Wednesday, March 29, 2023

बँकिंगची मुहूर्तमेढ

 सिलीकॉन व्हॅली बँक बुडाल्यानंतर अमेरिकेतील बँक व्यवसायात चिंतेचे वातावरण पसरले. ह्या चिंतेचे प्रतिबिंब अमेरिकेवासी भारतीय आयटी व्यवसायातही पडले. कारण, अनेक आयटी कंपन्यांचे उत्पन्न ह्या बँकांवर अवलंबून होते. अजून ह्या बँकबुडीचा भारतावर कितपत परिणाम होईल ह्याचा पध्दतशीर अभ्यास अर्थ मंत्रालयाने केलेला नाही. एक समिती नेमण्यात आली असून त्या समितीचा नेमका अजेंडा काय हे अजूनही कोणालाही नीटसे उमगलेले नाही. अठराव्या शतकात हुंडी वटवण्याचा व्यवसाय करणा-या मारवाडी-गुजराती पेढ्यांच्या मनमानी कारभाराच्या तक्रारी कंपनी सरकारने कशा हाताळल्या ह्याची माहिती गोविंद नारायण माडगावकर ह्यांच्या ‘मुंबईचे वर्णन’ पुस्तकात वाचायला मिळाली. अनबँकिंग रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल हे ठरवण्यासाठी १७२० साली तत्कालीन कंपनी सरकारने मुंबईतील व्यापा-यांची एक बैठक बोलावली.

ह्या बैठकीस हंडणावळीचा व्यवसाय करणारे सावकार, नाणावटी वगैरे मंडळी आवर्जून हजर होती. हुंडी वटवण्याचा व्यवसाय करणारे हुंडीवाल्यांकडून भरमसाठी कमिशन तर आकारायचेच, शिवाय हुंडी वटणा-यांकडे रक्कम कमी पडल्यास त्यांना भरमसाठ व्याजाने पैसे द्यायचे. ह्या बेबंद व्यवसायाचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी बँक काढण्याचा कल्पना कंपनींच्या अधिका-यांनी सुचवली. त्यानुसार सभा घेण्यासाठी दवंडी पिटवली. त्या सभेत कंपनीच्या अधिका-यांनी ह्या पहिल्यावहिल्या बँकेसाठी १ लक्ष रुपयांचा निधीही जमा झाला. बँकेत बचत खाती सुरू करण्याची कल्पना राबवण्यात आली. दिवसास शेकडा एक दुगाणी ( २ पया ) व्याजही देण्याचे ठरले. हुंडी वटवण्याचा व्यवसाय ह्या बँकेकडे सोपवण्यात आला. परंतु सावकारी करणा-यात निष्णात असलेल्या मारवाडी- गुजराती मंडळींनी ह्या बँकेचा पैसा वापरून आपला जुना धंदा चालू ठेवला. शेवटी बँकेचा पैसा त्यांच्याच हातात खेळत राहिला. ज्यांनी तो वापरला. वेळच्या वेळी परत करण्याचे नाव त्यांनी काढले नाही. परिणामी ही पहिलीहिली बँक बंद पडली ! १८४० साली बँक स्थापन करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला. मागच्या चुका टाळल्यामुळे ह्या बँकेकडे ५२ लाख २५ हजार रुपयांचे भांडवल जमा झाले. त्या भांडवलामुळे बँकेकडे ३ कोटींचे खेळते भांडवल तयार झाले. सेव्हिंग बँकेची कल्पना जोरदार पध्दतीने राबवण्यात आली. बचतीवर सालिना ४ टक्के व्याज देण्याचा निर्णय झाला. ह्याच धर्तीवर अन्य ७ बँका निघाल्या.

त्या काळात बँकिंग व्यवसाय करण-या बँकांना बँक पेढी असेच संबोधले जायचे. ह्या बँकांना रेल्वेचे, वाढत्या आयातनिर्यात व्यापाराचाही फायदा झाला. आर्थिक व्यवहारात प्रामाणिकपणाला अत्यंत महत्त्व असेत. ते ओळखून ह्या बँकांचा कारभार जास्तीत जास्त पारदर्शी करण्यात आला. त्या काळी स्थावरमालमत्ता गहाण ठेवणा-यांना बँकिंग पेढ्यांकडून पध्दतशीर कर्ज मर्यादा मंजूर केल्या गेल्या. मुंबई शहरात झालेली व्यापारउद्योगांची भरभराट हे त्याचा दृश्य परिणाम आहे. जे कुठल्याही शहराला जमले नाही ते मुंबई शहराला जमले.

मुंबई शहराच्या व्यवसायाचा फायदा गुजरातला होत राहावा म्हणून फाजलअली कमिशनच्या शिफारशी डावलून महाराष्ट्राची गुजरातबरोबर सांगड बांधण्यात आली. आजही केंद्रातल्या गुजराती नेत्यांचा मुंबईवर डोळा आहेच !

रमेश झवर

Friday, March 24, 2023

खासदारकी घालविणारा कायदा

 सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी एका प्रचार सभेत केलेल्या भाषणात मोदी’ आडनाव असलेल्या सर्वांची सरसकट बदनामी केल्याबद्दल दोषी ठरून दोन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा झाल्याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आले आहे. सन २०१९ च्याच निवडणुकीत केरळच्या वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी लोकसभेवर निवडून गेले होते. परंतु बदनामीच्या एका फौजदारी खटल्यात सूरत येथील मुख्य महामगर दंडाधिकारी न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याने संविधानाचा अनुच्छेद १०२ (१) आणि लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम ८ अन्वये राहुल गांधी लोकसभा सदस्य राहण्यास दि. २३ मार्च२०२३ पासून अपात्र ठरले असल्याची अधिसूचना लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी जारी केली. कायद्यानुसार राहुल गांधी यांना ही अपात्रता दोन वर्षांची शिक्षा भोगून झाल्यानंतरही त्यापुढील सहा वर्षे लागू राहील. म्हणजेच या काळात ते संसदेची किंवा कोणत्याही राज्य विधिमंडळाचीही निवडणूक लढवू शकणार नाहीत.
अपात्रतेच्या या गंभीर राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी राहुल गांधींना आता प्रदीर्घ आाणि खडतर कायदेशीर लढाई लढावी लागेल. यासाठी त्यांना कदाचित सत्र न्यायालयउच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय अशा क्रमाक्रमाने वरच्या न्यायालयांमध्ये अपिले करावी लागतील. दंडाधिकार्‍यांच्या निकालास या वरिष्ठ न्यायालयांकडून सर्वप्रथम स्थगिती मिळविणे आणि अंतिमत: तो निकाल रद्द करून घेणे हा एकमेव मार्ग त्यांच्यापुढे आहे. ही स्थगिती केवळ शिक्षेला मिळविणे पुरेसे नाहीतर त्यांना दोषी ठरविण्याच्या दंडाधिकार्‍यांच्या निष्कर्षालाही त्यांना स्थगिती मिळवावी लागेल. अशी स्थगिती त्यांना मिळविता आली तर ती स्थगिती लागू असेपर्यंत त्यांची अपात्रताही स्थगित राहील. या दरम्यानच्या काळात त्यांना लोकसभेचे गेलेले सदस्यत्व परत मिळेल व पुढची निवडणूक लढण्यासही ते पात्र ठरतील. अंतिमत: हा निकाल रद्द करून घेण्यात ते यशस्वी ठरले तर त्यांच्यावरील अपात्रतेची टांगती तलवार कायमची दूर होईल. मात्र अंतिम निकाल त्यांच्या विरुद्ध गेला तर त्यांची स्थगित राहिलेली शिक्षा व अपात्रता त्या दिवसापासून पुन्हा लागू होईल. म्हणजे अंतिम निकालानंतर त्यांना शिक्षेच्या दोन वर्षांसह एकूण आठ वर्षांची अपात्रता लागू होईल.
राहुल गांधीची शिक्षा व अपात्रता यावरून सत्ताधारी व विरोधक परस्परांवर तुटून पडले आहेत. राहूल गांधींना अपील करण्याची फुरसतही न देता त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुडाने करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. निव्वळ कायद्याच्या दृष्टीने विचार करता या आरोपात काही तथ्य नाहीअसेच म्हणावे लागेल. राहुल गांधीना ही अपात्रता प्रचलित कायद्यानुसार आपोआप लागू झाली आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्याची कारवाई कोणी केली आहेअसे म्हणता येत नाही. लोकसभा सचिवालयाने काढलेली अधिसूचना ही राहुल गांधींना अपात्र ठरविणारी नाही. तर ते  दि. २३ मार्चपासून लोकसभेचे सदस्य राहण्यास अपात्र ठरले आहेतही कायदेशीर वस्तुस्थिती त्या अधिसूचनेत केवळ नमूद करण्यात आली आहे.
लोकशाहीमध्ये लोकांनी निवडणुकीच्या माध्यमातून केंद्रीय संसद व राज्यांच्या विधिमंडळांमध्ये निवडून पाठवायच्या प्रतिनिधींना कोणत्या प्रकारची अपात्रता केव्हा लागू होतेयाची मूळ तरतूद भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १०१ व १९१ मध्ये आहे. अनुच्छेद १०१ मधील तरतूद लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांसाठी आहे. तर राज्य विधिमंडळांच्या सदस्यांसाठी अशीच तरतूद अनुच्छेद १९१ मध्ये आहे. ही अपात्रता व्दिस्तरीय आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्याच्या टप्प्याला ती जशी लागू होते तशीच ती निवडून आलेल्या प्रतिनिधींनाही लागू होते. आज संविधानात जो अनुच्छेद क्र. १०१ आहे तो संविधानाच्या मूळ मसुद्यात अनुच्छेद क्र. ८३ होता. संविधानसभेत त्यावर सन १९४९ मध्ये १९ मे व १३ ऑक्टोबर या दोन दिवशी चर्चा झाली व तो अनुच्छेद मंजूर झाला. तसेच आज संविधानात असलेल्या अनुच्छेद क्र. १९१ संविधानाच्या मूळ मसुद्यात तो अनुच्छेद क्र. १६७ होता. दि. २ जून१९४९ रोजी झालेल्या चर्च नंतर संविधानसभेने तो अनुच्छेद मंजूर केला.
अनुच्छेद १०१ व १९१ या दोन्हींची भाषा एकसारखी आहे. या दोन्ही अनुच्छेदांच्या पहिल्या कलमाच्या अक आणि ड या उपकलमांमध्ये सरकारमध्ये लाभाचे पद’ धारण करणेमानसिक संतुलन ठीक नसणेकोर्टाकडून दिवाळखोर घोषित केलेले असणेभारताचा नागरिक नसणेअन्य देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारलेले असणे आणि परदेशाच्या बंधनात किंवा बांधिलकीत असणे असे अपात्रतेचे निकष नमूद केलेले आहेत. पोटकलम ने याखेरीज अन्य स्वरूपाच्या अपात्रतेसाठी संसदेने कायदा करावाअसे म्हटले असून संसदेने तसा कायदा केला तर त्यानुसार ठरलेली अपात्रताही लागू होईलअसे नमूद केले आहे. विशेष म्हणजे संविधानामध्ये याप्रमाणे अपात्रतेची केवळ निकष दिलेले आहेत. मात्र अपात्रतेचे स्वरूप व कालावधी किती असेल याचा उल्लेख त्यात नाही.
भारताचे संविधान २६ जानेवारी१९५० पासून लागू झाले. संविधानानुसार लकसभेची पहिली निवडणूक सन १९५२ मध्ये झाली. या दरम्यान सन १९५० व १९५१ मध्ये संसदेने दोन लोकप्रतिनिधित्व कायदे (Representation ऑफ Peoples Act) केले. त्यापैकी सन १९५१ च्या कायद्यात कलम ८ मध्ये संसद व राज्य विधिमंडळावर सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी व निवडून आलेले पदावर कायम राहण्यासाठी कोणकोणत्या कारणाने अपात्र ठरतील याची सविस्तर तरतूद केली गेली. या कलम ८ च्या १२ व ३ या तीन पोटकलमांमध्ये डझनावारी कायद्यांची जंंत्री देऊन त्या कायद्यान्वये दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावाधीची कारावासाची शिक्षा झालेल्या व्यक्ती निवडणूक लढण्यास किंवा निवडून आल्यावर लोकप्रतिनिधी म्हणून कायम राहण्यास अपात्र ठरविण्यात आल्या. नंतर संविधान दुरुस्तीने पक्षांतरबंदी कायदा झाल्यावर त्यानुसार अपात्र ठरणारे लोकप्रतिनिधीही कलम ८ च्या अपात्रतेच्या कक्षेत आणले गेले. न्यायालयाने  शिक्षा ठोठावल्यापासून ही अपात्रता लगेच लागू होईल व ती शिक्षा भोगून पूर्ण झाल्यावरही पुढील सहा वर्षे ही अपात्रता लागू राहीलअशी तरतूद त्यात केली गेली.
राहुल गांधींचे वडील स्वर्गीय राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या सरकारने सन १९८९ मध्ये सन १९५१ च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यात दुरुस्ती केली आणि त्यातील कलम ८ मध्ये पोटकलम (४) नव्याने समाविष्ट केले. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना कलम ८ मधील अपात्रता लागू होईल अशी शिक्षा झाली तरी ती अपात्रता त्यांना लगेच लागू होणार नाहीअशी तरतूद या नव्या पोटकलमाने केली गेली. पदावर असलेल्या लोकप्रतिनिधीस कलम ८ ला अभिप्रेत अससेली शिक्षा झाली तरी शिक्षा झाल्यावर सुरुवातीस तीन महिन्यांपर्यंत व त्या शिक्षेविरुद्ध संबंधित लोकप्रतिनिधीने अपील केल्यास त्या अपिलाचा निर्णय होईपर्यंत अपात्रता लागू होणार नाहीअसे संरक्षण या दुरुस्तीने दिले गेले.
लिली थॉमस या वकील व लोकप्रहरी’ ही स्वयंसेवी संघटना अशा दोघांनी कलम ८ मधील या क्र. (४)च्या पोटकलमाच्या वैधतेस आव्हान देणाºया जनहित याचिका सन २००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात केल्या. दि. १३
जुलै२०१३ रोजी न्यायालयाने या दोन्ही याचिका मंजूर करून कलम ८ मध्ये पोटकलम (४) चा समावेश करणारी संसदेने केलेली घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरवून रद्द केली. न्यायालयाने हा निकाल पश्चातलक्षी परिणामाने लागू केला. हा निकाल झाला तेव्हा राहुल गांधींच्या मातोश्री सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या व त्यांनी उभे केलेले डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारची पाच वर्षांची दुसरी इनिंग्ज’ सुरु होती.  डॉ. मनमोहन सिंग सरकारने या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली. सोबतच लोकप्रतिनिधित्व कायद्यात दुरुस्ती करून पदावर असताना शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींनान्यायालयाने काढून घेतलेले अपात्रताविरोधी कवच पुन्हा बहाल करण्यासाठी एक विधेयकही राज्यसभेत सादर केले गेले.
डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार त्यावेळी चहूबाजूंनी जेरीला आले होते. लालू प्रसाद यादव यांचे राष्ट्रीय जनता दल या संपुआमध्ये होते व स्वत: लालूप्रसाद आधीच्या संपुआ’ सरकारमध्ये सन २००४ ते २००९ अशी पाच वर्षे रेल्वेमंत्रीही राहिले होते. चारा घोटाळ््याशी संबंधीत पहिल्या खटल्याचा निकाल लागून लालूप्रसाद यांना शिक्षा होईलअशी स्पष्ट चिन्हे होती. सरकार वाचविण्यासाठी लालूप्रसाद यांना शिक्षा झाल्यावर अपात्रतेपासून वाचविणे निकडीचे होते. त्यामुळे कायदा दुरुस्तीची वेळकाढू संसदीय प्रक्रिया करण्याऐवजी वटहुकूम काढून ती दुरुस्ती तातडीने करण्याचे ठरले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाने वटहुकूमाच्या मसुद्यास मंजुरी देऊन तो संमतीसाठी राष्ट्रपतींकडेही पाठविला. त्यावेळी राहुल गांधी  काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. वटहुकुमावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन तो जारी होण्याआधी २७ सप्टेंबर२०१३ रोजी राहुल गांधी यांनीपंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीतत्या वटहुकुमाची ‘Complete Nonsense’ अशा शब्दांत हेटाळणी करून त्याची प्रत फाडून केराच्या डब्यात फेकली! एवढा जाहीर पाणउतारा झाल्यावर तो वटहुकूम राष्ट्रपतींकरवी जारी करून घेण्याचे धारिष्ट्य दाखविणे डॉ. मनमोहन सिंग यांच्या आवाक्याबाहेरचे होते.
राहुल गांधी यांनी त्यावेळी तो वटहुकूम निघू दिला असता तर आज त्याचेच संरक्षण त्यांना मिळाले असते. राहुल गांधींनी त्या वेळी तो वटहुकूम फाडून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतलाएवढेच नव्हे तर आपल्या पित्याने केलेल्या कायद्यास पुनरुज्जीवित करण्याच्या संधीसही कायमची मूठमाती दिली.

अजित गोगटे



Thursday, March 23, 2023

गुह्य आणि अमृतानुभव

ॐम नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या। जय जय  स्वसंवेद्या। देवा तूचि गणेशु। सकलमूर्ती प्रकाशु। म्हणे निवृत्तीदासु। अवधारिजोजी॥ ही आणि त्या खालच्या १९ ओव्यात सगळी वेदोपनिषदे, अठरा पुराणे, श्रुती-स्मृती इत्यादी ग्रंथात आलेले सारे अध्यात्मशास्त्र गणेशाच्या रूपकात प्रगट केले आहे. सातशे श्लोकांच्या गीतेतल्या प्रत्येक अध्यायाच्या पुष्पिकेत योगशास्त्रेसु असा उल्लेख आहे. गीतेच्या मते ज्ञान, कर्म, योग, भक्ती हे सारे मार्ग हे परमेश्वराकडे नेणारे आहेत. ज्याला जो मार्ग पेलेले, सुलभ वाटेल त्या मार्गाने त्याने परमेश्वराला शरण जावे असा गीतेचा सारांश खुद्द श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला आहे. शेवटी जिकडे धर्म तिकडे जय असा महत्त्वपूर्ण उपदेश केला आहे. ज्ञानेश्वरांनी ७०० श्लोकांचा भावानुवाद करताना सुमारे सातसाडेसात हजार ओव्या लिहल्या आहेत. हे लिहून झाल्यावर ब्रह्मवस्तुच प्रत्यक्ष करतलावर दाखवल्यागत विवेचन करणारा अमृतानुभव हा स्वतंत्र ग्रंथ लिहला. सद्गुरू निवृत्तीनाथ ह्यांच्या आदेशानुसार त्यांनी तो मुद्दाम लिहला. असा आदेश ज्ञानेश्वरांना देण्यामागे  निवृत्तीनाथांचा हेतू एकच होता. तो म्हणजे गीतेच्या भावानुवाद करताना ज्ञानेश्वरांना मर्यादा पडल्या होत्या. ह्याउलट १० प्रकरणांचा  अमृतानुभव हा  ग्रंथ लिहताना ब्रह्मवस्तुच्या विवेचनातल्या सर्व मर्यादांवर त्यांनी मात केली.

अमृतानुभवात शब्द कसा निरूपयोगी आहे ह्याचे विवेचन ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवात वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरीचा सहावा अध्यायदेखील ह्या दृष्टीने मुद्दाम वाचण्यासारखा आहे.

अमृतानुभवात शब्दाविषयी खंडनमडनात्मक विवेचन केले आहे. ब्रह्मवस्तुची ओळख करून देण्यापुरतेच शब्दाचे काम असून ते झाले की शब्दाला काही काम शिल्लक राहात नाही. तो नाहीसा होतो! ह्या अर्थाने शब्दाचे काम फक्त आरसा दाखवण्यापुरते असून एकदा आरसा काढून घेतला की प्रतिबिंब पाहता येत नाही. ज्ञानेश्वरांनी लिहलेल्या अभंगातही हेच सत्य विषद करण्यात आले आहे. ह्याचाच अर्थ प्रत्यक्ष कृतीला महत्त्व असते, फाल्तु बडबडीला अजिबात महत्त्व नसते. फार मोठ्या व्यक्तीकडे काही मागायला लोक जातात तेव्हा त्या व्यक्ती त्याचे म्हणणे ऐकून त्याला हवे असलेले देऊन मोकळे होतात. त्यावर अजिबात चर्चा करत नाही. ह्याचा अनुभव राजकारणात, अर्थकारणात, व्यवहारात पदोपदी येत असतो. फार मोठे राजकारणी प्रतिक्रियेत अडकत बसत नाहीत. सत्यं ब्रूयात्मा ब्रूयातसत्यमप्रियमपिह्या सनातन धर्माचा त्यांच्याकडून नकळतपणे अवलंब केला जातो! परंतु प्रत्यक्षात हा सनातन् धर्म आचरण्यास फार अवघड आहे.  नच आचरता येत असेल तर त्याचे म्हणून ऐकून घेतात आणि गप्प बसतात!

मुळात आध्यात्मिक संवादात तर गप्प राहण्याला अत्यंत महत्त्व आहे. बडबड ऐकून अनेक जण मला दाखवा, प्रत्यक्ष सिध्द करून दाखवा वगैरे गोष्टी बोलत राहातात. वास्तविक ब्रह्मवस्तु प्रत्यक्ष दाखवण्याचा पराक्रम मोठमोठ्या गुरूंनाही जमला असेल की नाही ह्याबद्दल मला शंका आहे. अशावेळी त्याला शिष्यभावाने आपल्या जवळ ठेवून घेतात. त्याला समजले तर समजले, अन्यथा ह्या जन्मी किंवा पुढल्या जन्मी समजेल असे थातूरमातूर उत्तर देऊन त्याला निरोप देतात. वास्तविक खरोखर ज्याला ब्रहम्हज्ञान प्राप्त झालेले असते तो ते गावभर सांगत बसत नाही. त्याच्या चेह-यावरची प्रसन्नताच सगळे काही सांगून जाते. त्याच्यापुरते तरी ब्रम्हिचे स्वराज्य आलेले असते. गीतेत म्हटल्याप्रमाणे प्रयाणकाळी म्हणजे ह्या जगाचा निरोप घेतेवेळी तो स्थिरचित्त असतो. अशी स्थिरचित्त माणसे मी माझ्या कुटुंबात पाहिली आहे.  आजोबांच्या आणि वडिलांच्या मृत्यूप्रसंगी मी हजर होतो. त्या वेळी स्थिरचित्ताचा खरा अर्थ मला कळला. त्यांच्या शेवटच्या आजाराला निमित्तकारण मात्र अवश्य घडले होते. असो त्यावर अधिक भाष्य  करणे मला उचित वाटत नाही. पुनरपि जननं पुनरपि मरणं हेच खरे आहे! 

रमेश झवर

Tuesday, March 21, 2023

अनुग्रह

 गुरू अडक्याला तीन !...देशात स्वत:ला गुरू म्हणव-यांची संख्या अफाट आहे. त्यांच्यामुळे गुरूसंस्था बदनाम झाली. अजूनही ह्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. विशेष म्हणजे दुस-या गुरूंचा आणि त्यांच्या शिष्यांचा उपहास करणारेच अधिक! माझे सुदैव असे की अशा गुरूंच्या भानगडीत मी पडलो नाही. असे गुरूही माझ्या भानगडीत पडले नाहीत! माझे गुरू गजाननमहाराज अटक हे टेलिफोन खात्यात नोकरीला होते. ऑफिस बॉय म्हणून लागले. हेडक्लार्क म्हणून रिटायर झाले. माझी जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा ते ४२ वर्षांचे होते. मी ३५-३६ वर्षांचा होतो. माझे मित्र हेमंत कारंडे ह्यांनी  नायगाव टेलिफोन कार्यालयात त्यांची भेट घालून दिली. ऑफिस सुटल्यावर आम्ही तिघे चालत दादर स्टेशनला चालत आलो. अटकमहाराजांना कर्जत लोकल पकडायची होती म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही दोघेही मेल एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर गेलो. गाडीत चढण्यापूर्वी मला उद्देशून अटकमहाराज मला म्हणालेया कर्जतला एकदा. माझ्या मित्रमंडळींची तुम्हाला ओळख करून देतो.  अटकमहाराजांना कर्जत लोकल पकडायची होती म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही दोघेही मेल एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर गेलो. गाडीत चढण्यापूर्वी मला उद्देशून अटकमहाराज मला म्हणाले, या कर्जतला एकदा. माझ्या मित्रमंडळींची तुम्हाला ओळख करून देतो.

योगायोगाने लोकसत्तेत कंपनीने टाळेबंदी घोषित केलेली होती. मला बिनपगारी भरपूर सुटी होती. कर्जतला न जाण्याचे कारंडे ह्यांना सांगण्याचे सबळ कारण उरले नाही. नोव्हेबरमध्ये कर्जतला पौर्णिमेच्या रात्री जाण्याचे मी ठरवले. मी आणि कारंडे  'स्लो लोकल' पकडून कर्जतला गेलो. सहा वाजता त्यांच्या घरी पोहोचलो. चहापाणी झाल्यावर मी आणि कारंडे महाराजांसह दहीवलीहून शिरसे येथे चालत जायला निघालो. शिरसे गावात अप्पा कांबळे ह्यांच्या घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा चहापाणी वगैरे नित्याचा कार्यक्रम झाला. अप्पा कांबळेंबरोबर आम्ही तमनाथाच्या दर्शनाला गेलो. तमनाथाचे दर्शन घेऊन झाल्यावर थोडं उल्हास नदीच्या काठी गप्पा मारत बसलो. अंधार पडायला सुरूवात झाली. आम्ही  माघारी फिरलो. हातपाय धवून पुन्हा गप्पांचा फड रंगला. आणखी एकेक जण येत राहिला. १५-२० जण जमल्यावर अप्पा म्हणाले, 'चला, मंडळी पानं लावली आहेत. दोन घास खाऊन घ्या अशी माझी विनंती आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन सारे जण आतल्या खोलीत जेवायला बसलो. पत्रावळीवर भात आणि द्रोणात जहाल तिखट वरण एवढाच काय तो मेनू. माझी जरा पंचाईत झाली. मी खानदेशाचा. नुसता भात हे माझं जेवण कधीच नव्हतं.  अप्पांच्या ते लगेच ध्यानात आले. त्यांनी मुलीला तांदळाच्या भाकरी करायला सांगतले. त्यांची मुलगी मंगला हिने पाच मिनटात तांदळाची भाकरी माझ्या ताटात वाढली. माझा एकूण आहारच कमी होता हे बिचा-यांना काय माहित!

जेवल्यानंतर पुन्हा गप्पांचा फड. रात्रीचे बारा वाजायला ५ मिनटं कमी असताना अप्पांनी त्यांच्या पडवीत बारदानाची बिछायत केली. समोर पाटावर दत्ताची तसबीर, तसबिरीसमोर ज्ञानेश्वरीची प्रत बाजूला समई. दानवेमहाराजही आतल्या खोलीतून मुकटा नेसून आले. अटकमहाराजांचे दर्शन घेऊन ते स्थानापन्न झाले. दुस-या बाजूला अटकमहाराज बसले.  ज्ञानेश्वरीच्या पहिल्या दोन ओव्या आणि तुका आला लोटांगणीतुकारामाचा एक अभंग अशी प्रार्थना झाली. दानवे महाराजांनी आता तुम्ही बोलाअसं म्हणत प्रत्येकाला बोलायला लावलं. मला म्हणाले, झवरसाहेब, आता तुम्ही बोला!

माझ्यापुढे प्रश्न पडला, काय बोलावं ! मी मराठातल्या १-२ आठवणी सांगून वर्तमानपत्र कसं निघतं हे सविस्तर सांगितलं. जाता जाता ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय कॉलेजमध्ये अभ्यासाला होता हे सांगायला मी विसरलो नाही. 'मी कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाहीअसं सांगितलं तेव्हा हंशा पिकला. माझी उत्सुकता ताणली होती, आता पुढे काय? पुन्हा एकदा चहा आला. मात्र, तो कोरा  चहा होता. कसाबसा प्राशन केला. बरोबर चार वाजता दानवेमहाराज म्हणाले, झवरसाहेब पुढे या.

माझ्या आयुष्यात हा क्षण  दृष्टीने कसोटीचा होता. मनाशी विचार केला, एवीतेवी कर्जतला येण्यासाठी एवढा वेळ घालवलाच आहे तर आणखी ते काय म्हणू इच्छितात ते ऐकून घ्यायला हरकत नाही. मी पुढे सरकलो. अतिशय हळू आवाजात ते म्हणालेमी जो मंत्र म्हणतोय्‌ त्याचा जसाचा तसा उच्चार करा. त्यांनी उच्चारेल्या षडाक्षरी मंत्राचा मी बरोबर उच्चार केला. त्यावेळी प्रसन्नतेने त्यांचा चेहरा उजळून निघाला. आणखी एक गुह्य तुम्हाला मी समजावून सांगतो. ते म्हणजे ला जोडून असलेल्या अर्धा आणि मिळून जो उच्चार होतो तो करू नका. चुकून झालाच तर आवंढा गिळून मघाशी दिलेल्या मनातल्या मनात मंत्राचा पुनरुच्चार करा. बस्स. तुम्हाला जे दिलंय्‌ ते सांभाळत कामधंदा करा. घरसंसार करा. तुम्ही पत्रकार आहात. तुम्हाला मी अधिक सांगण्याची गरज नाही. नंतर त्यांना नमस्कार करून मी बाजूला होणार तोच त्यांनी मला थांबवले. दर्शन घेण्याची विशिष्ट पध्दत त्यांनी माझे प्रत्यक्ष दर्शन घेऊन दाखवली.  दर्शन घेणा-याला जास्त काळ थांबवायचे नसते. ती त्याची समाधी स्थिती असते. आदेशअसा उच्चार करून त्याला समाधीतून तत्काळ मोकळे करायचे असते. वस्तुत: दर्शनसुख हीच खरी सुखामय समाधी. दर्शन हीच गुरूला खरी दक्षिणा. पत्नी आणि मुलाबाळांनी घरातल्या कर्त्यांसह सगळ्यांचे रोज दर्शन घ्यायचे असते.  वस्तुतः हात जोडून कर्ता पुरूषही तुमचे दर्शन घेत असतो. दर्शन घेणारा मनातल्या मनात गुरुब्रह्मा गुरुर्विष्णूहा श्लोक म्हणत असतो. दर्शन घेणाराही मनातल्या मनात मिळालेल्या बीजमंत्राचा उच्चार करत असतो. अशा ह्या दर्शनविधीला नाथ संप्रदायात आत्यंतिक महत्त्व आहे. शंकर, पार्वती, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ आणि नंतर थेट रामकृष्ण परंहस, स्वामी विवेकानंद, जोगमहाराज, मामासाहेब दांडेकर, अटकमहाराज आणि  आम्ही  ( मला काही क्षणांपूर्वी अनुग्रह देणारे दानवेमहाराज ) अशी ही गुरूपरंपरा मला दानवेमहाराजांनी  संक्षेपाने सांगितली. माझ्याकडून वदवूनही घेतली,

गजाननमहाराज अटक  ह्यांना मामासाहेब दांडेकरांकडून दीक्षा मिळाली होती. खुद्द मामांना जोगमहाराजांकडून! आधुनिक काळात रामकृष्ण परमहंस, विवेकानंदापर्यंतची पूर्वसूरींची नावे सांगितली जातात. परंतु ऐतिहासिक काळातली ह्याहून अधिक नावे सांगितली जात नाहीत. एखाद्या कुळात बेचाळीस पिढ्यांची नावे कुणालाच माहित नसतात. जास्तीत जास्त आधीच्या सात पिढ्यांपर्यंत नाव सांगितली जातात. गुरूपरंपरपरेचेही असेच आहे. कर्तबगार पुरूषांच्या चरित्रात वा आत्मचरित्रात  वंशवेलीचा विस्तार कसा झाला ह्याचा आकृतीबंध देण्याची एके काळी पध्दत होती. तीही आता राहिलेली नाही.

मी जरी माझ्या जागेवर येऊन बसलो तरी मी भारावून गेलो होतो. दुस-या क्षणी त्यांनी दिलेले गुह्य वर्मानपत्राच्या नोकरीत काम करताना सांभाळणे अवघड जाईल ह्याची मला लगेच जाणीव झाली. ही स्थिती दानवेमहाराजांना सांगताच ते मला म्हणाले, तुम्हाला हँडब्रेकदिला आहे. तो अशा वेळी दाबायचा असतो ! सकाळी साडेपाच-पावणेसहा वाजता कार्यक्रम संपला. प्रार्थना झाली. ह्या प्रार्थनेत ज्ञानेश्वरीतील पसायदानाच्या १० ओव्या आणि नामदेवांच्या अभंगाचा ( कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो माझिया विष्णूदासा भाविकांसी ) समावेश होता. लहानथोर वगैरे भेद बाजूला सारून प्रत्येक जणाने एकमेकांचे दर्शन घेतले. मीही बाकींच्या अनुकरण केले. परंतु ते फार यांत्रिक होते असे मला आठवते. परंतु हळुहळू ते वळण पडले !

ज्ञानेश्वरांना त्यांचे बंधू निवृत्तानाथ. निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनाकडून अशी ही गुरूंची पूर्वपरंपरा थेट आदिनाथापर्यंत जाऊन भिडते. हीच नाथपरंपरा आहे. आधुनिक काळात संसारी जनांना दीक्षा देण्याच्या पध्दतीत बदल होत गेला. तरी मूळ मंत्र आणि गुह्य ह्यात अजिबात बदल झाला नाही. प्रत्येक गुरू परंपरेचे म्हणून स्वत:चे असे काही वैशिष्ट्य असते. मला ज्या पध्दतीने अनुग्रह मिळाला असेल त्याच पध्दतीने तो इतरांना मिळाला असेल असे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. इत्यलम्‌!

रमेश झवर