Wednesday, June 12, 2013

प्रतिमेचा बळी!


भाजपामध्ये गेल्या तीन दिवसात ज्या वेगाने घटना घडल्या त्या वेगामुळे पक्षाचे शिल्ल्क राहिलेला जुना खांब कोसळतो की काय अशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पण प्रत्यक्षात खांब कोसळला नाही तरी लालकृष्ण आडवाणींनी कार्यकारिणी, संसदीय बोर्ड आणि निर्चाचन समितीचे सदस्यत्वाचा राजिनामा राजिनामा देताना केलेल्या आरोपांमुळे भाजपाच्या प्रतिमेला हादरा बसला. भाजपामध्ये फक्त विचित्र तणाव निर्माण झाला असून तो दूरही होईल, असे अनेकांना वाटत होते. तणाव संपला हे खरे; पण अशक्तपणा मागे ठेऊन!  सुदैवाने आडवाणींजीमधील भावविवशतेवर त्यांच्यातल्या विवेकबुद्धीने मात केल्यामुळे त्यांनी मोहन भागवत ह्यांचे ऐकून राजिनामा मागे घेतला. तणाव निवळला. पक्षात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. परंतु हा आनंद फार काळ टिकणारा नाही.
आडवाणीजी आता नव्वदीकडे झुकत चाललेले आहेत. ह्याही वयात पक्षात विचारविनिमयाची बैठक असो अथवा काही निर्णय घेण्यासाठीची बैठक असो, आडवाणी ती बैठक चुकवणार नाहीत. किंवा तो प्रश्न टाळणार नाही. परंतु गोव्याला भरलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत आपण हजर राहणार नाही असे जेव्हा आडवाणींनी कळवले तेव्हा मोदींच्या नावाला विरोध करण्यासाठीच त्यांनी हे पाऊल टाकले असे सर्वांना वाटू लागले. पण भाजपाचे सध्या काही बरोबर चालेले नाही, जो तो स्वत:चा अजेंडा राबवत असून निवडणुकीच्या तोंडावर तो पक्षाला घातक ठरणारा आहे एवढेच त्यांना अभिप्रेत होते. ते हुषार राजकारणी असल्यामुळे त्यांनी राजिनाम्याचे शस्त्र उगारले. ह्याचा अर्थ मोदींच्या नावाला त्यांचा विरोध होता असा नाही. कदाचित मोदींइतकेच अन्य लायक उमेदवार भाजपात आहेत, असेही त्यांचे मत असावे. मोदींच्या नावाबरोबर त्यांच्याही नावांची चर्चा झाली पाहिजे असे त्यांना वाटलेले असू शकते. किमान मोदींच्या नावावर विचारविनिमयाचा लोकशाही मार्ग स्वीकारावा, अशीही त्यांची भूमिका असू शकते. परंतु मोदींचे घोडे दामटणा-यांना लोकशाही मार्गाचे भान राहिले नाही. त्यांनी पक्षबैठकीचा मार्ग सोडून दिला. मिडियाचे दरवाजे ठोठावण्याचा मार्ग त्यांनी पत्करला. बैठकीपूर्वी आडवाणींची प्रत्यक्ष भेट घेऊन राजनाथ आणि मोदी ह्यांनी त्यांच्याशी विचारविनिमय केला असता तर कदाचित आडवाणींनी आढेवेढे घेऊऩ का होईना, मोदींच्या नावाला संमती दिली असती. कारण मोदींच्या नावाला देशभरात मिळणारा वाढता पाठिंबा आहे हे वास्तव नाकारण्याइतके आडवाणी मूर्ख नाहीत.
अडवाणींनी नेहमीच पक्षाला सर्वोपरी मानले आहे. पक्षासाठी स्वत:च्या महत्त्वाकांक्षेवर पाणी सोडून त्यांनी अटलबिहारी वाजपेयी ह्यांना पाठिंबा दिला होता. अर्थात अटलजींची जनमानसातली प्रतिमा लक्षात घेऊऩ त्यांनी स्वत:ची पंतप्रधान होण्याची महत्ताकांक्षा बाजूला सारली होती. निवडणुकीपूर्वी भाजपाचे भावी पंतप्रधान वाजपेयीच राहतील अशी नि:संदिग्ध घोषणा केल्यामुळेच भाजपाला सत्ता प्राप्त झाली होती. इंदिरा गांधींच्या काळात संसदेत वावरताना अटलजी आणि आडवाणी ह्यांची मैत्री जुळली होती. हे मैत्रीचे नाते त्यांनी सत्ता मिळवण्यापूर्वी अन् सत्ता मिळाल्यानंतरही निभावले. उपपंतप्रधानपद स्वीकारून त्यांनी आपल्या अटलजींबरोबरच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले. पूर्वायुष्यात भाजपासाठी त्यांनी केलेल्या ह्या त्यागाबद्दल त्यांनी कधी बक्षीसाची आशा मुळीच बाळगली नाही. पक्षात घेतल्या जाणा-या मोठ्या निर्णयांबाबत आपल्याशी विचारविनिमय केला गेला पाहिजे असे मात्र त्यांना अलीकडे वाटू लागले असेल तर त्यात वावगे काहीच नाही. नव्हे, ते अत्यंत स्वाभाविक मानली पाहिजे. मोदी आणि राजनाथ ह्यांच्या कंपूने मात्र आडवाणींच्या ह्या भावनेवर पाणी फिरवले. खरे तर, काँग्रेसमध्ये पूर्वी इंदिरा गांधी, नंतर राजीव गांधी आता सोनिया गांधी ह्यांचे जे स्थान आहे तसे वाजपेयी-आडवाणी ह्यांचे असले पाहिजे. पण नव्या पिढीतील भाजपा नेत्यांना राजकारणातला सूक्ष्म विचार माहीतसुद्धा नाही. म्हणूनच भाजपा जास्त काळ विरोधी पक्ष म्हणून राहू शकला;  पण जास्त काळ राहू शकला नाही!
नरेंद्र मोदी हे खरे तर आडवाणींचे चेले. गोधरा हत्याकांडाच्या वेळी मोदींच्या विरोधात काहूर उठले तेव्हा वाजपेयींनी त्यांना राजिनामा देऊन राजधर्माचे पालन करा,  असे सुचवले होते. त्या काळात हिंदुत्ववादी आडवणीच मोदींच्या बाजूने उभे राहिले. मोदींच्या गुजरातमधूनच आडवाणींनी गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली. प्रचाराला एकदाही न जाता मोदींनी त्यांना निवडून आणले. ह्या यशामुळे मोदी आणि आडवाणी ह्या दोघांची राजकीय प्रतिमा प्रथमच उजळून निघाली. राममंदिर आंदोलनामुळे भाजपाला यश मिळाले असेल; पण निदर्शकांना आवरू न शकणारा नेता अशी आडवाणींची काहीशी मलीन प्रतिमादेखील निर्माण झालीच. त्या मलीन प्रतिमेने त्यांचा बराच काळ पिच्छा पुरवला हे कसे नाकारता येईल? आपील मलीन पुसून टाकण्यासाठी त्यांनी पाकिस्तानात जाऊन जिनांबद्दल गौरवोद्गार काढले. बाबरीचे भूतही ते काही अंशी गाडू शकले. पण तरीही देशात उसळलेला इस्लामी दहशतवाद मात्र अजूनही शमलेला नाही.
मिडियीत आडवाणींच्या विरोधात प्रचाराची आघाडी नेहमीच उघडलेली असते. ह्या पार्श्वभूमीवर आडवाणींच्या मोदीविरोधाचे संशोधन बरेचसे कपोलकल्पित आहे. परंतु मिडिया मोगल एक विसरतात, वय झाल्यामुळे लालकृष्ण अडवाणी काहीसे भावविवश झाले हे खरे असले तरी त्यांच्या विवेकबद्धीने मात्र अजूनतरी त्यांची साथ सोडलेली नाही. भले संघाच्या सांगण्यावरून का होईना, त्यांनी दोन दिवसात राजिनामा परत घेतला. आपले मित्र अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या मदतीने ज्यांनी पक्ष उभा केला ते पक्षात कटुता मागे ठेऊन जातील असे कोणालाच वाटले नव्हते. पंतप्रधान होण्यासाठी मोदींना ज्या आक्रमक हालचाली केल्या त्या मात्र आडवाणींना खटकलेल्या असू शकतात. त्याला कारणेही आहेत. मोदींच्या नावाला नितिशकुमारांचा विरोध. यशवंत सिन्हांसारख्या स्वकियांचाही विरोध! हे सगळे घटक आडवाणी दृष्टीआड कसे करू शकतील? म्हणूनच साधकबाधक चर्चेनंतर मोदींचे नाव पुढे आलेले जास्त चांगले असा पोक्त विचार आडवाणींनी केला नसेल कशावरून? राजकीय जीवनात प्रत्येकाला फेससेव्हिंग दिले पाहिजे. भाजपामधल्या अनेक नेत्यांना ह्या तत्त्वाचे आकलनदेखील नाही.   पण भाजपामध्ये राजनाथसिंगांसह असे अनेक जण असे आहेत की जे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत. कोणत्याही प्रश्नावर फक्त व्यवहारवादी भूमिकेतून विचार करण्याची त्यांना सवय लागली आहे. ह्या मंडळींनी असे गृहित धरले की आडवाणींची फारशी फिकीर करण्याचे कारण नाही. ते दोनचार दिवस त्रागा करतील नंतर नंतर मुकाट मान्यता देतील! भाजपाचा हा व्यवहारवाद खोटा आहे असेही म्हणता येत नाही हेच राजिनामा-प्रकरणाने दाखवून दिले. पण भाजपाच्या प्रतिमेचा बळी गेलाच!
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता
 

No comments: