भिंतीवर टांगलेला नकाशा वा-यामुळे फडफडला म्हणजे देशात धरणीकंप होत
नाही, असे सुभाषित लिहणारे राम गणेश गडकरी आज असते तर त्यांनी म्हटले असते,
कॅलेंडर बदलले म्हणजे काळ बदलत नाही! आज घरोघर कॅलेंडर बदलले असेल. आज मध्यरात्री संपणआर ते वर्ष 2018, आज
मध्यरात्रीनंतर उजाडणार ते वर्ष 2019 ! परंतु वर्ष बदलले तरी, काळ खरोखरच बदलतो का? काळाला भौतिकतः
रूप नाही. तो अनादि अनंत आहे. तो कधीच बदलत नाही. काळाबद्दलचे हे चिरंतन सत्य बहुतेक
तत्त्वज्ञांना आणि वैज्ञानाकांना मान्य आहे. सभोवतालच्या परिस्थितीत बदल झाला की
काळ बदलला असे आपण म्हणतो! ह्या
पार्श्वभूमीवर 2019 च्या मार्च-एप्रिलमध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीमुळे निदान
भारतातला तरी काळ बदलेल अशी आशा लाखो लोकांना वाटू लागली आहे!
थोर शास्त्रज्ञ आइन्स्टीन म्हणतो, 'The
passage of time is merely a feature of our consciousness and has no objective physical significance. Thus past, present and future has the value of mere illusion' आइन्स्टीनच्या म्हणण्याचा अर्थ इतकाच की बदलाचा प्रत्यय येणे महत्त्वाचे. माणसाला काळ बदलल्याचा प्रत्यय येणार नसेल तर माणसाच्या दृष्टीने काळ बदललाच नाही. उपनिषदाचेही म्हणणे काहीसे असेच आहे. संवत्सराचे चक्रात्मक आणि यज्ञात्मक असे दोन प्रकार असतात. ज्या बिंदूपासून पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण सुरू झाले त्या बिंदूवर पृथ्वी जेव्हा परत येते तेव्हा होणारा बदल हा चक्रात्मक बदल. चक्रात्मक बदलाचा अनुभव येत असतानाच्या काळातच अग्नी-सोम-मिथुन प्रक्रियेमुळे जीवसृष्टीचा विकास व विनाश असे दोन्ही प्रकारचे बदल घडून येत असतात. म्हणून यज्ञातामक संवत्सर हाच खराखुरा बदल. जीवन-यज्ञाची ही प्रक्रिया अप्रतिहत सुरू असते. सृष्टीतली ही प्रक्रिया हेच 'यज्ञात्मक संवत्सर'!
passage of time is merely a feature of our consciousness and has no objective physical significance. Thus past, present and future has the value of mere illusion' आइन्स्टीनच्या म्हणण्याचा अर्थ इतकाच की बदलाचा प्रत्यय येणे महत्त्वाचे. माणसाला काळ बदलल्याचा प्रत्यय येणार नसेल तर माणसाच्या दृष्टीने काळ बदललाच नाही. उपनिषदाचेही म्हणणे काहीसे असेच आहे. संवत्सराचे चक्रात्मक आणि यज्ञात्मक असे दोन प्रकार असतात. ज्या बिंदूपासून पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण सुरू झाले त्या बिंदूवर पृथ्वी जेव्हा परत येते तेव्हा होणारा बदल हा चक्रात्मक बदल. चक्रात्मक बदलाचा अनुभव येत असतानाच्या काळातच अग्नी-सोम-मिथुन प्रक्रियेमुळे जीवसृष्टीचा विकास व विनाश असे दोन्ही प्रकारचे बदल घडून येत असतात. म्हणून यज्ञातामक संवत्सर हाच खराखुरा बदल. जीवन-यज्ञाची ही प्रक्रिया अप्रतिहत सुरू असते. सृष्टीतली ही प्रक्रिया हेच 'यज्ञात्मक संवत्सर'!
आगामी 20 वर्षांच्या काळात ह्या पृथ्वीतलावर नैसर्गिक बदल तर होतीलच. त्याखेरीज
अनेक मानवनिर्मित बदल घडणार आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रात
झालेली क्रांती ह्यामुळे तशी मानवनिर्मित बदलाची प्रक्रिया गेल्या काही वर्षांत
सुरू झालेलीच आहे. तीच प्रक्रिया 2019 वर्षात अधिक गतिमान होणार आहे. भारतही
त्याला अपवाद नाही. कसे असतील हे बदल? त्याचे स्वरूप कसे
राहील? त्यामुळे मानवजातीने आजवर जोपासलेली जीवनमूल्ये
उध्दवस्त तर होणार नाहीत? सात सफऱीपैकी एका
सफरीत एका बेटावर एक राक्षस सिंदबादनच्या मानगुटीवर बसतो. तो मानगुटीवरून खाली
उतरायला तयार नसतो! टेक्नालॉजीचा
राक्षस मानगुटीवर मानवाच्या मानेवर बसणार की तो मानवाला साह्यभूत होणार? 'टेक्नालॉजी
व्हर्सेस ह्युमॅनिटी' ह्या पुस्तकात
जेर्ड लिओनार्डने भविष्यकाळाचा वेध घेतला आहे.
जेर्डच्या मते, गेल्या तीनशे
वर्षांत लागलेल्या शोधांमुळे जग जेवढे बदलले त्यापेक्षा येत्या 20 वर्षांत होणा-या
तांत्रिक प्रगतीमुळे जग कितीतरी पट बदलून जाणार! अनारोग्य, पाणी, अन्न, उर्जा इत्यादि
समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार असला तरी माणूस
तंत्रज्ञानावर आरूढ होतो की तंत्रज्ञान माणसावर आरूढ होतो असा प्रश्न माणसाला पडेल! आर्टिफिशियल
इंटिलेजन्स, ब्लॉकचेन, थिंग्ज ऑफ इंटरनेट, थ्री डी प्रिंटिंग ह्या पाच
प्रकारांमुळे माणसाचे आयुष्य बदलून जाईल. समाज बदलून जाईल. 'पॉवर्ड मोबाईल' आणि वेगवेगळे 'अप्स' ह्यामुळे माणसाला जवापाडे
असलेले सुख पर्वतासारखे भासू लागेल. रिमोट शस्त्रक्रिया
तर ह्यापूर्वीच सुरू झाल्या आहेत. पुढची पायरी म्हणजे नर्सच्या हातातील उपकरण
किंवा तुमच्याकडील मोबाईलचा उपयोग पॅथालॉजिकल निरीक्षण-विश्लेषण ह्यावर आधारित उपचारासाठी
केला जाईल. इस्पितळातले बहुतेक उपचार आर्टिफिशयल इंडेलिजन्सच्या मदतीने करता येणे
सहज शक्य होईल.
वीजेवर चालणा-या ड्रायव्हररहित मोटारी येत्या रस्त्यावर धावू लागतील.
ड्रायव्हर नको, लर्निंग लायसेन्स
काढण्याची कटकट नको! फार काय, स्वतःची कार बाळगण्याचीही गरज नाही. स्वतःच्या
मालकीची एकही कार नसताना उबेर ही जगातली सर्वात मोठी टॅक्सी कंपनी आहे. ह्याच
धर्तीवर जितक्या तासांचा प्रवास करायचा तितक्या तासांचे पैसे कार कंपनीला दिले की
खुशाल झोप काढत प्रवास करण्याची चित्तचक्षुचमतकारिक सुविधा उपलब्ध झालेली असेल असे
जेर्ड म्हणतो. शेती आणि कारखान्यातील सर्व कामे महासंगणकाच्या आज्ञेनुसार रोबो पार
पाडणार. फार काय, माणसाच्या भावभावना वाचून त्यानुसार हव्या त्या सुखसुविधा पुरवणारी
संदेशवहन व्यवस्था कार्यान्वित झालेल्या असतील. सोफिया नावाची स्त्री रोबो तयार
करण्यात आली असून तिला सौदी अरेबियाने नागरिकत्वही बहाल केले आहे.
समुद्राचे पाणी अत्यल्प खर्चात पिण्यायोग्य करण्याच्या यंत्रणेमुळे
पिण्याच्या पाण्याची टंचाईची समस्या म्हणजे नेमकी काय, असा प्रश्न पडू शकेल. तेच
उर्जेचे! मुबलक सौरउर्जा पुरवू शकणारी व्यवस्था कार्यान्वित
झालेल्या असतील. त्यामुळे रोजचा जीवनातील स्पर्धा संपणार. अर्थशून्य भासणारा जीवनकलह
जवळ जवळ संपुष्टात आलेला असेल. जोडीला आजारपणावर अचूक उपचारांची रेलचेल! ह्या नवलाईमुळे माणसाचे
आयुर्मान उंचावून ते शंभरपर्यंत गेले तर आश्चर्य वाटायला नको. ह्या सगळे
वाचल्यानंतर वाचकांचा प्रश्न राहील. हे सगळे बदल भारतात घडणार का?
हे सगळे भारतात घडवून आणायचे की नाही ह्याचाच निर्णय राज्यकर्त्यांना
घ्यावा लागेल. भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर असल्याची ग्वाही जागतिक
संघटनांचे अहवाल अलकडे देऊ लागले आहेत. राज्यकर्त्यांना तशी स्वप्ने पडू लागली
आहेत. कृषी, आरोग्य, शिक्षण, दळणवळण आणि शहरे ह्या 5 क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन
घडवून आणण्याचे नीती आयोगाने निश्चित केले आहे. त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी
संबंधित संशोधन प्रकल्प राबवण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. ह्या कार्यक्रमांचा हेतू
स्तुत्य आहे ह्याबद्दल वाद नाही. परंतु आधारकार्डचा प्लॅटफॉर्म ज्या बेगुमानपणे
वापरला गेला तो पाहता उपरोल्लेखित प्रकल्प कशा प्रकारे राबवले जातील ह्याबद्दल मनात
शंकेची पाल चुकचुकली तर कोणाला दोष देणार?
दरम्यानच्या काळात फेसबुक आणि गूगल ह्या दोन महान कंपन्यांची भारतात 'डाटा वसाहत' स्थापन झाल्यात
जमा आहे. आधारकार्डाचे सर्वोच्च न्यायालयात जसे वाभाडे निघाले तसे ह्या कंपन्यांचे
वाभाडे कोर्टात निघाले नाही हे खूप लक्षणीय आहे. सरकार आणि खासगी कंपन्या ह्यांच्या
सहकार्याने सुरू झालेल्या आर्टिशियल इंटेलिजन्सच्या संशोधऩ प्रकल्पाचे नेमके
स्वरूप तूर्त तरी गूढगम्य आहे. ह्या संशोधनाचा फायदा कोणत्या कंपन्यांना मिळणार हे
गौडबंगाल तर भल्याभल्याच्याही लक्षात येण्यासारखे नाही. अलीकडे 'स्कील डेव्हलपमेंट'ची भाषा वारंवार
बोलली गेली. त्यामुळे बेकारीनिवारण होऊ शकेल असा राज्यकर्त्यांचा दावा आहे. वस्तुस्थिती
मात्र वेगळी आहे. बेगोजगारीत बेसुमार वाढ होत आहे. ह्याबद्दल खुलासेवार माहिती कोण
देणार? एक मात्र सांगता
येईल, भारतात तंत्रज्ञान माणसाच्या मानगुटीवर आरूढ होण्याचा धोका जरा जास्त दिसत
आहे. धोका म्हणण्याचे कारण असे की बायोमेट्रिक्स पडताळून पाहिले जात असताना
आधारकार्ड बेभरवशाचे असल्याचा अनुभव गेल्या नोव्हेंबरात अनेक पेन्शनधारकांना आला.
नोटबंदीनंतर पैशाच्या व्यवहारात ज्या प्रकारे डिजिटल टेक्नालॉजी
राबवण्याचा प्रयत्न झाला तो पाहता गरीब शेतकरी, कुशल-अर्धकुशल कामगार आणि लहान
व्यापारी कदाचित रोजीरोटीपासून वंचित झाला नसतीलही, परंतु आयुष्याचा अत्यंत खडतर काळ
त्यांनी अनुभवला. आर्टिफिशियल इंटेलेजन्समुळे कामगारांचा, शेतक-यांचा वर्ग समूळ
संपुष्टात येतो की काय अशी भीती वाटू लागली आहे. त्या भीतीचे निराकरण जाणत्यांनी
करावे अशी अपेक्षा आहे. आजवर फक्त कामगार जात्यात सापडत आला. परंतु येत्या 20
वर्षांच्या काळात कामगारांचे पोशिंदे 'मालक' आणि त्यांचे कारभारी जात्यात सापडणार नाहीत
कशावरून? कारण आर्टिफिशियल
इंटेलिजन्स आणि स्मार्ट मोबाईल ह्यामुळे मनुष्यबळाची गरजच मुळी राहणार नाही!
-असा हा काळ बदलून टाकणारे नवे वर्ष सुरू होत आहे. पुराणकारांच्या मते, कळिकाळ
तर केव्हाच सुरू झाला. तरीही कळिकाळाची भीषणता मानव जातीला तशी अनुभवावी लागली नाही
हे सुदैव. लौकरच सुरू होणारे 2019 वर्ष कळिकाळाच्या भीषणतेची चाहूल न ठरो. नववर्षाच्या शुभेच्छा!
रमेश झवर