सध्या देशात दौ-याचे राजकारण सुरू आहे. एखाद्या देशाच्या पंतप्रधानाने सेसल्समनछाप दौरे करावेत का? देशाची सर्वांगिण प्रगती झाली पाहिजे, त्यासाठी जितकी कल्पक धोरणे राबवणे शक्य आहे तितकी
अवश्य राबवली पाहिजे ह्याबद्दल कुणाचेही दुमत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी त्यांच्या सोळा महिन्यांच्या कारकीर्दीत 29
परदेश दौरे केले. ह्या आठवड्यात ते अमेरिका आणि आयर्लँडच्या दौ-यावर निघाले आहेत. एक दिवसाचा
आयर्लँडदौरा आटोपून ते अमेरिकेत दाखल झाले आहेत. ह्याही दौ-यात त्यांचे
सेसल्समनछापाचे ठराविक कार्यक्रम पार पडणार आहेत. नरेंद्र मोदी ह्यांच्या दौ-याची ही त-हा तर काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी ह्यांच्या दौ-याची त-हाही
अजब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या
गुंतवणूक दौ-यावर आहेत तर राहूल
गांधी म्हणे ‘विक एंड विथ चार्ली रोझ’ नामक परिषदेला हजर राहण्यासाठी अमेरिकेच्या दौ-यावर गेले आहेत. ही कुठली परिषद?
भारतातल्या सर्वसामान्य लोकांनी ह्या परिषदेचे साधे
नावही कधी ऐकले नाही. बड्या
उद्योगधुरीणांच्या जमावाला भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन करणे, एखाद्या संस्थेत उपोद्घाताचे भाषण ठोकणे, त्या त्या देशातल्या भारतीयांच्या जमावासमोर ‘उर अभिमामानाने भरून’
यावा असे भाषण ठोकणे आणि आता अनायासे त्या
देशाला भेट दिलीच आहे तर निदान तेथल्या राष्ट्रप्रमुखाची सदिच्छा भेट, चारदोन करारावर सह्या असा पंतप्रधान नरेंद्र
मोदींच्या कार्यक्रमाचा साचा ठरून गेला आहे. आता सुरू असललेल्या अमेरिका दौ-यात
ह्या साचेबंद कार्यक्रमाखेरीज काहीही नाही असे एकूण त्यांच्या अमेरिका दौ-याकडे पाहिल्यास म्हणावेसे वाटते.
राष्ट्राच्या नेत्यांचे परदेश दौ-याचे
लिखित नियम नाहीत; पण संकेत जरूर आहेत.
बड्या राष्ट्रप्रमुखांच्या संघटनांच्या बैठकी,
युनोच्या आमसभेत भाषण, उभय देशांच्या संबंधात जर तिढा निर्माण होऊन त्यात दोन्ही
राष्ट्रप्रमुखांनी लक्ष घालण्याची निर्माण झालेली आवश्यकता अशा काही विशिष्ट
कारणांसाठी पंतप्रधानांनी परदेश दौरा करण्याचा संकेत आहे. ह्या दौ-यांचे प्रोटोकॉलही
ठरलेले असतात. अमेरिकेच्या
अध्यक्षांना अनेक देशांकडून निमंत्रणे येत असतात. त्या आमंत्रणांचा स्वीकार करायचा की ती तशीच प्रलंबित ठेवायची हे अमेरिकन
परराष्ट्र खाते ठरवत असते. सध्या केंद्र
सरकारमध्ये फक्त पीएमओ हेच एकमेव खाते असावे असे दिसते. परराष्ट्र आणि विदेश व्यापार ही दोन्ही खाती बहुधा पंतप्रधान खात्यात
विलीन करण्यात आली असावीत. त्यामुळे मनात आले की
पंतप्रधान दौ-यावर निघतात. त्यांच्या दौ-याबद्दल कुणी काही प्रश्न उपस्थित करू नये अशी त्यांची बहुधा अपेक्षा
असावी. सुदैवाने राहूल गांधी ह्यांच्याकडे विरोधी
पक्षनेते पद नाही. काँग्रेसचे
उपाध्यक्षपद आणि खासदारकी सोडली तर त्यंच्याकडे कुठलेही पद नाही. त्यांच्या दौ-याबद्दल काय बोलायचे! सध्या नरेंद्र मोदी
आणि राहूल गांधी ह्या दोघांच्या दौ-यांवरून सध्या
काँग्रेस आणि भाजपा ह्यांच्यात जूतमपैजार सुरू आहे. दोघांचे दौरे करमणुकीचा विषय झाले आहे. त्यामुळे देशाच्या अब्रूचे खोबरे झाले आहे.
पंतप्रधानांच्या दौ-यांचे एक कारण नेहमी
दिले जाते. भारत सरकारची प्रतिमा उजळण्याची थोर कामगिरी
त्यांना करायची आहे. सकल राष्ट्रीय
विकासाचा वेग वाढता कसा ठेवायचा ह्याची चिंता देशआला भेडसावत आहे. चिंता दूर करायची तर परदेशातून थेट गुंतवणूक
आणण्याची गरज आहे हेही खरे. पण त्यासाठी
पंतप्रधानांनी उठसूट स्वतः दौरे करण्याची गरज आहे का? सकल राष्ट्रीय उत्पादव वाढवण्यासाठी खरी गरज आहे ती प्रशासन गतिमान
करण्याची. मोदी सरकार आल्यापासून केंद्राचे प्रशासन
गतिमान झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खरा मानला तरी परदेशी भांडवलदारांना कोठे, किती गुंतवणूक करायला वाव आहे, त्यांनी
कशा प्रकारची गुंतवणूक करायची, कोणत्या प्रकारच्या
उत्पादनात गुंतवणूक करायची हा सगळा तपशील संबंधितांना उपलब्ध करून दिला पाहिजे.
हे काम परकी दूतावासांनी अग्रक्रमाने हाती घ्यायला
हवे आहे. त्यासाठी त्यंना योग्य त्या प्रकारची
सामग्री उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. भारताला
गुंतवणूक हवी असली तरी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा आहे का असा
प्रश्न असतो. तुम्ही हेरून
ठेवलेल्या क्षेत्रात गुंतवणूक किफायतशीर ठरेल हे गुंतवणूकदारांना पटले पाहिजे.
पटले तरी संबंधित प्रकल्पदार आणि संबंधित राज्ये
ह्यांच्यात समन्वय साधण्याचे काम त्या त्या देशातल्या भारतीय दूतावासांना करू देणे
जास्त उचित ठरते. पण तूर्तास तरी
पंतप्रधनांनीच हे काम स्वतःच्या हातात घेतलेले दिसते.
अमेरिकेच्या दौ-यात मोदी गूगल,
फेसबुक इत्यादी बड्या कंपन्यांच्या प्रमुखांना
भेटणार आहेत. वास्तविक ह्या बड्या
कंपन्यांखेरीज अनेक बलाढ्य अमेरिकन कंपन्यांना भारतीय कंपन्यांकडून माहिती सेवा
पुरवली जाते. खरा प्रश्न आहे तो
ह्या सेवा पुरवठादार कंपन्यांच्या इंजिनीयर्सना व्हिसा मिळवून देण्याच येणा-या अडचणींचे सर्वप्रथम निराकरण करण्याची गरज आहे.
त्यात लक्ष घालून सोडून पंतप्रधान अमेरिकन
कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेत फिरत आहेत. हा सारा प्रकार घरोघऱ फिरून उदबत्त्या विकत फिरणा-या मुलासारखा आहे! आपण वापरतो तो साधा
मोबाईल, लॅपटॉप किंवा पीसीदेखील तैवानातून आयात
केलेला असतो. हार्डवेअर
निर्मितीच्या क्षेत्रात भारताची दमदार पावले पडायला हवी होती. आपल्या आयआयटीमधूनबाहेर पडलेले इंजिनिअर्स
अमेरिकेचा रस्ता सुधारतात. कारण त्यांना हव्या
असलेल्या सोयीसुविधा अन् काम करण्याची मोकळिक भारतापेक्षा सिलीकॉन व्हॅलीत अधिक
उपलब्ध आहेत. भारतात कुशल
कर्मचीरवर्ग तयार करण्याच्या योजनान आखण्यात आल्या असून त्या योयोजनात विदेशी
कारखानदारांना सहभागी होता येईल असेही सांगितले जाते. परंतु परकी कारखानदारांना आता ज्या अद्यावत स्वरूपाचे कारखाने स्थापन
करायचे आहेत त्यात 20-25 जणांच्याच
मनुष्यबळाची गरज असते. अधिक मनुष्यबळावर
कारखाने काढण्याचे दिवस आता हेवी इंजिनिअरींगपुरते तरी संपुष्टात आले आहेत.
शेती, संशोधन, ज्ञानविज्ञान इत्यादि सर्व क्षेत्रांचे तंत्र पार
बदलले आहे. ह्याउलट भारतात मोदी सरकारमधील मंत्रिगणांचे
चेले वैदिक संस्कृतीचे गोडवे गाण्यात मशगूल आहेत. त्यांना वेळीच आवरले नाही तर मोदी सरकारवर दरदिवशी नवी आफत ओढवणार.
अन् खुलासे करण्यातच सरकारचा वेळ जाणार अशी स्थिती
आहे. नरेंद्र मोदी भाषणे करण्यात पटाईत आहेत हे
एव्हाना लोकांना माहित झाले आहे. परंतु जागतिक उद्योगपती
आणि गुंतवणूकदार ह्यांचे खरे लक्ष असते ते तुमच्या देशाकडून त्यांना काय मिळण्याचा
संभव आहे ह्यावर! त्यांना देण्यासाठी
भारताकडे केवळ ‘आशावाद’च आहे. जगावर
मंदीचे सावट आहे. अमेरिकेचा जास्तीत
जास्त आयातनिर्यात व्यापार हा युरोपबरोबर असून त्या खालोखाल चीनबरोबर आहे. वर्ष 2014 अखेरीस
भारताबरोबर अमेरिकेचा व्यापार 66,8.52 कोटी
डॉलर्सचा होता. ह्यात थेट गुंतवणूक व्यवसायाचा
समावेश नाही. 1990 साली जेव्हा भारतात मुक्त व्यापाराचे वारे
वाहू लागले त्यावेळी भारत ही जगातली सर्वात मोठी टेलिकॉम सेवेची बाजारपेठ राहील
असे अनुमान अमेरिकेतील तज्ज्ञांनी बांधले होते. ते खरेही
ठरले. आजच्या स्थितीबद्दलही अमेरिकेतल्या तज्ज्ञांचे काही
अंदाज असू शकतात. ते केंद्र सरकारच्या व्यापारमंत्रालयास
माहित असतील तर मोदींच्या दौ-यांचा उपयोग! देशात दुष्काळ असला तरी दौ-यांचा मात्र सुकाळ आहे.
रमेश झवर
www.rameshzawar.com
htt//phodilebhandar.rameshzawar.com