अर्जुनाने जयद्रथाचा शिरच्छेद केला त्या दिवशी सूर्यग्रहण होते असे लोकमान्य टिळकांनी म्हटले
आहे. श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राच्या साह्याने सूर्याला झाकून ठेवले.
त्यामुळे सूर्यास्त झाला असे जयद्रथासह
सगळ्यांना वाटू लागले. काय चालले आहे हे पाहण्यासाठी लपून बसलेला जयद्रथ बाहेर
आला. जयद्रथ दिसताच कृष्णाने सुदर्शन चक्र काढून घेतले. सूर्य मावळायला अवकाश होता. तेव्हा कृष्ण म्हणाला,
‘हा सूर्य आणि तो
जयद्रथ ! तुझी प्रतिज्ञा पुरी कर!’
‘अर्जुनाने तत्काळ
बाण सोडून जयद्रथाचे शिर उडवले.
कृष्ण हा नुसताच कौरवपांडवांच्या समकालीन होता असे नव्हे तर, पांडवाशी त्याचा नातेसंबंधही होता. पांडव त्याचे सख्खे आतेभाऊ होते.
देवकीचा आठवा पुत्र कृष्ण हा आपला काळ ठरणार अशी आकाशवाणी कंसाने ऐकली होती.
म्हणूनच बहीण देवकी आणि बहिणीचे यजमान वासुदेव
ह्या दोघांना त्याने कारागृहात
डांबून ठेवले होते. देवकीला पुत्र होताच त्याला ठार मारण्याचा सपाटा त्याने
लावला. मात्र कृष्णाचा जन्म होताच वासुदेवाने
त्याला टोपलीत घालून रातोरात त्याला गोकुळात नेऊन यशोदा आणि नंदाच्या
सुपूर्द केले. बालक म्हणून कृष्ण मोठा झाला तो गोकुळात! गोकुळातच कृष्ण हा बालवयाचा
झाला तो परिपूर्ण विकसित मानव म्हणून!
भागवतात त्याचे चित्रण ‘दिव्य मानव’ असे केले आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. गोकुळवासी गोप
बालकांबरोबर खेळताना तो त्यांच्याशी समरस झाला. गोकुळात त्याच्या बाललीला जितक्या
प्रसिध्द तितक्याचा बालवयात त्याने गाजवलेल्या पराक्रमाच्या कहाण्याही प्रसिध्द
आहेत. कालिया मर्दन, पाऊस पडावा म्हणून गोवर्थन पर्वत उचलण्याचा त्याने पर्जन्यदेवतेला धडा शिकवला.
ह्या सगळ्या कथांकडे सूक्ष्म दृष्टीने पाहून त्आया प्रतिकात्मक आहेत हे लक्षात
घेतले पाहिजे. तरच कृष्णाच्या कर्तृत्वाची
कल्पना येते. त्याची किर्ती कंसापर्यंत पोहचायला फारसा वेळ लागला नाही. शेवटी
त्याल मथुरेला आणण्यासाठी कंसाने हालचाली सुरू केल्या. त्याने कृष्णाला आणण्यासाठी
अक्रूराला मथुरेला पाठवले.
कृष्ण सावळ्या वर्णाचा असला तरी
दिसायला सुंदर होता. गोपींच्या स्त्रीसुलभ मनात त्याच्याबद्दल
वात्स्यल्याची भावना होती. गोकुळात
असतानाच त्याने मल्लविद्येत प्राविण्य मिळवले. जेव्हा तो मधुरेला आला तो न डगमगता!
कंसाला मल्लयुध्देत ठार मारण्याचा बहुधा विडा उचलूनच तो मधुरेला आला होता.
कंसाच्या दरबारात आपल्याला मल्लयुध्दाचे आव्हान दिले जाणार हे त्याला माहित होते.
घटनाही त्याला हव्या तशा घडत गेल्या. वडिलांना कंसाच्या तुरूंगातून सोडवण्यासाठी
बालवयातच ( इस. सनपूर्व ३१६७ ) त्याने कंसाला मल्ल युध्दात ठार मारले.
तत्कालीन पध्दतीप्रमाणे सांदिपनी आश्रमात कृष्णाचे शिक्षण झाले. आश्रमातच
सुदामाची त्याची मैत्री झाली. सांदिपनी आश्रमातले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर
तीर्थंकर वृषभदेव ह्यांच्याही आश्रमाला कृष्णाने भेट दिली. इसवीसनपूर्व ३१६० साली
कृष्णाने रुक्मिणीबरोबर विवाह केला. अर्थात रूक्मिणीने लिहलेल्या प्रेमपत्रानुसारच
त्याने रूक्मिणीला पळवून नेले आणि तिच्याबरोबर विवाह केला. इ.स.पूर्व १३५८ साली
प्रद्युम्न ह्या त्याच्या पहिल्या पुत्राचा जन्म झाला.
कृष्णाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सिंहासनाधिष्ठित राजा होण्याचे स्वप्न
त्याने कधीच पाहिले नाही. त्याचे वडिल वासुदेव हेच राज्याचे स्वामी होते. बलराम
त्याचा ज्येष्ठ बंधू. त्याच्या ज्येष्ठत्वालाही कृष्णाने कधीच आव्हान दिले नाही. मथुरेवर अनेक वेळा
आक्रमणे झाली. ती पिटाळून लावण्यासाठी त्याने शौर्याची पराकाष्ठा केली. कालयवनादि
अनेक शत्रूंचा त्याने नायनाट केला. शेवटी लढायांना कंटाळूनच बेट द्वारकेवर वासुदेवाचे स्वतंत्र
राज्य स्थापन करण्याचे त्याने ठरवले. त्यात तो यशस्वीही झाला.
व्दारकेच्या राज्यात राजपुत्र असतानाही त्याला लढाया कराव्या लागल्या. पण
लढायापेक्षाही राजकारणावर त्याचा भर वाढला. त्याच्यासारखा राजकारणी आणि शूर योध्दा भारतवर्षात त्या काळात तरी
अन्य कोणीही नव्हता. त्याच्या शौर्याला
बुध्दित्तेमची जोड होती. त्याच्या चौफेर युध्द कौशल्याला त्याचे शत्रू ’कपटनीती निपुण समजून
चालले. थोडा मोठा झाल्यावर त्याची पांडवांची भेट झाली. पांडव त्याच्या नात्यात
असले तरी पांडवांच्या परिवारात मित्र म्हणूनच तो वावरला. विशेषतः अर्जुनाशी तर
त्याची घनिष्ट मैत्री जुळली होती.
पांडवांबरोबरची मैत्री अधिक दृढ झाली ती द्रौपदी स्वयंवरापासून ! इस. पूर्व ३१४२ साली द्रौपदी स्वयंवराला तो
मुद्दाम हजर होता. पाण्याच्या प्रतिबिंबात पाहून फिरत्या माशाच्या डोळ्याचा वेध
घेणे ही धनुर्विद्येची कसोटी असते. त्या
कसोटीत अर्जून पुरेपूर उतरला. अर्थात कृष्णाने त्याला उत्तेजन दिले होते. ह्या
कसोटीत खुद्द कृष्ण कधी काळी यशस्वी ठरला होता. पांडवांना स्थिरस्थानर करून त्याने
भीमार्जुनाच्या मदतीने जरासंधाचा काटा काढला. जरासंधाच्या कैदेतील सर्व राजांची
त्याने मुक्तता केली. ते सर्व राजे भविष्यात होणा-या महाभारत युध्दात पांडवांच्या
बाजूने लढणार हे तो जाणून होता.
पांडवांच्या इंद्रप्रस्थ राज्याच्या स्थापनेत ( इसवीसनपूर्व ३१९८ ते ३१२० )
आपणहून त्याने पांडवांना मदत केली. द्रौपदीबरोबर रात्र घालवताना पाची पांडवांनी
स्वत:चे स्वत:साठी काही नियम घालून घेतले होते. ज्याच्याकडून एकान्तवासाच्या
नियमाचा भंग झाल्यास त्याला वर्षभर अज्ञातवासात जावे लागेल असा एक नियम होता.
धनुष्यबाण आणण्याच्या निमित्ताने अर्जुनाकडून चुकून नियमाचा भंग झाला. परिणामी
अर्जुनाला तीर्थयात्रा करावी लागली.
तीर्थयात्रेचा काळ संपता संपता तो द्वारकेला गेला. तेथे सुभद्रेला पळवून नेऊन
तिच्याशी लग्न करण्यास कृष्णानेच अर्जुनाला फूस दिली. अर्थात् अर्जुन आणि सुभद्रा
एमेकांवर अनुरक्त झाले हे कृष्णाने ओळखले होते! इसवीसन पूर्व ३११८ साली अभिमन्युचा
जन्म झाला. पांडवांनी इसवीसन पूर्व ३११७ साली राजसूय यज्ञ केला. राजसूय यज्ञात
अग्रपूजेचा मान कृष्णाला देण्यास शिशुपालाने आक्षेप घेतला. त्यावेळी शिशुपाल
कृष्णास अपमानास्पद बोलला. त्याच्या ह्या बोलण्यामुळे शिशुपालाचे शंभर अपराध भरले.
तत्क्षणी कृष्णाने शिशुपालावर सुदर्शन चक्र सोडून त्याला ठार मारले.
द्यूत क्रीडा हा महाभारतातला सर्वात मोठा प्रसंग. तो इसवीसन पूर्व ३११५ साली
घडला. दरबारात द्यूत खेळण्यासंबंधीचे सारे नियम पायदळी तुडवले गेले. खरे तर,
ज्याला द्यूत
खेळायची इच्छा असेल त्याने ज्याच्याशी द्यूत खेळायचे त्या राजाच्या दरबारात जाऊन
द्यूत खेळले पाहिजे असा संकेत होता. हस्तिनापूरच्या दरबारात पाचारण करून द्यूत
खेळण्याचे निमंत्रण धृतराष्ट्राने पांडवांना मोठ्या खुबीने दिले. ‘करमणूक म्हणून द्यूत
होईलही’ अशा
मोघम शब्दात धृतराष्ट्राने दूतामार्फत पांडावांना निरोप पाठवला होता. हस्तिनापूरच्या दरबारात द्यूत ( इस. पूर्व ३११५
) खेळण्यास जेव्हा प्रत्यक्ष सुरूवात झाली तेव्हा धृतराष्ट्र जाणूनबुजून दरबारात
उशिरा हजर आला. द्यूतात पांडवांचे राज्य जिंकण्याचे लक्ष्य दुर्योधन आणि
शकुनीमामाने आधीच ठरवले असावे असे अनेक उल्लेखांवरून स्पष्ट होते. द्यूत खेळताना
सर्व संपत्ती, राज्य गमावून बसल्यावर शकुनी युधिष्टराला म्हणाला,
अस्ति वै ते प्रिया ग्लह एकोsपराजित:।
पणस्व कृष्णां पांचालीतयात्मनं पुनर्जय।।
‘नैव ह्रस्वा न महती नातिकृष्णा न रोहिणी।
सरागनेत्रा च दीव्याम्यहं त्वया ॥’
द्यूत खेळण्यात शकुनी युधिष्टरापेक्षा
कितीतरी सरस होता. द्रौपदीला दु:शासनाने राजसभेत ओढत आणले. तिचे वस्त्र फेडण्याचा
आततायी प्रकार दु:शासनाने जेव्हा सुरू
केला तेव्हा द्रौपदीने राजसभेला उद्देशून प्रश्न विचारला. ‘युधिष्ठर जर स्वत:स पणाला लावून
हरला असेल तर मला पणास लावण्याचा त्याला मुळी अधिकार कसा पोहतो?’ त्यावेळी भीष्म, द्रोणाचार्यादि मान खाली
घालून बसले होते. जे चालले होते ते सुसंघटित अराजक होते! त्यावर ते काय बोलणार?
शेवटी त्या मानिनीने कृष्णाचा धावा केला. तिने नेसलेली वस्त्रे संपता संपेना.
दु:शासन थकून गेला. भीमाने खूप आदळआपट केली. पण काही उपयोग झाला नाही. अशा ह्या
सर्वस्वान्तकर द्यूताची हकिगत कृष्णाला जेव्हा समजली तेव्हा तो म्हणाला, मी त्यावेळी हजर असतो तर
हे द्यूत मुळी होऊच दिले नसते. त्या काळातल्या धारणेप्रमाणे कृष्ण स्वतः
द्यूतक्रिडेत प्रवीण होता!
महाभारत काळाचा थोडक्यात घटनाक्रम असा देता येईल.
द्यूतात हरल्यामुळे पांडवांना १२ वर्षांचा वनवास आणि १ वर्षांचा अज्ञातवास
भोगावा लागला. १ वर्षाचा अज्ञातवास त्यांनी विराटराजांकडे नोकरी करून भोगला. नेमका
तो संपल्यावर दुर्योधनाने विराटच्या राज्यातील गायी पळवण्याच्या हेतूने आक्रमण
केले. ते पिटाळून लावण्यासाठी विराटपुत्र उत्तर रथावर आरूढ होऊन युध्दाला सामोरा
गेला. बृहन्नडेच्या वेषात अर्जुनाने त्याच्या रथाचे सारथ्य केले. त्यावेळी
उत्तराचा सारथी अर्जुन असला पाहिजे दुर्योधनाला शंका आली. त्याने भीष्माला वनवास
आणि अज्ञातवासाच्या काळाची गणना करण्यास सांगितले. भीष्माने ती केली. त्यांचा
वनवासकाळ आणि अज्ञातवासाचा काळ पूर्ण झाल्याचा जबाब दुर्योधनाला दिला.
विराटच्या दरबारात पांडव प्रकट झाले. विराटानेही त्यांना प्रेमाने निरोप दिला.
विराटराजाने त्याची कन्या उत्तरा अर्जुनाला देऊ केली. त्याला नकार देऊन तिचा विवाह
अभिमन्युबरोबर करण्याचे सुचवले. विराटानेही त्याला आनंदाने संमती दिली. विराटाचा निरोप
घेतल्यावर पांडावांपुढे आपले राज्य परत मागण्याचा प्रश्न महत्त्वाचा होता. ह्याही
प्रसंगी कृष्ण त्यांच्या मदतीला धावून आला. राज्य सहजासहजी परत मिळणार नाही हे
पांडवांना ठाऊक होते. शिष्टाई करण्यास कृष्ण जातीने कौरव दरबारात हजर झाला. अर्थात
कृष्ण निघाला तेव्हा द्नौपदीने त्याला तिच्या मोकळ्या केसांची आठवण करून दिली.
अर्थात कृष्णाला ते माहित नव्हते असे नाही. शिष्टाई हा मुत्सद्देगिरीचा भाग आहे हे
दुखावलेल्या द्रौपदीला कसे लक्षात येणार? शिष्टाई प्रसंगी कृष्णाची मुत्सद्देगिरी, वक्तृत्वकला, शौर्य, चातुर्य इत्यादि अनेक
गुणांचे कौरवसभेला दर्शन घडले. त्याला अटक करण्याचा दुर्योधनाने बेत आखला होता हे
जेव्हा त्याला समजले तेव्हा कृष्ण भरसभेत म्हणाला, `आता पाहूच कोण कोणाला अटक करतो
ते! क्रोधायमान झालेल्या कृष्णाचे उग्र रूप पाहून कौरव दरबारातील अनेक जणांची
भीतीने गाळण उडाली. मुळात कौरवपांडवात युध्द अटळ असल्याचा निष्कर्ष कृष्णाने काढला
होता. बहीण द्रौपदीची भर दरबारात विटंबना
झाली हे त्यालाही सहन झाले नव्हते. फार पूर्वीपासून द्रौपदीने कृष्णाला भाऊ मानले
होते. मनाशी कौरवपांडवांचे युध्द अपरिहार्य
असल्याचे त्याचे आकलन होते. तरीही दूत ह्या नात्याने कौरव दरबारात त्याने आपली कामगिरी मुत्सद्देगिरीपूर्णरीत्या
बजावली. महाभारत ऐकताना किंवा वाचताना वाचकांना असे जाणवते राहते की
द्यूतपर्वानंतरचा घटनाक्रम युध्दाकडे सरकत होता.
युद्धात मदत मागण्यासाठी दुर्योधन आणि अर्जुन एकाच वेळी व्दारकेला पोहोचले.
तेव्हा युध्दात माझे सैन्य आणि मी स्वतः ह्यापैकी जे हवे ते मागा असे दौघांना
सांगितले. अर्जुनाने तूच आमच्या बाजूने हवास अशी मागणी केली. कृष्णाने ती तत्काळ
मान्य केली. दुर्योधनाला असे वाटले की ज्याने शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा केली
आहे त्याला आपल्या बाजूला घेऊन काय उपयोग ! अर्जुनाने हातात शस्त्र न धरण्याची
प्रतिज्ञा करून बसलेल्याला मागितले ह्याचा दुर्योधनाला मनातून आनंदच झाला. यादवसैन्य
त्याच्या बाजूने लढण्यास मिळाले म्हणून तो मनातल्या मनात खूश झाला. त्याच्या
इच्छेनुसार कृष्णाने यादव सैन्याला दुर्योधनाच्या बाजूने लढण्यास अनुमती दिली.
त्यावेळी बळिराम तीर्थयात्रेला गेला होता. त्यामुळे कृष्णाच्या धूर्त राजकारणात
अडथळा उत्पन्न होण्याचा प्रश्नच आला नाही. सैन्याची जुळवाजुळव खूप महिने सुरू
होती. शेवटी कुरूक्षेत्रावर कौरवसैन्य आणि पांडवसैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले. ( इ.स. पूर्व ३१०१, २९ नोव्हेंबर )
युध्द सुरू होण्यापूर्वी अर्जुन मोहग्रस्त झाला. मी युध्दच करू इच्छित नाही असे सांगून त्याने धनुष्यबाण टाकून दिले. त्यावेळचा
कृष्णार्जुनाचा संवाद म्हणजेच ७०० श्लोकांची सुप्रसिध्द भगवद्गीता. युध्दभूमीवर
त्या दोघात झालेला संवादाचे स्वरूप हे गुरूशिष्यातल्या संवादाप्रमाणे आहे. त्या
संवादांकडे सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर असे लक्षात येते की श्रीकृष्ण म्हणजे
बुध्दी आणि अर्जुन म्हणजे विचलित झालेले मन! हे खुद्द कृष्णाने अनुगीतेत अर्जुनाला
सांगितले. समरभूमीवर जसा गीतोपदेश केला तसा उपदेश आम्हाला पुन्हा ऐकायचा आहे,
तरी तो पुन्हा कर
असे पांडवांनी जेव्हा कृष्णास विनवले तेव्हा कृष्णाने असमर्थता व्यक्त केली.
कृष्ण म्हणाला, मला योगयुक्त अंत:करणाने केलेला
उपदेश पुन्हा करता येणार नाही! महाभारत ग्रंथात १ लाख श्लोक आहेत. त्यामुळे महाभारतावर ह्या पूर्वी जे संशोधन झाले
त्यापुढे जाऊन संशोधन करण्याची गरज अलीकडे
विद्वानांना वाटली नाही.
३०६५ साली द्वारकेजवळच व्याधाने
मारलेला बाण लागून वयाच्या १२० व्या वर्षी कृष्णाला मृत्यू आला. एक कर्तृत्ववान
व्यक्ती हे जग सोडून गेली! त्या सुमारास
सांबामुळे यादवकुळात बखेडा माजला आणि यादव कुळाचा संपूर्ण विनाश झाला.
कृष्ण चरित्राचा सारांश ह्या छोट्या लेखात लिहणे केवळ अशक्य आहे. तरीही मी
माझ्याकडून थोडक्यात ते लिहण्याचा प्रयत्न केला. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते,
’कृष्णात् परं किमपि तत्त्वमहम न जाने’
रमेश झवर