माणूस कल्पनेच्या
बाधेत अडकतो म्हणजे नेमके काय? समोर दिसणारे
ढळढळीत वास्तव त्याला दिसत नाही.विशेष म्हणजे नेहमी अद्वैत तत्तवज्ञानाच्या गप्पा
मारणा-यांनामनातले हे सुप्त व्दंद्वध्यानात येत नाही.अध्यात्मात मुरलेल्या
माणसाला मात्र हे व्दंद्व लगेच समजते. अध्यात्म म्हणजेतरी काय? अध्यात्मशास्त्र माणसाला आरशाप्रमाणे वास्तवाचे प्रतिबिंब दाखवते.
रोजचे जीवन कसे जगत असताना येणा-या अडचणींचे निराकरण कसे करावे हेही उलगडते. एखादी वस्तु लख्ख प्रकाशात जसजशी स्वच्छ दिसू लागते तसतसे
अडचणही दिसते. त्यावरचा उपायही दिसतो. म्हणून परिस्थिती कितीही विपरीत असली
तरी तो मुळीच अस्वस्थ होत नाही. ह्याचे कारण परिस्थिती
अनुकूल असली तरी ती हळुहळू बदलणार हेही त्याच्या ध्यानात येत असते. त्याच्या हेही ध्यानात येते की, विपरीत
परिस्थितीदेखील कायम बसून राहणार नाही. ह्या सत्याची मला वारंवार प्रचिती
येत गेली.
एक लाख श्लोकांचे महाभारत किंवा २५
हजार श्लोकांचे रामायण वाचणे संस्कृत विषय घेऊन एमए झालेल्या माणसाला शक्य
नाही. मग सर्वसामान्य माणसाची काय कथा? साधी ७०० श्लोकांची गीताही लोकांना समजत नाही. म्हणूनच गुरू
निवृत्तीनाथांच्या आदेशावरून ज्ञानेश्वरांनी गीतेचा भावानुवाद नेवासे येथे
मोहिनीराजांच्या मंदिरात श्रोत्यांसमोर सादर केला. नामदेवांनी स्वतंत्र अभंग रचना केली तरी त्यांच्या
अभंगाला रामायण, महाभारत आणि भागवत पुराणांचा आधार आहे.
नामदेवांच्या १४ अभंगांचा तर शिखांच्या गुरूबानीमध्ये समावेश करण्यात आला आहे. शीख
लोकही पंढरपूरला नामदेव पायरीवर मत्था टेकण्यासाठी येतात. एकनाथांनी भागवत आणि
भावार्थ रामायण तर लिहलेच; शिवाय भारूडे, गवळणी लिहून सामान्य जनांना आध्यात्मिक वाट दाखवली. समर्थांनी देशभर भ्रमण
करून लोकांना तत्त्व आणि व्यावहारिक मार्गांचा मेळ घालण्याची शिकवण दिली. अकरा
मारोतींची स्थापना करून दक्षिणेवर होणा-या औरंगजेबाच्या
आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी प्रेरणा दिली! त्यातूनच पुढे मराठेशाही साम्राज्य
स्थापन झाले.
मी जेव्हा एकटा बसलेला असतो
त्यावेळी बाराव्या शतकापासून अठराव्या शतकांचा चित्रपट माझ्या डोळ्यांसमोरून
सरकतो. ज्या अल्पसंख्यांक माहेश्वरी समाजात मी जन्मलो त्या समाजातील ७२ कुळांचे
पूर्वज रजपूत सरदार होते. ऐतिहासिक काळात कुठले तरी युध्द ते हरले. त्यामुळे
त्यांच्यावर रानावनात पळून जाण्याची पाळी आली. त्या वनवासातच भगवान
महेशाने त्यांच्यावर कृपा केली. वणिग् वृत्तीने आयुष्य जगण्याची प्रेरणा दिली.
भगवान महेशांच्या कृपेने त्यांच्या भाल्यांची लेखणी झाली. ढालींचे तराजू झाले !
सणावळ्या पाठ करणे म्हणजे इतिहास नाही. इतिहासाचा जिवंत चित्रपट आपल्या
डोळ्यांपुढून सरकतो तेव्हाच आपल्या मनातले नैराश्याचे मळभ दूर होते! इतरांचे मला
महित नाही, परंतु मनातले नैराश्य दूर होण्याच्या प्रक्रियेचे
हे दर्शन मला वेळोवेळी झाले. भरकटलेले मन आपोआपच स्थिर होते गेल्याचा अनुभव आला.
माझ्या सध्याच्या आयुष्याची
पार्श्वभूमी पुरेशी स्पष्ट व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे तपशील मी मुद्दाम
नमूद करत आहे. मी जळगावात मोठा झालो. जळगावात नदी अशी नव्हती. जळगावात जी मेहरूणी
नामक लहानशी नदी होती. तिचे रूपान्तर कधीच नाल्यात झालेले होते! तापी आणि गिरणा
ह्या दोन नद्यांचे वरदान जळगावला मिळाले खरे ; परंतु
ह्या दोन्ही नद्या जळगाव शहरापासून तशा लांबच. तापी स्नानासाठी ममुराबाद
किंवा इदगावपर्यंत बसने जावे लागायचे. सूर्यग्रहणाच्या दिवशी माझे वडिल
गिरणा स्नानाला जात असत. मी थोडा मोठा झाल्यावर वडिल मला सायकलीवर डबल सीट बसवून
गिरणास्नानाला अनेकदा नेले. जळगावकरांचे सुदैव असे की १९२७
साली जळगाव नगरपालिकेने पाणीपुरवठा योजना राबवली. ह्या योजनेमुळे जळगावकरांना
गिरणेच पाणी नळाद्वारे मिळू लागले. बालाजी पेठेत माझे घर होते. हा भाग
जळगावतला ‘लो लायिंग एरिया’. त्यामुळे
घरात नळाला पाणी नाही असे कधीच घडलेच नाही! शिवाय घरात विहीरही
होतीच.राहाटगाड्याने पाणी वर आणता येत असे.
जळगावनजीक मेहरूणचा तलाव किंवा
गिरणा वॉटर टँक ही दोन स्थळे होती. सहलीला जाण्याची ठिकाणे होती. मेहरूण रोडवर जवळ जवळ रान होते. त्या रानात
एक देवीचे देऊळ होते. ह्या देवीचे नाव इच्छादेवी! आश्विन अष्टमीच्या दिवशी
माझे चुलते शंकरभाईजी झवर हे इच्छादेवीच्या देवळात सगळ्या झवर
कुटुंबाला जेवण देत असत. सगळे झवर कुटुंब जेवणाला हजेरी लावत असे.
महाराष्ट्रातील सर्व शहरांचा विस्तार झाला तसा तो जळगाव शहराचाही झाला. त्याचा
दृश्य परिणाम असा की इच्छादेवीचे मंदिर नेमके कुठे आहे हे रस्त्याने जाणा-यांच्या
लक्षात येत नाही.
अलीकडे जळगाव नगरपालिकेची महापालिका
झाली. महापालिकेचे कार्यालय १७ मजली टॉवरमध्ये आहे! एखाद्या शहराच्या महापालिकेचे
कार्यालय १७ मजली टॉवरमध्ये असल्याचे हे एकमेव उदाहरण असावे. शहर ह्या दृष्टीने
जळगाव जितके आधुनिक तितकेच सांस्कृतिक परंपरेच्या बाबतीही समृध्द आहे.
जुन्या काळापासून जळगावाचे नाव हे सांस्कृतिक केंद्र म्हणून दुमदुमू लागले
होते. ‘संगीत स्वयंवर’पासून ते ‘मी
जिंकलो मी हरलो’ ह्या विजय तेंडुलकरलिखित नाटकांपर्यंत
पुण्यामुंबईला होणा-या बहुतेक नाटकांचे प्रयोग जळगावलाही केले जात. नाटकांप्रमाणे
वृत्तपत्र व्यवसायाची परंपराही जळगावात जुनी आहे. प्रबोधचंद्रिका
साप्ताहिक आणि कवितेला वाहिलेले ‘काव्यरत्नावली’ मासिक नानासाहेब फडणीस ह्यांनी
जळगावला सुरू केले. भा. रा. तांबेंपासून केशवसुत-केशवकुमार ह्यांच्यापर्यंत असा
एकही कवी नसेल की ज्याच्या कविता काव्यत्नावलीत प्रसिध्द झाल्या नाही. राजसंन्यास
नाटकाचे काही प्रयोग राम गणेश गडकररींनी सोनाळकरांच्या
घरी लिहले. नोकरीनिमित्त माधव ज्युलियन ह्यांचे अमळनेरमध्ये काही काळ वास्तव्य
होते.
सानेगुरूजींनी तर खानदेश ही
कर्मभूमी मानली. त्यांच्या वास्तव्यामुळे खानदेशची भूमी पावन झाली. १९३०
साली गांधींजींच्या आदेशावरून दांडी यात्रेत कायदेभंग केला. सानेगुरूजींनीही
कोकणात शिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह केला. शिरोड्याच्या
सत्याग्रहात माझ्या वडिलांनी भाग घेतला! आपण मिठाच्या सत्याग्रहाला जात असल्याची
चिठ्ठी त्यांनी आजोबांना लिहून ठेवली. ही गीतेत ठेवल्यामुळे आजोबांना बरोबर
सापडली. ह्या आठवणीला माझे वडिल अधुनमधून उजाळा देत. मीही त्यांच्या आठवणीत
रमून जात असे.
न. चिं केळकरांचे ज्येष्ठ बंधू
महादेव चिंतामण केळकर हे जळगावला डेप्युटी कलेक्टर होते. त्यांचे मोठे घर होते. म.
चिं. केळकरांच्य पश्च्यात
त्यांचे चिरंजीव वसंत केळकर हे जळगावात स्थायिक झाले. मुंबईतली आर्ट गॅलरी बंद
करून उपजीवेकासाठी त्यांनी बळिराम पेठेत इंग्रजीचे क्लास सुरू केला. मी एस्सेसीला
असताना त्यांच्या क्लासमध्ये ५ रुपये भरून प्रवेश मिळवला. इंग्रजीसह मी एस्ससी
पास झाल्याने माझा कॉलेज-प्रवेश सोपा झाला.
जळगावच्या मूळजी जेठा कॉलेजात प्रा. म. ना. अदवंत हे
मराठीचे विभागप्रमुख होते. ते अनेक विद्यापीठांच्या
अभ्यास समितीवर होते. त्यांच्या मदतीला सुधाकर जोशी, विमल
राणे, राजा महाजन हे तीन व्याख्याते
होते. कॉलेजच्या आर्टस् शाखेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिंदीतील प्रख्यात
व्यंगकार शंकरबाब पुणतांबेकर हे हिंदी शिकवायला होते. उत्तमचंद कोठारी हे त्यांचे
मदतनीस. ह्यांच्याखेरीज सुरेश चिरमाडे ( अर्थशास्त्र ),
जोगळेकर ( तर्कशास्त्र
), तारळेकर दांपत्य, नाडकर्णी मॅडम
हेही वेगवेगळे विषय शिकवत. एकूण सगळी टीम पुणे-मुंबई विद्यापीठातल्या
व्याख्यात्यांच्या तोडीस तोड होती.
ह्या लेखाचा
‘फोकस‘ नेमका कशावर दिला आहे असा प्रश्न
पडण्याचा संभव आहे. त्याचे उत्तर असे की माझ्या आध्यात्मिक जीवनाची पार्श्वभूमी
वाचकांना समजण्यास मदत व्हावी. मला असे वाटते की ह्या लेखातील तपशीलाने ती
वाचकांच्या ब-यापैकी लक्षात आली असेल. वडिलांची परिस्थिती गरीबीची नव्हती
किंवा फार श्रीमंतीचीही नव्हती. वडिलांनी सुरूवातील धान्याचा आणि नंतर नंतर सरकी,
पेंड वगैरे पशुखाद्याचा व्यवसाय केला. धंद्यात त्यांना फार
पैसा मिळवला असे नाही. परंतु त्यांना कमी पडले नाही हेही तितकेच खरे. वंशपरंपरागत
मिळालेल्या प्रॉपर्टीची हिस्सेवाटणी झाल्यानंतर आमची परिस्थिती ब-यापैकी पालटली.
वडिल बंधूंचे शिक्षण एसेस्सीनंतर थांबले होते. मला मात्र कॉलेज शिक्षणाची संधी
मिळाली हे माझे वडिलोपार्जित भाग्य !
रमेश झवर