देगलूर येथे राहूल गांधींच्या भोरत जोडो यात्रेने महाराष्ट्रात प्रवेश केला, खरे तर, महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला ओळखला जात होता. केंद्रात मोदींच्या नेतृत्वखाली भाजपाची सत्ता येताच भाजपाचे देशभर साम्राज्य उभारण्याची महत्त्वाकांक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळगली. वास्तविक स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी असूनही काँग्रेसला देशात एकछत्री साम्राज्य स्थापन करणे काँग्रेसला जमले नाही. संघाप्रणित हिंदुत्वाच्या भरवंशावर सूक्तासूक्त मार्गाच अवलंबून करून हा प्रयत्न मोजींनी करून पाहिला. केवळ ‘सबका साथ सबका’ अशी घोषणा दिल्याने जर देशाचा विकास करता आला असता तर भारताचा कधीच विकास झाला असता. पण तसे घडणे शक्यच नाही. हे कॉंग्रेस नेते राहूल गांधी ह्यांनी ओळखले आहे. म्हणूनच मोदी सरकारविरूध्द जनजागृती करण्यासाठी त्यांनी ‘भारत जोडो यात्रा’ सुरू केली. ह्या यात्रेला आतापर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातही भारत जोडो यात्रेला काँग्रेसच्या एके काळच्या बालेकिल्ल्यात प्रतिसाद मिळेल असे वातावरण आहे.
महागाई आणि बेरोजगारीच्या समस्येने देशभरातील शेतकरी आणि कामगारांचे कंबरडे मोडले आहे. गुजरातच्या दोन उद्योगपती घराण्यांना सार्वजनिक उद्योगांचे मोदी सरकारने लचके तोडून दिले ! परिणामी मध्यमवर्गियांच्या चांगल्या वेतनमानाची संधी संपुष्टात आला. देशभरचा ‘कॅशरिच’ किराणा आणि धान्यव्यापारावर रिलायन्सला वर्चस्व स्थापन करायचे आहे तर अदानीला विमानतळ आणि रेल्वे व्यवस्थापन ह्या व्यवस्थापनाकडून कमिशन खाण्याचा धंदा करायचा आहे. भारत पेट्रोलियमकडून कमिशनकडून फुकटम्फाकटी कमाई तर अदानींना ह्यापूर्वीच सुरू झाली आहे. त्यांनी त्यांच्याकडील सेवा महाग केल्या नसल्या तरी आज ना उद्या त्या महाग होणारच आहेत हे सांगण्याची गरज नाही. सर्वसामान्य लोकांनी रस्त्यावर वडापावच्या आणि पकोडा विकण्याच्या गाड्या लावायच्या अशी मोदी सरकारची अपेक्षा आहे. चांगले आणि सुरक्षित जीवनमान मिळण्याची आशा त्यांनी कधीच बाळगायची नाही असे मोदी सरकारला अभिप्रेत आहे. देशाच्या कल्याणाची विचारसरणी बाळगावी अशी पंतप्रधानसारख्या सर्वोच्च पदावर आरूढ झालेल्या मोदींकडून अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात काय दिसले? आपल्या राज्यापुरताच विचार करणारा एक बिलंदर कार्यकर्ता पंतप्रधान झाला! काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली ५०० आणि हजाराच्या नोटा रद्द केल्या. प्रत्यक्षात काय झाले? ह्या परिस्थितीचा फायदा घेऊन अनेकांनी काळा पैसा पांढरा करून घेतला.
राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या मागे ही सगळी पार्श्वभूमी आहे. संसदेत विरोधी पक्षाचा आवाज ऐकायलाच नाही. बहुतेक विधेयके एतर्फी मंजूर करण्यात आली. जीएसटीच्या नावाखाली भरमसाठ करवाढ करण्यात आली. देशातली वाढती महागाई ह्या जीएसटीचेच फळ आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले लोक अडाणी असतील. पण त्यांना ग्यानबाचे अर्थशास्त्र बरोबर समजते. तेच लोक भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. मंदिरवगैरे बांधण्याची मागणी करणारी ही यात्रा नाही. देशातील गरीब मध्यमवर्गीयांच्यामनिचा आवाज उठवण्यासाठी ही यात्रा आहे. म्हणूनच ठिकठिकाणी लोक ह्या यात्रेत सामील होत आहेत. ‘दांडी यात्रे’मुळे स्वातंत्र्य लढ्याला बळ मिळाले होते. भारत जोडो यात्रेमुळेही अशीच लोकजागृती होणार आहे. हा ‘जनिंचा प्रवाहो’ देशात सध्या सुरू असलेल्या अप्रत्यक्ष लूटमारीच्या धोरणांविरूद्ध हा आवाज आता थांबणार नाही.
रमेश झवर
No comments:
Post a Comment