कॉलेजमध्ये असताना त्यांना कविता लिहण्याचा
छंद होता.
तो त्यांनी मनोमन जोपासलाही. हे म. ना. अदवंतांना
कळताच त्यांनी आणि प्रा. राजा महाजन ह्या दोघांनी
महानोरना उत्तेजन दिले. राजा महाजन हे अहिराणी भाषेत कविता लिहीत.
ललितबंधच्या क्षेत्रात म. ना. अदवंतांचे नाव महाराष्ट्रभर गाजलेले होते. आपल्या विद्यार्थ्यांच्या
काव्यस्फूर्तीला उत्तेजन देणे हे दोघे आपले कर्तव्य समजायचे.
ना. धों. महानोर,
दिवाकर गंधे, पुरूषोत्तम भावसार. मंगला नाडकर्णी ह्यांचे कौतुक करण्याच्या बाबतीत दोघांनी कधी हात आखडता घेतला नाही. कवितेच्या प्रांतात मला लुडबूड करायचीच नव्हती.
विनोदी लेख आणि कथा लिहण्याची मला इच्छा होती. सुदैवाने साप्ताहिक
गावकरी आणि महाराष्ट्र टाईम्स ह्या दोन नियतकालिकांनी मला प्रसिध्दी दिली. साहजिकच
अदवंतसरांनी आणि राजा महाजनांनी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
त्यामुळे माझा भआव वधारला.
मी प्री डिग्रीमध्ये असताना कॉलेजतर्फे
‘हिरवळ’ नावाची
भित्तीपत्रिका सुरू करण्याचा उपक्रम अदवंतसरांनी सुरू केला. ह्या उपक्रमाची
जबाबदारी त्यांनी प्रा. सुधाकर
जोशी ह्यांच्यावर सोपवली. तो संपूर्ण अंक सुंदर हस्ताक्षरात लिहून काढण्याची जबाबदारी माझे मित्र दिवाकर गंधे ह्याने पत्करली. कॉलेजमध्ये आणि घरीदारी लिहण्याखेरीज आम्हाला दुसरे
काही सुचत नव्हते. दिवाकरने त्याही पुढे मजल मारून ‘साहित्य
साधना’
नावाची संघटना स्थापन केली. साहित्य साधनेची बैठक
दर रविवारी त्याच्या घरी भरत असे. बैठकीत प्रत्येक जण त्याचे
लिखाण वाचून दाखवायचा प्रा. सुधाकर जोशी आवर्जून उपस्थित राहायचे.
ना. धों. पळसखेड्याला राहायचे.
त्यामुळे इच्छा असूनही आपल्याला साहित्य साधनाच्या बैठकीला हजर राहता
येत नाही ह्याची खंत नाधोंनी दिवाकरकडे आणि माझ्याकडे अनेकदा व्यक्त केली. मूळजी जेठा कॉलेजमध्ये आयोजित करण्यात
आलेल्या कविसंमेलनास मात्र नाधों आवर्जून हजर राहायचे.
पळसखेडे आणि जळगावमधले अंतर लक्षात घेता सायकलीने येणे सोपे नव्हते.
कवितेबद्दल त्यांच्या मनात प्रेम होते.
थोडं उशिरा का होईना ते येणार ह्याची आम्हा सर्वांना खात्री होती. आमची खात्री कधीही खोटी ठरली नाही
हे आवर्जून सांगितले पाहिजे.
पाहता पाहता कवी म्हणून नाधोंचे नाव महाराष्ट्रभर
गाजू लागले. विद्याधर गोखले ह्यांनी लोकसत्ता दिवाळी अंकाचे काम माझ्याकडे सोपवले.
त्यांनी नावांची यादी तयार करून माझ्या हातात दिली. त्यानंतर मी भराभर एकेका कवीला
फोन लावायल सुरूवात केली. महानोरना फोन लावला तेव्हा कळले की त्यांना जसलोक रुग्णालयात
हलवण्यात आले आहे. त्यांच्या वतीने कुणीतरी नर्सबाई बोलत होत्या. महानोरनी मला निरोप
दिला. ‘ह्या
वर्षी तरी मी कविता देऊ शकणार नाही. मलामाफ करा. बळावलेल्या काविळीमुळे मी जसलोकात
दाखल झालो आहे.’
दुस-या दिवशी त्यांचे
पत्र आले. त्या पत्रात त्यांनी लिहले होते, ह्या वर्षी माफ करा. पुढच्या वर्षी मी तुम्हाला
नक्की कविता देईन. नंतर विधानपरिषदेवर त्यांची
आमदार म्हणून नेमणूक झाली. ते आणखी बिझी झाले. मी जळगावला जेव्हा जेव्हा माझ्या घरी
जाई तेव्हा तेव्हा महानोरना त्यांच्या घरी जाऊन भेटत असे. चहापोहे घेतल्याशिवाय त्यांनी
मला कधी जाऊ दिले नाही.
आज मित्रवर्य ना. धों गेल्याची बातमी फेसबुकवर वाचताच
मन उदास झाले.
रमेश झवर
No comments:
Post a Comment