Saturday, June 8, 2019

अंतराळात जंक्शन स्टेशन!

तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथला ज्या गुफेत ध्यान करायला बसले त्या गुफेत ध्यान करायचे आहे का? तेथे ध्यान करायला बसायचे असेल तर तेथे दिवसाचे भाडे काय द्यावे लागेल? माहित नाही. मुळात ती भाड्याने दिली जाते की नाही हेही माहित नाही. ठाणे स्टेशन नेमकं कुठे होणार हे मध्य रेल्वेच्या जनरल मॅनेजरला माहित नाही.. तेव्हा तुम्हाला कुठून माहित असणार? मुंबई-नाशिक आणि मुंबई-पुणे ह्या दोन मार्गांवर सुरू होणा-या गाड्या 2 तासात इच्छित शहरात पोहचवतील. पण त्या गाड्या लौकरच म्हणजे केव्हा सुरू होतील नोकरीत असलेले पत्रकार सांगू शकणार नाही. मी पडलो सेवानिवृत्त पत्रकार! मी कसं सांगणार की अमुक महिन्यापासून ह्या नव्या अति जलद गाड्या सुरू होतील. एक मात्र मी सांगू शकतो. ते म्हणजे चंद्र आणि मंगळ ह्या दोन ग्रहांवर पर्यटक वाहतूक सुरू करण्याची तयारी करण्यापूर्वी नासा ह्या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने 'लोअर अर्थ ऑर्बिट' जंक्शन स्टेशन सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ह्या स्टेशनाच्या सेवा प्राप्त करून देण्यासाठी प्रतिप्रवासी 30 हजार डॉलर्स फी नासाने ठरवली असून त्यावर किती मार्जिन आकारायचे, कितीला राकेट प्रवासाचे तिकीट विकायचे तिथला झोपण्याचा खर्च, चहापाणी जेवणाचा खर्च किती आकारायचा वगैरे सतराशे छपन्न आकार हे ज्या कंपनीला काम दिले जाईल त्या कंपनीने ठरलायचे आहे. अमेरिकेतील एकूण खर्च आणि नफा कमावण्याची प्रवृत्ती लक्षात घेतली तर हा खर्च प्रतिप्रवासी दीडेक लाख डालर्सपर्यंत सहज जाऊ शकले. पहिल्या टप्प्यात 10-12 पर्यटकांना अंतराळ प्रवासाठी संधी उपलब्ध होऊ शकेल. चंद्र हे पहिले लक्ष्य तर मंगळ हे दूसरे लक्ष्य असे अंतराळ प्रवासाचे दोन टप्पे नासाने ठरवले असून चंद्र-सफरच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने नासाने पाऊल टाकले. 
पहिले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन सुरू करण्यासाठी मार्केटिंग, जाहिरात, ब्रॉडबँड सेवा, ऑफ अर्थ मॅन्युफॅक्चरींग , पर्यटण इत्यादि पूरक कंपन्या स्थापन करण्याची घोषणा नॅसडॅक स्टॉक एक्सचेंजमध्ये नासाकडून करण्यात आली. अर्थात हा धंदा नफा मिळवण्याच्या उद्देशाने सुरू केला जाणार असल्याचे नासाने स्पष्ट केले. त्यात देशभक्ती वगैरेचा मुद्दा नाही. जेटप्रवासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन निर्मिती करण्याची जबाबदारी ह्या कंपन्यांची राहील. अध्यक्ष ट्रंप ह्यांनी मात्र ह्या प्रस्तावात खोट काढलीच. चंद्र हा मंगळाच्या मालकीचा, तेव्हा चंद्र सफर ठरवण्याचा तुम्हाला अधिकार काय अशी पहिली तोफ अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप ह्यांनीच डागली आहे. त्यांच्या मते 2028 ह्या वर्षांपर्यंत मंगळावर जेटसेवा सुरू करायचे ठरले होते. मग मध्येच ती मंगळ सफर कटशॉर्ट करून 2024 पर्यंत चंद्र सफरच्या दृष्टीने तयारी करण्याचे कारणच काय? नासाचे बजेट वाढवून देण्याचा प्रस्ताव काँग्रेसमध्ये आला तेव्हाही ट्रंपनी विरोध केला होता. 
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन स्थापन करण्याचा धंदा मिळवण्यासाठी सेरा नेवाडा ही कंपनी पुढे आली आहे. त्याखेरीज कॉर्पोरेशन, अमेझॉन, स्पेसएक्स ह्या कंपन्यांत अन्य पूरक सेवा पुरवण्याचा धंदा कसा मिळवता येईल ह्यादृष्टीने विचारविनमय सुरू झाला. त्या दृष्टीने उच्च स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. हा नवा बिझिनेस हातचा जाऊ द्यायचा? चंद्र प्रवासाचे रॉकेट वर्षांतून दोनदाच सुटणार असून दोन्ही मिळून दहाबारा पर्यंटनप्रेमी खासगी व्यक्ती ह्या स्टेशनवरून प्रवासाला निघतील. 10-12 पर्यटकांची सेवा करण्याच्या बिझिनेसमधून किती प्राप्ती होईल ह्याचाही ह्या कंपन्यांनी अंदाज घेतला असेलच. The moon is just the beginning; Mars is the goal हे आधीच ठरले असल्याने दीर्घकालीन फायद्यावर ह्या कंपन्यांनी लक्ष केंद्रित केले असेल हे उघड आहे.
हे आंतरराष्ट्रीय अंतराळ प्रवास स्टेशन असल्याने तेथून अन्य देशाचे खासगी अस्ट्रोनॉटही जेट उड्डाण करू शकतील., त्याप्रमाणे कोणत्याही देशआचे पर्यटक इथून चंद्र प्रवासाला निघू शकतील. त्यांच्याकडे अमेरिकेचा व्हिसा असण्याची गरज नाही. पृथ्वीपासून 2000 किलोमीटर उंचीवर अंतराळात पहिले सुसज्ज स्टेशन स्थापन करण्याच्या उद्देशाने तीस पानांचे एक धोरणविषयक निवेदनच नासाने प्रसृत केले. त्या अंतराळ स्थानकावर सुसज्ज संशोधन सोयीदेखील राहतील. पुढेमागे नासादेखील ह्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनाचा भाडे देऊन वापर करू शकणार. 
सुमारे तीस वर्षापासून नासा अंतराळ पर्यटनाचे स्वप्न पाहात असून त्यासाठी कॅलिफोर्नियात एडवर्ट एअर बेस येथे जेट उड्डाणाच्या चाचण्या सुरू होत्या, त्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतरत अंतराळ स्टेशनाची कल्पना साकार होण्याची वेळ आली आहे. आता खासगी कंपन्यांनी पुढे यावे अशी नासाची अपेक्षा आहे. अंतराळ स्टेशन स्थापन करण्याची जबाबदारी धडाडीबाज खासगी कंपन्यांनी उचलावी ही ह्या प्रस्तावामागची कल्पना आहे. पहिले लाँचिंग 2021 मध्ये शक्य व्हावे आणि 2024 वर्षांत नियमित चंद्र सेवा सुरू होऊन पर्यटक चंद्रावर उतरावेत अशी अपेक्षा आहे. ह्या अंतराळ स्टेशनवर 1 किलो माल पाठवण्यासाठी 3 हजार डॉलर्स खर्च अपेक्षित आहे तर रॉकेट प्रवासात जिवंत राहण्यासाठी 11250 डॉलर्सचा खर्च तर जेवण, औषधे, व्यायामा सोयी वगैरेंसाठी 22500 खर्च होऊ शकतील.
वीणाताई, केसरीभाऊ! त्वरा करा. वीणा वर्ल्ड, केसरी ट्रॅव्हेल्स, आयटीडीसी, एमटीडीसी ह्या कंपन्यातील सगळ्या मॅनेजरांनो इकडे लक्ष द्या! 2024 नाही तर किमान 2030 मध्ये चंद्र व्हायेज बुकिंग मिळवा. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा!

रमेश झवरNo comments: