योगविद्येला योगशॉपी संबोधून भारताच्या प्राचीन
योगविद्येला नावे ठेवण्याचा हेतू नाही. परंतु युनोतर्फे दि. 21 जून रोजी साजरा
होणा-या योग दिवसानिमित्त केंद्र सरकारच्या पुढाकाराने आणि सहभागाने योगदिवसाला आलेले
स्वरूप योगशॉपीपेक्षा वेगळे नाही. दिल्ली येथे होणा-या सरकारी कार्यक्रमास योग
दिवस म्हणण्यापेक्षा ड्रिल दिवस तर युनोच्या मुख्यालयात होणा-या कार्यक्रमास योगशॉपी
म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. वास्तविक ‘योग’ हा काही निव्वळ
मनःस्वास्थ्य आणि शरीरस्वास्थ्यासाठी नाही. योगाची संकल्पना व्यापक असून ईश्वराशी
युज्य होणे हा योगाचा खरा अर्थ आहे. योगाच्या संकल्पनेबद्दल शास्त्रकारांत तीव्र मतभेद
आहेत हे सर्वश्रुत आहे. देशभरातल्या आध्यात्मिक आखाड्यात त्यावर एकमत होण्याची
सुतराम शक्यता नाही. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी खटपटीलटपटी करून युनोला
योग दिवस साजरा करण्यास प्रवृत्त केले. 21 जून 2015 हा युनोतर्फे साजरा होणारा पहिलाच
योगदिवस आहे.
अध्यात्मप्रेमींच्या
मते पतंजलींनी लिहीलेले योगसूत्र सोडले तर तोंड वेडेवाकडे करून सर्कस सदृश
हालचालींना योग म्हणणे ही योग शब्दाची घोर विटंबनाच आहे! रामदेवबाबांसारख्या आधुनिक योग गुरूंचे टीव्हीवरील योगासनाचे वर्ग पाहताना तर
जनसामान्यांना असे वाटू लागते की योग योग म्हणताता तो हाच! ह्या योगात हातपाय, कंबर दुमडण्याला किंवा मान वेडीवाकडी करण्याला महत्त्व आहे.
परंतु बारकाईने पाहिल्यास रामदेवबाबा शिकवतात ती योगासने म्हणजे त्यांच्या
आयुर्वेदिक मालाची जाहिरात करण्यासाठी हुषारीपूर्वक सुरू करण्यात आलेला स्टंट आहे.
रामदेवबाबांच्या योगासनांना ‘हटयोग प्रदीपिका’ ह्या प्राचीन ग्रंथाचा ठोस आधार आहे ह्यात शंका नाही. योगशास्त्रावर घेरंडसंहिता किंवा योगवासिष्ट
ह्यासारखे प्राचीन ग्रंथही आहेत. अजूनही बुद्धीवान वाचकांवर पडलेली त्यांची पडलेली
मोहिनी संपलेली नाही. परंतु योगाचा विचार योगासनांहून कितीतरी खोल आहे ह्याची
जाणीव सामान्य माणसाला झालेली नाही. ती
होणारही नाही कारण बहुतेक पुस्तके ह्या ना त्या पुस्तकातल्या उचलेगिरीवर आधारलेली
असून चित्रवाण्यांवर चालणा-या चर्चेतही तीच ती बडबड सतत चाललेली असते. वास्तविक
योग हा गीता-भागवत ह्या सर्वमान्य ग्रंथांनुसार ईश्वराप्रत नेणारा, नव्हे स्वतःत आणि
अवघ्या प्राणीमात्रात साक्षात् ईश्वरदर्शन घडवणारा आहे!
महाराष्ट्रात भक्ती
ही योगाचीच दुसरी बाजू आहे असे मानले जाते. ज्ञानेश्वरांना नाथ परंपरेकडून
योगदीक्षा मिळाली होती. तीच दीक्षा त्यांनी त्यांच्याबरोबर आलेल्या संतमंडळीला
दिली. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात आपल्याला मिळालेल्या ‘समाधीधना’चा स्पष्ट उल्लेख त्यांनी केला
आहे. सर्व प्रांतातल्या होऊन गेलेल्या बहुतेक संतमंडळाची योगाच्या संदर्भात हीच
भूमिका आहे. सगळ्या संतांनी योगापेक्षा भक्तीला का महत्त्व दिले? एक ज्ञानेश्वर वगळता कोणाही अन्य
संतांना योगमार्गाची दीक्षा मिळालेली नाही. म्हणून त्यांनी भक्तीचा पुरस्कार केला.
परंतु ज्ञानेश्वरांनी योगमार्गाचा प्रसार का केला नाही? ह्याचे कारण योग मार्ग अत्यंत अवघड असून योगाच्या निसरड्या कड्यावर जाताना
पाय घसरून पडण्याची शक्यताच अधिक! म्हणून हटयोगापासून
ही सगळी मंडळी स्वतःही लांब राहिली असावी. भाळ्याभोळ्या लोकांना त्यांनी योगासनाच्या भानगडीत न पडण्याचाच आडवळणाने
केलेला उपदेश केला आहे असे वाटते.
भारत ही योगभूमि
असूनही बहुसंख्य माणसे योगापेक्षा भक्ती का श्रेष्ठ मानतात हा एक गूढ प्रश्न आहे.
गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या पुष्पिकेत योगशासस्त्राचा उल्लेख केला आहे. योगाची ही
सुप्त परंपरा पाहता अलीकडे अचानक योगाचे महत्त्व कसे वाढले? ह्या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे.
योगामुळे अष्टमहासिद्धी प्राप्त होतात, कोणताही चमत्कार करून दाखवणे योग्याला शक्य
आहे, योग्याला पाण्यावरूनदेखील चालता येते, मुसमुशीत तारूण्य योग्याचे दास्य
पत्करायला केव्हाही सिद्ध असतो. धंडी ऊनवा-याचापासून कसलाही त्रास होऊ शकत नाही,
त्याला हवे ते आणि हवे तसे मिळवता येते असा
शिष्यांचा दृढ समज योगगुरूंनी त्यांच्या करून दिला. परंतु संतांनी मात्र
चमत्कारापेक्षा कर्मयोगावर आणि कर्मे करता करता नैषकर्म होण्यावर भर दिला आहे.
अर्धशिक्षित शिष्यांचा एकवेळ तसा समज झाला असेल तर ते समजू शकते. परंतु उच्च्पदस्थ
अधिकारी, राजकारणी, मोठमोठे धनिक वगैरेंचाही तात्कालिक फायद्यावरच डोळा आहे. आज
साजरा होत असलेला योग दिवस हे त्याचे बोलके उदाहरण आहे.
योगाबद्दल लोकांच्या
भोळसट कल्पनांची सरकारमधील जाणत्यांना कल्पना नाही असे नाही. परंतु नरेंद्र मोदी ह्यांच्यापुढे
कोणाचे चालत नसावे! सर्व महत्त्वाचे
कूटनीतिक कामकाज बाजूला सारून योगदिवस साजरा करण्याच्या दृष्टीने सर्व दूतावासांना
कामाला लावणारे परिपत्रक परराष्ट्र खात्याने काढले. परराष्ट्र खात्याने
सुरू केलेल्या ह्या दुकानदारीला रमजानच्या पवित्र महिन्याचा अपशकुन होतो की काय
अशी साधार भीती राजकीय वर्तुळात वाटू लागली आहे. भारतात साजरा होणा-या योगदिवसात
सामील होण्यास अनेक मुस्लिम संघटनांनी विरोध केला असून सूर्य नमस्कार हा
योगासानाचा भाग इस्लामच्या तत्त्वाला धरून नाही आहे असे त्यांचे म्हणणे. परंतु भाजपाशी
घरोबा केलेल्या काही चारदोन मुस्लिम संघटनांनी सूर्य नमस्कार घालताना नमाज पढताना
जे मंत्र म्हणतात त्या मंत्रांचा उच्चार केला किंवा अल्लाचे स्मरण करावे अशी तोड
काढली.
जगातला सर्वात मोठा
मुस्लिम देश असलेल्या इंडोनेशियाने भारताच्या योग दिनास विरोध केलेला नाही. कारण
तेथला धर्म मुस्लिम असला तरी तेथली संस्कृती ही पूर्णतः हिंदू म्हणता येईल अशी
आहे. बाली बेट तर हिंदूंचे बलस्थान म्हटले तरी चालेल. त्यामुळे भारतीय
दूतावासातर्फे साजरा होणा-या योग दिवसास इंडोनेशियाचा बिल्कूल विरोध नाही. उत्तर
आफ्रिका, मध्य आशियातील मुस्लिम देशांचा योग दिवसाबद्दल बरेच उत्साहाचे वातावरण
आहे. पण हा उत्साह दुकानात गि-हाईकाने पाय ठेवताच दुकानदारात जसा उत्साह संचारतो
तसा आहे.
भारताबरोबर व्यापार
वाढला तर आपला फायदाच आहे असे कदाचित् ह्या देशांना वाटत असेल तर त्यात काही चूक
नाही. पाकिस्तान आणि सौदी अरेबिया
ह्यांच्यासह 10 देशांचा मात्र योग दिनाला सुरूवातीपासून विरोध होता. युनोत योग
दिनाचा प्रस्ताव जेव्हा भारतातर्फे
मांडण्यात आला तेव्हाच त्यांनी ह्या प्रस्त्वाचे सूचक म्हणून सहभागी होण्यास विरोध
दर्शवला होता. त्यामुळे हा योगदिववस ह्या देशातील भारतीय दूतावासांना योग दिवस
घरगुती स्वरूपात म्हणजे दूतावासापुरताच साजरा करावा लागणार आहे. योगात इस्लामविरोधी असे काहीच नाही हा भारतातर्फे
सुरू झालेल्या युक्तिवाद अर्थात त्यांच्या गावी नाही. इंडोनेशियात योगाचा उदोउदो
करण्यास मात्र भारताला भरपूर वाव आहे. मलेशियात योग दिवस कसा आणि कितपत साजरा होईल
ह्याबद्दल संदिग्धतता असून ह्या संदर्भात सरकारलाही अंदाज नाही.
योग इस्लामी
तत्त्वांशी विरोधी आहे की नाही ह्याबद्दल सौदी अरेबियाला काही देणेघेणे नाही.
मक्का मदिना ही इस्लामची मूळ भूमि असून ती सौदीच्या ताब्यात आहे. त्यामुळे हिंदूंची
योगाप्रसाराचीची खटपट त्यांना मुळातच मान्य नाही. रोमन कॅथालिक वा ज्यू इत्यादींनी
योगदिवसाबद्दल सावध मौन बाळगलेले दिसते. मुस्लिम जगाप्रामणे ख्रिश्चनांच्या विश्वात
फारशी प्रतिक्रिया दिसली नाही. अर्थात त्यांच्या मौनात योगाला पाठिंबा की विरोध आहे
हे स्पष्ट नाही. परंतु ख्रिश्चन धर्माच्या संदर्भातली युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील
रोमन कॅथालिकांना पोपखेरीज कोणाला फारसे मानत नाहीत. त्यामुळे ते योगाच्या वाटेला
जाणार नाहीत.
अमेरिकेत मात्र
युनोच्या योग दिवस जाहीर करण्याच्या पूर्वीपासूनच योग लोकप्रिय आहे. योगदिवस साजरा
करण्याची भारताने करण्यापूर्वी अमेरिकेत स्वामी विवेकानंद, योगानंद ह्यांच्यामुळे
योगविद्येच्या प्रसार झाला होताच. नुसताच प्रसार झाला असे नव्हे तर कुबडी, आसन, पंचा, गुरुशर्ट, नेति जलधोती वगैरे ‘योग अन्सिलरीज’ची तुफान विक्री
अमेरिकेत सुरू आहे. समाधीत प्रवेश कसा करावा ह्याचा डेमो, प्रार्थना वगैरेंच्या
ध्वनिमुद्रित सीडीजदेखील अमेरिकेत उपलब्ध असून त्या ब-यापैकी खपतात. अमेरिका हा
शेवटी व्यावसायप्रधान देश असल्यामुळे तेथे कोणता व्यवसाय केव्हा भरभराटीला येईल
ह्याचा नेम नाही. चीनच्या शॅव्हलॉन स्कूनलवरील सिनेमाने प्राचीन चिनी विद्येबद्दल
अमेरिकेत अफाट कुतूहल निर्माण झाले. ते ओसरलेही. ह्या पार्श्वभमीवर दि. 21 जून
रोजी साजरा होणा-या योग दिवसास अफाट प्रतिसाद मिळाला तरी तो कितपत टिकेल ह्यात शंका नाही.
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक,
लोकसत्ता
www.rameshzawar.com
No comments:
Post a Comment