चंद्रावर उतरण्याच्या दृष्टीने ‘विक्रम लँडर’ सज्ज झाले असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ते उतरवण्याची घडी समीप आली आहे. हे लँडर चंद्रभूमीवर विशिष्ट जागी उतरवण्यासाठी चांद्रायानाचा वेग कमी करावा लागतो. श्रीहरीकोटा अवकाशयान केंद्रावरील शास्त्रज्ञांनी यानाचा वेग शुक्रवारपासून कमी करत आणला. ह्या मोहिमेतील सारे टप्पे यशस्वीरीत्या ओलांडण्यात आले. आता हा अखेरचा टप्पा. लँडर विशिष्ट जागी उतरवणे महत्त्वाचे असते. ह्या वेळी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले जाणार आहे. ते एकदाचे नियोजित स्थळी आणि नियोजित वेळी उतरले की चांद्र मोहिम यशस्वी झाली असे म्हणता येईल.
चंद्रभूमीवरील मातीचे परीक्षण
करण्याच्या उद्देशाने ही मोहिम राबवण्यात आली आहे. सत्तरीच्या दशकात अमेरिकन
अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग ह्याने जेव्हा चंद्रभूमीवर पाऊल टाकले तेव्हा मी
सांजमराठाचा संपादक होतो. ‘चंद्रा तुझे एकाकीपण
संपले’ अशी बॅनर हेडलाईन सांज मराठाच्या अंकाला दिली होती.
नील आर्मस्ट्राँगला मी पृथ्वीपुत्र नील आर्मस्ट्राँग ह्याने चंद्रभूमीवर पाऊल
ठेवले ह्या वाक्याने बातमीची सुरूवात केली. काही बावळट पोथीनिष्ठ वाचकांचे फोन
आले. ‘अमेरिकन अंतराळवीर’ म्हणण्याऐवजी
तुम्ही पृथ्वीपुत्रच म्हणणार! मराठा हा कम्युनिस्टांचा पेपर आहे ना ! तुम्हाला
मालकाचे ऐकणे भागच आहे. वर्तमानपत्रात बातमी लिहताना पत्रकाराची वैयक्तिक मते
किंवा भूमिकेचा काही एक संबंध नाही. मराठाचे संपादक ह्यांच्या आम्हाला कोणत्याही
सूचना नव्हत्या. मूळ पीटीआय किंवा रॉयटरच्या बातमीनुसार बातमी लिहावी हेच
उपसंपादकांकडून अपेक्षित असते. मी लिहलेला इंट्रो बरोबरच होता. एक आवश्यक मुद्दा
नव्या पिढीतील वाचकांच्या लक्षात यावा म्हणून मी जुन्या काळातील बातमीचा उल्लेख
केला.
चांद्र मोहिम राबवण्यामागे अनेक कारणे आहेत. खरे तर, जगातील सर्वच अंतराळ संशोधन संस्थांचा मंगळावर जाण्याचा इरादा आहे. मंगळावर यान पाठवताना चंद्र हे पहिले स्टेशन राहणार आहे. तिथे थोडा वेळ थांबून यान मंगळाच्या प्रवासाला निघेल. मंगळ प्रवासाच हा कार्यक्रम जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांनी ठरवला आहे. म्हणून चंद्राच्या भूगर्भात कुठल्या प्रकारची खनिजे आहेत ह्याची अद्यावत माहिती भारताकडून मिळवली जात आहे. इस्रोच्या मोहिमातले हे लॉजिक आहे अनेकांना माहित नाही. परंतु अंतराळ संशोधकांना, शास्त्रज्ञांना ते निश्चित करावेच लागते. त्यानुसार तूर्त तरी मातीपरीक्षण हा उद्देश ठरवण्यात आला आहे. हे लक्षात घेता विक्रमचे दि. २३ रोजी होणारे लँडिंग महत्त्वाचे राहील. ते एकदा यशस्वी झाले की भारताची ही चांद्रयान-३ मोहिम फत्ते झाली असेच म्हटले पाहिजे !
रमेश झवर
No comments:
Post a Comment