ज्येष्ठ पत्रकार आणि सिनेमा, क्रिकेट ह्या विषयांवर मिष्कील शैलीत लिहणारे लेखक आणि पत्रकार शिरीष कणेकर ह्यांच्या निधनाचे वृत्त वाचून मला धक्काच बसला. कणेकर एक्स्प्रेसमध्ये वार्ताहर म्हणून आणि मी लोकसत्तेत उपसंपादक म्हणून नोकरीला लागण्यापूर्वीपासून त्यांची आणि माझी मैत्री होती. माझे मित्र प्र. ना. शेणई ह्यांचे बंधू दत्ताराम शेणई ह्यांनी माझी कणेकरांशी ओळख करून दिली होती. ते १९६७-१९६८ साल असावे. त्यांची ओळख होताच मी त्यांना विचारले, दंगलीत तुमच्या मोटार सायकलीची मोडतोड कुणी केली?
‘दंगलखोर
कोण होते हे मी कसे सांगणार?’
नंतर मला लगेच आठवले की शिरीष कणेकर
हे कायद्याचे पदवीधरही आहेत. त्यामुळे माझ्या
प्रश्नाला त्यांनी दिलेले उत्तर विटनेस बॉक्स उभ्या असलेल्या साक्षीदाराने द्यावे तसे होते. ते म्हणाले, खरे तर चूक माझीच आहे. दंगलग्रस्त
भागातून मी जायलाच नको होते. फाजील आत्मविश्वास मला नडला!
त्यानंतर माझी आणि कणेकरांशी भेट झाली
ती माझे इंडियन एक्स्प्रेसमध्ये ते एक्सप्रेसमध्ये वार्ताहर होते. मी लोकसत्तेत उपसंपादक होतो. सुरूवातीला आम्हा दोघांनाही किरकोळ बातम्या
करायला दिल्या जात. बीएसव्ही राव हे त्यांचे
बॉस तर माझे बॉस तुकाराम कोकजे. तो काळ आम्हा दोघांच्या उमेदावारीचा
होता. ह्याची जाणीव कणेकरांनाही होती तशी मलाही होती. आम्हाला कुठला ‘बीट’
असा नव्हता. सगळे महत्त्वाचे बीटस् हे राखीव होते.
वर्तमानपत्रात तुम्हाला कुठलीही बातमी लिहायला सांगितल्यावर ती तुम्ही
मुकाट्याने लिहून देणे हे आम्ही जाणून होतो. वरिष्ठांचे काहीही
मत असले तरी चीफ सब एडिटरला आम्ही लिहलेल्या कॉपीवर कधी बॉलपेन फिरवावा लागला नाही
ह्यावर आम्ही खूष होतो. परंतु वर्तमानपत्रातले वातावरण इतके साधे
अन् सरळ असत नाही. तुमची इमेज काळवंडली
पाहिजे असाच चंग काही लोकांनी बांधलेला असतो. त्यांच्या टीकेला तुमच्याकडे उत्तर
नसते. कारण, हे सगळे तुमच्या समोर चालत
नाही. कोणी विशिष्ट व्यक्ती तुमच्याविरूध्द ते चालवत असते
असेही नाही. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार ट्रायल
इन इन ॲब्सेनिशिया!
यशाचा जसा पिंजरा असतो तसा अपयशाचाही पिंजरा असतो. अपयशाचा पिंजरा
तुम्ही कधीच भेदू शकत नाही.
शिरीष कणेकरांची आणि माझी जेव्हा खासगीत
भेट होत असे तेव्हा मनातले हे दु:ख
आम्ही एकमेकाकंडे व्यक्त करत असू. अर्थात कालान्तराने
ह्या दु:खातून आम्ही
दोघेही सावरलो. ह्याचे सगळ्याचे मोठे कारण म्हणजे एक्सप्रेसमधले राधाकृष्णन्,
संपत आणि मेन्झिस हे तिघे चीफ सब. तिघांनी कणेकरांना
सांभाळून घेतले. मला लोकसत्तेत सदानंद पालेकर, लक्ष्मीदास बोरकर आणि श्रीपाद डोंगरे ह्या तिघा चीफसबनी सांभाळून घेतले.
सुरूवातीला कॉपी स्वत : तपासून
मगच बातमी चीफ सबच्या हातात द्यायची हे मी ठरवून टाकले.
हातात बातमी आली की त्यावर मल्लीनाथी न करता सरळ त्या बातमीला भिडणे असा शिरस्त मी ठरवून टाकला. कणेकरांनीही
बहुधा तेच ठरवले असावे. आमच्या विरूध्द असलेले वातावरण हळुहळू
पालटले.
मी अमेरिकेला जाऊन आल्याचे त्यांना कळताच
माझ्याजवळ येऊन त्यांनी विचारले,
‘तुम्हाला
कोणत्या संस्थेचे निमंत्रण मिळाले होते ?’
‘मला कोणीच निमंत्रण दिले नाही.
पासपोर्ट कार्यालयात जाऊन मी रीतसर पासपोर्ट मिळवला. अमेरिकन भुलाभाई मार्गावरील वकालतीत जाऊन अमेरिकेचा व्हिसा
मिळवला. व्हिसा कसा मिळाला ह्याची तपशीलवार हकिगत मी कणेकरांना
सांगितली. विशेषत: व्हिसा
अधिका-याबरोबर माझा संवाद कसा झाला हेही मी कणेकरांना तपशिलवार सांगितले.
तो संवाद असा-
‘तुम्हाला
व्हिसा कां हवा आहे?
‘मी
देशभर
हिंडलो आहे. पर्यटणाची मला हौस आहे. म्हणून सर्वप्रथम अमेरिकेला जायचे माझ्या मनात आले’
माझे म्हणणे व्हिसा अधिका-याला पटले असावे.
‘ओके यू विल
हॅव इट.
कम आफ्टर थ्री ओ क्लॉक अँड कलेक्ट युवर पासपोर्ट.’
माझी ही संपूर्ण स्टोरी मी कणेकरांना
सांगितली.
शेकहँड करून त्यांनी माझा निरोप घेतला.
मला अधुनमधून रविवार लोकसत्तेत लेख लिहण्याची
संधीही मिळत गेली. कणेकरांनाही
रविवार लोकसत्तेचे संपादक विद्याधर गोखले ह्यांनी लिहण्याची संधी दिली. त्या संधीचा आम्ही दोघांनी भरपूर उपयोग करून घेतला. सिनेमा
आणि क्रिकेट हे कणेकरांचे आवडते विषय तर ‘द्याल तो विषय
आणि सांगाल ते काम’ हे
माझे धोरण!
ह्या आमच्या नव्या धोरणामुळे
आमच्या
डोक्याची कटकट कायमची मिटली. आयुष्याच्या लढाईची
एक वेगळीच गंमत आहे. एक कटकट मिटली की दुसरी कटकट हमखास सुरू होते.
शिरीष कणेकर आणि मला हाच अनुभव आला. सिनेमा आणि क्रिकेट ह्या दोन विषयांवर खुसखुशीत शैलीत
लिहणारा लेखक अशी त्यांची नवी प्रतिमा तयार झाली. जैन मुनींपासून ते झोपटपट्टीत राहणा-या गरीब लोकांच्या
समस्या अशा कुठल्याही विषयावर मी लेख लिहीत राहिलो. ‘फुटक्या
अवयवांची झोपडपट्टी’ ह्या
कुष्ठरोग्यांच्या वसाहतीवर लिहलेल्या माझ्या लेखावर वाचकांच्या पत्रांचा अक्षरश: पाऊस पडला.
कणेकरांच्या बाबतीत हेच घडले. यादोंकी बारात,
शिरीषासन, मुद्दे आणि गुद्दे माझी फिल्ल्मबाजी
इत्यादी सदरातील लेखांना वाचकांनी अभूतपूर्व दाद दिली. लायनो
ऑपरेटरही त्यांचे लेख ऑपरेट करण्यापूर्वी वाचून पाहात आणि मगच
ऑपरेट करायला घेत. खुद्द फोरमन त्यांचे
लेख वाचून मग तो ऑपरेट करायला देत !
अशा माझ्या ह्या
प्रिय सहका-याने काल अचानक इहलोकाचा निरोप घेतला.
त्याला माझी श्रध्दांजली.
रमेश झवर