दोनचार दिवस बेपत्ता राहून आपल्याच पक्षातील ४० आमदारांच्या सह्या गोळा करण्याचा उद्योग अजितदादा पवारांनी कां केला असावा? महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजपाकडून उपमुख्यमंत्री पदरात पाडून घेण्यासाठी अजितदादांनी सकाळी सहा वाजताच शपथविधी कार्यक्रम उरकून घेतला होता. त्यावेळी दिवसभर चर्चा केल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाचा राजिनामा देऊन अजितदादा स्वगृही परतले होते. ह्या मागच्या घटनेचा फायदा घेण्याचा विचार अजितदादांच्या मनात तर आला नसेल? उलट अज्ञातवासात राहून पाठिंबा देणा-या आमदारांच्या सह्या घेण्याची मोहिम अजितदादांनी ह्यावेळी अधिक पध्दतशीर राबवली. नव्हे, त्यांच्या ह्या मोहिमेमुळे देशभरातल्या राजकारण्यांना कात्रजच्या घाटात मशाली दौडत असल्याचे दृश्य दिसले. नव्हे, तसे ते दिसावे असाही अजितदादांच्या मनातला सुप्त हेतू असू शकतो.
आपला श्वास चालू आहे तोपर्यंत आपण राष्ट्रवादी
काँग्रेस सोडणार नाही वगैरे वक्तव्य त्यांनी केले. दुसरीकडे शरद
पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे ह्याही स्वतंत्रपणे प्रेसशी बोलल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, येत्या १५ दिवसात दिल्लीत १ आणि मुंबईत १ असे दोन राजकीय भूकंप पाहायला मिळतील! त्यांच्या ह्या वाक्याचा अर्थ कसाही निघतो. सध्याचे एकनाथ शिंदे ह्यांचे भाजपाबरोबरचे सरकार पडू शकते. तसे ते पडल्यास मुंबईत भूकंप होणार हे ज्योतिष्याने सांगण्याची गरज नाही.
त्याखेरीज ह्या भूकंपाच्या कंपनाची झळ केंद्रीय गृहमंत्रालयास पोहोचू
शकेल. तेथेही महाराष्ट्रातला भूकंप जाणवणारच. कारण स्पष्ट आहे. शिवसेनेच्याच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद
देऊन भूतपूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची युक्ती
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा योजली होती. थोडक्यात, उध्दव ठाकरे म्हणजेच शिवसेना हे शिवसेनेचे
गृहितक अमित शहांनी फेटळून लावले.
अजितदादा हे विद्यमान विधानसभेत विरोधी
नेते आहेत. विरोधी नेत्याचे पद हे मंत्र्यांच्या
बरोबरीचेच असते. विरोधी नेत्यालाही मंत्रालयाच्या समोर बंगला,
गाडीवगैरे सर्व सुखसुविधा आणि कार्यसुविधा पुरवल्या जातात. आपल्याच पक्षाच्या आमदारांची जमवाजमव करण्यामागे त्यांचा काहीच हेतू नव्हता
असे म्हणता येणार नाही. राजकारणात हेतूशून्य असे काही केले जाता
नाही. ह्या संदर्भात
एका महत्त्वाच्या गोष्टीचा अनेकांना विसर पडला आहे. ती म्हणजे
अधिकृत शिवसेना कोणाची ह्यासबंधींचे प्रकरण
सर्वोच्च न्यायालयासमोर विचाराधीन आहे. ह्या खटल्याचा निकाल उध्दव
ठाकरे ह्यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागला तर शिंदे सरकार पडायला वेळ लागणार नाही.
नव्या संभाव्य राजकीय परिस्थितीत गाफील राहणे राष्ट्रवादीला परवडणारे
नाही. शरद पवार हे राष्ट्रवादीचे प्रमुख आहेत. त्यांच्या पक्षाला आतापर्यंत असलेली राष्ट्रीय पक्ष म्हणून निर्वाचन आयोगाकडून
मिळालेली मान्यता काही दिवसांपूर्वीच रद्द करण्यात आली. ह्या
बाबतीत स्वत: शरद पवार बेफिकीर राहू
शकत नाहीत. अजितदादांची आणि त्यांच्यासमवेत
असलेल्या आमदारांच्या नाराजीच्या बातम्या अचानक झळकू लागल्या. हा सर्व प्रकार कात्रजच्या घाटात मशाली दौडवण्याचा प्रकार असू शकतो.
अर्थात राष्ट्रवादीचा ही युक्ती फोल ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणूनच अजितदादांसह सर्वांनी आज विस्तृत निवेदन केले.
वर्तमानपत्रांनीही अजितदादांना भरपूर कव्हरेज दिले आहे. आता सर्वांना प्रतिक्षा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या
निकालाची! न्यायालयीन निकाल उध्दव ठाकरेंच्या
बाजूने लागल्यास शिंदे सरकारचे पतन निश्चित आहे. उध्दव ठाकरेंनी
मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा ह्यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे
अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता बळावली आहे. अर्थात
महाराष्ट्र सरकार बडतर्फ करून राज्यात राष्ट्रपतीपती राजवट जारी करण्याचा पर्याय केंद्राकडून
अवलंबला जाण्याची शक्यता आहे. अर्थात कसेही झाले तरी महाराष्ट्रातल्या
सत्तेची कटकट निर्माण
होणारच! त्या
कटकटीचा फायदा उचलण्यासाठी हे पहिले पाऊल आहे.
रमेश झवर
No comments:
Post a Comment