राजकारणात हिंदुत्वाचा बडिवार फार जुन्या काळापासून माजलेला आहे. महात्मा गांधींच्या बावन्नकशी हिंदूत्वाची बरोबरी आजच्या तथाकथित हिंदूत्वावाद्यांना मुळीच करता येणार नाही. मुळात त्यांना महात्मा गांधींच्या हिंदूत्वासंबंधी काडीचीही माहिती नाही. इतकेच नव्हे तर खरे हिंदूत्व कशात आहे ह्याचा तर त्यांना थांग पत्तादेखील नाही. महात्माजींच्या हिंदुत्वाला त्याग आणि अहिंसेची पार्श्वभूमी असून अस्पृश्यांबद्दल कणव आणि शत्रू म्हणून ओळखल्या गेलेल्या मुसलमान, ख्रिश्र्चन, बौद्ध ह्या सर्वांबद्दल सारखीच आपुलकी हे महात्मा गांधींच्या हिंदूत्वाचे सार होते. महात्मा गांधी स्वत:ला कट्टर हिंदू समजत असत. देऊळ, प्रार्थना, हाती घेतलेले कार्य कर्मबंधनात न सापडता पुरे करण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. ते आत्म्याचे अमरत्व मानणारे, पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे, सत्य-अहिंसा आचरणारे, वर्णाश्रमाप्रमाणे चालणारे, नि गोरक्षणाचा आदर करणारे हिंदू होते. वेद, उपनिषदे, गीता, रामायण-महाभारतादि ग्रंथ शिरोधार्य मानणारेही होते. हिंदूसकट सर्व समाजाचे हित पाहणारे होते.
हा आपला, तो परका असा भेदभाव त्यांना मुळीच मान्य नव्हता. फक्त स्वकीयांबद्दलच झटणारे, केवळ उच्चवर्णियांतच उठबस करणारे, कनिष्टवर्णियांबद्दल घृणा बाळगणारे अशा प्रकारचे ‘राजकीय हिंदू’ ते मुळीच नव्हते. त्यांचे हिंदुत्व हिंदू महासभेलाच काय, नेहरू-पटेलादि काँग्रेस नेत्यांनाही परवडणारे नव्हते. जन्माने वैष्णव असलेल्या गांधींत औदार्य, करूणा, विनम्रता वगैरे वैष्णवांचे सारे सद्गुण एकवटले होते. म्हणूनच, योगानंदांकडून योगदीक्षा घ्यायला त्यांना मुळीच संकोच वाटला नाही. विवेकानंद, टॉलस्टॉय, टागोर, बायबल ह्या सर्वांचा त्यांच्या व्यक्तिमत्वार खोल परिणाम झालेला होता. गांधीजींनी सिद्ध करून दाखवलेली हिंदुत्वाची कसोटी मान्य केली तर किती नेत्यांना त्यांचे हिंदूत्व सिद्ध करून दाखवता येईल? समजा, करून दाखवता आली तरी तरी, राजकारण करण्याची वेळ येताच त्यांचे हिदूत्व गळून पडणार!
मोदींच्या हिंदूत्वालाही करूणेचा ‘साक्षात्कार’ झाला. पण तो फक्त थेरॉटिकल! कुत्र्याचे पिलू गाडीखाली सापडले तर आपण वाहनचालकाच्या सीटमध्ये नसलो तरी आपल्याला दु:ख होणारच, असे त्यांनी रॉयटरच्या वार्ताहराला सांगितले. रेलवेच्या डब्यातील मुस्लिमांना जाळून टाकण्याची घटना नि कुत्र्याचे पिलू अपघातत: गाडीखाली सापडून ठार मारले जाणे ह्या दोन घटनेतला फरक मोदींना नक्कीच कळतो. म्हणजे कळावा अशी अपेक्षा आहे. एक माणूस ह्या नात्याने त्यांना गोध्रा येथील मुस्लिमांच्या हत्याकांडाचे नक्कीच दु:ख झाले असणार! पण गुजरातचे शासनकर्ते ह्या नात्याने गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देववण्याच्या सुस्पष्ट आदेश त्यांनी तपासयंत्रणेला दिला होता का याबद्दल संशयाचे वातावरण मात्र निश्र्चितपणे निर्माण झाले होते. भले चौकशी यंत्रणांनी त्यांनी दोषमुक्त केले असले तरी संशयाचे ते वातावरण आजही कायम आहे. राजधर्माचे पालन करा, असा स्पष्ट आदेश त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी मोदींना जाहीररीत्या दिला हेही लोक विसरलेले नाहीत. ह्या एकाच घटनेवरून मोदींच्या हिंदूत्वाची नि राष्ट्रीयत्वाची परीक्षा लोक एकाच वेळी करणार अन् मोदींचे हिंदूत्व शंभर नंबरी नाही, असा निर्वाळा दिला जाण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय जनमानसाला हिंदुत्वाबद्दल अतीव आदर आहे ह्यात शंका नाही. ‘हिंदूत्व’, ‘राष्ट्रीयत्व’, ‘धर्मनिरपेक्षता’ ह्या शब्दांचा राजकारणात अलीकडे सर्रास वापर सुरू आहे. पण बारकाईने पाहिले तर राजकारणातल्या ह्या चलनी नाण्यांना हल्ली कोणी किंमत देत नाही. ही ‘चलनी नाणी’ फेकून निवडणूका जिंकता येतात असे जरी ज्युनियर राजकारण्यांना वाटत असले तरी तो त्यांचा एक मोठा भ्रम आहे. अलीकडे बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशी भावना देशवासियात बळावत चालली आहे. सत्य स्वयंप्रकाशित असले तरी ते सिद्ध करून दाखवावे लागते. आतापर्यंत मोदींना त्यांचे हिंदूत्व नि राष्ट्रीयत्व सिद्ध करून दाखवावे लागले नसले तरी पंतप्रधानपद मिळवण्यासाठी त्यांना ते सिद्ध करून दाखवावेच लागणार!
अतिरेकी हिंदूत्ववाद्यांनी भले बाबरी मशीद उद्धवस्त केली असेल, पण भाजपाला सत्ता मिळाल्यानंतर रामजन्मभूमीवर देऊळ उभारणी करणे काही त्यांना जमले नाही. भारतातली अनेक देवस्थानांचा कारभार भ्रष्ट्राचाराने बरबटलेला आहे. त्याची हिंदूं मनाला विषण्ण करणारी जाणीव भाजपाला कधी दूर करता आली नाही, असाही विचार लोकांच्या मनात येतोच. भाजपाच्या मनात मात्र हा विचार कधी आला का? काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहूल गांधी ह्यांनाही जनता हिंदूत्वाच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या कसोटीवर एकाच वेळी पारखून घेऊन मगच मतदान करणार! काँग्रेसलाही खरी धर्मनिरपेक्षता अन् खरे हिंदूत्व सिद्ध करून दाखवावे लागणारच. गरीबांबद्दलची कणव आणि पापभिरू मुसलमानांना अभय तसेच माणूसकीच्या सर्व मर्यादा सोडून बसलेल्या दहशतावद्यांना कठोर शासन ही सच्च्या हिंदूत्वाची कसोटी आहे. ह्या जनमान्य कसोटीवर दोन्ही पक्षांना खरे उतरावे लागेल. गरीबाच्या झोपडीत जाऊन एखाद्या वेळी जेवण घेण्यामुळे गरीबांबद्दलची कणव सिद्ध होते असे मुळीच नाही. किंवा रमजान पार्टीला मुसलमानविशिष्ट टोपी वापरून रमजान-भोजन समारंभाला हजेरी लावल्यामुळेही सर्वधर्मनिरपेक्षता सिद्ध होत नसते.
भ्रष्ट्राचारमुक्त अर्थव्यवस्थेचा लाभ गोरगरीबांपर्यंत पोहचवण्याच्या ध्येयधोरणाची अमलबजावणी करणा-या काँग्रेस आघाडी सरकारच्या योजना प्रत्यक्षात किती उतरल्या? ह्या योजनांची चोख अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत काँग्रेसला भविष्यकाळात किती यश मिळेल, हीदेखील कसोटी मतदार लावणार ह्यात शंका नाही. अजून तरी हिंदुत्वाच्या सच्च्या निकषावर भाजपाला नि धर्मनिरपेक्षतेच्या सच्च्या निकषावर काँग्रेसला यश मिळालेले नाही.
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता
No comments:
Post a Comment