Saturday, January 28, 2023

अदानी समूहावरील संकट

अमेरिकी  विश्लेषण  संस्थेने घेतलेल्या आढाव्यानुसार अदानी समूहावरचे आर्थिक संकट गहिरे असल्याचे वृत्त येताच अदानी समूहाच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणा-यांवर एका दिवसात  .२ लाख रुपये गमावण्याची पाळी आली. अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी ही जगात सातव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आहे. गेल्या दोन दिवसांपासून अदानी समूहाच्या शेअर्सची घसरण सुरू झाली असून ती रोखण्याचे आर्थिक बळ आज घडीला तरी अदानी मूहाकडे नाही. ह्या घसरणीला शेअर सटोडिया जितके कारणीभूत आहेत तितकेच खुद्द अदानी समूहाचे चालकही जबाबदारी आहे. मिळेल तसा आणि मिळेल तिथून पैसा उभा करण्याचे तंत्र कधी कधी अंगलट येते ते हे असे ! व्यावसायिक नफा मिळवण्यासाठी  दुय्यम कंपन्या स्थापन करण्याचा सपाटा एखादा समूह लावत असेल तर त्यालाही मर्यादा आहेत. ह्या मर्यांदाचे उल्लंघन वारंवार केल्यानंतर संकट मालिका अपरिहार्य ठरतेच. आताच्या ह्या संकटातून तिकडम करून मार्ग काढला तर तो कोणाच्याही लक्षात येत नाही असे अदानी समूहाच्या अधिका-यांना वाटते. पण डोळे बंद करून मांजर दूध प्याली तरी इतरांचे डोळे बंद नसतात !

समूहातील  कंपन्यांचा भांडवल उभारणीतला पोलखोल केली अमेरिकेतील हिंडनबर्ग ह्या विश्लेषण कंपनीने. ह्या कंपनीविरुद्‌ध कारवाई  करण्याची घोषणा गौतम अदानींनी केली असल तरी ह्या कंपनीचे विश्लेषक हे पाळीव मांजर नाहीत. हिंडनबर्गला अदानी समूहाने कितीही धमक्या दिल्या तरी हिंडनबर्ग कंपनी बधणार नाहीच. गॅस, पेट्रेलियम, उर्जा ह्या क्षेत्रात रोख रक्कम जमा होते म्हणून त्या क्षेत्रातच जास्तीत जास्त गुंतवणूक कण्याचा सपाटा लावला. रेल्वेच्या खास गाड्या भाड्याने घेऊन त्या चालवण्याची गरज मोदी सरकारला पटवून  देऊन अदानींनी तो रोखीचा धंदा सुरू केला. कांडला बंदराला लागून असलेली खारफुटीची जमीन गुजरात नरेंद्र मोदी सरकारकडून पदरात पाडून घेतली होती. त्या जमिनीत भराव टाकण्याचे कामही अदानींनी रेल्वेलाच करायला लावले. त्यांची वक्रदृष्टी विमातळांकडे वळली. विमातळाच्या व्यवस्थापनाचे कंत्राट मिळवून रोकड पैसा जमवला. पेट्रोलियम कंपन्यांची कमिशन एजन्सी मिळवून ती आणखी सोय केली. साहजिकच कंपनीला बँकांनी कॅश फ्लोच्या पोटी मोठमोठी कर्जे दिली. त्याखेरीज कंपन्यांचे शेअर्स तारण ठेऊन त्यावरही कर्ज दिले. हा सगळा बँकांच्या कर्ज पुरवठा धोरणाच्या नियमानुसार असला तरी अंतिमत: बँका आणि खुद्द अदानी समूह अचणीत आल्याखेरीज राहणार नाही ह्याचे भान अदानी समूह आणि पतपुरवठा करणा-या बँका ह्या दोघांनाही राहिले नाही .

अंबानी आणि अदानी हे दोन्ही समूह स्वत:ला उद्योगपती समजत असले तरी दोघांना कॅश बिझिनेस करण्यातच अधिक स्वारस्य आहे. सिलेक्शन परीक्षेत यशस्वी ठरलेले आयएएस अधिकारी कितीही शिकलेले असले तरी त्यांची अक्कल त्यांनी ह्या दोन्ही समूहाकडे गहाण ठेवली आहे. पढा बह्मन भुका अनपढा बनिया भुका’ अशी ह्या दोन्ही समूहातील अधिकारीआणि त्यांच्याशी साटेलोटे करणा-या सरकारी अधिका-यांची अवस्था आहे. २०१४ सरकार सत्तेवर आल्यानंतर हे दोघे समूह सरकारमधील अधिका-यांना कल्पना सुचवतात. आणि पंतप्रधानांकडून मंजुरीही मिळवून आणतात !

२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकात विजय मिळपर्यंत हे असेच सुरू राहील असे वाटते. म्हणू हर प्रकारे निवडणुका जिंकण्याचे डावपेच डावपेच सुरू झाले आहे. सर्व यंत्रणा त्या दृष्टीने कार्यरत आहे. अदानी समूहावरील संकट ही तर सुरूवात आहे! बेरोजगारी, लघुउद्योगांना कर्ज वगैरे विषय विसरून जाण्याचे दिवस आले आहेत हेच खरे !

रमेश झवर

Tuesday, January 3, 2023

नोटबंदी: व्यवहाराचे काय?

दोनहजार सोळा  साली  ५०० व १००० किंमतीच्या  चलनी  नोटा  अचानक  रद्द करण्याचे मोदी सरकारने उचलल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बहुमताने कायदेशीर ठरवला. एका न्यायाधीशांच्या मते मात्र चलनी नोटा बाद करण्याचा सरकारचा हेतू  कितीही स्तुत्य असला तरी ह्या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया डावलली गेलेली नाही. न्यायमूर्तींचा हा निवाडा घटना घडून गेल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी आला आहे. परिणामी न्यायालयीन निवाड्यात सामान्य जनतेला आजघडीला तरी स्वारस्य उरलेले नाही. ह्याचाच अर्थ निर्णयाला फक्त प्रक्रियात्मक दृष्टीने महत्त्व आहे. प्रत्यक्षात सरकारवर अर्थव्यव्यवस्थेची जबाबदारी असून चलन व्यवस्थापनाची जबाबदारी स्वायत्त म्हणून ओळखल्या गेलेल्या रिझर्व्ह बँकेवर आहे.  तुलनेने भारी किंमतीच्या चलनी नोटा बाद करण्यात आल्यामुळे असंख्य  लोकांना त्रास झाला. नोटा बदलण्यासाठी बँकात लावण्यात आलेल्या रांगेत अनेक वृध्द, आजारी माणसांचा मृत्यू  झाला. त्यांना झालेल्या हाल अपेष्टांचे आणि यातनांचे सरकारला काही देणेघेणे नव्हते.  न्यायसंस्था हे लोकशाहीचे तिसरे महत्त्वाचे अंग. ह्या निकालाने जनतेला दिलासा मिळण्याचा प्रश्नच नव्हता.

काळा पैसारूपी राक्षसाचा धुडगूस थांबवण्याचे, विशेषत: दहशतवदी कारवायांना प्रभावी आळा घालण्याचे  सरकारचे उद्दिष्ट्य असल्याचे  मोदी सरकारकडून वारंवार सांगण्यात आले.  काळा पैसा व्यवहारातून सर्वस्वी  संपला का, ह्या प्रश्नाचे उत्तर सरकारने स्वत:ला दिले पाहिजे. बिनबिलाचे व्यवहार करणा-यांची संख्या अधिक आहे ह्याबद्दल वाद नाही. ब-याच ग्राहकांना मुळात बिल नकोच असते. भाजीवाले, किरकोळ माल विकणारे किराणा दुकानदार ह्यांचा मोठ्या नोटा हाताळण्याचा तसाही फारसा संबंध येत नाही. आयकर आणि जीएसटीअंतर्गत  कर भरणा-या  बडे व्यापारी आणि उद्योजक ह्यांची संख्या अत्यल्प आहे. ती संख्या अत्यल्प असली तरी अर्थव्यवस्था चालते ती ह्या वर्गाकडून होत असलेल्या उलाढालींमुळे ही  वस्तुस्थिती आहे.

न्यायसंस्था सरकारशी धोरणांशी वचनबध्द असावी काअसा वाद इंदिराजींच्या काळात उपस्थित झाला होता. परंतु काळ बदलताच हाही वाद काळाच्या इतिहासात जमा झाला. लोकांना त्याचे विस्मरणही झाले होते. कदाचित्‌ नोटबंदी आणि त्यावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकालदेखील काळाच्या इतिहासात जमा होईल. निकालाची एक जमेची बाजूही आहे  ५ न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या खंडपीठातील ४ न्यायमूर्तींनी नोटबंदीच्या बाजूने तर एका न्यामूर्तीने विरूध्द १ बाजूने मत नोंदवले. महिला न्यायमूर्ती बी. व्ही. नागमूर्ती ह्यांनी त्यांच्या निकालपत्रात नोटबंदीला लागू पडणारा एक दाखला दिला आहे. त्या म्हणतात, संतती औरस असली आणि तिच्या कायदेसंमत असण्याला बाध येत नाही हे खरे; परंतु ज्या स्त्रीपुरूष संबंधातून बाळाचा जन्म झाला तो संबंध कायदेसंमत नव्हता. सरकारने रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला बोलावून घेऊन रिझर्व्ह बँकेला ५०० आणि १००० रुपये किंमतीच्या नोटा बाद करण्यास अनुकूल करून घेतले ह्या वस्तुस्थितीकडे न्या. नागमूर्ती ह्यांनी अंगुली निर्देश केला आहे.

नोटबंदी करतानाच २ हजारांची नोट जारी करण्यात आली  होती. ती स्थगित ठेवणे व्यवहारदृष्ट्या खर्चाचे ठरले असते. सार्वजनिक पैशाचा अपव्यय झाला. इतकेच नव्हे, नव्याने जारी करण्यात आलेल्या २०० आणि १०० रुपयांच्या नोटा प्रत्येक प्रांतात पोहचवण्यासाठी विमानांचा खर्च झाला तो वेगळा ! मोठी फौज घेऊन दक्षिणेकडे निघालेल्या वेड्या महंमद तुघलकासारखीच सरकारची अवस्था झाली.

नोटबंदी प्रकरणाबद्दल आता काही लिहण्याला, बोलण्याला काही अर्थ नाही. असोम्हणूनच हे प्रकरण जमा करणेच जास्त चांगले.

रमेश झवर