केवळ वारी नव्हे, ती तर जीवननिष्ठा !
अलीकडे सुशिक्षित मंडळीत वारीबद्दल अफाट कुतूहल निर्माण झालंय्. अर्थात गेल्या वीस वर्षांपासून वारीला वर्तमानपत्रांत मिळणा-या प्रसिद्धीमुळे वारीला ग्लॅमर प्राप्त झालय्. पहिल्यांदा वारीचा आखों देखा हाल प्रस्तुत केला वीज मंडळाचे भूतपूर्व मुख्य जनसंपर्क अधिकारी रमेश सहस्रबुद्धे ह्यांनी. ते स्वत: दासगणुमहाराजांचे पुतणे. त्यामुळे सांप्रदायिक परंपरा त्यांनी आधुनिक पद्धतीने सांभाळली. आता तर तर बहुतेक सर्व वर्तानपत्रात वारीचे डेली रिपोर्टिंग होते. परंतु वारीचा पारंपरिक संदर्भ किती पत्रकारांना माहित आहे? खुद्द वारीत सामील होणा-यांनाही तो माहीत आहे की नाही ह्याबद्दल मा साशंक आहे. अनेक नव्या पिढीतील वारकरी आजोबांना किंवा वडिलांना आता वारी झेपत नाही म्हणून स्वतः त्यांची वारी घेणारे आहेत. म्हणजेच पर्यायाने माळ आणि वारी ही एक संप्रदायनिष्ठा म्हणून स्वीकारणा-यांचा वर्ग मोठा आहे. हौसे, नवसे आणि गवसे ह्यांना हे कधीच कळणार नाही.
वारी ही वारक-याची जीवननिष्ठा. ह्या जीवननिष्ठेचे श्रेष्ठत्व कधी कधी योगशास्त्रातल्या ‘पंचसार्वभौम महाव्रतां’पेक्षाही अधिक मानले जाते. एरव्ही आकाश पांघरोनी गातो कबीर दोहे हे फक्त कबीराच्या पुस्तकात किंवा कबिरावरील पुस्तकात वाचायचे आणि वेळ आली की कोण कबीर आणि कसले दोहे अशी मनोवृत्ती दिसून येते. तेच ज्ञानेश्र्वरमाऊलीबद्दल आणि तुकाराममहाराजांबद्दलही आहे. साहित्यिकवगैरे मंडळी तुकारामचे अभंग वारंवार उद्धृत करतात. म्हणून अभंगाते अनेक तुकडे आता अनेकांना माहीत झाले आहेत. वारंवार प्रवचन-किर्तनांना गेल्यामुळेदेखील अनेकांचे अभंग पाठ होतात. परंतु तुकारामामहाराजांना सुशिक्षित मंडळींत सतत सुरू असेली ‘दिमाखाची भनभन’ मुळीच मान्य नाही.
तुकाराममहाराजांना मनातून जे वाटते ते त्यांनी अनेक अभंगातून व्यक्त केले आहे. ‘हित ते करावे देवाचे चिंतन’ असे त्यांचे कळकळीचे सांगणे आहे. ‘परि नाही घडली सेवा काही’ ही त्यांना वाटणारी खंत सुशिक्षितांना कशी कळणार? माघशुद्ध दशमीला बाबाजी चैतन्यांनी त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांच्यावर अनुग्रह केला होता. वयाच्या एकविसाव्या वर्षी. त्याच स्वप्नात गुरूंनी त्यांच्याकडून पावशेर तूप मागितले. पण ते देण्यापूर्वी स्वप्नभंग पावले. आपण गुरूची सेवा तर केली नाही, इतकेच नव्हे तर त्यांची गुरूदक्षिणाही देऊ शकलो नाही ही ती खंत. अशी भावार्त खंत किती बुद्धिवंतांना अनुभवता येईल? हे वारक-यांना माहित नसते असे नाही. परंतु परनिंदा न करण्याचे आणि न एकण्याचे सांप्रदायिक व्रत ते जन्मभर पाळत असतात.
हरिपाठाचे अभंग हीच भक्ती-मुक्ती! म्हणून वारक-यांची तीच संध्या. वर्षातून एकदा का होईना आपल्या गुरूंच्या आदेशानुसार ज्ञानेश्र्वरी, तुकाराम गाथा किंवा एकनाथी भागवताचे पारायणकरण्याचा वारक-यात प्रघात आहे. मुंबईतील डबेवाल्यांचे कौतुक केले जाते. परंतु कोणताही डबेवाला आपली वारी सहसा चुकवत नाही. त्याचे काम अन्य वारकरी सांभाळून घेतात! गळ्यात तुळशीमाळ धारण करतेवेळी देहावर तुळशीपत्र ठेवण्याची तयारी ठेवावी लागते. गळ्यातली माळ आणि नाकापासून ते फुफ्फुसापर्यंत सतत सुरू असलेली बारा अंगुळे पसरलेली श्वासोच्छासांची मालिका हीच ती माळिकेची खूण! ही वारी ज्याला कळली त्याची वारी सफल झाली. एक प्रकारे वास्तवाचे, वर्तमानाचे भान! तोच साक्षीभाव. योगयाग विधी सा-या उपाध्या टाकून देणारा आघवा जनसमूह त्या ‘एका’च्या दिशेने निघाला आहे!
`माझां साक्षात्कारी सरे ‘अहंकाराची वारी। अहंकारलोपी अवधारी व्दैत जाये।।‘ हे ज्ञानोबामाऊलींनी केलेले वारीचे सोपे सुटसुटीत वर्णन. मला ते नेहमीच आवडत आले आहे. ज्ञानेश्र्वरांना नाथपरंपरेने आलेली योगदीक्षा मिळालेली असल्याने (भाडीचा कवडा वेचणा-या) लाजिरवाण्या दीक्षितांप्रमाणे जीवन न जगता त्यांनी ‘गो खर चांडाळ’ (हे शब्दशः घ्यायचे नाही) ह्यांची सेवा करण्याविषयीचा पैठण पीठाचा ‘आदेश’ शब्दशः मानला. वास्तविक रेड्यामुखातून वेद वदवल्यानंतर पैठणच्या ब्रह्मवृंदांनी आधीचा आदेश बदलून शुद्धपत्र दिले होते. पण त्या चार भावंडांनी आधीच्या आदेशाचेचे पालन करायचे ठरवले होते. ह्या पार्श्वभूमीवर पूर्वापार चालत आलेल्या वारीत ते सहभागी झाले नसते तरच नवल.
एखाद्या गुहेत बसून गुरूपदिष्ट विद्येनुसार स्वत:पुरती मोक्षदायिनी साधना करण्याच्या भानगडीत ते मुळी पडलेच नाहीत हे विशेष. तीर्थयात्रेचे फोलपण नामदेवमहाराजांनीदेखील फार बहारदार केले आहे. व्दारकेला गेलांत तर निष्कारण खारे पाणी पिण्याचा प्रसंग यायचा. पुरीच्या देवाला ना हात ना पाय! काशीची त-हा तर आणखी न्यारी. काशीत मोक्ष मिळतो खरा; पण तिथे मृत्यू आला तर! त्यापेक्षा पंढरपूर आपले बरे. भूवैकुंठच. स्वर्ग असेल तर तो ह्या इथेच भूतलावर. स्नान, दर्शन आणि भेटीगाठी! पंढरपूरचा विठ्ठल हा व्दारकेचा तर राणा आहेच; पण तो योगीराणादेखील आहे. भक्त तोचि योगी असो साधेसोपे ‘योगदर्शन’ त्यांनी लोकांना दिले. त्यामुळे योगाने जे साध्य होते ते भक्तीभावाने पांडुरंगांच्या पायावर डोके टेकूनदेखील साध्य होते.
म्हणूनच योगीजन कोणत्याही प्रांतातले असले तरी पांडुरंगाच्या एकदा का होईना, पांडुरंगाच्या चरणांवर डोके टेकायला येतातच. ज्याची वारी बारा अंगुळे (वारियाने कुंडल हाले..) अखंड चालते त्याला वर्षातून एकदा का होईना विठ्ठलाच्या पायावर टोके टेकण्यासाठी पंढरीची वारी करावीशी वाटणे हेच मुळी योगरहस्य! चारी मुक्तींपैकी किमान एक मुक्ती—समीप मुक्ती—तर साध्य होते! मला वाटते, वारीबद्दल अधिक काही सांगण्याची गरज नाही. कारण मी जे लिहीत आहे ते बहुतेकांना कदाचित पाठ असण्याची शक्यता आहे.
-रमेश झवर
No comments:
Post a Comment