Friday, September 12, 2014

शांतता, गुर्‍हाळ चालू आहे!

सेना-भाजपा युती असो की काँग्रेस राष्ट्रवादी असो, वाटाघाटींचे गु-हाळ चालू असल्यामुळे एकमेकांसाठी किती जागा सोडायला दोन्ही बाजूंचे नेते तयार आहेत हे जाहीर झाले नाही. त्यामुळे निव़डणूक जाहीर झाली तरी जागावाटपाची अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही. विधानसभा निव़डणूक एकत्रितरीत्या लढवायाची एवढे सामंजस्य मात्र टिकून आहे हे नशीब म्हणायला हवे! भाजपाला लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे पूर्ण बहुमत मिळवता आले तसे बहुमत विधानसभा निवडणुकीतही मिळवता येईल का, असा भाजपापुढे प्रश्न निर्माण झालेला असू शकतो. कदाचित् थोडी तडजोड मान्य केल्याखेरीज जागावाटपाचे गु-हाळ पुढे सरकणार नाही अशीही अवस्था  असू शकते. अन्यथा एव्हाना निवडणुकीची घोषणा झाली असती. जागावाटपाच्या वाटाघाटींचे अडकलेले  गु-हाळदेखील जागच्या जागी थांबले नसते. म्हणूनच सध्या पितृपक्षाचा अशुभ काळ सुरू असल्याचे कारण पुढे करण्याची वेळ युतीवर आली आहे. सगऴे श्राद्धादि कर्मात अडकले असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात पेरण्याची देखील त्यांच्यावर पाळी आली. जागावाटपात शिवसेनेला 143 तर भाजपाला 145 जागा देण्याचे ठरले असून दोन्ही पक्षांनी आपल्या वाटणीच्या समसमान जागा युतीतल्या अन्य पक्षांसाठी सोडाव्यात असे ठरले असल्याचीही बातमी एका वर्तमानपत्रातील्या युतीशी घरोब्याच्या संबंध असलेल्या पत्रकाराने दिली आहे.
सेना-भाजपा युतीत अलीकडे लहान भाऊ मोठा भाऊ असा शब्दप्रयोग करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना भाजपाचा कमळाबाई असा उल्लेख करण्यात येत होता. आता बाळासाहेबही नाहीत. परिस्थितीही बदललेली! मुळात देशभर अस्तित्वात असलेले भाऊबंदकी कल्चरला युतीदेखील अपवाद नाही.  आतापर्यंत वडिलकीचा मान शिवसेनेकडे होता. पण लोकसभा निवडणुकीत भाजपाला संसदेत पूर्ण बहुमत मिळाल्यामुळे वडिलकीचा मान आमचाच अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यामुळे देऊ तितक्या जागा मुकाट्याने घ्या असे वाक्य न उच्चारता भाजापने जागावाटपाचे गु-हाळ अडवून ठेवले आहे हे एव्हाना शिवसेनेच्या लक्षात येऊन चुकले आहे. परंतु तसे मोकळेपणाने कबूल केले तर शिवसेनेच्या वडिलकीला बट्टा लागतो. दुसरे म्हणजे प्रेशर बिल्ड अप करण्याची कामगिरी ज्यांच्यावर सोपवली आहे त्यांचीसुद्धा सन्माननीय सुटका होणेदेखील गरजेचे असते. म्हणून काही वेगळ्याच सबबी सांगण्याचा प्रकार सुरू आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीतला तिढाही युतीपेक्षा फारसा वेगळा नाही. स्वबळावर निवडणुका लढवण्याचा शड्डू ठोकण्याचे काम अजितदादांवर सोपवले गेले होते. शरदरावजी मात्र समंजस वक्तव्य करत काँग्रेसबरोबरचे संबंध बिनसणार नाही अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत. परंतु काँग्रेस आघाडीत जागावाटपाचे गु-हाळा मात्र अद्यापही सुरू करता आलेले नाही. जागावाटप म्हणजे तरी काय? निश्चित विजयी होणा-या उमेदावाला तिकीट देण्याचा आग्रह धरणे. काँग्रेस कल्चरमधला हा प्रश्न तसा जुनाच, त्याचे उत्तरही जुनेच! त्यामुळे अपक्षांना आधी पक्षात सामील करून घेण्याचे काम सुरू झाले असून एकूण गांभीर्य लक्षात घेऊन अनेकांनी काँग्रेसचा रस्ता धरला आहे. राष्ट्रवादीलाही आपली दारे उघडी ठेवणे भाग आहे. परंतु विधानसभेत बहुमत प्राप्त करून सत्ता आणणे बदलत्या परिस्थितीत कठीण होऊन बसले आहे ह्याची जाणीव सगळ्यांना झाली आहे.  त्यातून काहींनी ह्यापूर्वीच भाजपाचा रस्ता धरला आहे तर काही शिवसेनेकडे झुकण्याच्या विचारात आहेत. वाटाघाटींचे गु-हाळ सुरू असताना घुंघरूच्या आवाजाकडे लक्ष ठेवून असणा-यांची संख्याही कमी नाही.
एक मात्र खरे! स्वबळावर तर सोडाच आपली आघाडी टिकवूनदेखील बहुमत आणता येईल की नाही ह्याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही पक्षांतील नेत्यांना शंका आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदींनी स्वतःच स्वतःची लाट निर्माण केली तशी लाट आपणही निर्माण करावी असे राज्यातल्या अनेकांना सुरूवातीला वाटले. मोदींनी पहिल्यांदा भाजपातल्या त्यांच्या विरोधकांना मोडून काढले. नंतर व्टिटर, फेसबुकसारख्या सोशल मिडियावर भर दिला. स्वतःचा प्रचार आणि काँग्रेसवर प्रहार असे दुहेरी तंत्र त्यांनी अत्यंत प्रभावीरीत्या राबवले. स्वतः देशभर झंझावाती दौरे करून जाहीर सभा घेतल्या. त्याचे दूरचित्रवाहिन्यांवरून प्रक्षेपणही करवले. काँग्रेसविरूद्ध अवघा रणकल्लोळ माजवला. आपणही तसे काही केले तर मोदी लाटेने जी किमया केली तशी किमया आपल्यालाही घडवून आणता येईल हा सुरूवातीचा भ्रम हळुहळू निवळला. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, नारायण राणे वगैरे मंडळींचा तो आविर्भाव अल्पावकाशात संपला. सगळ्यांनी पुन्हा एकदा जागावाटपाच्या हातखंडा तंत्रावर लक्ष केंद्रित केले. म्हणजेच निवडणुकीचे राजकारण पुन्हा एकदा आत्मविश्वासाच्या अभावाच्या गर्तेत सापडले!
विधानसभा निवडणूक लोकसभेपेक्षा कठीण ह्या निष्कर्षावर सगळे बुद्धिबळपटू आले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव पुढे करण्यात आले होते. तसे मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचे नाव पुढे करायचे हादेखील प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस? विनोद तावडे? की पंकजा मुंढे? शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचे तर ते कोणाला द्यायचे? मनोहर जोशींचे नाव कधीच बाद करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे ह्यांचे नाव सोडले तर कोणाचे नाव पुढे करायचे? ज्याचे नाव पुढे करता येईल असा नेता कोण आहे? काँग्रेसमध्ये नारायण राणे मुख्यमंत्रीपदाचे बाशिंग बांधून बसलेले आहेत. त्यांच्याखेरीज पतंगराव कदम, अशोक चव्हाण ह्यांचीही नावेही आहेत. राष्ट्रवादीत अजितदादा ह्यांचा क्लेम निर्विवाद आहे हे खरे; परंतु आरआऱआबा. छगन भुजबळ ह्यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपद भूषवले असल्याने तेही क्लेमपात्र आहेतच. परंतु राज्यभर दौरे करून बहुमत मिळवण्याची धमक दोन्ही पक्षातल्या कोणत्या नेत्यात आहे? परंतु राज्याच्या राजकारणात वावरणा-या नेत्यांच्या नेतेपदाच्या महत्त्वाकांक्षा पाहता ह्या सगळ्यांची स्थिती पानीमां म्हस बाम्हन बाम्हनीले मारस अशी आहे! त्यामुळे युतीआघाडी असली तरी निखळ बहुमत आमचेच हे अजून तरी स्वप्नरंजनच आहे.

रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

वाचा  गेस्ट एडिटर विश्वास रानडे ह्यांचा लेख 'कोळसाः न उगाळलेला!'..www.rameshzawar.com

No comments: