Saturday, November 26, 2011

माथेफिरूंचा प्रताप!



कुठल्या तरी माथेफिरू माणसाने कृषीमंत्री शरद पवार ह्यांच्या गालावर थप्पड मारल्याने खळबळ माजली हे खरे; पण गेल्या पाचसहा महीन्यांत दिल्लीत अनेक प्रतिष्ठित माथेफिरूंचा सुळसुळाट झाला आहे. योगी रामदेवबाबा, अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, किरण बेदी हे प्रतिष्ठित माथेफिरू आहेत. दिल्लीचे पोलीसही असेच एक माधेफिरू गृहस्थ असावेत. रामदेवबाबा आणि त्यांच्या भोळ्या भगतगणांवर अकारण लाठीहल्ला करून दिल्लीच्या पोलीस कमिश्नरनी आपण सवाई माथेफिरू असल्याचे दाखवून दिले. वास्तविक भित्र्या रामदेवबाबांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करायची गरज असताना मध्यरात्री त्यांच्यावर लाठीमार करून त्यांना विनाकरण प्रसिद्धी मिळवून दिली. प्रसारमाध्यमांना जी ‘बातमी’ हवी होती ती पोलिसांनी मिळवून दिली. अण्णा हजारे ह्यांच्या बाबतीतही दिल्ली पोलिसांनी तेच केले.

अण्णांना खुशाल उपोषण करू द्यायचे होते. त्यांच्या उपोषणातली हवा आपोआपच निघून गेली असती. अण्णांना जागा देण्यावरून दिल्ली पोलिसांनी साध्या 144 कलमाचा मुद्दा घटनास्वातंत्र्याच्या कलमांपर्यंत नेऊन सोडला. बात का बतडंग म्हणताता तो असा. बरे ते झाले ते झाले, अण्णांना अटक करून इकडेतिकडे नेण्याची काय गरज होती? मुख्य म्हणजे, त्यांना कोर्टात उभे करण्याची गरज नव्हती. अण्णांना रोज अटक करून संध्याकाली सोडून दिले असते तर उपोषणकर्त्या अण्णांची पंचाईत झाली असती.

पोलीस कारवाईमुळे अण्णांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा राहिला बाजूला आणि भलत्याच मुद्द्यावर चर्चा सुरू झाली. आपल्याच जनलोकपाल विधेयकावर चर्चा झाली पाहिजे हा त्यांचा आग्रह निव्वळ दुराग्रह! स्पष्ट बोलायचे तर हरमिंदरसिंगच्या माथेफिरूपणाची सौम्य आवृत्ती! लोकशाहीत गावातल्या (फक्त राळेगण सिद्धी—मूळ नाव राळेगण शिंदी) जनतेलाच काय ते सर्व अधिकार आणि देशभराततून निवडून आलेले खासदार त्यांचे नोकर. ज्या स्टॅंडिंग कमिटीचा अधिकार सरकारलाही मान्य करावा लागतो त्या स्टॅंडिंग कमिटीचा अधिकार अण्णांना मात्र अमान्य! गांधीवाद्यांनी ग्रामस्वराज्याची कल्पना उचलून धरली हे खरे पण! हा ‘पण’ सगळ्यांनीच पणास लावला आणि गांधीवाद्यांना त्यापुढे हार पत्करावी लागली.

विनोबा, काका कालेरकर वगैर अनेक थोर गांधीवादी नेहरू सरकारपुढे हतबल झाले. लष्कर कशाला पाहिजे अशी भूमिका घेऊन विनोबांनी शांतिसेना स्थापन केली आणि स्वत:ला शांतिसेनेचे सेनापती जाहीर करून घेतले. काकासाहेब कालेलकरांनी नेहरूंची भेट घेतली आणि लष्कर बरखास्त करण्याची मागणी केली. अहिंसक विचारसरणीला अनुसरून शांतिसेना स्थापन करण्याचीही त्यांनी मागणी केली. त्यावर नेहरूंनी शांतिसेनेला पगार द्यावा लागेल का, अशी पृच्छा केली. त्यावर काका गडबडले. थोडा विचार करून म्हणाले, थोडा तरी पगार द्यावा लागेल!

अशा त-हेने लष्कर बरखास्त करण्याची मागणी निकालात निघाली. खादीग्रामोद्योगाच्या संदर्भात गांधीवाद्यांकडून करण्यात आलेल्या मागण्यांसंबंधी खादीग्रामोद्योग आयोग स्थापन करण्याची मागणी मान्य केली. ग्रामस्वराज्याच्या संदर्भात पायलट प्रोजेक्ट राबवण्याची मागणी मान्य करण्यात आली. राळेगणसिद्धीप्रमाणेच महाराष्ट्रातील काही गावांत ग्रामसभा स्थापन करण्यात आल्या असून मडलीक ट्रस्टच्या साधना वैराळे ह्या ग्रामसभांना मार्गदर्शन करतात. परंतु कोणीच त्याची दखल घेत नाही. सगळी वर्तमानपत्रे राळेगणसिद्धीवरच कॅमेरा फोकस करून बसली आहेत. ह्याचे कारण जातिवंत माथेफिरू राळेगणसिद्धीच्या ग्रामसभेला भोंगळ सल्ला वजा मार्गदर्शन करत असतात!

सरकामध्ये बसलेली आणि निवडून आलेली माणसे मूर्ख असून स्वार्थाने बरबरटलेली आहेत, ही सगऴी मंडऴी भ्रष्टाचारात आकंठ बुडालेली आहेत असा समज भ्रष्टाचारात अयशस्वी ठरलेल्या ग्रामीण मंडळींचे ठाम मत आहे. हे मत चूक की बरोबर हा प्रश्न बाजूला ठेवला तरी ते बदलण्याची कुवत आजच्या प्रसार माध्यामाकडे मुळातच नाही. ह्याउलट एकच दृष्य दिवसभर दाखवत राहून बातम्यांचे गु-हाळ चालू ठेवण्याची त्यांच्यावर साधन-सामुग्रअभावी जवळ जवळ सक्ती आहे असे म्हटले तरी चालेल. अर्ध्या तासाचे बुलेटिन भरून काढण्यासाठी दिवसभर आलेल्या बातम्या एडिट करून दृकश्राव्य माध्यमातून सादर करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. जो स्टाफ त्यांना लागतो, जेवढा पैसा खर्च करावा लागतो तो चॅनेलमालकांकडे नाही. म्हणूनच अण्णांच्या उपोषणाचा ‘पराचा कावळा’ करण्याची संधी काही जणांनी हेरली. त्यांनी हेरलेली संधी आणि हरमिंदरसिंगसारखाया माथेफिरूने शरदरावजींसारख्या लोकप्रिय नेत्याच्या अंगावर हात उगारण्याची घेतलेली संधी ह्यात तत्त्वत: काहीच फरक नाही. सगळा देशच सध्या माथेफिरूंच्या ताब्यात गेला आहे!! माथेफिरूंचा हा प्रताप देशाला भोवल्याखेरीज राहणार नाही.

-रमेश झवर

निवृत्त सहसंपादक, लोकसत्ता