असंख्य मुलामुलींच्या वैवाहिक आयुष्याची सुरूवात रोखून धरण्याचा, भौमा,
तुझ्यावर कोणी कितीही आरोप केले असले तरी तू ते मनावर घेऊ नकोस!
राग तर अजिबात धरू नकोस. पृथ्वीवरच्या माणसांना खोड
आहे आपल्या स्वभावाचं खापर दुस-यावर फोडण्याची पृथ्वीवरच्या असंख्य मानवांना
येणारा राग येतो तो केवळ तुझ्यामुळेच! पण खरं सांगू का? अलीकडे वाटायला लागलं राग आलाच पाहिजे.
जिकडेतिकडे भ्रष्टाचाराचं साम्राज्य पसरलं असताना ज्याला राग येत नसेल त्याला काय
म्हणावं? ज्याची विवेकबुद्धी शाबूत आहे त्यांना राग येत
नाही हाच तर मोठा चिंतेचा विषय आहे.
पण तथाकथित विचारी माणसं तुलाच दोष देतात! कुडमुड्या ज्योतिषांनी तुला ‘व्हीलन’ ठरवून टाकलं आहे.
त्याला लोक तरी काय करणार? तुझ्याबद्दल लोक वाटेल
ते बकत सुटतात! पण लोकांच्या जिभेला हाड नसतं हे लक्षात ठेव!
आणि हाड असलं तरी त्याचा फारसा उपयोग झाला नसता. म्हणूनच जगभरातल्या शास्त्रज्ञांनी लोकांच्या
नादी न लागता सरळ सरळ तुझी भेट घेण्याचा विचार केला. नुसतीच भेट नाही तर तुला अंजारून
गोंजारून बघावं, तुझ्या मऊसूत अंगावरून हात फिरवावा, जमलं तर तुझी ‘प्रकृती’ तपासून पाहावी ह्यासाठी
एकच धडपड सुरू केली.
अक्षरशः 51 वेळा तुझ्या दिशेने शोध यान पाठवले. यश मिळाले ते फक्त 21
वेळा. पृथ्वीवरील अमेरिका आणि युरोप खंडातल्या देशांनी तुझा सतत ध्यास घेतला.. एकविसाव्या
वेळी मिळालेले यश मात्र अफाट आहे. ते मिळवण्याचा मानही तू भारताला दिला. तुझा
स्वभाव पडताळून पाहण्याचा, तुझ्या परिसरातलं वातावरण ढुंढाळण्याचे नाना प्रयत्न आतापर्यंत
पृथ्वीवासियांनी केले. युरोपमध्ये तर सतरा देश एकत्र आले होते. पण तू कुणाला फारशी
दाद दिली नाही. आता भारतातून तुझ्याकडे पाठवलेल्या मॉम (मार्स ऑर्बिटर मिशन) ह्या दूताला
मात्र तू पहिल्या फटक्यात यश मिळवून दिलेस! तुझ्या अदृश्य कक्षेपर्यंत
पोहोचायला त्याला 322 दिवस लागले तेथे पोचताच आम्हाला हायसं
वाटलं. मात्र सकाळी त्याच्या गतीकडे डोळे लावून बसलेल्यांना तुझा निरोप बरोबर 6-56 वाजता
मिळला. तू तिथपर्यंत पोहोचला लगोलग तुझ्या कक्षेत शिरण्याच्या दृष्टीने त्याने आपली गती कमी केली. निरोप होता. त्याप्रमाणे
गती कमी करण्याची त्वरीत हालचाल सुरू झाल्याचाही सूचना श्रीहरीकोटा येथे जमलेल्या सर्व
शास्त्रज्ञांना मिळाली. त्यांना किती आनंद झाला म्हणून सांगू! पुढे सगळं अपेक्षेप्रमाणे घडत गेलं. मागचं इंजिन
25 मिनीटं धडाडत राह्यलं त्यानंतर स्वतःला परिभ्रमणासाठी त्यानं सज्ज केलं. 7.42
तो थोडा मागे आला. आणि पुन्हा मंद वेगाने तुझ्या कक्षेत तो शिरला. हे सगळं त्याने
स्वतःच्या मनानं केलं. तिथपर्यंत पोहोचताना वेग कमीजास्त करणं, उंची खालीवर करणं,
मागेपुढं सरकणं तेथे पोहोचताच वेग कमीजास्त करणं ह्या सा-या क्रिया त्याच्या त्यानेच
केल्या. त्या यशस्वी होण्यावर सारं काही अवलंबून होतं. सुदैवाने तो यशस्वी झाला. पृथ्वीवर
त्याचं नियंत्रण करण्याची मुळी व्यवस्थाच नव्हती. फक्त सगळं काही सुरळित चाललं की
नाही ते पाहण्याचे काम मात्र डोळ्यात तेल घालून करत होते सगळे जण.
तुला गंमत वाटेल! पण तुझ्याकडे सुमारे
68 कोटी किलोमीटरपर्यंत दौडत येणारा हा दूत निर्जीव आहे. मात्र दूतवैष्णवाप्रमाणे
हा बुद्धिमान आहे. आतापर्यंत जे जे कोणी तुझ्यापर्यंत पोहोचले त्या सगळ्यांपेक्षा
हा म्हणे स्मार्ट आहे. त्याला कामाला लावण्यासाठी सूचना द्याव्या लागत नाही. कोणाला
काही बाहेरून काही करावंच लागत नाही. त्याचं काम तो स्वप्रेरणेनेच करतो.. हां,
त्याला काम मात्र नेमून दिलं आहे. ते म्हणजे तुझ्या अंगप्रत्यंगात कोणता वायू दडला
आहे. माणसाच्या शरीरात पाच प्रकारचे वायू असतात असं म्हणतात. प्राण-अपान व्यान-उदान
आणि समान ह्या पाच वायूंच्या वेगवेगळ्या कार्यामुळे देह चालतो. पृथ्वीच्या पोटात
तर अनेक वायू आहेत. त्या त्या वायूमुळे पृथ्वीचा कारभार अजून आटोपला नाही. खेरीज
पृथ्वीवर 21 टक्के प्राणवायु आहे. म्हणून सगळं काही चालंल आहे. तुझ्या अंगप्रत्यंगात
मिथेन नामक वायू दडला असावा असा पृथ्वीवासियांचा कयास आहे. तुझा स्वभाव भडक
असल्याचे लोक सांगतात! तुझी कांती तांबूस वर्णाची आहे असं म्हणतात.
नव्हे नुसत्या नजरेने पाहणा-यांनाही ते जाणवतं. परंतु आता तुझी छायाचित्रं पाहून
तर खात्रीच पटली. त्या तांबूस अंगकांतिचं रहस्यही आम्हाला जाणून घ्यायचं आहे.
तुझं रहस्य जाणून घेण्याचा कुणी कुणी प्रयत्न केला नाही? जपानने 1998 साली केला. त्यानंतर चीनने 2011 साली केला.
परंतु ते दोन्ही तोंडघशी पडले. तुझ्याकडे येण्याचा युरोपमधल्या 17 देशांनी मिळून
प्रयत्न केला. हे सगळे जण तुझ्याच मागे का बरे लागले? मिथेनचा पत्ता
लागला तर तुझ्याविषयी ते अनेक निष्कर्ष काढू शकतात. खरं तर त्यांचा हेतू वेगळाच
आहे. तू पृथ्वीचा सहोदर आहेस. त्यामुळे पृथ्वीसारखं वातावरण तुझ्याकडे असण्याचा
संभव आहे. थोडक्यात तुझ्या ध्यानात आलाच असेल आमचा हेतू! पृथ्वीसारखं हवापाणी
जर तिथे निर्माण करणं शक्य असेल तर लागलीच एफएसआय मंजूर करून तेथे वसाहत
करण्याच्या दृष्टीने टीम पाठवण्यात येईल. त्यामुळे तुझी काय नासाडी होईल हे सांगता
येत नाही. मात्र, पृथ्वीपुत्रांनी पृथ्वीची बरीच नासाडी करून ठेवली आहे. आमच्या
देशातील महाराष्ट्र नामक प्रांतात सध्या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने वांधेखोरीला
जोर आला आहे. तुला म्हणून सांगतो, सगळ्या वांधेखोरीच्या मुळाशी एफएसआय प्रकरणच
असतं. एफएसआय देण्यावरून मंत्रिमंडळात भांडणं सुरू असतात. तो देण्याचा अधिकार मला
पाहिजे, त्याला नको, हाच खरा मुद्दा आहे. किती पैसा करता येईल ह्याचा हिशेब करून
मगच जागांची मागणी, मुख्यमंत्रीपदाची मागणी असले मुद्दे उपस्थित केले जात आहे.
असो. त्यामुळे ‘मॉम’ला तुझ्याकडे
पाठवलं, नेमून दिलेल्या कामात ‘मॉम’ यशस्वी झाला. पण
कोणाला तुझ्याकडे पाठवलेल्या दूताशी घेणं देणं नाही!
मंगळावर वस्ती? कशाला फिकीर करू? माझ्या हयातीत ते
होणार नाही. माझ्या मुलाबाळांच्या हयातीतही तेथे वस्ती करण्याचा विचार सुरू होणं
शक्य नाही. आम्ही रोकडा विचार करणारी माणसं! शेपन्नास
वर्षांनंतरचा सौदा आताच कशाला करू? टिकट मिला तो सबकुछ मिला. एक सधा
सब सधै! प्रॉमिस,
तुझ्याकडे येण्यासाठी बुकिंग सुरू झालं तर पहिलं बुकिंग मुंबईतनं! दिल्ली, श्रीहरीकोटाचे प्रवासी तुला मिळतील. पण ते
सगळे एकजात फुकटे! वाटलं तर मंगल जर्नीची
एजन्सीदेखील आम्ही घेऊ. त्याच्या उद्घाटनालाही येऊ. कारण शास्त्रज्ञांनी आम्हाला
स्पष्ट सांगितलंय. पृथ्वीवासियांचा भूतकाळच नव्हे; तर भविष्यकाळ जाणून घेण्याची उत्सुकता हेच ‘मॉम’चे ध्य़ेय आहे. आमचा
शास्त्रज्ञांवर पूर्ण भरवसा आहे. ते त्यांची कामगिरी
अगदी माफक खर्चात बजावतील! पहिल्या अधिवेशनात शास्त्रज्ञांच्या अभिनंदनाचा
ठराव घेऊ!
भौमा, तू पृथ्वीचा धाकटा भाऊ आहेस की नाही हे आम्हाला अजून माहीत नाही.
पण जरा सबुरीने घे. तुला जाता जाता विनंती. धसमुसळेपणा नकोस. हां, आणखी एक, बाबारे
मदत करात आली नाही तरी चालेल, पण कुणाचंही लग्न मोडू देऊ नकोस! जमलं तर न्य़ायालयात
पेंडिंग असलेली घटस्फोटांची प्रकरणं कमी कर.
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता