Saturday, June 26, 2021

मुकेश अंबानींची गरूडझेप

सरकारचे धोरण अनुकूल असले तरी त्याचा फायदा घेण्यासाठी अनुकूल मानसिकताही आवश्यक असते. किंबहुना वेळ पडल्यास धोरणात हवे तसे बदल  करून घ्यायला सरकारला भाग पाडता आले पाहिजे. मुख्य म्हणजे सरकारच्या धोरणानुसार आपल्या उद्योगाचे सुकाणू फिरवण्याचे सामर्थ्य आणि कौशल्यही उद्योगपतीकडे हवेच. ह्या दृष्टीने पाहता मुकेश अंबानींकडे सामर्थ्य आणि कौशल्य दोन्ही आहेत. म्हणूनच २०३० पर्यंत गरूडझेप मारण्याची महत्त्वाकांक्षा मुकेश अंबानी समूहाने बाळगून आहे. मुकेश अंबानी समूहाच्या यंदाच्या वार्षिक अहवालावर नजर फिरवली तर हे सहज ध्यानात येते. निकटच्या भविष्यात  हा समूह  डाटा, सौर उर्जा आणि तेलशुद्धीकरण ह्या तीन क्षेत्रात आघाडीवर आल्यास किंवा नंबर वन झाल्यास आश्चर्य वाटू नये.

जामनगर येथे साडेसात एकर क्षेत्रात भारतातील सर्वात मोठा तेलशुद्धिकरण प्रकल्प स्थापन केला होता. आता ह्या प्रकल्पाच्या शेजारी ५ हजार एकर क्षेत्रात ६० हजार रूपये खर्चाचा सौर उर्जा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्याखेरीज सौर उर्जा प्रकल्पाशी सबंधित सुटे भाग, प्रकल्प उभारणीस आवश्यक तांत्रिक साह्य उपलब्ध इत्यादीसाठी १५ हजार रूपये खर्चाचा लहान प्रकल्प तयार करण्यात आली आहे. ह्या दोन्ही प्रकल्पांमुळे सौर रिलायन्स उद्योग समूहाची गणना सौर उर्जा क्षेत्रातली आघाडीवरील कंपनी म्हणून तर केली जाईलच शिवाय तेल शुध्दिकरणादीच्या नफ्यावर अवलंबून न राहता सौर उर्जा क्षेत्रातून गडगंज नफ्याची प्राप्ती कंपनीला होत राहील. अपारंपरिक उर्जा क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्याचा रिलायन्स समूहाचा मनोदय रिलायन्सच्या वार्षिक अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. कारखाना स्थापन होईपर्यंतच्या काळात अमलबजावणीवर खूप खर्च करावा लागतो.  त्या खर्चाची तरतूद करण्यासाठी आयातीत उपकरणांच्या मदतीने सौर उर्जा युनिट्च्या मार्केटमध्ये २०२२ पर्यंत उतरण्याचे  ठरवले आहे. मागे जामनगर रिफ्यानरीत उत्पादन सुरू होण्यपूर्वीच रिलयान्सचे शेअर घेणा-यांना अंबानींनी कमाई सुरू करून दिली होती. उत्पादनपूर्व कमाई सुरू करण्याचा हा निराळाच मार्ग ह्यावेळी  स्वतःसाठी अंबानींची योजला आहे. अबानींचे सौर उर्जा युनिट्सचे उत्पादन सुरू होताच ४५०० कोटी रूपयांची सबसिडी मिळण्यास अंबानी गट पात्र ठरेल ह्यात शंका नाही!

कृष्णा गोदावरी खो-यात वायू शोधण्याच्या आणि तेल शुध्दिकरण ह्या दोन्ही उद्योगांवर घट्ट पकड बसवताना मुकेश अंबानींच्या एक लक्षात आले की आगामी ८-१० वर्षात जगामध्ये क्लीन एनर्जीचे महत्त्व वाढणार आहे. अमेरिकेच क्लीन एनर्जीचा बोलबाला सुरू झाला असून तो नक्कीच वाढणार अशी अटकळ मुकेश अंबानींनी बांधली असावी. ती फारशी चुकीचीही नाही. जगात इलेक्ट्रिक कारचा प्रचार-प्रसार वाढला असून आगामी काळात ड्राव्हरलेस कार रस्त्यावर धावू लागतील, असा अमेरिकन आणि जर्मन कंपन्यांचा अडाखा आहे. साहजिकच क्लीन उर्जेची आणि  वेगवान डाटासंवहनाची गरज वाढणार आहे.  अर्थात ८-१० वर्षांचा हा काळ अडथळ्यांची शर्यतीचा ठरू शकतो ह्यची मुकेश अंबानींना जाणीव नसेल असे म्हणता येणार नाही. अर्थात अडथळे दूर करण्यासाठी दाम करी काम हे सूत्र अंबानी गटांकडून चूपचाप अवलंबले जाणारच. अर्थात त्यात कल्पक आणि आक्रमक बदल करण्याइतकी हुषारी मुकेश अंबानींकडे निश्चितपणे आहे.

दरम्यान सौदा अरबच्या सहकार्याने शुध्दिकरण प्रकल्पाकडे मुकेश अंबाननींनी अजिबात दुर्लक्ष केले नाही. सौदी अरेबियातील अरामको कंपनीचे अध्यक्ष याशीर अल् रुमययान ह्यांना रिलायन्स इंडस्ट्रीजच्या  संचालक मंडळावर घेण्याची प्रक्रियादेखील अंबानींनी जवळ जवळ पुरी करत आणली.  याशीर हे ५१ वर्षींचे असून ते हार्वर्डचे पदवीधर आहेत. भारतातल्या एखाद्या कंपनीच्या संचालक मंडळावर परदेशी नागरिकाच्या नेमणुकीचे हे पहिलेच उदाहरण असेल. परकी नागरिकास संचालक मंडळावर सभासदत्व देण्याच्या बाबतीत अपवाद करण्यास अर्थातच सरकारचे साह्य लाभले असेल हे उघड आहे. प्रकल्पाची अमलबजावणी करण्यात येणारे सारे अडथळे दूर करण्याचे एक्सपर्टाइज मुकेश अंबानींनी एव्हाना आत्मसात केलेले आहे. सरकार कोणाचेही असो, अंबानींची कामे होणार म्हणजे होणार!

रिलायन्स रिटेल, आणि माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातही नवे काही करत राहण्याचा रिलायन्सचा उपक्रम असून अंतिमतः नफ्यात वाढ कशी होईल हेच लक्ष्य रिलायन्स उद्यागाचे प्रमुख मुकेश अंबानी ह्यांनी डोळ्यांसमोर ठेवले आहे. जिओ नावाने स्थापन केलेल्या रिलायन्सच्या डाटा कंपनीत फेसबुक, गूगल्स आणि सायक्रोसॉफ्ट ह्यासारख्या अमेरिकेतल्या महाकाय कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. गेल्या खेपेस केवळ डिपॉझिटच्या रकमेवर मोबाईल सेट विक्रीस उपलब्ध केल्याने त्यांचा फार मोठ्या प्रमाणावर विक्री कर वाचला आणि बाकीच्या टेलिकॉम कंपन्या अस्वस्थ झाल्या. ह्या खेपेस दुकानदारांना स्वतःची इंटरनेट साईट सुरू करता यावी म्हणून सुरूवातीला स्वस्त दराने डाचा पुरवण्यात येणार आहे. ह्या आक्रमक धोरणामुळे रिलायन्सची  आणि इंटरनेट णि डाटा क्षेत्रात मक्तेदारी निर्माण होण्यास आपोआप मदत होणार आहे.

रिलायन्सच्या रिटेल व्यवसायाचीदेखील भरभराट झाली आहे. गेल्या वर्षात रोज ५ लाख तयार कपडे विकून वस्त्रप्रावरणाच्या विक्रीतबाबत रिलायन्सने उच्चांक गाठला. रोज ५ लाख कपडे ह्याचा अर्थ वर्षाला १८ कोटी ड्रेसची विक्री. संपूर्ण इंग्लंडमध्ये १८ कोटी तयार कपडे खरेदी केले जातात! रिलायन्स रिटेलमध्ये २ लाख लोकांना रोजगार मिळतो. ह्या वर्षात १५०० नवे रिटेल स्टोअर्स सुरू करण्यात येणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या विक्रीचा आकडा गेल्या वर्षी साडेचार कोटींच्या घरात गेला होता. ह्याचा अर्थ दररोज १.२ लाख वस्तु रोज विकल्या जातात. किराणा मालाच्या विक्रीतही भरघोस वाढ झाली आहे. आता पर्यायी मंडीचा कायदा केंद्राने केला तो रिलायन्सला अनुकूलच ठरणारा आहे. तिस-या मंडीमुळे दलाली, मापाडी आणि अडत ह्यावर होणा-या सध्याच्या खर्चात रिलायन्सची खूपच बचत होणार आहे. पिन टू पियानो हे व्यापारी धोरण अवलंबल्यमुळे प्रोक्युअरमेंट खर्चात बचत होऊन नफा वृध्दिंगत होण्यास खूप मदत होते हे रिलयान्सच्या लक्षात आले असावे.

आणखी एका बाबीचा जाता जाता उल्लेख करायला पाहिजे. नव्या मुंबईत जिओ इन्स्टिट्यूटचे काम ह्या वर्षात सुरू होणार आहे. निता अंबानींच्या मदत निधीतून  जिओ इन्स्टिट्यूट ही संस्था विद्यापीठ धर्तीवर ह्याच वर्षांपासून कार्यरत होणार आहे.  टाईम्स समूह, बिर्ला इत्यादींच्या संस्था ह्यापूर्वीच कार्यरत आहेत. आतापर्यंत  शैक्षणिक बाबतीत रिलायन्स समूह थोडा मागे होता. ह्यापुढील काळात मात्र तो मागे राहणार नाही.

रिलायन्स समूहाला मिळालेल्या यशामागे राज्यकर्त्यांना पटवणे हा एकच घटक नाही. अर्थात तो महत्त्वाचा ऱटक आहे ह्याबद्दल शंका नाही. दूरदृष्टी, प्रकल्पाचा सर्वांगीण विचार, वेळोवेळी निवृत्त सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन, भविष्य काळाचा वेध घेण्याची क्षमता इत्यादि अनेक घटक रिलायन्सच्या यशाला कारणीभूत ठरले आहेत, असे म्हणावेसे वाटते. यशासमान यशाखेरीज दुसरे काही नसते. म्हणूनच रिलायन्स समूह गरूडझेप घेण्यास सिध्द झाला आहे!

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार

Saturday, June 19, 2021

आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त!

योगदिनानिमित्त योगपरंपरेचा विचार केल्यास हटयोगप्रदिपिका. धेरंडा संहितापतंजली योगसूत्रे इत्यादि अनेक संस्कृत ग्रंथांची नावे डोळ्यांसमोर येतात. योगाचे स्वरूपतः तीन प्रकार रूढ आहेत. पहिला मार्ग यमनियम, आसन प्राणायामादिद्वारा कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी आसन, मुद्रा आणि प्राणायामाचा मार्ग . त्याला साधन-सिध्दमार्ग म्हटले जाते. दुसरा  मार्ग सद्गुरुच्या कृपेने ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत होते. त्याला आसन वगैरे करावी लागत नाहीत. ती आपोआप होतात. ह्या मार्गाला कृपासिध्द मार्गम्हटले जाते. तिसरा मार्ग जन्मजन्मान्तराच्या पुण्यासंचयाने ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत होते त्याला दैवसिध्द साधक संबोधले जाते. त्याला आसनप्राणायादि उपाय सहज जमताता. हे तिन्ही मार्ग आपापल्या परीने श्रेष्ट मार्ग आहेत. त्याखेरीज जैन आणि बौद्ध संप्रदायांचाही योगावर भर आहे. योगाला दोन्ही संप्रदायांनी अतुलनीय प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्याखेरीज भगवत् गीता हा एक असा ग्रंथ आहे की जो देशभरात अनेकांच्या नित्यपठणात आहे. गीता हा  माझ्या मते योगशास्त्रावरचा सर्वोत्कृष्ठ ग्रंथ आहे. ७०० श्लोकांच्या गीतेच्या  प्रत्येक अध्यायाच्या शेवटी  दिलेल्या पुष्पिकेत ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे ‘श्रीकृष्णार्जुनसंवादे —-नाम …..अध्यायःअसा स्पष्ट निर्देश आहे. म्हणूनच कदाचित् निवृत्तीनाथांनी  ज्ञानेश्वरांना गीतेचा भावानुवाद करण्याचा आदेशदिला असावा. नाथ संप्रदायात आदेशसंज्ञेला विशेष अर्थ आहे हे सगळ्यांना माहित आहे. खुद्द निवृत्तीनाथांना ब्रह्मगिरीवर गहिनीनाथांकडून नाथसंप्रदायाची दीक्षा मिळाली होती. ती दीक्षा मघाशी उल्लेख केलेल्या तीन योगमार्गांपैकी दुस-या क्रमांकाचा कृपासिध्द योगमार्गआहे.

महाराष्टात योगमार्गाचे स्वरूप पालटून त्याचे भक्तीमार्गात रूपान्तर झाले. किंबहुना योग आणि भक्ती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हेही मराठी माणसांच्या लक्षात आले. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेव-तुकारामचे अभंग इत्यादीत योगमार्गच भक्तीमार्गाच्या रूपात प्रकट झाला आहे. योगयाग विधी येणे नोहे सिध्दी। वायाचि उपाधी दंभह्या हरिपाठाच्या पाचव्या अभंगात ज्ञानेश्वरांनी योगमार्गाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. विशेष म्हणजे योगी ज्ञानेश्वरांनीच हा अंभंग लिहला आहे! त्यांनी योगमार्गाचा परिचय करून देतांना भक्तीमार्गाचा उपहास केला नाही किंवा भक्तीमार्गाचा पुरस्कार करताना योगमार्गाचा उपहास केला नाही.

गीतेचा सहावा अध्याय हा थेट योग मार्गावर आहे. ह्या अध्यायाचा अनुवाद करताना  साहजिकच कवि ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेला बहर आला आहे.. मूळ गीतेत अर्जुनाने तो शिष्यभावाने योगमार्ग ऐकून घेतला. अर्जुनाच्या मनात आलेल्या शंकांचे निरसनही श्रीकृष्णाने केले. दोघांचे नातेच मुळी  गुरूशिष्याचे होते. सहाव्या अध्यायात चर्चिलेला योग किती सहजसाध्य आहे हे सांगताना ज्ञानेश्वरांनी अनेक अर्थगर्भ ओव्या लिहल्या आहेत. जिथे पक्ष्यांचा किलकिलाट नाही असे एकान्त स्थळ ( एखाददुसरा मोर चालेल! ) निःशब्द परंतु सपाट जमान असलेले स्थळ किंवा गर्दी नसलेले शिवालय चालेल, वा-याची मंद झुळूक असली तरी हरकत नाही, असे सांगून ज्ञानेश्वर लिहतातमग तेथ आपण। एकाग्र अंतष्करण। करूनि गुरुस्मरण। अनुभविजे।।८६।। थोडक्यात, योग साध्य व्हावा म्हणून गुरूंनी दिलेल्या दीक्षा मंत्रानुसार साधनारंभ करायची शिकवण ज्ञानेश्वर देतात. संपूर्ण सहावा अध्याय योगातील आसनसिद्धी, प्राणायाम, वगैरे सिध्दमार्गांचे विवेचन तर त्यांनी केलेच आहे; शिवाय जे आकाराचा प्रांतु। जे मोक्षाचा एकांतु। जेथ आदि आणि अंतु। विरौनी गेली।।‘  ह्या एकाच ओवीत अत्युच्च समाधीचे वर्णन केले आहे.

सिध्दमार्ग कितीही श्रेष्ठ असला तरी गुरूपदिष्ट विद्या चव्हाट्यावर बोंबलून सांगायची नसते, असा दंडक आहे. ज्ञानेश्वरांनी त्याचा उल्लेख अध्यायात  केला आहे. गुरूपदिष्ट विद्येच्या संदर्भात  असलेल्या ह्या बंधनामुळे ह्या मार्गावर भर न देता योग मार्गाच्या नाण्याचीच दुसरी बाजू असलेल्या भक्तीमार्गावर मराठी मनांचा भर आहे. ज्ञानेश्वरांनी तर श्वासालाच बारा अंगुळे चालणा-या वारीची उपमा दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे आधुनिक महाराष्ट्रात सिध्द मार्गाची परंपरा लोप पावली नाही. वारकरी संप्रदायातील अनेक गुरूंनी ती आपल्या परीने सुरू ठेवली. परंतु समाजातल्या भोंदु गुरूंमुळे गुरू संस्था बदनाम झाली.  शिष्याकडून जो सेवा घेत नाही तोच खरा गुरू म्हटला पाहिजे असा संताचा निरोप आहे. पण असे गुरू दुर्मिळच.

अलीकडे हटयोगाला पुन्हा चलती आली आहे. २१ जून हा आंतराराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर झाल्याने हटयोगाला उर्जितावस्था आली आहे. २१ जूनला तर सर्वत्र सामूहिक योगसनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ह्यापूर्वीच अनेक शहरात गल्लोगल्ली योगा क्लास’ ( योग नाही बरं का, योगा! ) सुरू झाले! त्यामुळे सर्व योगात राजयोगसमजला जाणारा म्हणजेच नसता खटाटोप न करता ईश्वरचिंतनाचा योगमार्ग तर विवेकानंदांनी लिहलेली पुस्तके वाचणा-यांनाच फक्त माहित आहे. शहरी सामान्यजनांना तो माहितसुध्दा नाही. सध्या गावोगावी दिसून येणारा योगमार्ग हा प्रामुख्याने हटयोग प्रकारात मोडणारा आहे! तो प्रामुख्याने पतंजलीकृत योगसूत्रावर आधारित आहे. ह्याच योगमार्गाचा देशभर प्रसार झाला आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त  तर ह्याच मार्गाचा धूमधडाक्याने प्रचार-प्रसार सुरू आहे. विशेषतः आरोग्यासाठी योग आवश्यकच असल्याचा प्रचारकांचा मुद्दा हटकून असतो.  अर्थात योगामुळे उत्तम आरोग्य प्राप्त होते हयात संशय नाही. पण तेवढाचा काही योगाचा उद्देश नाही. पन्नास वर्षांपूर्वी नागपूरमध्य़े जनार्दनस्वामींनी एक पैसाही न घेता हजारो लोकांना योगासने शिकवली.  जनार्दनस्वामी आजच्या अनेक योगशिक्षकांचे परात्पर गुरू आहेत !

सांगण्याचे कारण म्हणजे योग मार्गाचे रूपान्तर भक्तीमार्गात झाले आहे हे लोकांच्या लक्षात आणून देण्याच्या उद्देशाने हा योगविषयक तपशीलवार पूर्वेतिहास दिला आहे. साखरेमहाराज, जोगमहाराज. मामासाहेब दांडेकर इत्यादी वारकरी संप्रदायाच्या धुरिणांनी वारकरी संप्रदाय संघटित केला. वारकरी संप्रदायाचा भक्तीमार्ग योगमार्गाहून वेगळा नाही. पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती ही योगमूर्तीआहे असे मूर्तीशास्त्राचे तज्ज्ञ देगलूरकर ह्यांनी सप्रमाण सिध्द केले आहे. विठ्ठल हा विष्णूचा अवतार असला तरी ह्या मूर्तीला दोनच हात असून त्या हातात कमळ आणि शंख आहे. विष्णू मूर्ती बहुधा चतुर्भूज असते. त्याच्या चारपैकी एका हातात शस्त्र असतेच असते. विठ्ठल हा विष्णूचा चोविसावेगळा अवतार आहे. म्हणून साक्षात् विष्णू विठ्ठलाच्या-मनुष्यवेषात- अवतरले आहेत!  म्हणूनच  विठ्ठल मूर्तीस दोनच हात आहेत. योग्याला शस्त्राची गरज नाही असाच जणू मूक संदेश अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला विठ्ठल देत आहे! सहजयोग आणि ज्ञानविज्ञानाची योग्याला गरज आहे.

रमेश झवर

Tuesday, June 15, 2021

महागाईचा कळस

 किरकोळ बाजारातील महागाईने कळस गाठलेला असताना मे महिन्यात घाऊक बाजाराचा महागाई निर्देशांकही १२.९४ टक्क्यांवर पोहचला! महागाईच्या ह्या उंचावलेल्या ह्या कळसाला कोरोना कारणीभूत असल्याचा समज असला तरी तो पूर्णांशाने खरा नाही. महागाई वाढण्याचे खरे कारण केंद्र सरकारने समाजवादाधिष्ठित समाजवादी धोरणाची कास सोडून भांडवलाष्ठित धोरणाची कास धरली हेही एक महत्त्वाचे कारण आहे. हे नवे धोरण अंगीकारताना दुर्बळ घटकांसाठी काँग्रेस काळातल्या योजनांना धक्का लावला नाही हे खरे असले तरी सरकारकडून राबवल्या जाणा-या अघोषित नव्या धोरणाविषयी जनतेत समज-गैरसमजच अधिक आहेत! त्याखेरीज पेट्रोलियमच्या दराची गेल्या सात वर्षांत झालेली वाढ हे नेहमीचे कारण तर आहेच.

विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचा दर खाली आला तेव्हाही सरकारने शुध्दीकृत तेलावर जबर करआकारणी केली. आता तर आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर वाढल्यामुळे केंद्र सरकारला करवाढीला आयती सबब मिळाली. ह्या शिवाय राज्य सरकारांनीही पेट्रोलियमवर आव्वाच्या सव्वा कर आकारणी सुरू केली. पेट्रोलियमवर मूल्यवर्धित कर वाढवणा-या  राज्यांना केंद्र सरकार कोणत्या तोंडाने मनाई करणार? महागाई निर्देशांक वाढीत पेट्रोलियमच्या दरवाढीत दुप्पट वाटा म्हणजे जवळ जवळ ३४.६१ टक्के वाटा आहे.

महाराष्ट्रातली महागाईची परिस्थिती तर फारच भयंकर आहे. ह्याचे कारण देशातील एकंदर मालवाहतुकीच्या ४० टक्के वाटा मुंबई शहरात आहे. दोन्ही बंदरामुळे मालवाहतूक व्यवसायाचे मुंबई हे देशातले सर्वात मोठे केंद्र आहे. गुजरातमध्ये कांडला बंदर असले तरी लोकांची पसंती कांडला बंदरापेक्षा मुंबईतील बंदरांना अधिक आहे. त्याचे कारण म्हणजे कांडला बंदर परिसरात असलेली दलदलीची जमीन. तेथे असलेले रस्तेही निमूळते.ते प्रशस्त करणे आणि रेल्वे मार्ग थेट कांडला बंदरापर्यंत नेण्याचे काम केंद्र सरकारच्या आवाक्याबाहेरचे. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरात सरकारने अदानी गटाला ३-४ हजार हेक्टर जमीन मोफत देऊनही अदानी गटाला ही संपूर्ण जमीन अजूनपर्यंत  रिक्लेम करता आली नाही. मदतीसाठी सरकारकडे याचना करणा-त अदानी गट अव्वल क्रमांकावर आहे असे म्हटले तरी चालेल. मदतीचा खर्चदेखील अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारच्या माथ्यावर पडत आला आहे. एवढे करूनही मुंबई बंदरांची मक्तेदारी संपुष्टात आली नाहीच.

गेल्या ७ वर्षांत नव्या संसद भवनासह सरकारने मेट्रो, देशभर रूंद महामार्ग इत्यादि अनेक अनावश्यक आणि अव्याहारिक प्रकल्प हातात घेतले. कोरोना काळ सुरू झाला तरी ती कामे थांबवण्यात आली नाही. अफाट सरकारी खर्च   पेलण्यासाठी जीएसटीतील अनेक स्लॅब काही कारण नसताना वाढीव दराचे ठेवण्यात आले. हे वाढीव दर उद्योगधंद्याच्या वाढीस मारक ठरले! त्या दरामुळे उद्योगधंद्याचा कणाच मोडला. परिणामी देशभरात कोरोनाबरोबर महागाईचीही लाट आली. ह्या लाटेत खुद्द केंद्र सरकारही सापडले नसेल असे नाही. कितीतरी प्रकल्प खर्चात अव्वाच्या सव्वा वाढ झालेली असू शकते. परंतु सरकार ते कबूल करायला तयार नाही. त्याउलट अर्थव्यवस्था ट्रिलियम डॉलर्समध्ये नेण्याच्या स्वप्नात सरकार मश्गुल आहे.

जी-५ इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी रिलायन्स उद्योग समूहाला परवाने, विदेशी गुंतवणुकीच्या परवानग्या इत्यादि अनेक प्रकारे झुकते माप देण्याच्या सरकारने काय काय खटपटी केल्या हे जनतेपासून लपून राहिलेले नाही. अमेरिकेने केलेल्या प्रगतीचा पॅटर्न स्वीकारणे म्हणजे अमेरिकेतल्याप्रमाणे दारिद्र्य आणि विषमता मान्य करण्यासारखे आहे. अर्थात  सरकारी तज्ज्ञ हे मुळीच मान्य करणार नाही तो भाग वेगळा. सरकारच्या अघोषित धोरणामुळे समाजात भयकंप निर्माण झाला आहे. मालाचे भाव वाढवले नाही तर आपण नव्या परिस्थितीत तग धरू शकणार नाही अशी मानसिकता लहानमोठ्या दुकानदारांची आणि  शेतक-यांची झाली  आहे. लोकमानसाचे हे मानसशास्त्र समजावून घेण्यासाठी तज्ज्ञ असण्याची गरज नाही.

सध्याची महागाई ही सामान्य माणसांना वाटत असलेल्या भयातून निर्माण झाली आहे. सतत वाढणा-या महागाईमुळेही लोकांच्या मनातले भयही वाढले आहे. त्यातून पुन्हा नव्याने महागाईच वाढत जाते.

होलसेल रिटेलमध्ये टाटा, रिलायन्स ह्यासारख्या मोठ्या उद्योग समूहांना स्वारस्य होतेच. मोदी सरकारच्या धोरणामुळे ते वाढले आहे. अमेझॉनसारख्या ऑनलाईन व्यवसाय करणआ-या संपनीकडून सध्या स्वस्त दराने मालाची विक्री सुरू झाली. परंतु एकदा बाजारपेठेवर जम बसवला की स्वस्त दराने माल विकण्याचे धोरण गुंडाळण्यास अमेझॉन ही अमेरिकन कंपनी मागेपुढे पाहणार नाही. अमेझॉनचे अनुकरण करण्याच्या कामास लहानमोठ्या दुकानदार लागले आहेत. असे असले तरी स्वतःची साईट सुरू करण्याइतपत भांडवल त्यांच्याकडे नाही. तेव्हा, वाढीव खर्चाची रक्कम उभी करण्यासाठी भाववाढ करण्याखेरीज  दुकानदारांकडे अन्य पर्याय नाही. अनेक दुकानदारांच्या बॅलन्सशीटमध्ये तोटा दिसतो. त्यामुळे त्यांना बँका मदत करायला तयार नाहीत. शेवटी नॉनबँकिंग फायनान्स कंपन्यांकडे हा वर्ग वळतो. म्हणजेच वाढीव दराने कर्ज उभारण्याची मनाची तयारी  करतो. ह्या सगळ्याचा शेवट महागाई वाढण्यातच होतो!

महागाईचे चक्र फिरत राहिले नाहीतर लाखो व्यापा-यांचा व्यापारधंदा ठप्प झाल्याशिवाय राहणार नाही. महागाईमुळे  शेतक-यांचे उत्पन्न वाढले तरी ते त्यांचा खर्च आटोक्यात राहण्याची सूतराम शक्यता नाही. ह्या लोकांसाठी लेव्हल प्लेईंग फील्डनावाची चीज काय असते हे अजून तरी सरकारला आणि खुद्द व्यापा-यांनाही माहित नाही ! स्वस्त माल खरेदी करून महाग दराने विकणे हाच दुकानदारीचा बाळबोध मंत्र त्यांना माहित आहे.

रमेश झवर

Saturday, June 5, 2021

दे दान, न सुटे गिर्हान!

व्याजाचे दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केला. व्याजाचे दर कायम ठेवत असताना ह्या वेळी रिझर्व बँकेने लघु आणि मध्यम कारखानदारांना १५ हजार कोटी आणि सिडबीमार्फत वेगळे १६ हजार कोटी रूपयांची कर्जे उपलब्ध करण्याचाही निर्णय जाहीर केला. त्याखेरीच पर्यटण व्यवसायासाठी १५ हजार कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोना परिस्थिती लघु आणि मध्यम उद्योगांना सावरण्यासाठी कर्ज देणे आवश्यक होते ह्याबद्दल दुमत नाही. परंतु ह्या कर्जाऊ रकमेचा उपयोग करून घेण्याची क्षमता किती लघु आणि मध्यम उद्योगांत शिल्लक आहे? कदाचित ह्यासंबंधीची आकडेवारी गोळा करण्याचे काम रिझर्व्ह बँकेचे नसावे. पतधोरण एकट्या गव्हर्नरने ठरवणे योग्य नाही असा युक्तिवाद करत मोदी सरकारने काही वर्षांपूर्वी गव्हर्नरना सल्ला देण्यासाठी विस्तृत परामर्ष समिती नेमली होती. थकित आणि सुरळित कर्ज फेडणा-या लघु आणि मध्यम उद्योगांची तपशीलवार यादी प्रदीर्घ बैठकीत चर्चा सादर झालीच असेल अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय दे दान सुटे गिर्हान धर्तीचा निर्णय गव्हर्नरांनी जाहीर केला नसता.

गेल्या वर्षी सरकारने कर्जाची मुदत वाढवून देण्यात आली थकित व्याजातून मदतीची रक्कम वळती करून घेण्यात आली होती. कर्जा दिया किसने और लिया किसनेअसे म्हणण्याची पाळी लहान उद्योगव्यवसायिकांवर आली. ह्या वेळी मदत करताना रिझर्व्ह बँकेने हात आखडता घेतला नसला तरी कर्जापेक्षा व्याज अधिक असे होऊ नये अशी आशा बाळगण्यापलीकडे उद्योजक आणि व्यावसायिकांच्या हातात काही नाही. वास्तविक सध्या संपूर्ण देश कोरोना संकटात सापडला असल्याने लघु आणि मध्यम कंपन्यांची अवस्था बिकट अवस्था झाली आहे. खरे तर, त्यांची अवस्था गोरगरिबांपेक्षाही बिकट आहे. गोरगरिबांना मिळालेल्या मदतीची निदान परतफेड तरी करावी लागत नाही. कर्जाऊ घेतलेल्या रकमेचा एकेक रुपया आपल्याला फेडावाच लागेल हया जाणीवेने उद्योजक आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. ह्या वस्तुस्थितीचे आकलन सरकारला आणि रिझर्व्ह बँकेला आहे की नाही ह्याची शंका येते. सरकारला आणि रिझर्व्ह बँकेला हे आकलन असते तर शंभर वर्षात अपवाद म्हणून शून्य टक्के  व्याजाने कर्ज देण्याचा निर्णय घेतला गेला असता!  

नेहमीप्रमाणे गव्हर्नरांनी जीडीपीचा अंदाज, महागाई निर्देशांक ह्या विषयांचा उहपोह केला. हवामानाच्या भाकितानुसार यंदाचा हंगाम चांगला राहणार असा आशावाद व्यक्त करायला गव्हर्नर शक्तीकांत दास विसरलेले नाही, वास्तिवक जीडीपी घसरणार असा अंदाज स्टेट बँक, मूडीज ह्या संस्थांनी ह्यापूर्वीच जाहीर केला होता. देशाच्या उत्पान्नात घसरण झाली आहे हे सामान्य माणसालाही माहित आहे. जीडीपी जेमतेम ९.५ टक्क्यांवर जाईल हे सांगायला गव्हर्नर कशाला हवा? सध्या उत्पन्नाअभावी जनतेच्या हातात पैसा नाही. परिणामी मागणीच संपुष्टात आली आहे. अशा वेळी मागणीत वाढ होण्यासाठी जास्त नोटा छापण्याचा कल्पक मार्ग काढण्याची गरज होती. त्या दिशेने प्रयत्न करण्याऐवजी भलत्याच गोष्टींचा उहापोह करण्यात रिझर्व बँकेने वेळ घालवला ही वस्तुस्थिता कशी नाकारणार?

 उधारी ही लघु आणि मध्यम उद्योग व्यवसायांची खरी समस्या आहे.  मोठे कारखाने चालतात ते लहान कारखानदारांच्या कच्च्या मालाच्या किंवा सुट्या भागांच्या पुरवठ्यावर! ह्याच मोठ्या कंपन्या त्यांच्या ग्राहकांना पहले पैसा फीर मालह्या तत्त्वावरच माल विकताना दिसतात! ग्राहकांच्या हाच पैसा मोठ्या प्रमाणावर मुंबई शेअर बाजारातील उढालीसाठी वापरला जातो. तोही स्वतःच्या वित्तीय कंपन्या कंपन्यांमार्फत! पाचो उंगलियां घी मेंहे बड्या कंपन्यांचे धोरण अजूनही सरकारला उमगलेले नाही ! पन्नास वर्षांत लघु आणि मध्यम कंपन्या लघु आणि मध्यमच राहिल्या. मोठ्या कंपन्या मात्र दरवर्षी अधिक मोठ्या होत गेल्या हा देशाचा खरा औद्योगिक इतिहास आहे! हे सगळ्या बाबी रिझर्व बँकेच्या अधिकारकक्षेच्या बाहेर आहेत. सद्यस्थिती अशी आहे की पत धोरण जाहीर केले की रिझर्व्ह बँकेचा विषय संपला. लघु आणि मध्यम उद्योगांना मदत करा, असे रिझर्व्ह बँकेला आणि अन्य बँकांना सांगून सरकार हात झटकून मोकळे होते. हे नित्याचे झाले आहे! काँग्रेसच्या सत्ता काळात जसे सुरू होते तसेच भाजपाच्या सत्ता काळातही सुरू आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचा सारांश सांगायचा झाल्यास दे दान सुटे गिर्हानह्या एकाच वाक्यात सांगता येईल. नेहमीचे ग्रहण केव्हा सुटेल हे निदान पंचागांत दिलेले तरी असते; कोरोनचे ग्रहण केव्हा सुटेल हे सांगण्याची सोय नाही!

रमेश झवर

Thursday, June 3, 2021

अति उत्साही वडेवट्टीवार

राज्यातील अनेक जिल्ह्यात टाळेबंदी उठवण्यात येणार असल्याची घोषणा करून पुनर्वसन खात्याचे मंत्री विजय वडेवट्टीवार स्वतः तर तोंडघशी पडलेच शिवाय त्यांनी ठाकरे सरकारलाही तोंडघशी पाडले. तोंडघशी पाडले अशासाठी की मुळात निर्णय प्रलंबित असताना निर्णय झाल्याचे त्यांनी वार्ताहर परिषदेत सांगून टाकले. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या घोषणेनंतर तासाभरात टाळेबंदी शिथील करण्याचा अंतिम निर्णय अजून घेण्यात आलेला नाही असा खुलासा ठाकरे सरकारकडून करण्यात आला. त्यावर तत्त्वतः निर्णय घेण्यात आल्याचे वडेवट्टीवारांनी सांगितले. त्यांनी काहीही खुलासा केला तरी बूंद से गई वो हौदोंसे नही आयेगी!

वस्तुतः सरकारच्या निर्णयांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम स्वरूप दिले जाते. मगच मंजुरी प्रक्रिया पूर्ण होते. अर्थात निर्णय खातेअंतर्गत घेतले जात असले तरी कॅबिनेटची संमती मिळवावी लागते. निर्णयांचे स्वरूप प्रशासकीय असेल तर त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी क्वचितच घ्यावी लागते. कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आलेल्या  निर्णयांची माहिती मंत्रालयातल्या वार्ताहरांना सहाव्या मजल्यावर बोलावून मुख्यंतमंत्र्यांच्या कार्यालयातील स्वतंत्र दालनात दिली जाते. सेना-भाजपा सरकार असताना गोपीनाथ मुंढे उपमुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या ब्रिफींगनंतर दुस-या दिवशी मुंढे त्यांच्या कार्यालयात पत्रकारांना बोलावून ब्रिफींग करू लागले. खरे तर हा विनोदी प्रकार होता! त्या काळी भाजपा हा नवसत्ताधारी पक्ष होता. पक्षाची अस्मिता जतवण्याची एकही संधी सोडायची नाही हा त्यावेळी मुंढ्यांचा खाक्या होता. पत्रकारांनी अर्थात तिकडे दुर्लक्ष केले.

मुंढ्यांनी जो प्रकार केला त्यासारखाच प्रकार वडेवट्टीवारांनीही केला. फक्त तो मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी केला एवढेच.  सध्या काँग्रेसमध्ये अनेक वडेवट्टीवार आहेत. येनकेण प्रकारे प्रसिध्दीच्या झोतात राहण्याची त्यांना हौस दांडगी आहे. त्यांच्या ह्या हौसेपायी त्यांचे हसे होते. मंत्र्यांना प्रेसशी बोलण्याचा अधिकार नाही असे कोणी म्हणणार नाही. प्रसिध्दीच्या झोतात कसे राहायचे ह्याचे तंत्र काँग्रेसच्या नवपुढा-यांना मात्र माहित नाही.१९६० ते १९८० ह्या काळात काँग्रेसचे मंत्री पत्रकारांना बातम्या देत नसत असे मुळीच नाही. परंतु बातमी देताना वार्ताहरांना ते विनंती करत की बातमीत माझे नाव देऊ नका. म्हणून बातमीची विश्वासार्हता पटवण्याच्या उद्देशाने  समजते, कळतेकिंवा उच्च पाळीवरील सरकारी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार अशी शब्दरचना वार्ताहर बातमीत हमखास करायचे. काही वेळा संभाव्य निर्णयाची प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या उद्देशाने खुद्द मुख्यमंत्रीदेखील हा मार्ग अवलंबत असत.

इंदिराजी पंतप्रधान असताना त्यांनी चक्क परिपत्रक काढून मंत्र्यांना  प्रेसशी बोलण्यास मनाई केली होती. पंतप्रधानांच्या परिपत्रकाचा फारसा उपयोग झाला नाही. अनेक मंत्री घरोब्याच्या पत्रकाराला बंगल्यावर बोलावून किंवा खासगी फ्लॅटवर बोलावून बातम्या देत. पत्रकारही बातमीत विमानतळावर ह्या वार्ताहराने विचारले असताअसे वाक्य टाकून बातम्या देत! हे प्रकार वाढत गेल्यामुळे काँग्रेस सरकारमध्ये आणि काँग्रेसमध्ये कोणाचा पायपोस कोणात उरला नाही. त्याची परिणती पक्षात फाटाफूट होणात झाला. त्याखेरीज पक्षात पैसा बोलू लागला तो वेगळाच! काईबी कर्ता तो कार्यकर्ता अशीच काँग्रेसमध्ये जणू कार्यकर्त्याची व्याख्या रूढ झाली. दिवसभर बातम्यांचे रवंथ करत बसणारे कार्यकर्ते संधी मिळाली की मुंबई किंवा दिल्ली गाठतात! कार्यकर्ते. उठल्यसुटल्या अध्यक्षांना असंतोष-पत्र पाठवणारे आणि वडेवट्टीवारांसारखे बनचुके अतिउत्साही मंत्री ह्यांच्यापासून काँग्रेस पक्षाला वाचवण्याची वेळ काँग्रेसवर नक्की आली आहे!

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार

Tuesday, June 1, 2021

संपादक राधाकृष्ण नार्वेकर

राधाकृष्ण नार्वेकरांची माझी पहिली भेट पत्रकार संघात भेट झाली. ते नवाकाळचे वार्ताहर असताना!  ते नवाकाळचे वार्ताहर होते खरे, परंतु त्या काळात नवाकाळचे नाना मोने, मराठाचे मधुकर भावे आणि लोकसत्तेचे अशोक पडबिद्री ह्यांचा दबदबा होता. नवशक्तीचे चंदू देसाई आणि भालचंद्र मराठे ह्यांची महापालिका प्रेसरूममध्ये दादागिरी होती. मराठाचे ना. ग. मुसळे हे महापालिकेचे वार्ताहर होते. नार्वेकर आणि मुसळे ह्यांना बिचारेम्हणण्याइतके ते सालस होते! मुसळे ठाकूरद्वारला राहात. दुपारी जेवण आणि वामकुक्षी झाल्यावर ते पालिकेची बस पकडत. नार्वेकरना खास बीट नव्हता. पण महापालिकेच्या बातम्या त्यांच्याकडून अपेक्षित होत्या. नवाकाळचे  निळूभाऊ त्या काळात रिपोर्टिंग करत. हे सगळे मुद्दाम सांगण्याचे कारण असे की आम्ही पत्रकारितेत आलो तेव्हा आम्ही दोघे कुणीच नव्हते.  Many people are nobody; only few prople are somebody असे एक वाक्य मी ब्रिटिश काऊंसिलमधून आणलेल्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत वाचले होते. ते वाक्य मला जितके लागू पडत होते तितकेच नार्वेकरांनाही लागू पडत होते. Both of us were nobody!

हे वाक्य मी एकदा धाडस करून पत्रकार संघात नार्वेकरांशी गप्पा मारताना सहज बोलून गेलो. नार्वेकरांनी माझ्या हातावर टाळी दिली. त्या दिवसापासून आमची दोघांची

जी मैत्री झाली ती शेवपर्यंत कायम राहिली. ते शाळेत शिक्षक होते. त्यांच्याकडे चांगली बीए बीएडची पदवी होती. माझ्याकडे बीएची पदवी होती. आम्ही पदवीधर असल्यामुळे नवाकाळ आणि मराठासारख्या लहान वृत्तपत्रात बाकीचे बिगरपदवीधर सहाकारी आम्हाला काहीच समजतनसत. आचार्य अत्रे, शिरीष पै, विश्वनाथ मोरे आणि मी एवढे ४-५ जण सोडले तर मराठाच्या संपादकवर्गात पदवीधर जवळपास नव्हतेच. ह्यांना काय पत्रकारिता जमणार’, असा आमच्याकडे पाहण्याचा सगळ्यांचा टिपिकल दृष्टीकोन होता.  तो बदलेल असे निदान मला तरी वाटत नव्हते. सकाळ पाळीत माझी ड्युटी ३ वाजता संपायची. ड्युटी संपली की घरी जाण्यापूर्वी मी पत्रकार संघात चक्कर टाकत असे. तेथे ब-याच ऑफ ड्युटी पत्रकारांची गाठ पडायची. नाना मोने, राजा केळकर, वसंत उपाध्ये, नार्वेकर, मोहन केळुस्कर आणि नार्वेकर ह्यांच्यापैकी कुणाची तरी हमखाल गाठ पडायची. कधी चंद्रकांत पुरंदर-यांचीही गाठ पडायची.

त्यांची चागली ओळख झाल्यावर एकदा ते चंद्रकांत पुरंद-यांकडे घरी आले. मी पुरंदरेंच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहात असल्याने  ते माझ्याकडेही आले. मी  सौ. झवरना पोहे करायला सांगताच नार्वेकर म्हणाले, ‘नको! नको! मी आताच पुरंद-यांकडे पोहे खाऊन आलोय्.

निदान चहा तरी घ्यावाच लागेलअसे मी सांगताच १० मिनटात चहाचा कप आमच्या पुढ्यात आला.  चहाचा एक एक घुटका घेत असताना आमच्या गप्पा रंगल्या. तासभर केव्हा निघून गेला ते कळले नाही. नंतर जेऊनच जा, अशी मी त्यांना विनंती केली. ती विनंतीही त्यांनी मान्य केली नाही. मीही लंच बॉक्स पॅक करून त्यांच्याबरोबर निघालो. आम्हा दोघांनाही बोरीबंदरला जायचे होते. विक्रोळी ते बोरीबंदर ह्या ४५ मिनटांच्या प्रवासात आमच्या गप्पांचा ओघ सुरूच होता. त्यात राज्याच्या राजकारणापासून ते ऑफिसमधल्या राजकारणापर्यंत अनेक विषय निघाले. गप्पा अगदी निखळ होत्या. कोणाबद्दल उलटसुलट बोलणं नाही की कोणाचाही अधिक्षेप नाही. फक्त निरूपद्रवी माहिती कथन एवढंच त्या गप्पांचं स्वरूप  होतं. माझ्याशी बोलताना ते एकदाही एकेरीवर आले नाही. माझ्याहून ते वयाने, अनुभवाने मोठे होते. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना एकेरीवर येण्याचा प्रश्नच नव्हता. एकेरीवर येऊन बोलत नसतील तर दोघात जवळीक आहे असा दृढ समज त्या काळात निदान पत्रकारांचा तरी होता. परंतु आमच्या मैत्रीत शिष्टाचार होता. जवळीकही होती.

अधुनमधून त्यांच्या माझ्या भेटी व्हायच्या पण अगदी कमी! मला चीफसबचं प्रमोशन मिळालं. नवाकाळ सोडून नार्वेकरही सकाळमध्ये गेले. थत्ते मुंबई आवृत्तीचे संपादक होते. पण त्यांचे पद निव्वळ नामधारी होते. वितरण, जाहिराती वगैरे मॅनेजमेंटची कामे ते जास्त बघत. आत्माराम सावंत आणि गडकरी ह्यांच्या काळात सकाळचा प्रोफेशनल वृत्तपत्र म्हणून नावलौकिक झाला. त्या प्रशस्त वृत्तपत्रीय वातावरणात सहाय्य्क संपादक ह्या नात्याने नार्वेकरांची कामगिरी सुरू झाली. नंतरच्या काळात नार्वेकरांची सकाळच्या संपादकपदी नेमणूक होणे क्रमप्राप्त होते. मॅनेजमेंटच्या विशिष्ट धोरणामुळे मलाही सर्व प्रकारची प्रमोशन्स मिळत गेली.

माझे मित्र प्रफुल्ला शेणई हे नोकरीअभावी अस्वस्थ होते. त्यांना लोकसत्तेत घ्यावे म्हणू मी वृत्तसंपादक कोकजेंकडे शब्द टाकला. कोकजेंनीही माझ्या शब्दाचा मान ठेवला. त्यांनी शेणईना भेटायला बोलावले.  ते पदवीधर नाहीत हे मी कोकजेंना आधीच सांगून टाकले होते. तरीही शेणईंना  त्यांनी कामावर बसवले. अर्धात नेमणूकपत्र वगैरे औपचारिकता  ते कशी काय पूर्ण करणार होते हे त्यांचे त्यांनाच माहित! शेवटी पदवी नाही ही बाब शेणईंना नडलीच. त्यांनी लोकसत्तेत कमावर येणे बंद केले. अर्थात कोकजेंनी शेणईंना व्हाऊचर पेमेंटमिळवून दिले. आठवड्याभरात शेणई पन्हा माझ्या घरी हजर.

सकाळमध्ये जागा आहे. तुम्ही नार्वेकरसाहेबांना फोन कराल काशेणई

माझी नार्वेकरांची ओळख आहे. पण माझ्याकडे त्यांचा घरचा फोन नंबर नाही. तुमच्याकडे आहे कामी

नाही. ठीक आहे. मी ऑफिसमध्ये गेल्यावर फोन करीनअसे मी  सांगितले. खरे तर. अशी कामे फोनवर होत नाहीत असा माझा अनुभव होता. पण त्या काळात मी उठून त्यांच्या ऑफिसमध्ये जाणे मला शक्य नव्हते. त्या काळात फोन करणेदेखील आजच्यासारखे सोपे नव्हते. ऑफिसला गेल्यावर दोनअडीचच्या सुमारास मी सकाळला फोन केला. नार्वेकर फोनवर येताच मी म्हणालो, प्रफुल्ल शेणई नावाचे माझा मित्र आहेत. त्यांच्या नावार एक कादंबरीही आहे. त्यांना नोकरीची गरज आहे. तुम्ही त्याला नोकरी दिली तर चांगल्या माणसाला मदत होईल.

त्या क्षणी नार्वेकर काही बोलले नाही. थोडावेळ थांबून ते म्हणाले, ठीक आहे.

त्यांचा आवाज मला का कोणास ठाऊक त्रासिक वाटला. नार्वेकर खरोखरच वैतागले का हा प्रश्न मला सतावत राहिला. अर्थात त्याचा काही उपयोग नव्हता. माझ्या तोंडून बाण तर सुटून गेला होता. शेवटी शेणईचं नशीब!असं स्वतःशी म्हणत मी कामाला लागलो. शेणईंचा फोन आला तेव्हा मी त्यांना एवढेच सांगितले की उद्या तुम्ही नार्वेकरांना भेटा. त्यानंतर नार्वेकरांना फोन करण्याचे मला धाडस झाले नाही. तिस-या दिवशी मला शेणईंनीच फोन केला,  नार्वेकरांनी मला नोकरी दिली.

मला आनंद झाला. नार्वेकरांनी माझ्या मैत्रीवर शिक्कामोर्तब केले तर! त्यानंतर नार्वेकरांचे आणि माझे एकदाही बोलणे झाले नाही. दरम्यानच्या काळात मी निवृत्त झालो. निवृत्त झाल्यावर तेही पत्रकार संघाच्या कामात रस घेऊ लागले. कुमार कदमनी मला ऑफर दिली की तुम्ही कोशाध्यक्ष म्हणून मला हवे आहात. मला निवडणुकीचे राजकारण जमणार नाही, असं कुमारना  मी सांगितले. ते माझ्याकडे लागले,’ असे सांगून त्यांनी मला फॉर्म भरण्याचा आदेश दिला. मी फॉर्म भरला. प्रचंड बहुमताने निवडून आलो. नार्वेकर विश्वस्त होते. कार्यकारिणीच्या बैठकीत पुन्हा नार्वेकरांची माझी गाठ पडू लागली. मिटिंगमध्ये मी चालू महिन्याचा जमाखर्चाचा हिशेब सादर करत असताना माझ्या लक्षात आले की नार्वेकर आणि कुसुम रानडे हे दोघे माझे सादरीकरण लक्षपूर्वक ऐकत आहेत. पुढील वर्षांचे अंदाजपत्रक सादर करण्याच्या दिवशी मी मागील वर्षाचे बॅलन्सशीट काढून त्यावर सरसकट १० टक्के वाढ केली. माझे हे सूत्र सांगताच नार्वेकरांनी मला प्रश्न विचारला, १० टक्क्यांची फिगर तुम्ही कुठून काढली?

साधा मुद्दा आहे. दर वर्षी महागाईत वाढ होतेच. ती किती झाली ह्या तपशिलात जाण्यापेक्षा सरसकट १० टक्के वाढ मी गृहित धरतो! साधं टॅक्सीचं भाडे घ्या. घराहून निघून स्टेशनवर यायला तुम्ही गेल्या वर्षी किती भाडं देत होतांत? ह्या वर्षी किती भाडं देता?’

माझ्या ह्या उत्तरावर नार्वेकर खळाळून हसले. नार्वेकर का हसताहेत हे कुणाला कळले नाही. वर्षांतून एकदा लोणावळ्याला बैठक व्हायची. त्यावेळी त्यांना अन् मला सकाळी लवकर जाग यायची. आपण फिरायला जाऊ या का? असे मी त्यांना विचारताच ते तयार झाले. आम्ही दोघेही फिरायला गेलो. येता येता कॉर्नरवर फुल्ल चहा पीत असू. परत आल्यावर मात्र त्यांची दिनचर्या सुरू व्हायची. माझाही अंघोळ वगैरे कार्यक्रम सुरू व्हायचा!

अलीकडे त्यांची आणि माझी गाठ पडली ती मला पुरंदरे ट्रस्टचा पुरस्कार मिळाला तेव्हा वरळीतल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. कार्यक्रम संपल्यावर आपण  दोघेही टॅक्सीने जाऊ असे सांगताच ते म्हणाले, मला टप्प्याटप्प्याने घरी जायचे आहे. मी दादरला निघताना दोघांनी एकदा बाहेर एकत्र जेवायचा आमचा बेत ठरला. पण ह्या ना त्या कारणाने तो लांबणीवर पडत गेला. नंतर कोरोना निर्बंध सुरू झाले. शेवटी तो बेत कधीच प्रत्यक्षात आला नाही. फक्त फोनवर बोलणे व्हायचे तेवढेच. एकदा मी त्यांना म्हटले, करतो रहो मदिने की बात हकिकत में यही है जिनेकी बात!

त्यावर ते खळाळून हसले! आज कोरानाने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आले. त्यांच्या अनेक आठवणी मनात उसळल्या. माझ्या काळातला एक सुसंस्कृत संपादक तर निघून गेलाच; त्याहीपेक्षा माझा जवळचा मित्र निघून गेला!

रमेश झवर

          ज्येष्ठ पत्रकार