अब मेरी आँखे अच्छी हो गई है! हे उद्गार आहेत व्ही शांताराम ह्यांचे! त्यांच्या नव्या चित्रपटाच्या सुरूवातीला प्रेक्षकांना दाखवण्यात आलेल्या एका छोट्याशा फिल्ममधले हे उद्गार आहेत. त्यांच्याच शब्दात मीही हे निवेदन करू इछितो.
मेरी आँखे अच्छी हो गई हैं! १३ ऑगस्ट २०२२ शनिवार रोजी माझ्या डाव्या डोळ्याची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर लगेच आलेल्या दुस-या शनिवारी उजव्या डोळ्याची शस्त्रक्रियाही झाली. कल्याणचे ख्यातनाम नेत्रविशारद डॉ. अभिजीत वाडेकर ह्यांनी दोन्ही शस्त्रक्रिया उत्तम प्रकारे केल्या. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी नेत्रविशारद झालेला माझा नातू डॉ. नंदन सोमाणी ह्यालाही ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी डॉ. वाडेकरांनी उदार मनाने दिली.
डॉ. वाडेकर, डॉ. सोमाणी, ऑपरेश थिएटरच्या प्रमुख नर्स, केसपेपर तयार करणारे आणि पूर्वतयारी करणा-या अन्य नर्सेस असे सगळे मिळून बारा हात कामाला लागले होते. माझी दृष्टी पूर्ववत् झाली असून मी कामाला लागलो. जवळ जवळ महिनाभर ठप्प झालेले माझे लेखन-वाचन पूर्वीसारखे सुरू झाले.
डोळे पाहायचे काम करतातच, कान ऐकायचे काम चोख बजावतात, रसनेला चव ओळखायला सांगावे लागत नाही, वास घ्यायला नाकाला सांगावे लागत नाही. त्वचेला स्पर्शज्ञान चटकन् होते, अशा अर्थाची एक ओवी ज्ञानेश्वरीत आहे. ‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एक तरी ओवी अनुभवावी’॥ नामदेवाच्या ह्या अभंगाचीची मला अक्षरश: प्रचिती आली !
पंचज्ञानेंद्रियांचे आणि पंचकर्मेंद्रियांचे महत्त्व आध्यात्मिक परिभाषेत पूर्वापार सांगितले गेले आहे. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर ह्या ज्ञानेंद्रियांच्या संज्ञा अचूक आणि अर्थवाही आहेत ह्याचा मला साक्षात् अनुभव आला !
रमेश झवर
No comments:
Post a Comment