावर वडिल मला सायकलीवर डबल सीट बसवून  गिरणास्नानाला अनेकदा नेले.  जळगावकरांचे सुदैव असे की १९२७ साली जळगाव नगरपालिकेने पाणीपुरवठा योजना राबवली. ह्या योजनेमुळे जळगावकरांना गिरणेच पाणी नळाद्वारे मिळू लागले. बालाजी पेठेत माझे घर होते. हा  भाग जळगावतला लो लायिंग एरिया’. त्यामुळे घरात नळाला पाणी नाही असे कधीच घडलेच नाही! शिवाय घरात  विहीरही  होतीच.राहाटगाड्याने पाणी वर आणता येत असे.

जळगावनजीक मेहरूणचा तलाव किंवा गिरणा वॉटर टँक ही दोन स्थळे होती.  सहलीला जाण्याची ठिकाणे होती. मेहरूण रोडवर जवळ जवळ रान होते. त्या रानात एक देवीचे देऊळ होते. ह्या देवीचे नाव इच्छादेवी! आश्विन अष्टमीच्या दिवशी  माझे चुलते शंकरभाईजी झवर हे इच्छादेवीच्या देवळात सगळ्या झवर कुटुंबाला जेवण देत असत. सगळे झवर कुटुंब जेवणाला  हजेरी लावत असे. महाराष्ट्रातील सर्व शहरांचा विस्तार झाला तसा तो जळगाव शहराचाही झाला. त्याचा दृश्य परिणाम असा की इच्छादेवीचे मंदिर नेमके कुठे आहे हे रस्त्याने जाणा-यांच्या लक्षात येत नाही.

अलीकडे जळगाव नगरपालिकेची महापालिका झाली. महापालिकेचे कार्यालय १७ मजली टॉवरमध्ये आहे! एखाद्या शहराच्या महापालिकेचे कार्यालय १७ मजली टॉवरमध्ये असल्याचे हे एकमेव उदाहरण असावे. शहर ह्या दृष्टीने जळगाव जितके आधुनिक तितकेच सांस्कृतिक  परंपरेच्या बाबतीही समृध्द आहे. जुन्या काळापासून  जळगावाचे नाव हे सांस्कृतिक केंद्र म्हणून दुमदुमू लागले होते. संगीत स्वयंवरपासून ते मी जिंकलो मी हरलोह्या विजय तेंडुलकरलिखित नाटकांपर्यंत पुण्यामुंबईला होणा-या बहुतेक नाटकांचे प्रयोग जळगावलाही केले जात. नाटकांप्रमाणे  वृत्तपत्र व्यवसायाची परंपराही जळगावात जुनी आहे. प्रबोधचंद्रिका साप्ताहिक  आणि कवितेला वाहिलेले काव्यरत्नावली’  मासिक नानासाहेब फडणीस ह्यांनी जळगावला सुरू केले. भा. रा. तांबेंपासून केशवसुत-केशवकुमार ह्यांच्यापर्यंत असा एकही कवी नसेल की ज्याच्या कविता काव्यत्नावलीत प्रसिध्द झाल्या नाही. राजसंन्यास नाटकाचे  काही प्रयोग राम गणेश गडकररींनी सोनाळकरांच्या घरी लिहले. नोकरीनिमित्त माधव ज्युलियन ह्यांचे अमळनेरमध्ये काही काळ वास्तव्य होते.

सानेगुरूजींनी तर खानदेश ही कर्मभूमी मानली. त्यांच्या वास्तव्यामुळे  खानदेशची भूमी पावन झाली. १९३० साली गांधींजींच्या आदेशावरून दांडी यात्रेत कायदेभंग केला. सानेगुरूजींनीही  कोकणात शिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह केला. शिरोड्याच्या सत्याग्रहात माझ्या वडिलांनी भाग घेतला! आपण मिठाच्या सत्याग्रहाला जात असल्याची चिठ्ठी त्यांनी आजोबांना लिहून ठेवली. ही गीतेत ठेवल्यामुळे आजोबांना बरोबर सापडली. ह्या आठवणीला माझे वडिल अधुनमधून उजाळा  देत. मीही त्यांच्या आठवणीत रमून जात असे.

न. चिं केळकरांचे ज्येष्ठ बंधू महादेव चिंतामण केळकर हे जळगावला डेप्युटी कलेक्टर होते. त्यांचे मोठे घर होते. म. चिं. केळकरांच्य  पश्च्यात त्यांचे चिरंजीव वसंत केळकर हे जळगावात स्थायिक झाले. मुंबईतली आर्ट गॅलरी बंद करून उपजीवेकासाठी त्यांनी बळिराम पेठेत इंग्रजीचे क्लास सुरू केला. मी एस्सेसीला असताना त्यांच्या क्लासमध्ये ५ रुपये भरून प्रवेश मिळवला. इंग्रजीसह मी एस्ससी  पास झाल्याने माझा कॉलेज-प्रवेश सोपा  झाला. जळगावच्या मूळजी जेठा कॉलेजात  प्रा. म. ना. अदवंत हे मराठीचे विभागप्रमुख  होते. ते अनेक विद्यापीठांच्या अभ्यास समितीवर  होते. त्यांच्या मदतीला सुधाकर जोशी, विमल राणे, राजा महाजन हे तीन  व्याख्याते  होते. कॉलेजच्या आर्टस्‌ शाखेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिंदीतील प्रख्यात व्यंगकार शंकरबाब पुणतांबेकर हे हिंदी शिकवायला होते. उत्तमचंद कोठारी हे त्यांचे मदतनीस. ह्यांच्याखेरीज  सुरेश चिरमाडे ( अर्थशास्त्र ), जोगळेकर     ( तर्कशास्त्र ), तारळेकर दांपत्य, नाडकर्णी मॅडम हेही वेगवेगळे विषय शिकवत. एकूण सगळी टीम पुणे-मुंबई विद्यापीठातल्या व्याख्यात्यांच्या तोडीस तोड  होती.

ह्या लेखाचा  ‘फोकसनेमका कशावर दिला आहे असा  प्रश्न पडण्याचा संभव आहे. त्याचे उत्तर असे की माझ्या आध्यात्मिक जीवनाची पार्श्वभूमी वाचकांना समजण्यास मदत व्हावी. मला असे वाटते की ह्या लेखातील तपशीलाने ती वाचकांच्या  ब-यापैकी लक्षात आली असेल. वडिलांची परिस्थिती गरीबीची नव्हती किंवा फार श्रीमंतीचीही नव्हती. वडिलांनी सुरूवातील धान्याचा आणि नंतर नंतर सरकी, पेंड वगैरे पशुखाद्याचा व्यवसाय  केला. धंद्यात त्यांना फार पैसा मिळवला असे नाही. परंतु त्यांना कमी पडले नाही हेही तितकेच खरे. वंशपरंपरागत मिळालेल्या प्रॉपर्टीची हिस्सेवाटणी झाल्यानंतर आमची परिस्थिती ब-यापैकी पालटली. वडिल बंधूंचे शिक्षण एसेस्सीनंतर थांबले होते. मला मात्र कॉलेज शिक्षणाची संधी मिळाली  हे माझे वडिलोपार्जित भाग्य !

रमेश झवर

Saturday, August 5, 2023

विवेकबुध्दीचे दर्शन

लोकशाही राजकारणात
कोणालाही राजकारण करण्यास मज्जाव करणे हे लोकशाहीच्या मूळ तत्त्वाविरूध्द आहे. ह्यउप्परही राजकीय विरोधकाला संसदीय राजकारणात वावरण्यास मज्जाव करायचा असेल तर किमान सर्वोच्च नेत्याने तरी विवेकबुध्दीला तिलांजली देणे योग्य ठरत नाही. मोदी आडनावासंबंधीचे विधान राहूल गांधींनी मुळात करायला नको होते. परंतु त्यांनी ते केल्याबद्दल राहूल गांधींना गुजरातमधील मॅजिस्ट्रेट कोर्ट, सेशन्स कोर्टाने दोषी ठरवून दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा दिली. वास्तविक अब्रुनुकसानीच्या खटल्यात न्यायालयांनी नेहमीच सौम्य भूमिका घेतली. फारतर. कोर्ट उठेपर्यंत कारावासाची शिक्षाही अनेक प्रकरणात दिल्या गेल्या आहेत. राहूलला झालेली शिक्षा रद्द गुजरात हायकोर्टाला रद्द करता आली असती. किंवा नव्याने खटला चालवण्याचा आदेश देता आला असता. मुळात जिल्ह्याच्या राजकारणात कोर्टबाजी करण्याची अनेकांना सवय आहे. राहूल गांधीवरचे खटले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. कनिष्ठ न्यायालयांचे समजू शकते. उच्च न्यायालयानेही कनिष्ठ कोर्टाचा निकाल उचलून धरावा? ह्याचा अर्थ गुजरातमधील न्याधीशवर्ग ‘नको रे बाबा’ असे मनातल्या मनात म्हणत गुजरातमधल्या न्यायाधीशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोष पत्करण्याची जोखीम पत्करली नाही.
भारत यात्रेच्या काळात कर्नाटकमधील कोलारजवळ राहूल गांधींनी केलेले विधान हे विनोदबुध्दीने केले असा पवित्रा राहूल गांधींना घेता आला असता. परंतु तो तसा त्यांनी घेतला नाही. भाजपातदेखील अनेकांना विनोदी बुध्दीचे वावडे आहे. राहूल गांधींचा काटा काढण्याची अचानकपणे आलेली पंतप्रधान नरेंद्र ह्यांना मिळाली. ती साधून राहूल गांधींचे लोकसभा सदस्यत्व निलंबित करण्यास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला ह्यांना भाग पाडले. शेवटी राहूल गांधींना झालेल्या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने हंगामी काळासाठी का होईना स्थगिती दिल्यामुळे राहूल गांधींचे हिसकावून घेतलेले लोकसभा सदस्यत्व मोदी सरकारला भाग आहे. ह्या प्रकरणाचा एकूण विचार करता ह्या मोदी सरकारचीच बदनामी अधिक झाली असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. निवडणूक प्रचार सभांत पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी राहूल गांधींना ‘पप्पू’ म्हटले. राहूल गांधींनी ते फारसे मनावर घेतले नाही. राजकारणात प्रतिस्पर्ध्याला शेलकी विशेषणे बहाल करण्यामुळे श्रोत्यांची करमणूक होते. नेहरू - गांधी परिवारातल्या व्यक्तींविरुध्द वाटेल ते बोलण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रघात आहे. तो मोदींनी भाजपाच्या राजकारणात आणला.
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात विवेकबुध्दीचे दर्शन घडले. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राहूल गांधींना त्यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले. ह्या बाबतीत वेळकाढूपणा करणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरला असता. सरकारच्या कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन घडलेच. राहूल गांधींना खासदारकी पुन्हा बहाल झाली. अर्थात २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाविरूध्द हा मुद्दा निश्चितच राहील.
रमेश झवर
सर्व प्रतिक्रिया:
Sanjay Chitnis, Pradeep Varma आणि अन्य ११
लाईक
टिप्‍पणी
सामायिक करा
आणखी कमेंट्स पहा

Thursday, August 3, 2023

मित्रवर्य ना धों. महानोर

खानदेशला
  काव्यप्रतिभेचे  देणे  लाभले  आहे. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, बहिणाबाई चौधरी, सोपानदेव चौधरी अशी कितीतरी नावे सांगता येतील. सानेगुरूजी आणि माधव ज्युलियन हे मूळचे खानदेशचे नसले तरी  त्यांची प्रतिभा बहरली ती खानदेशच्या मातीत! निसर्गातल्या पिकाच्या संवेदना अलगद टिपणारे ना. धों.महानोर  हे अगदी अलीकडचे नाव. त्यांचे गाव पळसखेडे अजिंठा तालुक्याच्या सीमेवर असले तरी  जळगावला जवळ आहे. नशीब काढयाला पळसखेड्याची मंडळी जळगावला येतात. जैन इगेशनचे भवरलाल जैन हेदेखील मूळ पळसखेड्याचे. पळसखेड्याला भवरलाल जैन ह्यांची आणि नाधोंची थोडीफार शेती होती. भवरलाल जैन जळगावला आले. त्यांनी लहानसा व्यवसाय केला. महानोरही महाविद्यालयीन शिक्षणाला जळगावला आले. मूळजी जेठा महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. पुढे कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना शिक्षण सोडून द्यावे लागले.

कॉलेजमध्ये असताना त्यांना कविता लिहण्याचा छंद होता. तो त्यांनी  मनोमन जोपासलाही. हे म. ना. अदवंतांना कळताच त्यांनी आणि प्रा. राजा महाजन ह्या दोघांनी महानोरना उत्तेजन दिले. राजा महाजन हे अहिराणी भाषेत कविता लिहीत. ललितबंधच्या क्षेत्रात . ना. अदवंतांचे नाव महाराष्ट्रभर गाजलेले होते. आपल्या विद्यार्थ्यांच्या काव्यस्फूर्तीला उत्तेजन देणे हे दोघे आपले कर्तव्य समजायचे. ना. धों. महानोर, दिवाकर गंधे, पुरूषोत्तम भावसार. मंगला नाडकर्णी ह्यांचे कौतुक करण्याच्या बाबतीत दोघांनी कधी हात आखडता घेतला नाही. कवितेच्या प्रांतात मला लुडबूड करायचीच नव्हती. विनोदी लेख आणि कथा लिहण्याची मला इच्छा होती. सुदैवाने साप्ताहिक गावकरी आणि महाराष्ट्र टाईम्स ह्या दोन नियतकालिकांनी मला प्रसिध्दी दिली. साहजिकच अदवंतसरांनी आणि राजा महाजनांनी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्यामुळे माझा भआव वधारला.

मी प्री डिग्रीमध्ये असताना कॉलेजतर्फे हिरवळ नावाची भित्तीपत्रिका सुरू करण्याचा उपक्रम अदवंतसरांनी सुरू केला. ह्या उपक्रमाची जबाबदारी त्यांनी प्रा. सुधाकर जोशी ह्यांच्यावर सोपवली. तो संपूर्ण अंक सुंदर हस्ताक्षरात लिहून काढण्याची जबाबदारी माझे मित्र दिवाकर गंधे ह्याने पत्करली. कॉलेजमध्ये आणि घरीदारी लिहण्याखेरीज आम्हाला दुसरे काही सुचत नव्हते. दिवाकरने त्याही पुढे मजल मारून साहित्य साधना नावाची संघटना स्थापन केली. साहित्य साधनेची बैठक दर रविवारी त्याच्या घरी भरत असे. बैठकीत प्रत्येक जण त्याचे लिखाण वाचून दाखवायचा प्रा. सुधाकर जोशी आवर्जून उपस्थित राहायचे. ना. धों. पळसखेड्याला राहायचे. त्यामुळे इच्छा असूनही आपल्याला साहित्य साधनाच्या बैठकीला हजर राहता येत नाही ह्याची खंत नाधोंनी दिवाकरकडे आणि माझ्याकडे अनेकदा व्यक्त केली.  मूळजी जेठा कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनास मात्र नाधों आवर्जून हजर राहायचे. पळसखेडे आणि जळगावमधले अंतर लक्षात घेता सायकलीने येणे सोपे नव्हते. कवितेबद्दल त्यांच्या मनात प्रेम होते. थोडं उशिरा का होईना ते येणार ह्याची आम्हा सर्वांना खात्री होतीआमची खात्री कधीही खोटी ठरली नाही हे आवर्जून सांगितले पाहिजे.

पाहता पाहता कवी म्हणून नाधोंचे नाव महाराष्ट्रभर गाजू लागले. विद्याधर गोखले ह्यांनी लोकसत्ता दिवाळी अंकाचे काम माझ्याकडे सोपवले. त्यांनी नावांची यादी तयार करून माझ्या हातात दिली. त्यानंतर मी भराभर एकेका कवीला फोन लावायल सुरूवात केली. महानोरना फोन लावला तेव्हा कळले की त्यांना जसलोक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्या वतीने कुणीतरी नर्सबाई बोलत होत्या. महानोरनी मला निरोप दिला. ह्या वर्षी तरी मी कविता देऊ शकणार नाही. मलामाफ करा. बळावलेल्या काविळीमुळे मी जसलोकात दाखल झालो आहे.’

दुस-या दिवशी त्यांचे पत्र आले. त्या पत्रात त्यांनी लिहले होते, ह्या वर्षी माफ करा. पुढच्या वर्षी मी तुम्हाला नक्की  कविता देईन. नंतर विधानपरिषदेवर त्यांची आमदार म्हणून नेमणूक झाली. ते आणखी बिझी झाले. मी जळगावला जेव्हा जेव्हा माझ्या घरी जाई तेव्हा तेव्हा महानोरना त्यांच्या घरी जाऊन भेटत असे. चहापोहे घेतल्याशिवाय त्यांनी मला कधी जाऊ दिले नाही.

 आज मित्रवर्य ना. धों गेल्याची बातमी फेसबुकवर वाचताच मन उदास झाले.

रमेश झवर

Tuesday, July 25, 2023

शिरीष कणेकर

ज्येष्ठ पत्रकार आणि सिनेमा, क्रिकेट ह्या विषयांवर मिष्कील शैलीत लिहणारे लेखक आणि पत्रकार शिरीष कणेकर ह्यांच्या निधनाचे वृत्त वाचून मला धक्काच बसला. कणेकर एक्स्प्रेसमध्ये वार्ताहर म्हणून आणि मी लोकसत्तेत उपसंपादक म्हणून नोकरीला लागण्यापूर्वीपासून त्यांची आणि माझी मैत्री होती. माझे मित्र प्र. ना. शेणई ह्यांचे बंधू दत्ताराम शेणई ह्यांनी माझी कणेकरांशी ओळख करून दिली होती. ते १९६७-१९६८ साल असावे. त्यांची ओळख होताच मी त्यांना विचारले, दंगलीत तुमच्या मोटार सायकलीची मोडतोड कुणी केली?

दंगलखोर कोण होते हे मी कसे सांगणार?’

नंतर मला लगेच आठवले की शिरीष कणेकर हे कायद्याचे पदवीधरही आहेत. त्यामुळे माझ्या प्रश्नाला त्यांनी दिलेले उत्तर विटनेस बॉक्स उभ्या असलेल्या साक्षीदाराने द्यावे तसे होते. ते म्हणाले, खरे तर चूक माझीच आहे. दंगलग्रस्त भागातून मी जायलाच नको होते. फाजील आत्मविश्वास मला नडला!

त्यानंतर माझी आणि कणेकरांशी भेट झाली ती माझे इंडियन एक्स्प्रेसमध्ये ते एक्सप्रेसमध्ये वार्ताहर होते. मी लोकसत्तेत उपसंपादक होतो. सुरूवातीला आम्हा दोघांनाही किरकोळ बातम्या करायला दिल्या जात. बीएसव्ही राव हे त्यांचे बॉस तर माझे बॉस तुकाराम कोकजे. तो काळ आम्हा दोघांच्या उमेदावारीचा होता. ह्याची जाणीव कणेकरांनाही होती तशी मलाही होती. आम्हाला कुठला बीट असा नव्हता. सगळे महत्त्वाचे बीटस् हे राखीव होते. वर्तमानपत्रात तुम्हाला कुठलीही बातमी लिहायला सांगितल्यावर ती तुम्ही मुकाट्याने लिहून देणे हे आम्ही जाणून होतो. वरिष्ठांचे काहीही मत असले तरी चीफ सब एडिटरला आम्ही लिहलेल्या कॉपीवर कधी बॉलपेन फिरवावा लागला नाही ह्यावर आम्ही खूष होतो. परंतु वर्तमानपत्रातले वातावरण इतके साधे अन्‌ सरळ असत नाही. तुमची इमेज काळवंडली पाहिजे असाच चंग काही लोकांनी बांधलेला असतो.  त्यांच्या टीकेला तुमच्याकडे उत्तर नसते. कारण, हे सगळे तुमच्या समोर चालत नाही. कोणी विशिष्ट व्यक्ती तुमच्याविरूध्द ते चालवत असते असेही नाही. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार ट्रायल इन इन ब्सेनिशिया! यशाचा जसा पिंजरा असतो तसा अपयशाचाही पिंजरा असतो. अपयशाचा पिंजरा तुम्ही कधीच भेदू शकत नाही.

शिरीष कणेकरांची आणि माझी जेव्हा खासगीत भेट होत असे तेव्हा मनातले हे दु:ख आम्ही एकमेकाकंडे व्यक्त करत असू. अर्थात कालान्तराने ह्या दु:खातून आम्ही दोघेही सावरलो. ह्याचे सगळ्याचे मोठे कारण म्हणजे एक्सप्रेसमधले राधाकृष्णन्, संपत आणि मेन्झिस हे तिघे चीफ सब. तिघांनी कणेकरांना सांभाळून घेतले. मला लोकसत्तेत सदानंद पालेकर, लक्ष्मीदास बोरकर आणि श्रीपाद डोंगरे ह्या तिघा चीफसबनी सांभाळून घेतले. सुरूवातीला कॉपी स्वत : तपासून मगच बातमी चीफ सबच्या हातात द्यायची हे मी ठरवून टाकले. हातात बातमी आली की त्यावर मल्लीनाथी न करता सरळ त्या बातमीला भिडणे असा शिरस्त मी ठरवून टाकला. कणेकरांनीही बहुधा तेच ठरवले असावे. आमच्या विरूध्द असलेले वातावरण हळुहळू पालटले.

मी अमेरिकेला जाऊन आल्याचे त्यांना कळताच माझ्याजवळ येऊन त्यांनी विचारले,

तुम्हाला कोणत्या संस्थेचे निमंत्रण मिळाले होते ?’

मला कोणीच निमंत्रण दिले नाही. पासपोर्ट कार्यालयात जाऊन मी रीतसर पासपोर्ट मिळवला. अमेरिकन भुलाभाई मार्गावरील वकालतीत जाऊन अमेरिकेचा व्हिसा मिळवला. व्हिसा कसा मिळाला ह्याची तपशीलवार हकिगत मी कणेकरांना सांगितली. विशेषत: व्हिसा अधिका-याबरोबर माझा संवाद कसा झाला हेही मी कणेकरांना तपशिलवार सांगितले. तो संवाद असा-

 तुम्हाला व्हिसा कां हवा आहे?

मी देशभर हिंडलो आहे. पर्यटणाची मला हौस आहे. म्हणून सर्वप्रथम अमेरिकेला जायचे माझ्या मनात आले

माझे म्हणणे व्हिसा अधिका-याला पटले असावे.

ओके यू विल हॅव इट. कम आफ्टर थ्री ओ क्लॉक अँड कलेक्ट युवर पासपोर्ट.

माझी ही संपूर्ण स्टोरी मी कणेकरांना सांगितली. शेकहँड करून त्यांनी माझा निरोप घेतला.

मला अधुनमधून रविवार लोकसत्तेत लेख लिहण्याची संधीही मिळत गेली. कणेकरांनाही रविवार लोकसत्तेचे संपादक विद्याधर गोखले ह्यांनी लिहण्याची संधी दिली. त्या संधीचा आम्ही दोघांनी भरपूर उपयोग करून घेतला. सिनेमा आणि क्रिकेट हे कणेकरांचे आवडते विषय तर द्याल तो विषय आणि सांगाल ते काम हे माझे धोरण!

ह्या आमच्या नव्या धोरणामुळे आमच्या डोक्याची कटकट कायमची मिटली. आयुष्याच्या लढाईची एक वेगळीच गंमत आहे. एक कटकट मिटली की दुसरी कटकट हमखास सुरू होते. शिरीष कणेकर आणि मला हाच अनुभव आला. सिनेमा आणि क्रिकेट ह्या दोन विषयांवर खुसखुशीत शैलीत लिहणारा लेखक अशी त्यांची नवी प्रतिमा तयार झाली. जैन मुनींपासून ते झोपटपट्टीत राहणा-या गरीब लोकांच्या समस्या अशा कुठल्याही विषयावर मी लेख लिहीत राहिलो. फुटक्या अवयवांची झोपडपट्टीह्या कुष्ठरोग्यांच्या वसाहतीवर लिहलेल्या माझ्या लेखावर वाचकांच्या पत्रांचा अक्षरश: पाऊस पडला. कणेकरांच्या बाबतीत हेच घडले. यादोंकी बारात, शिरीषासन, मुद्दे आणि गुद्दे माझी फिल्ल्मबाजी इत्यादी सदरातील लेखांना वाचकांनी अभूतपूर्व  दाद दिली. लायनो ऑपरेटरही त्यांचे लेख ऑपरेट करण्यापूर्वी वाचून पाहात आणि मगच ऑपरेट करायला घे. खुद्द फोरमन त्यांचे लेख वाचून मग तो ऑपरेट करायला देत !

अशा माझ्या ह्या प्रिय सहका-याने काल अचानक इहलोकाचा निरोप घेतला. त्याला माझी श्रध्दांजली.

रमेश झवर