Friday, January 10, 2020

बेडर फादर, निर्भीड कवी


मराठी साहित्यिक-कवी कणाहीन, लेचेपेचे नाहीत हे उस्मानाबाद येथे भरलेल्या ९३ व्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो आणि कवी ना. धों महानोर ह्या दोघांनी केलेल्या भाषणावरून स्पष्ट झाले. गेल्या ६ वर्षांत धर्मस्वातंत्र्यावर आणि विचारस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा छुपा प्रयत्न सत्ताधारी आणि त्यांचे चेलेचपाटे करत आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गुंड घसुवून विरोधकांना बदडून काढण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली दिसते. रोज जे घडत आहे तिकडे दुर्लक्ष करून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी त्यावर मौन पाळले असले तर ते महाराष्ट्राला मुळीच आवडले नसते. देशात सुरू असलेल्या दंडुकेशाहीविरूध्द सुदैवाने साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो ह्यांनी आणि उद्घाटक ना. धों महानोर ह्या दोघांनीही जोरदार आवाज उठवला. एखाद्याचा जीव घेणे, विद्यार्थ्यांना मारहाण करणेही हीच का भारतीय संस्कृती आहे का, असा सवाल फादर दिब्रिटो ह्यांनी विचारला. त्यांचा सवाल कुठल्याही औपचारिक निषेधाच्या ठरावापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. कवी ना. धों महानोर काही वर्षांपूर्वी आमदार म्हणून वावरले. तरीही राजकारणी व्यक्ती अशी महानोरांची ओळख कधीही निर्माण झाली नाही. देशाला कुठलीही जाता नाही वा धर्म नाही, आंदोलन करणारी माणसे देशद्रोही आहेत असे म्हणण्याइतका करंटेपणा महाराष्ट्रात नाही, असे उद्घाटनाच्या भाषणात महानोरांनी स्पष्टपणे सुनावले.
भिन्न विचार मांडणा-यांच्या विचारांचे खंडन करण्याचा प्रयत्न सत्ताधा-यांच्या चेल्याचपाट्यांनी केला असता तर समजण्यासारखे होते. परंतु त्यांनी तसे केले नाही. भिन्न विचारसरणीच्या लेखक-पत्रकार, कलावंतांचे समाजमाध्यमातून ट्रोलिंग करण्याचे सत्र त्यांनी सुरू केले. ट्रोलिंगचे स्वरूप पूर्णतः गुन्हेगारी असूनही त्याविरूध्द कारवाई करण्याच्या बाबतीत सत्ताधारी पक्षाने कुचराई केली. इतकेच नव्हे तर, पाकिस्तानात चालते व्हा असे विचारवंत, कलावंत, साहित्यिक ह्या सर्वांना सुनावण्यासही कमी केले नाही. ह्या सा-याची दखल मराठी साहित्याच्या सर्वोच्च व्यासपीठावरून घेतली जाणे अपेक्षित होते. ती अपेक्षा सा-यांनी पूर्ण केली. भूतपूर्व संमेलनाध्यक्ष अरूणा ढेरे ह्यांनीही बदलत्या वातावरणाची सणसणीत दखल घेतली.
आता एकच मुद्दा शिल्लक राहतो. तो म्हणजे खुल्या अधिवेशनात निषेधाचा ठराव संमत करण्याचा!  पण असा ठराव संमत करून घेणे ही निव्वळ औपचारिकता ठरते. मराठी साहित्य संमेलनास हजेरी लावताना राजकारणी मंडळींनी नेहमीचा राजकीय डामडौल बाजूला ठेवला पाहिजे अशी मराठी साहित्यरसिकांची फार जुनी अपेक्षा आहे. त्या अपेक्षेकडे लक्ष न देता साहित्य संमलेनाला उद्घाटक म्हणून मंत्र्याला निमंत्रण देण्याचा अलिखित प्रघात मात्र आयोजकांनी कधीच बदलला नाही. मात्र उस्मानाबादेतील संमेलनाच्या आयोजकांनी ह्या वेळी उद्घाटक ह्या नात्याने मंत्र्यांना मुळी निमंत्रणच दिले नाही. काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांनी संमेलनाला हजेरी लावली; पण एक सामान्य रसिक म्हणून!
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून राजकीय प्रतिक्रिया व्यक्त करणे स्वाभाविक असले तरी प्रतिक्रियेचे महत्त्व हे प्रासंगिकच असते. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. अध्यक्षपदावरून भाषण करताना मराठी साहित्यासमोरील आव्हानांचा फादर दिब्रिटो ह्यांना विसर पडलेला नाही. मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे का ह्या प्रश्नावर फादर दिब्रिटो ह्यांनी दिलेले उत्तर कदाचित सर्वांना मान्य होणार नाही. मराठी भाषा मरणपंथाला लागली असे त्यांना वाटत नाही. भाषणात त्यांचा सूर आशावादी आहे. मरणयातना किंवा मानवी जीवनातल्या वेदना हीच साहित्याची जननी आहे ह्या त्यांच्या विचाराशी असहमत होता येणार नाही. खरे तर सृजन प्रक्रियेतल्या एका फार मोठ्या सत्यावर त्यांनी नकळतपणे बोट ठेवले. मराठीतल्याच नव्हे तर अन्य भाषेतील श्रेष्ठ साहित्याच्या निर्मितीचा इतिहासावर फादर दिब्रिटोंनी नजर टाकली आहे. त्यांना जे दिसले ते सत्य त्यांनी भाषणात मांडले आहे. लौकिक यशाची पर्वा न करणा-या लेखकांना अलौकिक यश लाभले आहे हेच ते चिरंतन सत्य!  
त्यांच्या प्रदीर्घ भाषणात अनेक मुद्दे आहेत की ज्यांचा स्वतंत्रपणे परामर्ष घेता येईल. ह्या दृष्टीने त्यांचे भाषण समाजमाध्यमातून प्रसिध्द होणे आवश्यक आहे. किंबहुना संपूर्ण मराठी साहित्य संमेलनची विडिओ प्रकाशित झाला पाहिजे. त्यांच्या भाषणातील प्रत्येक मुद्द्यावर चर्चा सत्रे आयोजित झाली पाहिजेत.
रमेश झवर

No comments: