नोबेल पुरस्कारविजेते अमर्त्य सेन हे नुकते भारत दौ-यावर आले आहेत. ह्या दौ-यात दारिद्र्य निमूर्लनाच्या दृष्टीने देशात सुरू असलेल्या प्रयत्नांच्या संदर्भात बिहार, ओडिशा आणखी काही अन्य राज्यांनी बजावलेल्या स्तुत्य कामगिरीचा अमर्त्य सेन ह्यांनी गौरव केला. हा गौरव करताना त्यांनी नरेंद्र मोदी आणि गुजरातबद्दलची आपली मते मांडली. गुजराते मुख्यमंत्री नरेंद्र मोदी ह्यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळून उपयोग नाही; कारण जातीयतेच्या प्रश्नावर मोदींची मते आणि भूमिका मला मान्य होणारी नाही. गुजरातमधील विकासाचे मोदींचे मॉडेलही देशाला उपयोगी पडणारे नाही, असेही अमर्त्य सेननी स्पष्टपणे सांगितले. झाले. भाजपातील मोदीवाद्यांचे पित्त खवळले. लावालावी म्हणजेच बातमी असे मानणा-यांना चार पत्रकारांना भाजपाच्या चंदन मित्रमहोदयांनी गोळा करून भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीने भावी पंतप्रधान मोदींबद्दलची अशा प्रकाराची मते व्यक्त करणे बरोबर आहे का, असा सवाल उपस्थित केला. अमर्त्य सेननी भारतरत्न पदवीची शोभा घालवली आहे, असेही उद्गार काढले.
भारतरत्न हा सन्मान आपल्याला अटलबिहारींच्या काळातच मिळाला; मला भारतरत्न मिळू नसे असे भाजपाला वाटत असेल तर वाजपेयींनी मला सांगावे, मी भारतरत्न परत करायला तयार आहे, असे अमर्तय सेननी सांगून मित्रांची बोलती बंद करून टाकली. लालकृष्ण अडवाणी, यशवंत सिन्हा वगैरे मंडळी आपले मित्र आहेत हेही त्यांनी जाता जाता सांगून टाकले. अमर्त्य सेन हे जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ असून दारिद्र्यनिर्मूलनाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या चिंतनाबद्दलच त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांना नोबेल मिळाल्याचे पाहून त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी स्वतः अमर्त्य सेनना भारतरत्न देण्याची शिफारस केली. त्यानुसार सेनना भारतरत्नचा सम्मान देण्यातही आला. एका भारतीय अर्थशास्त्रज्ञाचा जगात गौरव होतो अन् भारतवासियांना त्याचे काहीच कौतुक नाही ही स्थिती सरकारला तरी शोभणारी नाही हे लक्षात घेता अमर्त्य सेनना सन्मानित करण्याचा वाजपेयींचांचा निर्णय बरोबरच होता. अनेकदा निर्णय संकुचित पक्षभावना बाजूला ठेवून घ्यावा लागतो. ह्याचे वाजपेयींना चांगलेच भान होते. पण भाजपातील अनेक गणंगांना ते भान तेव्हा नव्हते. आजही नाही. कुठे वाजपेयी अन् कुठे चंदन मित्र!
कोणाचाही मुलाहिजा न बाळगता विचारवंत, कलावंत, शास्त्रज्ञ, लेखक वगैरे मंडऴींनी आपली मते परखडपणे व्यक्त करावीत अशी त्यांच्याकडून सुबद्ध नागरिकांची अपेक्षा असते. ह्याउलट स्वार्थप्रेरित मत व्यक्त करणे म्हणजे चापलूसी, हांजीहांजीखोरपणा ठरतो. भारतात सुदैवाने स्पष्टपणे आपली मते मांडण्याची परंपरा आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केल्यानंतर विनोबांनी ‘हे तर अनुशासनपर्व!’अशी सुटसुटीत प्रतिक्रिया व्यक्त केली. अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यामागे नक्कीच विनोबांचे काहीतरी राजकारण असले पाहिजे, असा जावईशोध अनेकांनी लावला. वास्तविक विनोबांच्या प्रतिक्रियेत खोल अर्थ दडलेला होता. युधिष्टराला राजधर्म समजावून सांगण्यासाठी महाभारतकारांनी अनुशासन पर्व लिहीले असून श्रीकृष्णाच्या सूचनेनुसार भीष्माने युधिष्टराला राजधर्म समजावून सांगितला. न्यायाने राज्य करण्याचा सल्ला विनोबांनी इंदिरा गांधींना दिला होता. त्याचप्रमाणे सैन्याला बंज करण्याची चिथावणी देणा-या जयप्रकाशजींनाही विनोबांची चपराक असू शकते. गांधींजींना त्यांच्या तोंडावर तुमचे चुकले असे सांगणारे अनेकजण होते. त्यात कुमारअप्पा हे एक होते. गांधींजींच्या मतांची ते त्यांच्या तोंडावर खिल्ली उडवत असत. अनेकदा गांधींना त्यांनी निरूत्तर केलेले आहे.
सध्या बहुतेक सर्व पक्षांच्या नेत्यांनी पत्रकारांपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी पक्षप्रवक्त्यांच्या नेमणुका करून घेतल्या आहेत. वास्तविक नेता कितीही मोठा असेना का, त्याने प्रेसला सामोरे गेले पाहिजे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहूल गांधी किंवा भाजपा नेते अडवाणी हे प्रेसला का टाळतात? आपण जातीने सामोरे जाण्याइतकी सध्याची प्रेस इंटेलिजंट नाही असे त्यांना वाटते का? की त्यांना खरोखरच फुरसद नाही? ते वाक्चातुर्यात कमी पडतात का? राजकारणाचा सध्या खेळखंडोबा होण्याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी राजकीय वक्तव्ये करण्यासाठी लागणा-या वाक्चातुर्याचा अभाव हे असेल का? त्याच त्या प्रश्नांना तीच ती उत्तरे देण्यासाठी प्रेसब्रीफिंग गिरणी चालत असते. आपले रोजचे दळण दळा आणि घरी जा, असा प्रवक्त्यांना आदेश दिसतो. त्यामुळेच बहुधा चंदन मित्रासारख्या निर्बुद्ध प्रवक्त्यांना रोजगार उपलब्ध होत असतो.
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता
No comments:
Post a Comment