Tuesday, June 4, 2013

नारायण! नारायण!!

महाभारतात एक प्रसंग आहे. अठरा दिवसांच्या युद्धानंतर युधिष्ठराला राज्याभिषेक झाला. त्यानंतर पाची पांडव आणि श्रीकृष्ण असे सगळे जण शिळोप्याच्या गप्पा मारत बसले होते. त्या गप्पांच्या ओघात अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला अशी विनंती केली, मला तू युद्धाच्या आरंभी जसा उपदेश केला तसाच उपदेश तसाच उपदेश आम्हा सगळ्या पांडवांना पुन्हा एकदा कर! त्यावर भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, त्यावेळी मी जो उपदेश केला तसा उपदेश मला आता पुन्हा करता येणार नाही. मी करूही शकणार नाही!
  इन्फोसिस टेक्नॉलाजी ह्या नारायण मूर्तींनी स्थापन केलेल्या कंपनीची खालावलेली अवस्था सुधारण्यासाठी जेव्हा नारायण मूर्तींना कंपनीत पुन्हा पाचारण करण्यात आले तेव्हा मला महाभारतातल्या वरील गोष्टीची आठवण झाली. नारायण मूर्ती ह्यांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. देशात त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल कोणाचेही दुमत नाही. त्यांचे सहकारी, त्यांच्या हाताखाली काम केलेले तज्ज्ञ आणि एकूणच सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटतो. इतकेच नव्हे, तर त्यांना सर्वत्र मानाचे स्थान आहे. म्हणूनच त्यांना सरकारने पद्मपुरस्कार देऊन त्यांचा गौरवदेखील केला. त्याचे कारणही आहे. एकवेळ अर्धशिक्षित कामगारांचा सहभाग असलेली कंपनी चालवणे सोपे, पण सॉफ्टवेअर तज्ज्ञांना गोळा करून भारतात सॉफ्टवेअर सेवा देणारी कंपनी स्थापन करून ती चालवणे हे महाकर्म कठीण! परंतु त्यांनी हां हां म्हणता इन्फोसिस कंपनी नावारूपाला आणली. इतकेच नव्हे, तर टीसीएससारख्या कंपनीच्या अगदी नजीकच्या स्थानावर आणून उभी केली. त्यांच्या कंपनीमुळे भारताच्या निर्यात उत्पन्नात लक्षणीय भर पडली.
  नारायण मूर्तींनी असा काय चमत्कार केला की ज्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या कंपनीला परदेशातली कामे मिळाली! त्यांनी कोणता असा चमत्कार केला की ज्यामुळे कोणत्याही कंपनीला हाणून पाडण्यात वाकबगार असलेल्या मुंबई शेअरबाजारातील दलालांना इन्फोसिसला हाणून पाडता आले नाही? इन्फोसिसचे शेअर अनिच्छेने घेणा-या शिपाई, ड्रायव्हर, कारकून आदींना आयुष्यात लक्षाधीश होण्याचा योग आला. नारायण मूर्तींनी कंपनीचे धोरण राबवताना गुणवत्ताधिष्ठितेला महत्त्व दिले. वशिलेबाजी, चुगल्या-चहाड्या, नातेवाईकांची भरती हे सगळे दोष भारतातल्या कंपन्यांच्या पाचवीला पूजलेले आहेत. इन्फोसिस चालवताना मूर्तींनी हे दोष आपल्या कंपनीत शिरू दिले नाही. त्याचप्रमाणे सहका-यांवर हुकूमशाही न करता त्यांच्या योग्य निर्णयांचे कौतुक केले. पण फाजील लाड करून त्यांना डोक्यावर मात्र बसू दिले नाही. आर्थिक व्यवहाराची शिस्त त्यांनी स्वत: ना कधी मोडली की कोणला मोडू दिली. मध्यमवर्गियात नेहमी आढळणा-या रागव्देष, मत्सरादि दोषांपासून स्वत:ला अलिप्त ठेवले, बरोबरीच्या सगळ्या सहका-यांनाही ह्या दोषांपासून अलिप्त ठेवले. सहका-यांना त्यांनी कधीही हाताखालचे मानले नाही. की डोक्यावरही बसू दिले नाही. टार्गेट देण्यापेक्षा मार्गदर्शन केले. हुकूमशाहीचा मोह टाळला. टीमला सृजनशीलतेचा आदर्श घालून दिला. त्यामुळे भांडणे, कुरबुरी अन् कुरघोडीचे राजकारण मुळात उद्भवलेच नाही. लोकांना य़ुटोपियन वाटावी अशा त-हेने इन्फोसिस चालवली. इन्फोसिसच्या यशात ह्या सगळ्यांचा मोठा वाटा आहे. इन्फोसिस सोडून गेलेल्यांपैकी कोणीही नारायण मूर्तींबद्द्ल अनुदार उद्गार काढल्याचे एकही उदाहरण नाही. काहींनी नोक-या सोडल्या असतीलही; पण आपल्या महत्त्वाकांक्षेला अधिक वाव मिळण्यासाठी!   नारायण मूर्ती वयोमानानुसार कंपनीतून सेवानिवृत्त झाले. काही काळ निवांत घालवल्यानंतर व्हेंचर कॅपिटल कंपनी काढून करिअरच्या नव्या वाटेवरून त्यांनी प्रवास सुरू केला. त्यांची प्रकृती चांगली आहे. सुदैवाने त्यांच्या अर्धांगिनी सुधा मूर्ती ह्यांनीही त्यांना चांगली साथ दिली आहे. चांगले कौटुंबिक आयुष्य हा तर त्यांचा मोठा असेट आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वाखाली इन्फोसिसला पुन्हा सुगीचे दिवस येतील असा विश्वास अनेकांना वाटत असावा. किंबहुना तसा वाटतो म्हणूनच त्यांचे इन्फोसिसमध्ये पुनरागमन झाले! पण खरी गोम इथेच आहे. त्यावर बोट ठेवण्यासाठी ह्या लेखाचा प्रपंच!   जीवनाचे कोणतेही क्षेत्र असो, विभूतीपूजेशिवाय भारतात कोणाचेही पान हलत नाही. मग सॉफ्टवेअर-क्षेत्र तरी त्याला अपवाद कसे राहील? राजकारणाचे उदाहरण घेतले तर नेहरूंच्या निधनानंतर सूर्यास्त झाला अशी लोकांची भावना झाली. लालबहादूर शास्त्रींच्या अल्प कारकीर्दीनंतर आलेल्या इंदिरा गांधी सत्तेवर आल्या. त्यांच्या काळात झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाचा मोहरा इंदिरा गांधींनी हां हां म्हणता फिरवला. पूर्व पाकिस्तानच्या ठिकाणी बांगला देश अस्तित्वात आला. पण त्यांच्या ह्या यशात जनरल माणेकशॉ आणि त्यांच्या नेतृवाखाली लढणा-या फौजेचा मोठा वाटा होता. त्यांच्यानंत सत्तेवर आलेल्या राजीव गांधींनी तर संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रात क्रांतीच घडवली. मनमोहन सिंग हे नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा मोहरा फिरवला. तेच मनमोहनसिंग पंतप्रधान असूनही त्यांच्या सरकारवर प्रचंड अपय़शाला तोंड देण्याची पाळी आली.   टाटांच्या टीसीएसमधून बाहेर पडलेल्या नारायण मूर्तींनी सॉफ्टवेअर व्यवसायात अशा प्रकारचे बदल केले की ज्यामुळे त्यांना मागे वळून पाहावेच लागले नाही. ह्या कामी त्यांना नंदन निलकेणी आणि अनेक सहका-यांची साथ मिळाली ह्यात शंका नाही. त्याखेरीज सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या प्रज्ञावंत मुलांनी केलेली विक्रमी मेहनतही इन्फओसिसच्या उभारणीत नारायण मूर्तींना उपयोगी पडली नसेल काय?   सतत बदलत चाललेल्या अमेरिकन व्यवसाय पद्धतीच्या सूक्ष्म अभ्यास, निरीक्षणानेही नारायण मूर्तींच्या नेतृत्वाला धुमारे फुटले असतील. यशाचे रसायन नेहमीच गूढ असते. त्यात कधी कधी परिस्थितीचाही वाटा असतो. नेतृत्व काळाला घडवते तसे काळही नेतृत्व घडवत असते! नारायण मूर्तींच्या यशात नाही म्हटले तरी काळाचाही वाटा आहेच. ह्या पार्श्वभूमीवर नारायण मूर्तींच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.   नारायण मूर्तींसाठी इन्फोसिस आणि सॉफ्टवेअर व्यवसाय नवा नाही हे खरे. पण काळ मात्र नवा आहे. नारायण मूर्तींना इन्फोसिसला वर काढणे हे नारायण मूर्तींपेक्षाही काळाच्या हातात अधिक आहे. आपण म्हणतो, काळ बदलला. खरे तर, काळ बदलत नाही. Change denotes time!  काळ अनंत आहे, अनादि आहे. पण नारायण मूर्तींबरोबरची माणसे बदलली आहेत. इन्फोसिसमध्ये प्रत्येक पातऴीवरील माणसे बदलली असतीलच. म्हणूनच काळ बदलला! पण मला वाटते नारायण मूर्तीदेखील बदलले आहेत. इन्फोसिसचे कार्यकारी अध्यक्षपद स्वीकारताना त्यांनी आपल्या मुलाला स्वत:चा एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी म्हणून बरोबर आणले आहे. वास्तविक त्यांनी स्वत:च घालून दिलेल्या तत्त्वाच्या हे विरूद्ध आहे. त्यांच्या अपयशाची ही सुरूवात तर नाही ना?   इन्फोसिस सावरण्याच्या बाबतीत त्यांना कितपत य़श मिळते हे लौकरच दिसेल. आता काही मला पुन्हा गीता सांगता येणार नाही’, असे भगवान श्रीकृष्णावर सांगण्याची पाळी आली होती. तशीच पाळी नारायण मूर्तींवर येते का, हे आता पाहायचेय्.
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता
 

No comments: