Monday, October 17, 2022

निर्मलाअक्कांचा विनोद

 जगभरातील सरकारांचे अर्थमंत्री विनोद करण्याचे टाळतात! परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन्ह्या जगभरातील अर्थमंत्र्यांत बहुधा अपवाद असाव्यात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीनिमित्त त्या वॉशिंगटन येथे आल्या आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, भारतीय अर्थव्यवस्था चालू वर्षाच्या अखेरीस ७ टक्क्यांवर गेलेली असेल. त्यांनी असा दावा करावा ते ठीक आहे. परंतु डॉलरच्या तुलनेने रुपया घसरत असल्याचे जेव्हा त्यांच्या निदर्शनास आणण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या, डॉलर भक्कम आहे हे मान्य ;  परंतु रुपया घसलेला नाही! वस्तुत : परकी चलनाची गंगाजळी मागील वर्षी ६४२.८७ अब्ज डॉलर्सवरून घसरून ह्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५३२.८७ वर आली. परकी गंगाजळी डॉलर-रुपया दर घसरू नये म्हणूनच करण्यात आल्याचे त्यांनी सूचित केले आहे.  तसे स्पष्टपणे सांगण्यास मात्र त्या तयार नाही.

रुपया घसरू नये म्हणून रिझर्व्ह बँकेकडून सुरू असल्याच्या प्रयत्नांचा अर्थमंत्र्यांनी विस्तृत आढावा घेतला. बहुतेक देशातील चलन डॉलरच्या तुलनेने घसरत असल्याची मोलाची महिती त्यांनी दिली. वस्तुस्थिती अशी आहे की अवघ्या जगावर मंदीचे सावट येत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. वास्तविक पाश्चात्य देशांबरोबर भारताची तुलना करण्याचे त्यांना काहीच कारण नव्हते. त्यांच्या वक्तव्याला जगभरातील देश फारशी किंमत देणार नाहीच. आर्थिक विषयाचे पत्रकार तर मात्र ती मुळीच देणार नाही. कारण, जगातील अनेक वित्तीय संस्थांनी भारतातला पैसा अन्य देशांच्या बाजारात गुंतवण्यास सुरूवात केली आहे. अजून तरी मुंबईतील दोन्ही शेअर बाजारांतील दलालांनी त्यांच्या खरेदी विक्री व्यवहाराची स्वतः ठरवलेली रेंज सोडलेली नाही. थोड्या फार फरकाने ह्या बाबतीत त्यांना थोडेफार यशही मिळाले. शेअर बाजारातील दलालांनी आक्रमक पवित्रा घेतलेला दिसला नाही. म्हणून अर्थविश्व अबाधित राहिले आहे. निर्मला सीतारामन्‌ ह्यांच्या मते, भारत आपल्या ठरवलेल्या लक्ष्यापासून ढळणार नाही!

असो.

रमेश झवर

https://rameshzawar.co.in

No comments: