Thursday, August 30, 2018

कट की कपोलकल्पित


भिमा कोरेगाव दंगलीच्या एक दिवस आधी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत समाजात जातीय तेढ उत्पन्न करणारी जहाल भाषणे केल्याबद्दल जिग्नेश मेवानी, उमर खलीद केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. आता नक्षलवाद्यांशी संगनमत करून शहरी भागात माओवादी चळवळ बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असणा-या 6 जणांना अटक करण्यात आली. त्यांना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी देशव्यापी धाडसत्र सुरू केले. धाडीत बरीच आक्षेपार्ह कागदपत्रे, इमेल इत्यादि हस्तगत करण्यात आल्याचा पुणे पोलिसांचा दावा आहे. त्याहूनही महत्त्वाचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची राजीव गांधीटाईप हत्या घडवून आणण्याचा कट रचला जात असल्याचा! नव्याने अटक झालेल्या सर्व आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्यासाठी न्यायालयाचा हुकूम मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पण तूर्त तरी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम मनाई हुकूमामुळे हा प्रयत्न बारगळा. संशयितांना पोलिस कोठडीत ठेवण्याऐवजी त्यांच्या निवासस्थानीच स्थानबध्द करण्याचा हुकूम सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे काही अंशी पोलिस तपास ठप्प झाल्यासारखा आहे. लोकशाहीत मतभेद हा एक प्रकारचा सेफ्टी व्हॉल्व असतो, अटक करण्यात आलेल्यांचा सरकारच्या विचारसरणीशी मतभेद आहे म्हणून त्यांना तुरुंगात टाकू नका असे उद्गार न्यायमूर्तींनी काढल्यामुळे ह्या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच गहिरे झाले.
मानवतावादी भूमिकेतून शहरी भागात चालवल्या जाणा-या चळवळीच्या म्होरक्यांचे सहकार्य मिळवण्यात माओवादी कम्यनिस्ट पक्ष यशस्वी झाल्याचा पुरावा पुणे पोलिसांनी मिळाला आहे. माओवादी आणि शहरी भागातील सामाजिक चळवळीचे म्होरके ह्यांच्या संगनमताचा गृहखात्याला निष्कर्ष मुळीच नवा नाही. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातच साईबाबाला अटक करण्यात आली होती तेव्हाच हा निष्कर्ष गृहखात्याने काढला होताच; शिवाय थोडाफार पुरावाही मिळवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्त्येचा कट रचला जात असल्याची पोलिसांची माहिती मात्र सर्वस्वी नवी आहे. ह्या नव्या माहितीनुसार पोलिस तपासाची दिशाच बदलू शकते. रिमांड अर्ज तूर्त तरी सर्वोच्च न्यायालयाने स्थगित ठेवला असला तरी ह्या प्रकरणाची सुनावणी बुधवार दि. 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यादिवशी सुरू होणा-या सुनावणीत सामाजिक चळवळीच्या माहोरक्यांचे आणि पोलिस तपासाचे भवितव्य ठरेल. पंतप्रदान नरेंद्र मोदींची हत्या घडवून आणण्याचा कट खरा की की कपोलकल्पित हेही सर्वोच्च न्यायालयात त्या उहापोहानंतरच ठरणार आहे!
सर्वोच्च न्यायालयात काय ठरते हे तर महत्त्वाचे आहेच. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीत प्रचारात पंतप्रधानांची हत्या घडवून आणण्याच्या कटाचा मुद्दा भाजपाला मिळाला! 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मनमोहनसिंग सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा आयता मुद्दा भाजपाला मिळाला होता. काँग्रेसविरुध्दच्या प्रचारात भ्रष्ट्राचाराच्या मुद्द्यास महत्त्व दिल्यामुळे भाजपला केंद्रात सत्ता मिळाली हे निर्विवाद सत्य आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भ्रष्ट्राचाराचा मुद्दा उपयोगी पडण्यासारखा नाही हे आता राज्यकर्त्या पक्षाने ओळखले आहे. विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणुका जिंकू शकतो असे भाजपा नेत्यांना वाटत होते. परंतु विकास कामावर आजवर कोणी निवडणुका जिंकल्या नाही. त्यात भाजपा नेत्यांची कामापेक्षा भाषणेच अधिक! ही वस्तुस्थिती भाजपा नेत्यंच्या नजरेतून सुटलेली नाही.  
काळ्या पैशाविरुध्द युध्द पुकारण्याच्या हेतूने 1000 आणि 500 रुपये किंमतीच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती. भारी कितीच्या नोटा रद्द केल्या की काळा पैसा बाळगणारे आपसूकच थंड पडतील अशी मोदी सरकारची अटकळ होती. परंतु ही अटकळदेखील चुकीची ठरली हे रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालावरून लक्षात आले आहे. माल व सेवा कर कायद्याचीही तीच गत झाली. जीएसटी कायद्याच्या सदोष अमलबजावणीपायी सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटकाच अधिक सहन करावा लागला. गेल्या चार वर्षांत इंधन दरात सरकारने भरमसाठ वाढ केली. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर वाढत असल्याने पेट्रोलियम दरवाढ अपरिहार्यच म्हटली पाहिजे असा खुलासा सरकार वेळोवेळी करत आले आहे. परंतु तो जनतेने स्वीकारला का? पेट्रोलियमच्या उत्पादन खर्चापेक्षा कितीतरी अधिक कर लादण्यात आल्यामुळे पेट्रोलियमचे दर जवळ जवळ दीडपट झाला हे खऱे कारण आहे. ते अडाणी ड्रायव्हरांनाही माहित आहे. किंबहुना सरकार चालले आहे ते एकूण महसुलात पेट्रोलियमावरील 46 टक्के कराच्या कमाईमुळे हेही आता गुपित राहिले नाही.
ह्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी समाजसेवा क्षेत्रात वावरत असलेले माओवादाच्या कच्छपी लीगलेले बुध्दिवंतदेखील हिंदुत्वादींइतकेच घातक आहेत हे दाखवून देणारा मुद्दा पुणे पोलिसांनी उपलब्ध करून दिला. हिंसक माओवादी चळवळीशी बुधद्धिवंतांचे संगनमत पुणे पोलिसांना सिध्द करता येवो अथवा न येवो, पण त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा रूबाब नक्कीच वाढेल! आणि पंतप्रधान मोदींची हत्त्या घडवून आणण्याचा कट उघडकीस आणला हे निवडणुकीच्या काळात किंवा नंतरही पोलिसांना सिध्द करता आला तर सोन्याहून पिवळे! भिमा कोरेगाव दंगल आणि एल्गार परिषद ह्या दोन्ही प्रकरणांचा तपास कसा हाताळायचा ह्यासंबंधी पोलिसांना मार्गदर्शन करण्याइतके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मूर्ख नाहीत. 'चीत भी मेरी पट भी मेरी' हा दिल्लीचा खाक्या आहे. काँग्रेसकाळात तो होता. भाजपाचा काळ त्याला अपवाद ठरण्याचे कारण नाही. भिमा कोरेगाव दंगल आणि एल्गार परिषदेच्या तपासाचे श्रेयापश्रेय फडणविसांच्या पदरात बांधून भाजपाश्रेष्ठी मोकळे होणार!
रमेश झवर
www.rameshzawar.com

Thursday, August 16, 2018

आदरणीय अटलबिहारी वाजपेयी


देशाचे पंतप्रधानपद तीन वेळा भूषवण्याची संधी मिळूनही अहंकाराचा वारा न लागलेले  अटलबिहारी वाजपेयी हे काळाच्या पडद्याआड निघून गेले. मनुष्य हा मरणधर्मा आहे. जन्माला आलेल्या व्यक्तीला एक ना एक दिवस हे जग सोडावेच लागते. वाजपेयजींनाही असेच अखेरच्या प्रवासाला निघून जावे लागले. परंतु चार दशकांहून अधिक काळ संसदीय राजकारणावर अधिराज्य गाजवणारी त्यांची कारकीर्द लोकांच्या कायम लक्षात राहील. वाजपेयींचे नाव 'भावी पंतप्रधान' म्हणून लालकृष्ण आडवाणी ह्यांनी जेव्हा निःसंदिग्धपणे जाहीर केले तेव्हाच आघाडीचे का होईना, परंतु स्वतःचे सरकार स्थापन करण्याइतपत यश भाजपाला प्रथमच मिळाले ही वस्तुस्थिती आहे. हा त्यांच्या करिष्म्याचा विजय होता! वाजपेयींच्या व्यक्तमत्वाची जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झाली. त्यांची संघनिष्ठाही नेहमीच अविचलित होती. परंतु संघाबाहेर 'मॉडरेट' स्वयंसेवक अशी त्यांची प्रतिमा होती. ती खरीही होती. तेवढीच ती नव्हती. त्यांच्या जीवनाला त्यागाचीही पार्श्वभूमी होती. म्हणूनच संघाबरोबर त्यांना संघेतरांचाही पाठिंबा सतत मिळत राहिला.
संसदेत विरोधी पक्षनेतेपदावर असताना त्यांचे भाषण ऐकताना ही व्यक्ती देशाची पंतप्रधानपदी विराजमान झाली तर देशाच्या आयुष्याला बहर येईल असे जनतेला मनोमन वाटत होते. तो य़ोग आला पण खूप उशिरा आला. मात्र, जनता राजवटीत पंतप्रधानपदाऐवजी परराष्ट्रमंत्रीपद त्यांच्या वाट्याला आले. पराष्ट्रपद भूषवताना नेहरूंच्या परराष्ट्र धोरणात बदल करण्याजोगे काही नाहीच असे त्यांच्या ध्यानात आले. विशेष म्हणजे मुंबईत बॉम्बे युनियन जर्नालिस्टच्या वार्तालापप्रसंगी वाजपेयींनी नेहरूंचे परराष्ट्र धोरणात तितका दोष नव्हता अशी प्रांजल कबुलीही दिली. अनेक प्रसंगी पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी ह्यांच्यावर वाजपेयी टीकास्त्र सोडताना सरकारच्या धोरणावर कडाडून हल्ला चढवत. सरकारवर टीकास्त्र सोडत असताना त्यांनी सभ्यतेच्या मर्यादा कधीच ओलांडल्या नाही. भारत-पाकिस्तान युध्दात विजय मिळवून बांगला देशास जन्माला घालणा-या इंदिराजींना 'दूर्गा' असे संबोधताना त्यांना ना संकोच वाटला, ना पक्ष किंवा संघ परिवारास काय वाटेल ह्याची त्यांनी क्षिती बाळगली!
प्रतिपक्षाच्या नेत्यांवर राजकारण्यांना टीका करावीच लागते. कधी कधी प्रतिपक्षाच्या नेत्यांचे वाभाडे काढताना त्या नेत्याच्या एखाद्या कृतीचा गौरव करण्याचा दिखुलासपणाही दाखवावा लागतो. मात्र, दिलखुलासपणा केवळ दाखवायचा नसतो. तो स्वभावातच असावा लागतो. वाजपेयी दिलखुलास स्वभावाचे तर होतेच; खेरीज ते संवेदनशीलही होते. विशेष म्हणजे संवेदनशीलता गमावण्याची वेळ त्यांच्यावर कधीच आली नाही. त्यांच्या अंगी असलेल्या गुणांना दाद द्यावीशी वाटली म्हणूनच पंतप्रधान राजीव गांधी ह्यांनी त्यांना युनोत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. मन मोठे करून अटलजींनीही ती विनंती मान्य केली. शिष्टमंडळाचे नेते ह्या नात्याने युनोच्या आमसभेत त्यांचे प्रभावी भाषण झाल्याने जागतिक नेत्यांवर त्यांची आपसूकच छाप पडली.
गुरु मानण्यावरून पंतप्रधान नरसिंह रावांनी काढलेल्या उद्गाराच्या संदर्भात 'गुरु' आणि 'गुरुघंटाल' ह्या दोन शब्दातला फरक वाजपेयींनी सहज जाता जाता स्पष्ट केला. त्यावेळी त्यांच्यातले जातीवंत लेखकाचे भाषाप्रभुत्व दिसले. वार्ताहर परिषद असो वा जाहीर सभा, पक्षाच्या कार्यकारिणीची मंथन बैठक असो वा भेटीस आलेल्या पक्षाच्या शिष्टमंडळापुढे बोलण्याचा प्रसंग असो, हजरजबाबीपणा हा त्यांचा गुण हमखास प्रकट व्हायचा. एखाद्या प्रश्नाच्या गाभ्यात जाण्यासाठी लागणारी प्रखर प्रज्ञा आणि कूटनीती-प्राविण्य हे दोन्ही गुण त्यांच्यात पुरेपूर होते. सत्प्रवृत्ती हा त्यांचा स्वभावाचे अंतरंग वैशिष्ट्य होते. त्यांच्या प्रतिपादनाला विनोदाची जोड लाभली नाही असे कधी घडले नाही.
सूरत अधिवेशनात भाजपा हा पर्यायी पक्ष असला पाहिजे असे भाजपाचे ध्येयधोरण निश्चित करण्यात आले. हे धोरण आडवाणींनी ठरवले असले हे तरी ते ठरवण्याच्या बाबतीत वाजपेयींचाही मोठा वाटा होता. सत्ता संपादन करण्याचा प्रश्न आला तेव्हा तात्त्विक अडसर उभे करणा-यांना लीलया बाजूला कसे सारायचे ह्याचे कौशल्य त्यांच्या स्वभावातच होते. राज्य पातळीवरील पक्षांशी भांडत बसण्यापेक्षा त्यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे करण्याचे शहाणपण दाखवणे केव्हाही चांगले अशी त्यांची भावना होती. म्हणूनच उत्तर भारताच्या राजकारणात नेहमीच घाणेरडे वर्तन असलेल्या पक्षांशी हात मिळवणी करताना वाजपेयींनी बिल्कूल फिकीर केली नाही. ' हां हां, इससे हमारे सतित्व का कोई भंग नहीं हो जाता' असे उद्गार अधिवेशन संपल्यावर झालेल्या वार्तालापप्रसंगी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी काढले होते. असे असले तरी पक्षाची प्रतिमा मलीन होणार नाही इकडे त्यांनी बारीक लक्ष ठेवले. गुजरातेत गोध्रा कांड झाल्यानंतर उसळलेल्या दंगली कठोरपणे आटोक्यात आणण्याचा सल्ला त्यांनी त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी ह्यांना दिला. तोही एका शब्दात- ' राजधर्म पाळा! ' अर्थात मोदींना राजधर्म सुनावण्याचा त्यांना नैतिक अधिकार होता. कारण, नरेंद्र मोदींना मुख्यमंत्रिपदाची संधी वाजपेयींनीच दिली होती.  
धर्मयुग ह्या हिंदी साप्ताहिकात प्रसिध्द झालेल्या त्यांच्या कवितांचा संग्रह 'मेरी एक्कावन कविताएं' ह्या नावाने प्रसिध्द झाला. राजकारणात वावरत असताना त्यांचे ह्रदय देशप्रेमाच्या भावनेने ओथंबले होत. त्यांनी लिहीलेल्या कवितांचा संग्रह प्रसिध्द झाला आणि त्यांचे एक नवेच रूप लोकांसमोर आले. मुंबई मुक्कामात एकतरी मराठी नाटक पाहायचेच असा त्यांचा नियम होता. पाहण्यासारखे नाटक कोणते आहे हे ते विद्याधर गोखल्यांना फोन करून विचारत आणि शिवाजी मंदिरातल्या नाटकाला जात. वेदप्रकाश गोयलांच्या घरी ते मुक्काम करत. त्यवेळी त्यांना भेटायला अनेक लहानथोर मंडळी येत. भेटीस आलेल्या प्रत्येकाशी  ते अगदी सहज संवाद साधत. त्यांच्या अंगी ती एक कलाच होती. संवाद साधताना ते कुणाचीही फिरकी घेत. फिरकी घेताना त्या माणसाबद्दल त्यांचा मनात अजिबात विखार नसायचा. गंमतीचा भाग म्हणजे ज्याची फिरकी ते घेत तोही त्यांच्या हास्यविनोदात सहभागी होत असे!
विलोभनीय व्यक्तिमत्त्व लाभलेला हा असामान्य नेता केवळ भाजपाचाच नव्हता, तर तो देशाचा नेता होता. जनमानसात त्यांची आठवण कायम राहील.  त्यांच्या आठवणींची फुले लोक त्यांना रोज अर्पण करत राहतील!  ह्या आदरणीय नेत्यास अखेरची आदरांजली!

रमेश झवर

www.rameshzawar.com


जंटलमन अजित वाडेकर


पत्रकारितेत येऊनही अजित वाडेकरशी माझा कधीकाळी संबंध येईल असे मला वाटले नव्हते. ऑस्ट्रेलियात किंवा न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या स्कोअरची 5-6 ओळींची बातमी देण्याची गोष्ट सोडली तर तरी माझा स्पोर्ट्स डेस्कशी कधी संबंध आला नाही. नामवंतांची ओळख असावी असे मला वाटत होते. मात्र, कुणाशी मुद्दाम ओळख करून घेण्याच्या भानगडीत मी कधी पडलो नाही. कॉलेजात असतानापासूनच्या काळात अजित वाडेकरचं बॅटिंग मला आवडत असे. कधीकधी तो चेंडू अलगद झेलत असे. हे सगळं तो हे कसे करू शकतो ह्याबद्दल मला नेहमीच आश्चर्य वाटत असे. बॅटिंग, बॉलिंग आणि फील्डिंग ह्या तिन्हीतली त्याची कर्तबगारी माझा प्रिय विषय होता. अष्टपैलू अजित जेव्हा कॅप्टन झाला त्याचा मला आनंद झाला. मालिकेत इंग्लंडला हरवून त्याने भारताला विजय मिळवून दिला. पतौडीच्या काळात भारतीय किक्रेटवर पसरललेले पराभवाचे सावट ह्या विजयामुळे पुसले गेले. पुढे गाववस्कर आणि सचिन धावांचे डोंगर रचण्याचा सुवर्णकाळ सुरू झाला. भारतीय क्रिकेटच्या ह्या वाढत्या लौकिकाची सुरूवात अजित वाडेकरने करून दिली असे मला वाटते. 1971 साली इंग्लंड आणि वेस्ट इंडीजला पराभूत करून त्याने भारतीय किक्रेटच्या इतिहासात विजयाचे अक्षरशः नवे पान लिहले. व्यक्तिशः अजित वाडेकरांच्या शिरपेचात तुरा खोवला गेला!
अजित वाडेकर हा माझा आवडता खेळाडू असला तरी त्याच्याशी माझी वैयक्तिक ओळख होण्याची सूतराम शक्यता नाही हे मी ओळखून होतो. त्यामुळे त्याची माझी भेट होईल असे मला कधी स्वप्नातही वाटले नाही. पण आयुष्यात काहीवेळा असे योगायोग जुळून येतात की अगदी अनपेक्षितपणे आवडत्या व्यक्तींची भेट होण्याची संधी अवचितपणे येते. बँकेच्या बातम्यानिमित्त  हा योग अचानक जुळन आला. अजित वाडेकरांशी माझी छान ओळख झाली. ती ओळख वृध्दिंगतही झाली.
अजित वाडेकर संघाचा कॅप्टन झाला. त्याची कॅप्टन म्हणून झालेली निवड ही त्याच्या जंटलमनली स्वभाव आणि मैदानावरचा त्याचा परफॉर्मन्स पाहूनच झाली ह्याबद्दल मला खात्री वाटत होती. ह्याचे कारण क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे अशी पारंपरिक ब्रिटिश समजूत आहे. जेव्हा त्याच्याशी कामानिमित्त संबंध आला तेव्हा तो खराखुरा जंटलमन आहे ह्याचा मला अनुभव येत गेला. संघात निवड करण्यावरून खूप राजकारण चालते हे खरे. परंतु कसोटी सामन्यासाठी संघात वर्णी लागणे आणि एखाद्या सिनेमासाठी हीरो म्हणून निवड होणे ह्या दोन्ही मुळीच सोप्या नाही. हिरोची आणि क्रिकेट टीममध्ये निवड ह्या दोन्ही गोष्टी राजकारणापलीकडील आहेत असे मला अजूनही वाटते. ह्याचे कारण त्यांचा परफॉर्मन्स अक्षरशः लाखो लोक पाहात असतात. क्रिकेटपटुंच्या आणि हीरोच्या  उणिवा मुळात झाकून राहूच शकत नाही. मॅच किंवा सिनेमातील परफॉर्मन्सला लाखो लोक साक्षीदार असतात. एके काळी रेडियोवरचे धावते समालोचन ऐकताना सामन्याचे हुबेहूब चित्र उभे राहायचे.  नंतर आकाशवाणीची जागा दूरदर्शनने घेतली आणि मॅच प्रत्यक्ष पाहण्याच्या आनंदात लाखो लोक न्हाऊन निघण्याचे दिवस आले. नेमके ह्याच काळात मॅचफिक्सिंगचे प्रकार सुरू झाले. त्यामुळे क्रिकेटविश्व खूपच बदनाम झाले. क्रिकेट हा जंटलमनचा खेळ राहिला नाही!
ह्याच काळात विद्याधर गोखलेंनी मला व्यापार कॉलम दिला होता. दर मंगळवारी तो कॉलम छापून येई. त्या कॉलमसाठी अर्थ आणि उद्योग जगाविषयी चौफेर वाचन करावे लागायचे. क्वचित मी भेटीगाठीही घेत असे. ह्याच कॉलममुळे अजित वाडेकरांशी जवळिकीचे संबंध निर्माण झाले. ती हकिगत मजेशीर आहे. एकदा स्टेट बँकेत सहज चक्कर मारली तेव्हा माझे मित्र थोरात ह्यांना भेटलो. ते इकॉनॉमिक रिसर्च खात्याचे महाव्यवस्थापक होते. त्यांच्याशी गप्पा मारता मारता स्टेट बँकेच्या हायरआर्कीचा विषय निघाला. बोलण्याच्या ओघात काही अधिका-यांची नावं सांगून कोण केव्हा निवृत्त होणार ह्याचे नावानिशीवार चित्र त्यांनी उभे केले. अगदी अनपेक्षितपणे मला कॉलमसाठी सणसणीत मसाला मिळाला!
ऑफिसला येऊन भराभर सगळे लिहून काढले. देशातली सगळ्यात मोठी बँक चेअरमनच्या शोधात असा माझ्या मजकुराचा आशय होता. तो लेख वाचून स्टेट बँकेतून मला अनेकांचे फोन आले. फोन करणा-यात अजित वाडेकरांचाही फोन होता. अजित वाडेकर स्टेट बँकेच्या जनसंपर्क खात्यात उपमहासंचालक पदावर होते. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया माझ्या दृष्टीने महत्त्वाची होती. त्यांची प्रतिक्रिया अतिशय संयत होती. कुठंही वावगा शब्द त्यांनी उच्चारला नाही. त्यामुळे वाडेकरांबद्दल मला आदर निर्माण झाला. स्टेट बँक चेअरमनच्या शोधात वगैरे काही नाही. बाकी हायरआर्कीच्या तपशिलाबद्दल तुम्ही दिलेली माहिती खरी आहे, एवढं बोलून वाडेकरांनी फोन बंद केला. पण खरी मह्त्त्वाची घटना तर पुढेच घडणार होती!
लोकसत्तेतला माझा कॉलम केंद्रीय मंत्री वसंत साठे ह्यांनी वाचला आणि त्यांनी माझ्या लेखाचा सारांश पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कानावर घातला. इंदिराजींनी त्यात लक्ष घातले आणि आठवडाभरात व्ही. एन. नाडकर्णी ह्यांची नेमणूक स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी करण्याचा निर्णय घेतला. अर्थात ही माहिती मला खुद्द साठेंनीच मुंबईत आल्यानंतर प्रत्यक्ष भेटीत सांगितली. नंतर योग्य वेळी व्ही. एन नाडकर्णींच्या नेमणुकीची बातमी प्रेसट्रस्टने दिल्लीहून दिली. दोन दिवसांनी स्टेट बँकेकडून नाडकर्णींच्या फोटोसह रीतसर प्रेसनोटही आली. बातमी माझ्या टेबलावर येताच अजित वाडेकरांचा मला पुन्हा फोन आला. 'कृपया, बातमी छापा!'  अजित वाडेकर म्हणाले. 'अहो छापणार ना! ' मी लगेच आश्वासन दिले. नंतरच्या काळातहा अधुनमधून बातम्यांसाठी त्यांचे फोन येते असत.
एकदा त्यांनी चहाला निमंत्रण दिले. ते नाकारण्याचे मला कारण नव्हते. त्यांना भेटल्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्यांनी हळूच सांगितले, चेअरमनसाहेबांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे. मी आनंदाने होकार दिला. नंतरच्या आठवड्यात चेअरमन कार्यालयाने ठरवल्यानुसार आमची भेट पार पडली.
दरवर्षी स्टेट बँकेच्या वार्षिक अहवालाची कॉपीही मला ते आठवणीने पाठवत. मीही त्यावर हमखास लिहीत असे. स्टेट बँकेच्या कामगिरीवर बातमी लिहून झाल्यावर मी सहज चक्कर मारायला म्हणून स्टेट बँकेत वाडेकरांच्या खोलीत शिरलो. गप्पा मारताना अजित वाडेकर म्हणाले, 'आमची बँक भारतातली सर्वात मोठी बँक. परंतु मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कलकत्ता सोडले तर एकाही शहरातल्या वृत्तपत्रात स्टेट बँकेच्या कामगिरीबद्दल काहीच छापून येत नाही.'
स्टेट बँकेच्या कामगिरीची बातमी छापून येत नाही त्याचे कारण त्या इंग्रजीत असतात. आर्थिक विषयावरचे इंग्रजी अनेक पत्रकारांना समजत नाही हे मी त्यांच्या निदर्शनास आणून देताच ते म्हणाले, 'अस्सं होय!'
क्षणभर ते विचारात पडले. तेव्हा मी त्यांना म्हटलं, मी तुम्हाला ह्यावेळी मराठीत बातमी करून देतो. तुम्ही ती सर्व वर्तमानपत्रांना पाठवा. मग बघू या आपण छापून येते की नाही ते!
त्यांना मी बातमी मराठीत करून दिली. हाताखालच्या अधिका-यांना त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या. अनेक जिल्ह्यातल्या लहान लहान वृत्तपत्रातही त्यावर्षीं स्टेट बँकेची बातमी प्रसिध्द झाली. अनेक मराठी वृत्तपत्रात बातम्या छापून आल्या तेव्हा अजित वाडेकर जाम खूश झाले.
त्यांनी मला जेवायला बोलावले तेव्हा न्यूजडेस्क सोडून त्यांच्याबरोबर हॉटेलात जाणे मला शक्य नव्हते. कारण हॉटेलमध्ये भरपूर वेळ लागणार असा मला अंदाज होता. माझी प्रामाणिक अडचण मी त्यांना सांगितली.
ते म्हणाले, 'ठीक आहे. नाहीतरी तुम्ही कँटिनमध्ये जेवायला जाणार ना, तेव्हा तुमच्या कँटिनमध्ये जाण्यापेक्षा माझ्या केबिनमध्ये आपण स्टेट बँकेच्या कँटिनचे जेवण मागवू ! तुमचा जास्त वेळ मोडणार नाही.'
खरोखरच त्यांनी माझा वेळ मोडला नाही! आपल्या कॅटिनमध्ये त्यांनी जेवण मागवले. आम्हा दोघांचे 'वर्किंग मिल' मात्र साग्रसंगीत पार पडले. आणि मी वेळेत ऑफिसला परत आलो. अशी ही आमची ही वर्किंग अरेजमेंट ते रिटायर होईपर्यंत सुरू राहिली. ब्याण्णव साली मला अमेरिकेचा व्हिसा मिळाला. तेव्हा मी त्यांना माझ्या अमेरिका ट्रिपबद्दल सांगितले. त्यांनी लगेच स्टेनोला बोलावले. माझा पाहुणचार करण्याची विनंती करणारी पत्रे न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कच्या ब्रँच मॅनेजरला लिहून माझ्या सुपूर्द केली. हे सारे मला अनपेक्षित होते.
मैत्रीच्या पातळीवर निर्माण झालेले त्यांचे माझे हे संबंध त्यांनी सदैव मैत्रीच्या पातळीवर ठेवले. त्याला कधीच ऑफिशियल औपचारिकतेचा स्पर्श होऊ दिला नाही. निवृत्त झाल्यानंतर त्यांना मी एकदा भेटायलाही गेलो. त्यांनीही मोठ्या अगत्याने माझे स्वागत केले. मुंबई क्रिकेट असोशियनमधल्या निवडणुकीच्या राजकारणाचा विषय त्यांनी चुकूनही काढला नाही. तो विषय मीही कधी काढला नाही. तो विषय काढला तर मी बातमी वगैरे देणार. त्यावरून राजकारण सुरू होणार असे त्यांना वाटले असावे. ते राजकारण त्यांच्यातल्या जंटलमनला मानवले नसते. त्यांच्या मृत्यूने जंटलमन क्रिकेटपटू कायमचा तूंबूत परत गेला!
रमेश झवर

Tuesday, August 14, 2018

कुठे आहे स्वातंत्र्याचे अत्तर?


आज बहात्तरावा स्वातंत्र्यदिन!  समता, स्वातंत्र्य आणि बंधूभाव हेच स्वतंत्र भारताचे ध्येय राहील असे आश्वासन देशाला मिळाले होते. प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळाला. वैचारिक तसेच अभिव्यक्तीचे स्वातंत्र्यदेखील लोकशाही राष्ट्रात महत्त्वाचे असते. तेही स्वतंत्र भारताच्या पहिल्या पिढीने जनतेला दिले. धर्माचरण आणि स्वतःला मान्य असलेल्या पध्दतीने ईश्वरोपासना करण्याचे स्वातंत्र्य  देशात प्रत्येकाला त्यांनी दिले. देशाचा नागरिक ह्या नात्याने सगळे समान! कोणी कोणापेक्षा मोठा नाही की लहान नाही. प्रत्येकाला समान संधी! ती देत सअसताना सामाजिक मागासलेल्यांना अधिक संधी द्यायला पहिली पिढी विसरली नाही. बाकी, ह्याला कमी त्याला अधिक हे चालणार नाही असे वातावरण त्यांनी निश्चित निर्माण केले.  देशाचा आत्मा एक आहे. देशाची एकात्मता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा ह्याबद्दल कसलीही तडजोड नाही! विशेष म्हणजे ह्या उदात्त तत्त्वांबद्दल भव्य भारतात मतभेद नाहीच. परंतु ह्या उदात्त तत्त्वांची प्रचिती महत्त्वाची!  137 कोटींच्या देशात किती जणांना त्याची प्रचिती येते ही कसोटी लावली तर विचारी माणसाचे मन निराशेने काळवंडून जाते! लक्षावधी सामान्य नागरिकांची दुःस्थिती कायम आहे. आपल्या दुःस्थितीचे कारण त्यांना अजूनही पापपुण्याच्या आणि प्राक्तनाच्या संकल्पनात शोधावे लागते!  ही वस्तुस्थिती नाकरता येणार नाही. नवभारतात अनेक राज्यकर्ते आले आणि गेले. काही राज्यकर्त्यांनी स्वतःशी इमान राखले. देशवासियांच्या सेवेत त्यांनी कसूर केली नाही. परंतु ह्या सेवायात्रेत लुटारू प्रवृत्तीचे अनेकजण सामील झाले हीही वस्तुस्थिती आहेच. मध्ययुगात आक्रमण करणा-या टोळ्या जाळपोळ करत. लुटालूट करत, मुलूख जिंकत! स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लुटारू प्रवृत्तीच्या बहुसंख्यांकडून जाळपोळ करण्यात आली नाही हे खरे आहे. त्यांनी मुलूख जिंकला नाही हेही खरे. परंतु त्यांनी केलेल्या कायद्यामुळे सामान्य माणसाला लुटण्याचे नवे नवे फंडे शोधून काढण्यात अनेक धूर्त लोकांना संधी मिळाली! गरीब माणसांचे, सामान्य माणसांचे हक्क हिरावून घेण्याची ही संधी श्रीमंतांना राज्यकर्त्यांमुळे मिळाली. हे काम त्यांनी अत्यंत हुषारीपूर्वक केले. सुखाने आयुष्य व्यतित करण्याच्या लाखो-करोडो प्रामाणिक माणसाच्या स्वप्नांचा चक्काचूर होईल अशीच कृती राज्यकर्त्यांकडून वेळोवेळी घडत गेली. फरक एवढाच की लुटारू प्रवृत्तीच्या राजकारण्यांनी जनतेला तलवारीऐवजी कायद्याने लुटले!  त्यासाठी नियमांचे जंजाळ उभे केले. त्या जंजाळामुळे लाखो लोकांचा श्वास कोंडला गेला! स्वातंत्र्य, समता आणि बंधूभाव ही तत्त्वे फक्त घटनेच्या पुस्तकातच राहिली! निदान बहुसंख्य असाह्य जनतेची हीच भावना आहे. अशी भावना असणे चांगले नाही. पण ही नवी वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती काळजी उत्पन्न करणारी आहे! ही वस्तुस्थिती वाचाळतेचे वरदान लाभलेल्या मंडळी कदापि मान्य करणार नाही. निवडणूक जिंकायची, सत्ता काबीज करायची आणि राजकीय प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करायचे हेच त्यांचे ध्येय झाले आहे. बड्यांना जास्तीत जास्त संधी कशीच मिळेल अशा पध्दतीने धोरण कसे राबवता येईल ह्याचीच त्यांना अहोरात्र काळजीकायद्याचे राज्य म्हणजे पक्षनामक व्यक्तीसमूहाच्या गडगंज फायद्याचे राज्य!  बाकी, शेतकरी असो वा शहरी भागातला मजूर, जीवन कंठण्यासाठी नोकरी करणारा असो वा मुलास उच्च शिक्षण देण्याची आस बाळगणारे मध्यमवर्गीय पालक! समाधान मानून घेणे हाच ह्या सर्वांचा एक कलमी कार्यक्रम. त्यांच्या आयुष्यात स्वातंत्र्याची अनुभूती अत्तराच्या फायासारखी! फाया शिल्लक आहे; फायातले अत्तर मात्र कधीच उडून गेले!
रमेश झवर
www.rameshzawar.com

Thursday, August 9, 2018

कर्तृत्ववान करुणानिधी


दिल्लीविरुध्द दंड थोपटणे म्हणजे उत्तरेच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान देणे असते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक राज्यांनी दिल्लीविरुध्द दंड थोपटले. केंद्र सत्तेला आव्हान देण्याच्या बाबतीत तामिळनाडूला जितके यश मिळाले तितके यश कुठल्याही राज्याला मिळाले नाही असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. तामिळनाडूतील काँग्रेसविरोधी राजकारणाचा इतिहास घडवणारे बहुतेक नेते काळाच्या पोटात गडप झाले. अगदी अलीकडे मरण पावलेल्या जयललिता ह्यांच्या पाठोपाठ मुथुवेल करुणानिधीही गेले!  कलैनार करूणानिधींच्या मृत्यूने तामिळ जनतेवर प्रदीर्घ काळ गारूड करणारी त्यांच्या आयुष्याची पटकथा तर संपलीच;  शिवाय तमिळ अस्मितेला दमदार फुंकर घालत राहणारा तमिळ नेता द्रविड राजकारणाच्या पटावरून कायमचा नाहीसा झाला!  राज्याचे अधिकार आणि केंद्राचे अधिकार असा लढा स्वतंत्र भारतात अनेक राज्यात उभा राहिला. परंतु तामिळनाडूत तो जितका प्रखर होता तितका प्रखर अन्य राज्यात कधीच झाला नाही. करूणानिधी त्या संघर्षात बिनीचे शिलेदार म्हटले पाहिजे. पेरियार इ. व्ही. रामस्वामी, सी. एन. अण्णादुराई, एम. जी. रामचंद्रन् ह्या नेत्यांच्या प्रभावळीत आपले करुणानिधींनी स्वतःचे स्थान निर्माण केले होते.  त्यांच्या नावामागे तमिळ जनतेने भले 'तलाइवार'  ( नेता ) अशी उपाधी लावली नसेल; परंतु नेता म्हणून त्यांचे स्थान प्रदीर्घ काळ टिकले. 'तलाइवार' ही उपाधी नसली तर 'कलैनार' ( म्हणजे कलेचे वरदान लाभलेला ) ही उपाधी त्यांच्या नावामागे लागली आणि ती त्यांनी अभिमानाने मिरवली.
करुणानिधी ह्यांच्याही जीवनाची सुरूवात लेखक म्हणून झाली. त्यांनी नाटके, कादंब-या लिहील्या. लहानसे वर्तमानपत्रही त्यांनी चालवले. नंतरच्या काळात ते पटकथालेखक म्हणून पुढे आले. त्यांनी सुमारे 35 चित्रपटांच्या पटकथा लिहील्या. खटकेबाज संवाद, अथुनमधून म्हणींचा वापर, डौलदार भाषा शैली हे त्यांनी लिहीलेल्या चित्रपटांचे वैशिष्ट्य होते. अर्थात पेरियार रामस्वामी ह्यांच्या विचारांचा गाभा त्यांनी जितका पकडला तितका तामिळनाडूतील अन्य पटकथालेखकांना पकडता आला नाही. म्हणून त्यांनी लिहलेले चित्रपट सतत गाजत राहिले. चित्रपट क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला इतिहासच त्यांना राजकारणात मिळालेल्या यशाची पटकथा ठरली.
प्रेक्षकांना जे आवडते तेच तमिळ निर्माते चित्रपटात दाखवतात. तर्कशुध्द विचारसरणी, स्वभावातले सूक्ष्म बारकावे असलेल्या स्वभावाच्या व्यक्तिरेखांपेक्षा भडक स्वभावाच्या व्यक्तिरेखा रंगवण्याकडे तमिळ चित्रपटांचा कल. कलात्मकता तर तमिळ चित्रपटांपासून कोसो दूर!  सरळसोट कथानक असलेला चित्रपटच तामिळ प्रेक्षकांना आवडतो. जे त्यांना आवडते तेच दाखवले की तमिळ प्रेक्षक गर्दी करणारच. हेच सूत्र तमिळ राजकारणासही लागू पडते. तमिळ राजकारणातही सगळे काही सरळसोट! नाही म्हणजे नाही आणि नाही होय म्हणजे होय असाच तमिळ जनतेचा खाक्या!  म्हणूनच चित्रपटात यशस्वी ठरलेली करुणानिधींसारखी मंडळी राजकारणात यशस्वी ठरली नसती तरच नवल! ब्राह्मणब्राह्मणेतर वादाचे बीज ह्या राज्यात जितके पेरले गेले तितके ते अन्य राज्यात पेरले गेले नाही. प्रश्न हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याचा असो वा केंद्राकडून मिळणारा वाटा असो, तमिळ जनता संघर्षाच्या पवित्र्यात उभी राहिली नाही असे क्वचितच घडले असेल. नद्यांच्या पाणीवाटपाचा प्रश्न तामिळनाडूने इतक्या वेळा सर्वोच्च न्यायालायात नेला की त्याची गणतीच करता येणार नाही.
करुणानिधी हे लोकनेते ठरले तरी त्यांच्या प्रतिस्पर्धी जयललिता ह्याही तुल्यबळ होत्या. जयललितांनी करुणानिधींविरूध्द कोर्टकचे-यांचे शुक्लकाष्ट लावले. त्यांनीही जयललिलतांविरुध् कोर्टकचे-यांचा ससेमिरा लावला. करणानिधी हे एक अजब रसायन होते असे म्हटले पाहिजे. कम्युनिस्टबहुल तंजावरमध्ये जन्मलेले करुणानिधी प्रत्येक प्रसंगी झुंजतच राहिले. त्यांचे सरकार दोन वेळा बडतर्फ झाले परंतु ते डगमगले नाही. विरोधकांशी त्यांची झुंज साधीसोपी कधीच नव्हती. विरोधकांशी झुंजता झुंजताच त्यांनी आपल्या मुलामुलींना राजकारणात स्थिर केले. हे करत असताना राज्यभरात आपल्याला मानणा-या नेत्यांचे भक्कम जाळेदेखील उभे करण्यास ते विसरले नाही.
जयललितांशी त्यांचे कधीच पटले नाही. पटणारही नव्हते. कारण, त्यांचा राजकीय प्रवास जयललितांच्या खूप आधीपासून सुरू झालेला होता. आपल्याला मिळणा-या भूमिकेला दुय्यमत्व मिळेल अशा पटकथा करुणानिधी मुद्दाम लिहीतात असा जयललितांचा ग्रह झालेला होता. त्यांच्यातला पडद्यामागील संघर्षच त्यांच्या भावी काळातल्या राजकीय संघर्षाचे मूळ असल्याची वदंता तामिळनाडूमध्ये ऐकायला मिळते. अर्थात सत्तासंघर्षात त्याला धार चढत गेली. तरी एका बाबतीत त्यांच्यात मतैक्य होते. ते म्हणजे तामिळनाडूत औद्योगिक प्रगती झाली पाहिजे. त्यांच्यातला सत्तासंघर्ष राज्याच्या औद्योगिक हितात कधी आड आला नाही. देशात घराणेशाहीला कितीही विरोध असला तरी भावी काळात शेवटी कलैनार कर्तृत्वान करुणानिधींचे पुत्र आणि कन्या ह्यांच्याभोवतीच द्रविड राजकारण त्याच जिद्दीने फिरत राहील असेच चित्र आज तरी दिसते.

रमेश झवर
www.rameshzawar.com