Wednesday, December 19, 2018

लोकसत्तेचा पुराणपुरूष


लोकसत्तेचे मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर कृ. पां. सामक ह्यांचे वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी निधन झाले. सामक ह्यांना संपादकापदाच्या आणि दिल्ली प्रतिनिधी म्हणून काम करण्याच्या ऑफर्स अनेक वेळा आल्या. परंतु लोकसत्तेतल्या ह्या पुराणपुरूषाने मोठे पद स्वीकारण्यास नेहमीच नकार दिला. अन्य वर्तमानपत्रातली उच्चपदे भूषवून मोठे होण्यापेक्षा त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे लोकसत्तेतले त्यांचे पद आपोआप उच्च झाले. हल्ली मंत्रालय आणि विधिमंडळात काम करणा-या पत्रकारांना 'पोलिटिकल एडिटर'चे पद दिले जाते. सामक ज्या काळात मंत्रालय आणि विधिमंडळाचे वार्ताहर म्हणून काम करत होते त्या काळात वर्तमानपत्रात 'पोलिटिकल एडिटर' नेमण्याची मुळी पध्दतच नव्हती. साहजिकच सामकांना पोलिटिकल एडिटर म्हणून कधीच नेमण्यात आले नाही. पोलिटिकल एडिटर म्हणून त्यांची नियुक्ती झाली नसेल; परंतु लॉबीमधे भेटलेला प्रत्येक आमदार आणि मंत्री त्यांना नेहमीच आदराने संपादक म्हणून संबोधत असे! सभागृहाचे कामकाजाचे रिपोर्टिंग करताना सरकार पक्षाकडून दिलेल्या उत्तराइतकेच चर्चेत भाग घेण-या विरोधी आमदारांच्या भाषणातील महत्त्वाच्या मुद्द्यांचा सामक बातमीत आवर्जून समावेश करायचे. लॉबीमध्ये चालणारे राजकारणही ते समजून घेत आणि त्यावर स्वतंत्र बातमी देत.  साहजिकच लोकसत्तेची बातमी हा आमदारवर्गात चर्चेचा विषय होत असे. विधानसभेतून ऑफिसला परत येता येता आमदार निवासात चक्कर मारण्याचाही त्यांचा शिरस्ता होता. व्दिभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाईंनंतर यशवंतरान चव्हाण मुख्यमंत्री व्दिभाषिक राज्याचे मुख्यमंत्री झाले. दोन वर्षांच्या काळातच चव्हाणांना पंडित नेहरूंनी दिल्लीत बोलावून घेऊन संरक्षण मंत्रीपद दिले. यशवंतराव चव्हाणानंतर मा. सां. कन्नमवार, वसंतराव नाईक आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. ह्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीचा राजकीय इतिहास सामक ह्यांच्या लेखणीने टिपला. त्यांच्या रिपोर्टिंगमध्ये कोणत्याही नेत्याला वा संपादकाला खोट काढता आली नाही हे विशेष! त्याचप्रमाणे सामक लोकसतेतेच प्रतिनिधी असतानाच्या काळात आजीमाजी आमदारांच्या मनात सामकांबद्दल आदराचे स्थान कायम राहिले. पत्रकार म्हणून काही काळ काकासाहेब नवरे ह्यांच्यासमवेत अल्पकाळ काम केल्यानंतर प्रदीर्घ आयुष्य लाभलेला सामक लोकसत्तेत वार्ताहर म्हणून रूजू झाले आणि त्यांच्याकडे मंत्रालयाचे कामकाज सोपवण्यात आले.
सामक ह्यांच्याबरोबर सहवार्ताहर म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली हा माझा आयुष्याचा भाग्ययोग! विधानसभेत मी काम सुरू केल्यानंतर दुस-याच दिवशी त्यांनी मला प्रश्नोत्तराचा तास आणि झिरो अवर्सची जबाबदारी सोपवली. त्या काळात टाईम्सचे शामराव देशपांडे आणि, दाते, केसरीचे राजाभाऊ कुलकर्णी, मटाचे चंद्रकांत ताम्हाणे, पीटीआयचे लक्ष्मण, हिंदूचे तिवारी, फ्रीप्रेसचे भालचंद्र मराठे, आकाशवाणीचे खाड्ये, मधु शेट्ये, हिंदुस्थान समाचारचे दात्ये अशी बडी मंडळी विधानसभा कव्हर करत. ह्या बुजूर्गांबरोबर काम करण्याचा वेगळाच आनंद होता. अनेक आमदार असेंब्लीच्या प्रेसरूममध्ये चक्कर टाकत. सरकार बदलले की मंत्री बदलत, एखादा वार्ताहर सेवानिवृत्त झाल्यानंतरच प्रेसरूममध्ये बदल व्हायचा. रोव्हिंग कॉरस्पॉडंट म्हणून सामकांची नेमणूक झाली तरी राजकारणात काय चालले ह्याचा कानोसा घेण्यासाठी ते मंत्रालयात किंवा अधिवेशन सुरू असेल तर विधानभवनात एखादी तरी फेरी मारत!
सामक ह्यांची पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यांनतर राज्यात सर्वत्र त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम सुरू झाले. त्या कार्यक्रमांमुळे सामक खूप वैतागले. शेवटी त्यांनी सत्काराचा कार्यक्रमाला स्पष्ट नकार द्यायला सुरूवात केली तेव्हा कुठे सत्काराचे कार्यक्रम थांबले. मुंबई मराठी पत्रकार संघाला स्वतःची जागा मिळवून देण्याचे काम सामक पत्रकारसंघाचे अध्यक्ष असतानाच धसास लागले. पत्रकार संघाचे अध्यक्ष असतानाच्या काळात कार्यालयाच्या नेहमीच्या कामाकडे त्यांनी कधीच दुर्लक्ष केले नाही किंवा लाटेंसाहेबांकडून कुठलीही सवलत मागितली नाही. लाटेसाहेबांचे वसंतराव नाईकांशी थेट संबंध होते. तरीही सामकांशी लाटेसाहेब रोज चर्चा करत आणि मगच अग्रलेख लिहायला घेत. ही एक प्रकारे सामकांच्या विश्वासार्हतेला पावतीच म्हटली पाहिजे. न्यूजडेस्कवर साहित्य, नाटक-सिनेमा, अध्यात्म इत्यादी अनेक विषयांवर चर्चा चालायच्या. त्या चर्चांत सामकांनी कधीच रस घेतला नाही. मात्र, वर्षांतून एकदा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांच्या समाधीला दर्शनाला जाण्याचा त्यांचा नियम होता. त्या नियमात कधी खंड पडला नाही. दर वर्षी कोजागिरीच्या रात्री चंदु तांबोळी दमेक-यांसाठी एक शिबीर घेत. त्या शिबिराची बातमी सोडली तर राजकारणाव्यतिरिक्त एकही बातमी देण्याची गळ त्यांनी चीफसबला घातली नाही. मला खात्री आहे, सामकांच्या निधनाची बातमी देण्याची गळ कुठल्याही वर्तमानपत्राच्या संपादकाला घालावी लागणार नाही.

रमेश झवर
rameshzawar.com

No comments: