शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या निधानाचे वृत्त प्रसारित होताच अवघा मराठी मुलूख हळहळला! मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणा-या शिवाजीमहाराजांबद्दल मराठी मुलूखात सर्वत्र आदराची भावना आहे. मराठेशाहीचा अस्त होऊन ब्रिटिशांचा काळ अवतरला. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळून पाऊणशे वर्षेंउलटून गेली. तरीही शिवछत्रींबद्दल जनतेला वाटणारा आदर यत्किंचितही कमी झाला नाही. शिवाजीमहाराजांची भव्यदिव्य स्वरूपाची ऐतिहासिक कामगिरीदेखील स्टेडियम किंवा चौपाटीसारख्या मैदानावर खास उभारण्यात आलेल्या तितक्याच भव्य आणि विशाल रंगमंचावर दाखवण्याचा धाडसी प्रयोग शिवशाहिरांनी केला. बरे. एखाददुसरा प्रयोग करून ते स्वस्थ बसले नाही. त्यांचा तो ध्यास आणि श्वास होता. जिथे जिथे शिवाजीमहाराज गेले तिथे तिथे बाबासाहेब स्वतः गेले. शिवाजीमहाराजांनी घेतलेल्या प्रत्येक किल्ल्यावर ते स्वतः गेले. त्यासाठी थंडीवारा किंवा उन्हाची त्यांनी पर्वा केली नाही.
पुरंदर किलिल्याच्या परिसरातले सासवड हे त्यांचे मूळ गाव. पुरंदर किल्ल्यावर ते किती वेळा गेले असतील त्याला गणती नाही. सरदार घराण्यात त्यांचा जन्म झालेला होता. परंतु मनाने ते शिवकाळातच वावरत राहिले. शरीरालाही त्यांच्या मनाने शिवाजीमहाराज जिथे जिथे गेले तिथे तिथे खेचून नेले. शिवाजीमहाराजांचे चरित्र गोष्टीरूपाने सांगायचे अेस त्यांच्या मनात घोळत होते. त्यांना योग्य तो फॉर्म सापडत नव्हता. आपण पाश्चात्य लेखकांचे कौतुक करतो. कारण ते एखादे पुस्तक लिहण्यासाठी खूप कष्ट घेतात.बाबासाहेबांचे कौतुक करताना मात्र मराठी समीक्षकांनी हात आखडता घेतला होता हे कदाचित नव्या पिढीला माहित नसेल.
शेक्सपियरच्या नाटकांनी केवळ ब्रिटिश जनतेलाच नव्हे तर, ब्रिटिश साम्राज्यातील प्रत्येक देशातील लेखकांना वेड लावले होते. महाराष्ट्र ही मुळात नाटकवेडा. त्यामुळे शेक्सपियरच्या नाटकांतील इंग्रजी भाषाच मराठी लेखक, सरकारी अधिकारी ह्यांच्या तोंडी खिळली. शेले हे तर मराठी मनाचे माहेर बनले होते. त्याचप्रमाणे शेक्सपियरची नाटकांनी, विशेषतः हॅमलेट आणि ऑथेल्लो ह्या दोन नाटकांच्या प्रयोगात मराठी माणूस रमून गेला. कॉलेजच्या अभ्यासात शेक्सपियरच्या एका नाटकाचा अभ्यास मस्ट ठरला होता. बाबासाहेबांना हा मान मिळाला होता. फक्त भाषा मराठी जिथे जिथे मराठी भाषा बोलली जात होती त्या त्या गावात जाणता राजाचे प्रयोग झाले!
‘शिवशाहीर’ ही पदवी बाबासाहेबांना लोकांनी उत्स्फूर्तपणे बहाल केली. शंभरी ओलांडण्याच्या सुमारासच त्यांना मृत्यूने गाठले! अशा ह्या थोर लेखकाची माझी गाठ पडण्याचा विलक्षण योगायोग माझ्या आयुष्यात आला. त्यांच्याबरोबर शिवप्रभूंची पूजा करण्याचा मानही मला मिळाला. ठाण्यात दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे जाणाता राजाचा प्रयोग ठेवण्यात आला होता. ठाण्याचे त्यावेळचे वार्ताहर सोपान बोंगाणे ह्यांनी मला फोन करून सांगतिले, झवरसाहेब, आज जाणता राजाचा प्रयोग आहे. त्या प्रयोगाला तुम्ही सहकुटुंब यावे अशी आनंद दिघेसाहेबांची इच्छा आहे. मी बरोबर संध्याकाळी ५ वाजता तुम्हाला गाडी पाठवतो. मी काही उत्तर देण्याच्या आता त्यांनी फोन बंद केला. खरेतर, कुठेही प्रमुख पाहुणा म्हणून जायचे नाही असा निर्णय खूप वर्षांपूर्वी मी घेतला होता. पण तो नियम मला बोंगाणेंनी मोडायला लावला. परंतु तो नियम मोडल्यामुळे बाबासाहेबांबरोबर काही तास घालवण्याची संधी मला मिळाली! अशा प्रकारच्या संधीची वाट पाहणे हे माझ्या स्वभावात नव्हते.
बाबासाहेबांबरोबर नी सहपूजेत सामील होण्यासाठी व्यासपाठीवर गेलो. बाबासाहेबांनी माझ्या डोक्यावर शिंदेशाही पगडी चढवली आणि पूजेत मी सहभागी झालो! खाली उतरलो तरी मी आनंदाच्या डोहात तरंगत होतो. कार्यक्रम संपल्यावर मी बाबासाहेबांना चरणस्पर्ष करून त्यांचा निरोप घेतला. गाडीतही मी कोणाशी बोललो नाही. मी आनंदाच्या डोहात तरंगत राहिलो.
बाबासाहेबांना माझी विनम्र श्रध्दांजली!
रमेश झवर
No comments:
Post a Comment