Wednesday, February 23, 2022

युक्रेन-रशिया संघर्ष

रशिया आणि युक्रेन  ह्यांच्यात उद्भवलेल्या  संघर्षातून जगात एक प्रकारचे शीतयुध्द सुरू झाले झाले असले तरी हा संघर्ष  भारताला त्रआसदायक ठरेल. युक्रेनच्या दोन राज्यात उसळलेल्या संघर्षामुळे  भारतातील क्रूड पुरवठ्यावर तर  परिणाम होणारच; त्याखेरीज भारताच्या आयातनिर्यात व्यापारालाही त्याचा थोडाफार फटका बसू शकतो. त्याखेरीज युक्रेनमध्ये शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर समस्या उभी  राहू शकते.  रशियाबरोबरच्या मैत्रीत किल्मिष येईल असे वक्तव्य  भारताला  करता येणार नाही हे उघड आहे. त्याचप्रमाणे युक्रेनला दुखावूनही चालणार नाही. अघळपघळ भाषणे करण्याची सवय असलेल्या नेत्यांना युरोपमधील ताज्या राजकीय  घडामोडींवर भाष्य करणे अडचणीचे ठरणारे आहे. म्हणूनच अर्थमंत्री निर्मला सीतारामन्‌ ह्यांना पंतप्रधानांनी पुढे केले असावे. त्याखेरीज एके काळी परराष्ट्र सचिव असलेले जयशंकर हे मदतीला आहेतच. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहरूंना कितीही नावे ठेवली तरी आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहरूंना मिळालेल्या  मानाची आणि तटस्थेच्या घोरणाची आठवण झाल्याखेरीज राहात नाही. सध्या तरी रशियाचे किंवा अमेरिकेच शेपूट पकडून चालणे आणि मुकाट्याने चीनची मर्जी सांभाळणे ह्याखेरीज मोदी सरकारने स्वतःपुढे पर्यायच ठेवला नाही.

युक्रेनचे दोन प्रांत रशियाने हां हां म्हणता गिळंकृत केले. अर्थात तिथे बंडाळी माजलेली होतीच. रशियाने कदाचित त्या बंडाळीला थोडे खतपाणीही घातले असेल! अर्थात भारताचा त्याच्याशी दूरान्वयानेही संबंध नाही.तसा तो असण्याचे कारणही नाही. पाकिस्तानबरोबरचा सीमातंटा किंवा ताजे गलवान प्रकरण भारताने ज्या पध्दतीने हाताळले ते पाहता भारताला पुष्कळच खंबीरपणे वागता आले असते असेच आता म्हणणे भाग  आहे. रशिया चीनची पर्वा करत नाही आणि अमेरिकेचीही फारशी मिजास चालू देत नाही. परराष्ट्र संबंधात मैत्री आणि व्यावहारिक संबध ह्यात अचूक संतुलन साधावे लागते. असो.

युक्रेन-रशिया संबधांचे जे काय व्हायचे असेल ते होईल! तूर्त तरी वाढत्या पेट्रोलियम दरापासून जनतेचा बचाव करण्यासाठी पेट्रोलियमवरील उत्पादन शुल्क आणि व्हॅट कमी करणे गरजेचे आहे. ज्या काळात आंतरराष्ट्रीय क्रूडचे दर कमी होते त्या काळात मोदी सरकारने तेलशुध्दिकरणावर शंभर टक्के उत्पादनशुल्क आकारले होते. त्यातून सरकारने गडगंज उत्पन्न कमावले होते. खरे तर, सरकार चालवण्यासाठी ह्या वाढीव उत्पन्नाचा सरकारने उपयोग करून घेतला होता. त्यावेळी कमावलेला पैसा जनतेला परत करण्याची पाळी सरकारवर आली आहे. अर्थात २०२४ साली होणा-या लोकसभा निवडणुका जिंकण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन थोडेफार कर कमी करण्यास मोदी सरकार तयार होण्याचा संभवही आहे. अर्थात सरकारी तिजोरीत खड्डा  पडल्याशिवाय राहणार नाही. मोदी सरकारला किंवा अन्य पक्षांना सत्ता  मिळाली तरी खड्ड्याचा प्रवास अटळ आहे.

जीवनावश्यक मालाच्या महागाईपासून जनतेला  वाचवण्यासाठी बुध्दियुक्त पवित्रा घेतला जाईल का? देशाच्या अर्थव्यवस्थेशी खेळ करत बसायचे की २०२४ सालच्या निवडणुका जिंकण्यासाठी एखादी नवीच तिकडम शोधून काढायची हा प्रश्न लौकरच मोदी सरकारची परीक्षा पाहणारा ठरेल ! आतापर्यंत प्राप्त परिस्थितीततिकडमकाढण्यात मोदी सरकारला यश मिळाले ह्याचा अर्थ भावी काळातही ते तसे मिळेल की सरकारच्या गच्छन्तीची वाट एकदाची मोकळी होईल असा प्रश्न  देशापुढे लौकरच उभा राहील. भाजपाच्या दृष्टीने तर तो यक्षप्रश्न ठरेल. दिल्लीच्या सुपरमार्केटमध्ये लोकांना परडेल असा कांद्याचा भाव सरकारकडून ठरवले जाण्याचे दिवस देशाने पाहिले आहेत. कांद्याची जागा पेट्रोलिय घेईल का ?

रमेश झवर

Saturday, February 19, 2022

स्वातंत्र्याची प्रेरणा

शिवाजीमहाराजांचे 
पुण्यस्मरण वर्षानुवर्षे सुरू आहेछत्रपती’, ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ `हिंदवी स्वराज्याचे संस्थापक‘ इत्यादि विशेषणे शिवाजीमहाराजांना लावली जातात. ती सार्थही आहेत. असे असले तरी  शिवाजीमहाराजांच्या  कर्तृत्वाचा वेध घेताना मुस्लिमविरोधाचा मुद्द्यावर नको तितका भर दिला गेला. खरे तर, ऐतिहासिक’ काळातसर्वच लढायांमागे धर्म ही प्रेरणा होती. लढाई म्हटली की स्त्रियांची अब्रू लुटणे, उभ्या पिकाची नासाडी करणे इत्यादि गोष्टी सर्रास चालत होत्या. हिंदुस्थानावर मुस्लिमांची आक्रमणे आठव्या नवव्या शतकापासूनच सुरू झाली होतीचितोडचे महाराणा  पृथ्वीराज चव्हाण ह्यांची घोरीशी दोनतीन वेळा युध्दे झाली. महाराणा प्रताप ह्यांचीही मोगलांबरोबर जोरदार लढाया झाल्यादहाव्या शतकापासून भारतात मुस्लिम आक्रमण हा जणू नियमच झाला होता.

 शिवाजीमहाराजांच्या जन्मापूर्वीच्या काळात दक्षिणेत मुस्लिमांच्या सत्ता स्थिरस्थावर झाल्यात्या काळात जी युध्दे होत ती मुस्तिम सत्ताधा-यांची आपापसात होत. विजयनगरच्या हिंदू साम्राज्याला बुडवण्यासाठी अनेक मुस्लिम शाह्या आपापसात कधी समझोता करत तर कधी एकमेकांच्या विरोधात उभ्या राहात. मराठा सरदारही कधी एका सत्तेच्या बाजूने तर कधी दुस-या सत्तेच्या बाजूने लढत !  हे सर्व  पाहातच बालशिवाजी लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडिल आदिलशहांच्या दरबारात मोठे सरदार होते. ब-याचदा ते निजामाच्या बाजूनेही लढले. उत्तरेचे आक्रमण परतून लावण्यासाठी झालेल्या लढायातही ते सहभागी झाले. शिवचरित्राची ही पार्श्वभूमी सामान्य लोकांना फारशी माहित नाही. प्राथमिक शाळेत पाचवी ते आठवीच्या वर्गात इतिहासात  जेवढा इतिहास वाचायला मिळतो त्यापलीकडे सामान्य माणसाचे इतिहासाचे ज्ञआन जात नाही.

हिंदुस्थानावर झालेली परकी आक्रमणे रोखण्याचा पहिला जबरदस्त प्रयत्न शिवाजीमहाराजांनी केला हे मान्य करावेच लागते.  खुद्द शिवाजीमहाराजांचा  वंश थेट अयोध्याच्या रामाच्या सूर्यवंशापर्यंत भिडतो हे अनेकांना माहित नाहीकृष्णराव अर्जुन केळुसकर ह्यांनी लिहलेले शिवाजीमहाराजांचे चरित्र१९०६ साली  प्रसिद्ध झाले.  ह्या चरित्रात केळुसकरांनी  शिवाजीमहाराजांच्या वंशांचा इतिहास दिला आहे. शिसोदिया वंशाचे उगम मूळ अयोध्येच्या सूर्यवंशापासून झाला. केळुसरांनी शिसोदिया वंशाची सविस्तर माहिती दिली आहे.  शिवाजीमहाराजांचा भोसले वंश हा रापुतान्यातील मूळचा शिसोदिया वंश. सूर्यवंश आणि चंद्रवंश हे प्राचीन काळात सुप्रसिध्द राजवंश आहेत. शिसोदिया वंशांचे मूळ अयोध्येच्या सूर्यवंशी राजघराण्याचे असल्याचे कृष्णराव  केळुस्करांनी दाखवून दिलेमात्र, रामाच्या इक्ष्वाकू कुळाचे संपूर्ण दैवतीकरण झाले असूनही सूर्यवंशी परंपरेबद्दल लिहताना केळुस्करांनी कुठेही दैवतीकरणाचा हवाला दिला  नाही.

शिवाजींच्या आधीपासूनच्या ऐतिहासिक काळात लढाया मारून राज्ये जिंकण्यामागे प्रामुख्याने धर्म हीच प्रेरणा होतीमात्रशिवाजी महाराजांच्या प्रेरणेत केवळ धर्म हीच प्रेरणा होती असे महणता येणार नाही. राज्य संपादन करण्याच्या त्यांच्या प्रेरणेत स्वातंत्र्याची आस ही तितकीच महत्त्वाची होती. आदिलशहाच्या दरबारात कुर्निसात करण्यासाठी हजेरी लावण्याचा त्यांना तिटकारा होता. लहान वयापासूच त्यांच्या मनात स्वातंत्र्याची आस फुलत गेली. एखादी जहागीर त्यांना स्वतंत्रपणे मिळू शकली असती. परंतु निव्वळ जहागिरीवर ते खूश नव्हते. तशी ती त्यांच्याकडे शहाजीराजांचा वारसदार म्हणून सहज चालत आली असती. किंबहुना शहाराजीराजांच्या मनाशी तो हेतू होताही. म्हणूनच त्यांनी त्यांना दरबारात नेले होते. परंतु बादशहाला कुर्नीसात करण्यासाठी ते गेलेही. तरीही त्यानंतर अगदी लहान वयात त्यांनी तोरणा किल्ला जिंकला. त्यांच्या हातून स्वराज्याची मुहूर्तमेढ झाली हा इतिहास आहे.  पुढे ते दुर्दैवाने औरंगजेबाच्या तावडीत सापडले. औरंगजेब बादशहाने त्यांना आग्रा दरबारात पंचहजारीही देऊ केली. परंतु मुळातच त्यांना  मोगलांची गुलामी मान्य नव्हती. शककर्ता राजा होण्याचे त्यांचे स्वप्न होते. आग्र्याच्या कैदेतून त्यांनी हिकमतपूर्वक सुटका करून घेतली. मजल दरमजल करत ते स्वराज्यात परत आले.

त्यांच्या काळापूर्वीच दक्षिणेत मुस्लीम राजवटी स्थिर झाल्या असल्या तरी सोळाव्या शतकात सुरू झालेल्या मोगलांच्या आक्रमणाने हिंदुस्थानाचे राजकीय चित्र ख-या अर्थाने पालटलत गेले. आसेतु हिमाचल’ पसरलेल्या हिंदुस्थानचे बादशहा’ होण्याचे मोगलांचे स्वप्न होतेबंगालपासून गुजरातपर्यंतचा मुलूख जवळ जवळ मोगलांच्या ताब्यात आलेला होता. अकबराच्या काळात गुजरात मोगलांच्या ताब्यात आलाखानदेशातला असीरगडचा किल्ला अकबराने ताब्यात घेतलादक्षिणेतील बहुतेक सर्व मुस्लिम सत्ताधा-यांबरोबर  मोगलांची युध्दे झालीपरंतु शिवाजीमहाराजांकडून तीव्र प्रतिकार होईल असे मोगलांना अपेक्षित नव्हतेऔरंगजेबाने तर शिवाजीमहाराजांना पहाडका चूहा’ असे विशेषण बहाल केले होते!  दक्षिणेतील सारेच मुस्लिम सत्ताधारी परस्परांना शत्रू समजत. त्यांच्या आपापसात लढाया होत!  परंतु  मोगल ह्या सगळ्याच शाह्यांचा समान शत्रू होता.

ऐतिहासिक काळात मुलूख जिंकण्याची दुर्दम्य इच्छा सगळ्याच सत्ताधा-यांना होती. अर्थात सुरूवातीला काळात धर्मप्रेरणा होती. धर्प्रेणा म्हणजे तरी काय? गो, गीता आणि गंगास्नान’ ह्या तिसूत्रीला हिंदूंच्या जीवनात अपरंपार महत्त्व होते. आजही आहे. स्नानाला पाणी उरले नाही ह्या समर्थांच्या वचनाला हा संदर्भ आहे. सतराव्या शतकात पोर्तुगीजडचइंग्रज आणि फ्रेंच ह्यांना मुलूख जिंकण्यात स्वारस्य नव्हते. त्यापेक्षा त्यांना व्यापारात अधिक स्वारस्य होते. ब्रिटिशांनी  भारताचा फार मोठा मुलूख पादाक्रांत केला परंतु त्यांनी रूढ अर्थाने भारतावर आक्रमण’ असे केले नाहीमुळात ते व्यापार करण्यासाठी आले होते. व्यापर करता करता ब्रिटिशांना बंगालच्या नबाबाकडून मिळालेला महसूल वसुलीचा अधिकार हा भारताच्या इतिहासाला कलाटणी देणआरा ठरलाहळुहळू  त्यांनी लष्करी अधिकारही मिळवले! पाहता पाहता भारतात त्यांचे साम्राज्य स्थापन झाले. ह्या पार्श्वभूमीवर शिवाजीमहाराजांचे मोठेपण उठून दिसते. महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य टिकवण्यासाठी  राजाराम, ताराराणी आणि धनाजी संताजींसारखे त्यांचे शूर सरदारह्यांनी कसोशीने पर्यत्न केला.  मोगलांच्या कैदेतून सुटून आलेले शाहू आणि पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ ह्यांनी शिवाजीमहाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा विस्तार केला. पुढे बाजीरावादि पेशव्यांनी केलेला मराठेशाहीचा विस्तार भारताच्या इतिहासातील सोनेरी पाने आहेत.

मराठेशाहीच्या इतिहासाचे  ग्रँट डफने जवळ जवळ विकृतीकरणच आहे. परंतु जदुनाथ सरकार ह्यांनी लिहलेल्या इतिहासामुळे ते विकृतीकरण पुष्कळच कमी झाले. सभासदाची बखर हा शिवशाहीच्या इतिहासाचा बहुमूल्य पुरावा मानला जातो. पुढे  गो. स. सरदेसाई ह्यांनी लिहलेला मराठेशाहीचा इतिहास पुष्कळ अंशी स्वीकारला गेला.

आज तारखेनुसार शिवजयंतीशिवजयंतीच्या तिथीबद्दलचा गेल्या दोनशे वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्रा सरकारने काही वर्षांपूर्वी संशोधकांच्या मदतीने शिवाजीमहाराजांची जन्मतारीख शोधून काढली. त्यानुसार १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घोषित केलातारखेचा वाद मिटला हे खरेएकदा यशवंतराव चव्हाणांनी शिवाजीमहाराजांच्या लढायांची तुलना व्हिएतनाममधील संघर्षांशी केली होती. ती कितीतरी सार्थ होती. त्यानेळी अनेकांनी य़शवंतराव चव्हाणांवर टीका केली होतीपरंतु चव्हाणांचा political sense फार कमी लोकांच्या लक्षात आला.

रमेश झवरSaturday, February 12, 2022

कृतीशूर राहूल बजाज

 

टू व्हीलर आणि  टो रिक्षा तसेच लाईट कमर्शिअल व्हेहिकल ह्या क्षेत्रात क्रांतीकारक कार्य करणा-या बजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहूल बजाज ह्यांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून देशभरातील वाहनचालक हळहळले असतीलभारत ही टू व्हीलर्सची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असून २०२० साली दर महिन्याला - ते . दशलक्ष युनिट्स भारतात नोंदली जातात. २०२१ साली कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे ह्या व्यवसायास फटका बसला खरा: परंतु तिस-या तिमाहीत टू व्हीलर्सची नोंदणी पूर्ववत्झाली. दुचाकी वाहन क्षेत्रात बजाज उद्योगसमूह पहिल्या क्रमांकावर नसला तरी त्यांनी उत्पादित केलेली स्कूटर हे लोकप्रिय वाहन ठरले. रोज कामावर जाण्यासाठी  करावा लागणारा ४-५ किलोमीटरचा प्रवास सुखकारक  होण्यासाठी स्वतःचे दुचाकी वाहन खरेदी करण्याची ‘कनिष्ठ मध्यमवर्गियां’ची स्वप्नपूर्ती बजाज ह्यांनी तर केलीच; शिवाय दूध, भाजीपाला आणि फळं आणण्यासाठी बजाज टेम्पोचा ग्रामीण आणि निमशहरी भागातही चांगला उपयोग झाला.  बजाजच्या ऑटो रिक्षामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर, आफ्रिका खंडातही गरीब माणसांना वाहनसुख मिळवून दिले.

१९५०-१९६० च्या दशकात ’बिर्ला आणि टाटा ह्या दोनों ने आधा आधा भारत बाटा’ असा संवाद सामान्य व्यापा-यांच्या तोंडात खिळलेला होता. परंतु तालुक्यांच्या आणि जिल्ह्यांच्या क्षेत्रात बजाज टेंपोला प्रतिष्ठा होती. टेंपोचे रूपान्तर प्रवासी वाहनात करण्याचाही उपक्रम सुरू झाला. बजाज रिक्षामुळे तर निमशहरी भागात क्रांतीच झाली. ग्रामीण भारतात टाटा-बिर्ला ह्यांच्यापेक्षा बजाज ह्यांचा ’वाटा’ अधिक होता ! हे सत्य कदाचित्‌ आकडेवारीने सिद्ध होणार नाही. वाहनउद्योगात बजाज समूहाने आपली स्वत:ची स्पेस हेरून  स्वतःचे स्थान निर्माण केले. अर्थात्‌ कर्तबगारीचा हा  वारसा राहूल ह्यांच्याकडे आजोबा जमनालाल बजाज ह्यांच्याकडूनच आला होता. महात्मा गांधींच्या इच्छेनुसार जमनालाल बजाजांनी विनोबाजींना शेतजमीन दिली आणि हवे ते प्रयोग करण्याचे स्वातंत्र्यही दिले. गांधीजींनाही पवनार येथे आश्रम स्थापन करण्यास गांधींजींच्या अटीवर सहाय्य केले. सहाय्य करताना बजाज कुटुंबियांनी  ’मी हे करतोय्‌’ असा अभिमानही बाळगला नाही.

स्वातंत्र्योत्तर काळात गांधीवादी अर्थरचनेवर भर न देता नेहरूंनी औद्योगिक भारताचे ध्येय पाहिले. बजाज कुटबंबियांनीही भारताच्या नव्या धेयानुसार औद्योगिक क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी आयर्न आणि वाहन उद्योग क्षेत्राचा पदार्पण केले. अर्थात हे नवे पदार्पण करत असताना बजाज कुटुंबाने शिक्षण क्षेत्रातही पदार्पण केले. मेडिकल, मॅनेजमेंट इत्यादि विद्याशाखात बजाज समूहाने प्रवेश केला. राहूल बजाज ह्यांनी स्वतः हॉर्वर्ड विद्यापीठात प्रवेश करून एमबीएची पदवी मिळवली होती. राजकारणही बजाज कुटुंबियाने वर्ज्य मानले नाही. त्यांच्या कुटुंबातील एक जण तरी लोकसभेत निवडून आलेला आहे. गतानुगतिकतेत अडकून न बसता त्यांनी परंपरेत नवा अर्थ भरला ! हे करत असताना नीतीमूल्यांशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. बजाज कारखान्याचा विस्तार करताना पुण्याखालोखाल त्यांनी सातारा आणि औरंगाबाद ह्य दोन शहरांची निवड केली. सातारा येथील स्कूटर उत्पादन प्रकल्प नीटसा चालला नाही. परंतु औरंगाबादचा प्रकल्प मात्र शिस्तीत चालला. यशस्वी झाला. राहूल बजाजांच्या मार्गदर्शनाखाली मधुर बजाज ह्यांनी चोख कामगिरी बजावली.   मधुर बजाजांची मुंबईला गरज निर्माण होताच राहूलनी त्यांना मुंबई कार्यालयात बोलावून घेतले. दरम्यानच्या काळात हिस्सेवाटणीच्या प्रश्नात लक्ष घालण्यासारखी परिस्तिती निर्माण झाली. बंधू शिरीष आणि राहूल ह्यांच्यात थोडा वाद झाला. परंतु शरद पवारांच्या मध्यस्थीने तो मिटवण्यात राहूल बजाज यशस्वी झाले. नंतरच्या काळात संजय आणि राजीव ह्या दोन्ही मुलात निर्माण झालेली सत्तेची समस्याही त्यांनी समाधानकारकरीत्या सोडवली. एका मुलाकडे ऑटो इंडस्ट्री तर दुस-याकडे फायनान्स कंपनी सोपवून राहूल बजाज स्वतः होल्डिंग कंपनीचे प्रमुख झाले. स्वत:चे स्थान कायम ठेऊन तिढा मिटवण्यात राहूल बजाज हे नेहमीच  यशस्वी ठरले होते.

स्पष्टवक्तेपणा  हा त्यांचा स्वभावविशेष होता. कोणत्याही पुढा-यांशी स्पष्ट शब्दात ते बोलू शकत होते. बिल गेटस्च्या भाषण प्रसंगी विंडो सॉफ्टवेअर हे फक्त ऑफिस चालवण्यासाठी ठीक आहे. पण हाताने काम केल्याखेरीज कुठलेही काम होत नाही असे त्यांनी बिल गेट्सच्या निदर्शनास आणून दिले. अर्थात त्या काळात रोबोटिक्स विकसित झालेला असता तर विंडोतली उणीव दाखवणयाच्या भानगडीत ते पडलेच नसते. अर्थात उणीव दाखवताना त्यांनी जीभ चालवून पुढचे वाक्य उच्चारले नाही तो भाग वेगळा!

राहूल बजाज ह्यांचे व्यक्तिमत्त्व पुरोगामी किंवा प्रतिगामी ह्या साचेबंद  विशेषणांत बसणारे नव्हते.ते कधीच पलीकडे गेलेले होते. वाचीवीरापेश्रा कृतीशूर उद्योगपती असेच त्यांचे वर्णन योग्य ठरेल.

रमेश झवर


Friday, February 11, 2022

अनावश्यक चर्चा

स्मारक कुणाचेही असो, ते कुठे करा, कुठे करू नका ह्यावर चर्चा सुरू केल्याखेरीज  आपली हुषारी लोकांना कशी दिसणार? आपली असलेली अन्नसलेली अक्कल पाजळली नाही तर आपले मह्त्त्व कसे वाढणार ह्या विचाराने झपाटलेल्यांचा भरणा राजकारण  आणि समाजकारणात  वाढत आहे. लता मंगेशकरांच्या मृत्यूला २४ तास  उलटले नाही तोच भाजपा आमदार राम कदम ह्यांनी लता मंगेशकरांच्या निवासस्थानी जाऊऩ लतादीदींचे बंधू ह्रदयनाथ मंगेशकर भेट घेतली आणि लतादीदींचे स्मारक करण्याचा मुद्दा उपस्थित केला. साहजिकच  काँग्रेस नेते, शिवसेना नेते संजय राऊत ह्यांना त्या विषयावर बोलणे भाग पडले. वास्तविक ठाकरे सरकार ह्यावर आपणहून घोषणा करणार हे स्पष्ट  होते. राम कदम हे संगीतकार आहेत. ते आमदार

 त्याआधीच राम कदम ह्यांनी विषय छेडून मोकळे झाले. वास्तविक विरोधी नेते देवेंद्र फडणवीस हे भाजपा नेते विरोधी पक्षनेते आहेत. स्मारकासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा-विचारविनिमय करण्याचे कर्तव्य फडणविसांनी निश्चितपणे बजावले असते. परंतु आपल्याच नेत्यांसह  मुख्यमंत्र्यांवरही कुरघोडी करण्याच्या नादात राम कदम लतादीदींच्या निवासस्थानी गेले आणि स्मारकाची चर्चा सुरू केली. ह्याला गावठी भाषेत आगाऊपणा ‘ म्हणतात !

वास्तविक लतादीदींचे स्मारक करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यापूर्वी  संबंधितांशी चर्चा, विचारविनिमय करण्याची भूमिका मुख्यमंत्री ठाकरे ह्यांनी ठरवलेले असू शकते. असो. ह्या विषयावर  तूर्त तरी चर्चा करण्याचे कारण नाही.

रमेश झवर

Sunday, February 6, 2022

स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर

स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर हे जग सोडून गेल्या. महाराष्ट्रातीलच नव्हे तर, देशभरातील लाखो गानप्रेमींच्या कानात साठवलेले सूर विरून गेले. अनेक पार्श्वगायक  आणि पार्श्वगायिक होऊन गेल्या. पुढील काळात अनेक होतीलही ! दुस-या  लता मंगेशकर मात्र पुन्हा होणार नाही.  चित्रपटांनिर्मितीचे युग सुरू झाल्यानंतर संगीत रंगभूमीवरील गायक नटांचा जमाना हळुहळू संपुष्टात  आला. महाराष्ट्रही ह्याला अपवाद नाही.  चित्रपटांसाठी  पार्श्वगायनाची परंपरा  सुरू झाली.  ह्या  गानपरंपरेत लता मंगेशकरच्या रूपाने एक शिखर निर्माण झाले. ह्या शिखराइतके उंच दुसरे शिखर दुसरे मात्र निर्माण झाले नाही. अर्थात ह्या मुद्द्यावर गानरसिकांचे मतैक्य होणार  नाही. खरे तर, प्रत्येकाच्या मताला महत्त्व  आहे  हे मान्य केल्याखेरीज हा वाद किंवा मतभेद कधीच संपणार  नाही. संपूही नयेत !

मास्टर दीनाननाथ  मंगेशकरांसारख्या  पित्याच्या  छत्रछायेत  लता आणि त्यांच्या भगिनी आशा, उषा आणि मीना ह्यांच्या पार्श्वगायनाची सुरूवात झाली. त्यामुळे स्वर सापडण्याचा, चुकण्याचा  प्रश्नच कधी उपस्थित झाला नाही. `लोकसत्तेसाठी  लता  मंगेशकर ह्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न अनेकांनी  केला. परंतु त्या प्रयत्नांना दाद लता मंगेशकरने दिली नाही.  ह्याचे कारण कधीच कुणाला समजले नाही.  लोकसत्तेचे जनरल मॅनेजर रंगनाथनसाहेब ह्यांच्या मार्फत प्रयत्न करून पाहा असे कुणीतरी रविवार आवृत्तीचे संपादक विद्याधर गोखले ह्यांना सुचवले.  रविवारचे संपादक नारायण आठवले किंवा यशवंत रांजणकर ह्यापैकी कुणीही रजेवर गेले की मला न्यूज डेस्कवरून हलवून रविवारचे काम दिले जात असे. थोडक्यात, मी रविवार लोकसत्तेत बदली कामगारहोतो !

रंगनाथन्?’ मी

`हो. ह्याचं कारण असं की शिवाजी गणेशन्‌ आणि लता मंगेशकर ह्यांच्यात रंगनाथनसाहेब वेळोवेळी संवाद घडवून आणतात. त्यामुळे लता मंगेशकर कदाचित्‌ नकार देणार नाही, ‘

अच्छा ये बात है! मी

मला नवीच माहिती कळली. गोखलेसाहबांनी लगेच रंगनाथसाहेबांना फोन लावला. मी प्रयत्न करतो, असे आश्वासन रंगनाथसाहेबांनी दिले. त्यानंतर तिस-या  दिवशी लतादीदींवर ह्रदयनाथ मंगेशकरांनी लिहलेला लेख रंगनाथनलाहेब गोखल्यांकडे स्वत: घेऊन आले. अर्थात गोखल्यांनी तो स्वतः माझ्याकडे आणून दिला. मला सूचना दिल्या, लेखातला एक शब्दही कापू नका. दीड ते दोन कॉलमपेक्षा जास्त मोठा लेख प्रसिद्ध करायचा नाही असे गोखलेसाहेबांचेच धोरण होते. ह्रदयनाथ मंगशेकरांनी लिहलेला लेख तब्बल चारसाडेचार कॉलम होता.  मी गॅली प्रूफचा जुडगा घेऊन गोखलेसाहेबांकडे गेलो. गोखलेसाहेबांनी तो लेख स्वतः पानात लावायला घेतला. तीन ठिकाणी कंट्युनिएशन घ्यावे लागले तेव्हा कुठे तो लेख पानात बसला.

लता मंगेशकरांची मुलाखत शेवटी मिळाली नाही ती नाहीच !  दुधाची तहान ताकावर भागवण्याचा हा प्रकार होता. अर्थात त्यांनी मुलाखतीची वेळ दिली असती तर त्यांची मुलाखत घेण्याची संधी  मला मिळाली नसतीच हे मी जाणून होतो. शिरीष कणेकरांसारख्यांनाच गोखल्यांनी पाठवले असते ! अर्थात लेख प्रसिध्द झाल्यावर दुस-याच दिवशी मला लता मंगशकरांच्या वतीने ह्रदयनाथ मंगशकरांनी फोन केला आणि माझे आभार मानले. फोनवर मला ते  म्हणाले, जरा थांबा हंलता दीदींना तुमच्याशी बोलायचं आहे. क्षणार्धात लता दीदींचा आवाज आला. माझ्या कानावर माझा क्षणभर विश्वास बसला नाही. त्यांनीही ह्रदयनाथांप्रमाणे  माझे आभार मानले. फोन कॉल संपला.

माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्यापर्यंत आमचे अमरावतीचे वार्ताहर सुरेश भट पोहचू शकले. ( सुरेश भट हे लोकसत्तेचे स्ट्रिंगर होते. ) अन्य कुणी मराठी पत्रकार त्त्यांया काळात तरी त्यांच्यापर्यंत पोहचू शकल्याचे निदान मला तरी माहित नाही. सुरेश भटांच्या गीतांना आणि गझलांना ह्रदयनाथांनी अतिशय सुंदर चाली लावल्या.  त्यांची गाणीही लताच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली. पत्रकारांपैकी कदाचित शिरीष कणेकर आणि स्क्रीनचे संपादक पिल्ले हे लता मंगेशकरपर्यंत पोहोचले असतील.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या गोल्डन टोबॅको नाईट्सच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका माझ्या नावार आली. निमंत्रण पत्रिका आणून देणा-याने मला आवर्जून कार्यक्रमाला येण्यास सांगितले. मी सौ. ज्योतीसह त्या कार्यक्रमाला मुद्दाम गेलो. पहिल्या रांगेवरच्या सीटवरून मला त्या कार्यक्रमात लता मंगेशकर, आशा भोसले ह्यांचे गाणी तर ऐकायला मिळालीच; शिवाय दिलीपकुमार, मेहमूद इत्यादींचे कार्यक्रमही अगदी जवळून पाह्यला मिळाले.  शिरीष कणेकर तर पुन्हा ऑफिसला गेले. त्यांनी दिलीपकुमारच्या भाषणाची बातमी दिली. ती बातमी दुस-या दिवशी इंडियन एक्सप्रेसच्या अंकात छापून आली.  गोल्डन नाईट्समात्र माझ्या कायमची स्मरणात राहिली! 

सिनेमा किंवा संगीत हा माझा बीट नसल्यामुळे मी लता मंगशकरपर्यंत कधीच पोहोचलो नाही. पोहचण्याचा प्रयत्नही केला नाही. लौकरच मराठी बोलपटांना ५० वर्षे पूर्ण झाली तेव्हा पुरूषोत्तम दारव्हेकरांनी मला नामवंतांच्या मुलाखती आणण्याची कामगिरी सोपवली. त्यानंतर भारतीय सिनेमास ७५ वर्षे पुरी झाली त्यानिमित्तही मी कार्यक्रमासाठी मुलाखती आणल्या. लता मंगशकर सोडून मी कोणाचीही मुलाखत आणण्यास तयार आहे, असे दारव्हेकरांना स्पष्टच सांगितले. अर्थात  त्यांनाही  लता मंगेशकर कुणाला मुलाखत देत नाही ह्यांची कल्पना असावी. म्हणून त्यांनीही  एखाद्या विशिष्ट  नावाचा आग्रह धरला नाही.

लतादीदींच्या निधनाने पार्श्वगायनाच्या क्षेत्रातले लता मंगशकर नावाचे पर्व संपले.

रमेश झवर


Wednesday, February 2, 2022

रमेश देव

 स्थळः लोकसत्ता संपादकाची केबिन

वेळः  दिवसतारीख आठवत नाहीसंपादक खात्याची बैठक संपादक अरूण टिकेकर

रमेश देवांचे आगमनशिपाई त्यांना थेट बैठकीत घेऊन आलारमेश देवांचे आगमन होताच आम्ही सगळे जण उभे राहिलोयोगायोगाने ते माझ्या शेजारच्या खुर्चीत स्थानापन्नटिकेकर आम्हा सगळ्यांचा परिचय करून   देतात.

 `हे रमेश झवर! ‘

आपण नामबंधू!’ हस्तांदोलन करत रमेश देव

होमाझ्या जन्माच्या वेळी मुलामुलींचे नाव बंगाली नावांवरून ठेवण्याची पद्ध होतीमाझ्या वडिलांनी बहुधा ती फॉलो केली असावी!‘

रमेश देव खळालून हसलेता वेळाने मिटींग आटोपली.

स्थळः स्टेट बँकेत अजित वाडेकरांची केबिनमी काही कामानिमित्त वाडेकरांना भेटायला गेलो होतो.मी त्यांच्या खोलीत बसलेलो असताना रमेश देवांचे आगमनते आत आल्याबरोबर वाडेकरांनी त्यांच्याशी माझा परिचय करून दिला तेव्हा ते लगेच म्हणाले,

`आपण दुस-यांदा भेटतोय्!’

`होयोगायोगआपण नामबंधूं ना!’

रमेश देव पुन्हा खळाळून हसले. आत मात्र मी निश्चयपूर्वक उठलो.

त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकताना हे सगळं आठवलंरमेश देवांचे खळाळून हसणं माझ्यापुरतं तरी संपलं.

रमेश झवर

Tuesday, February 1, 2022

आभासी अर्थसंकल्प

 सध्या देशात आभासी बैठकांची लाट आली आहे. ह्या लाटेत २०२२-२०२३ वर्षाचा  अर्थसंकल्पही सापडला आहे. ५ जी इंटरनेट सेवात वाढ करण्यासाठी स्पेक्ट्रमच्या लिलावाची घोषणा ह्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महामार्गांचा विस्तार आणि जलवाहतुकीचा विस्तार ह्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमुळे नेमका कोणाचा फायदा होणार आहे? अर्थात उद्योगपतींचा, पर्यायाने सरकारचा! जलवाहतुकीचा पाठपुरावा करण्याचे कारण बाराणशी येथील गंगेची वाहतूक पंतप्रधानांच्या मित्रांच्या आग्रहासाठी अर्थसंकल्पात अंतर्भूत करण्यात आली आहे.

सध्या गंगेवरची वाहतूक कोळी बांधवांकडे आहे. ह्या नावाड्यांना उत्तेजन देण्यास पंतप्रधानांचे बगलबच्चे तयार नाही. त्यांना गंगेवर डिझेलवर चालणा-या नौकांची वाहतूक सुरू करण्यात स्वारस्य आहे. त्यात योगी आदित्यवाथ सरकारचा आणि केंद्राचाही फायदा आहे. महामार्गावरील  वाहतुकही सरकारला वाढवण्याची इच्छा आहे. वास्तविक रेल्वे माल वाहतूक स्वस्त पडते. रेल्वे वाहतुकीचा विषय गेल्या काही वर्षांपासून वगळण्यात आला आहे. मूळ रेल्वे अर्थसंकल्प सार्वत्रिक अर्थसंकल्पात विलीन करण्यात आल्याने रेल्वेत काय सुरू आहे ह्याचा अनेक खासदारांना पत्ता नाही. लोकांना फक्त रेल्वे अदानी समूहाला भाड्याने देण्याचे घाटत आहे.

ह्या अर्थसंकल्पात क्रिप्टो करन्सीला- आभआसी चलनाला अधिकृत मान्यता देण्याची घोषणा करण्यात आली. ह्याचा आयातनिर्यात व्यापारावर नेमका परिणाम काय होईल आज घडीला कोणीच सांगू शकत नाही. क्रिप्टो करन्सीचा प्रांत संगणक तज्ज्ञांना बहाल करण्यात आली आहे. ज्या कंपन्या संगणक तज्ज्ञांची फौज उभी करू शकतील त्याच कंपन्यांचा ह्यापुढील काळात निभाव लागेल. गरीब, कनिष्ट मध्यमवर्गीय ह्या सगळ्यांची भवष्यकालीन व्यवहरातून उचलबांगजी झाल्यात जमा आहे. किंवा जिओ प्लॅटफर्मकडून इंचरनेट सेवा भाआजड्याने घ्या आणि हवा तो व्यवसाय खुशाल करा असाच ह्या तरतुदींचा अर्थ आहे. जनतेला डिजिटलज्ञआन संपादन करता यावे म्हणून खास डिडिटल विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ह्या आभासी जगाची चटक लागावी अशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची इच्छा !  त्यांच्या मोबाईल बँकिंगमध्ये होणारे फ्रॉड रोखण्यासाठी काहीही उपायोयजना नाही. सध्याच्या सायबर कायद्यानुसार कुछल्याही प्रकारचा फ्रॉड पोलिसांना शोधता आलेल नाही. पेगासस सॉफ्टवेअवर मिळवा आणि प्रतिस्पर्धी व्यापा-यांचे मोबाईल संभाषण चोरा आणि त्यांना हाणून पाडा असेच वातावरण ह्या नव्या आभासी अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे तयार होण्यास मदत होणार आहे.

वास्तव किंवा ’फिजिकल प्रेझेन्स’ला नव्या अर्थसंकल्पात अजिबात महत्त्व देण्यात आलेले नाही. करवसूली आणि भरभक्कम करवसूली हेच अर्थसंकल्पाचे लक्ष्य दिसते. चूष म्हणून हे वरवर प्रगतीचे लक्षण वाटत असले तरी ती ती तशी होईल की नाही ह्याबद्दल शंका व्यक्त करणे गैर ठरणार नाही.

आपल्या उद्दिष्टांचे लक्ष्य  गाठण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीचा निर्मला सीताराम ह्यांनी  भरपूर उपयोग केला आहे.  आभासी बैठका, जाहीर सभा आवश्यकच होऊन बसल्या होत्या ह्याबद्दल वाद नाही. आभास कितीही  -यासारखा वाटला तरी तो आभासच !  आज संसदेत सादर करण्यात आलेला २०२२-२०२३ अर्थसंकल्पातील खर्चाच्या आणि उत्पन्नाच्या तरतुदी आभास वाटाव्या अशा आहेत. क्रिप्टो करन्सी, ५ जी इंटरेट सेवेचा लिलाव, महामार्गांचा विस्तार इत्यादि अनेक घोषणा करण्यात आल्या असल्या तरी त्या प्रत्यक्षात कशा येतील हे अयोध्येचा राम जाणे ! गेल्या वर्षात रिझर्व बँकेकडून  राखीव निधी सरकारने मागून घेतला आणि ५ वर्षांची टर्म कशीबशी पार पडली. तब्बल दीड तासांच्या भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन्ह्यांनी अनेक प्रकारच्या योजनांसाठी भल्या मोठ्या तरतुदी जाहीर केल्या ! ह्या अर्थसंकल्पात त्यांचे स्वतःचे असे काही नाही. सब योजनाओंका मालिक एक- पंतप्रधान नरेंद्र मोदी !  

उत्पन्नाच्या तरतुदींचे आकडे वरवर कितीही मोहक असले, त्यामागील हेतू कितीही उदात्त असला आणि विकासाबद्दल सरकारला कितीही कळकळ वाटत असली तरी प्रत्यक्षात अर्थवयवस्थेचे व्यवस्थापन सरकारला कसे जमेल ह्यावर अर्थसंकल्पाचे बरेवाईट अवलंबून राहणार ! पूर्वानुभव लक्षात घेतला तर  हा अर्थसंकल्प आघवाचि आभासु आभासे जेयाचेनी ह्या ज्ञानोबांच्या उक्तीची विषण्ण प्रचिती देणारा आहे. अर्थसंकल्पच एक प्रकारचा राजकीय दस्तावेज असल्याने अर्थव्यवस्थेच्या संदर्भात सरकारने आशावादी सूर लावला हे समजण्यासारखे आहे. परंतु सकल राष्ट्रीय अत्पादनाचा खरोखर वाढणार का? की महागाई निर्देशांकामुळे उत्पादित मालाचा आकडा फुगत जाणार?  ह्या प्रश्नांची उत्तरे सरकारला देता येणार नाही.

रमेश झवर