Friday, September 5, 2014

खुबीदार नारा

विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची वेळ जवळ येऊन ठेपली तरीही निवडणुकीची घोषणा झालेली नाही. दिवाळी-दस-याच्या सणाचा निवडणूक प्रचारात अडथळा नको अशी सर्व संबंधितांची इच्छा असल्याने निवडणुकीच्या तारखा ठरवण्याच्या बाबतीत निर्वाचन आयोगात घोळ सुरू आहे. परंतु प्रचारात येणा-या अडथळ्याचे हे कारण खरे वाटत नाही. तारखांचा घोळ हे एक कारण आहे. पण ते एकमेव नाही. खरे कारण वेगळेच असले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या धुंदीत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणे धोक्याचे ठरेल, असे भाजपा नेत्यांना वाटत असावे. निवडणुकीला सामोरे जाताना निदान जागा वाटपावरून तरी धुसफूस नको. हा बखेडा वेळीच मिटवला नाही तर युतीच्या ताकदीसह स्वतःचे बहुमत ह्या भाजपाच्या धोरणावर पाणी पडू शकते! अमित शहांना विदारक वास्तवाची जाणीव असावी. म्हणूनच आधी शिवसेनेबरोबर शतप्रतिशत सलोखा आणि नंतर भजपाची शतप्रतिशत यशाची व्यूहरचना ह्या मूळच्या धोरणाला नवा पॅच जोडण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले. मुंबई भेटीचे सगळे सोपस्कारही त्यांनी यथास्थित पार पाडले. विमानतळावर उतरताच अब सब महाराष्ट्र हा नारा त्यांना ऐकवण्याची तजविज फ़डणवीस-तावडे ह्या जोडगोळीने चोख बजावली.
अब सब महाराष्ट्र हा नाराही खुबीदार आहे! त्यात महाराष्ट्रात युतीच्या सत्तेबरोबर भाजपाचे बहुमतही समाविष्ट आहे. राहता राहिला शिवसेनेच्या भावना कुरवाळण्याचा प्रश्न. तोही अमित शहांनी कसलेल्या बनियाप्रमाणे अलगद सोडवला. मातोश्रीवर जाऊन उद्धवजींना भेटण्याची संजय राऊतनी केलेली विनंती तर शहांनी मान्य केलीच; खेरीज आधी बाळासाहेबांच्या स्मारकास भेट देऊन श्रद्धांजलीदेखील वाहिली. शिवसेनेला एकूण जागांच्या 50 टक्केच जागा शिवसेनेला हव्या आहेत असे नव्हे, तर अन्य सहकारी पक्षांना ज्या जागा द्यायच्या त्या देऊन झाल्यावर उर्वरित जागांच्या 50 टक्के जागा शिवसेनेला हव्या आहेत. शिवसेनेची ही मागणी मान्य करायची की युतीला मिळणा-या संभाव्य यशाला निवडणुकीपूर्वीच गालबोट लावून घ्यायचे असा हा तिढा आहे.
उत्तर प्रदेशची सगळी जबाबदारी नरेंद्र मोदींनी अमित शहांवर टाकली होती. त्या वेळी अमित शहांनी जे कौशल्य दाखवले तेच कौशल्य महाराष्ट्राच्या विधानसभा निव़णुकीच्या वेळी दाखवावे अशी खुद्द नरेंद्र मोदींची अपेक्षा आहे. ही अपेक्षा बरोबरच आहे. कारण भाजपाला राज्यासभेत बहुमत नाही. जोपर्यंत दोन्ही सभागृहात बहुमत नाही तोपर्यंत उतू नका मातू नका असाचा आदेश भाजपातील देशभरातल्या आमदार-खासदारांना, नेत्यांना, उपनेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे. सर्वांना बरोबर घेऊन सरकारला देश पुढे नेण्याचे काम करायचे आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरांनी दूरदर्शनला मुलाखत देताना, स्पष्ट सांगितले. सरकार चालवण्यासाठी जे आवश्यक तेच विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठीदेखील आवश्यक आहे. अमित शहांनी हे भान बाळगलेले दिसते. म्हणून उद्धव ठाकरे म्हणतील त्याप्रमाणे उठाबस करण्यास अमित शहा तयार झाले. मुंबई भेट हे त्याचे प्रात्यक्षिकच म्हणायला हरकत नाही. अमित शहा हे कोल्हापूरचे पाहुणे आहेत. महाराष्ट्राचा मान राखायला पाहुणे चुकले नाहीत. आता पाहुण्याचा मान राखायला शिवसेना चुकणार नाही! एकूण निवडणूक होऊन जाईपर्यंत तरी दोन्ही पक्षात सुरू असलेला आणि काँग्रेस आघाडीला हवी असलेली कुरबूर संपुष्टात येणार असाच संदेश मोदीदूत अमित शहांनी दिला आहे.
काँग्रेसमधली परिस्थिती मात्र सेना-भआजपा युतीतल्या परिस्थितीच्या बरोबर उलट आहे! एकमेकांवर गुरगुरण्याचा मक्ता काही एकट्या अजितदादांनी घेतलेला नाही. पृथ्वीराज चव्हाणांनीदेखील राष्ट्रवादीवर अधुनमधून गुरगुरण्याचे  टेंडर भरलेले आहे. लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीची समीकरणे वेगळी असा पेटंट युक्तिवाद दोन्ही काँग्रेस स्वतःशी करत आहेत. मोदी लाट थोपवण्यासाठी ह्याच सूत्राचा आधार काँग्रेसवाले घेणार हे भाजपाने आधीच हेरून ठेवले आहे. म्हणून अमित शहांनी मुंबई दौ-यात पहिली तोफ डागली ती काँग्रेसविरूद्ध! मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांची मुळात नियत साफ नाही म्हणून तर दुष्काळ, गारपीट, अशा अस्मानी संकटांना महाराष्ट्राला वारंवार तोंड द्यावे लागते, ह्या अमित शहांच्या विधानाने भाजपाच्या प्रचाराची दिशा स्पष्ट झाली. दुष्काळपीडितांना, संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी काँग्रेस सरकार नेहमीच पुढे सरसावले आहे ह्या काँग्रेसकडून होणा-या पेटंट मुद्द्यातले फोलपण दाखवून देताना नियत वगैरेचा अमित शहांनी उपस्थित केलेला मुद्दा बुद्धिवाद्यांना झोंबणारा आहे ह्यात शंका नाही. परंतु बाजारपेठा गल्ली, चव्हाटे येथे हिरिरीने चालणा-या चर्चांना ह्या मुद्द्यामुळे खचितच खाद्य पुरवले जाईल. भाजपाविरूद्ध सेक्युलरवादी काँग्रेसकडे मुद्दे शिल्लक उरलेले नाहीत. गांधींजींच्या खुन्यांना निवडून देऊ नका, हिटलरी प्रवृत्ती असलेल्यांना पाडा वगैरे मुद्दे कधीच संपलेले आहेत. त्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस ह्यांच्यातली संदोपसुंदी गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. त्याचाच फायदा सेना-भाजपा युतीला मिळू शकतो.
रमेश झवर

भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

No comments: