मुखी राममनोहर लोहियांचे नाव घेत
खुर्चीसाठी वाट्टेल तो
युक्तिवाद करून सरकार पाडणे अन् संगीत सुरू असताना फेर धरत पुन्हा खुर्ची पकडणे
ह्याचेच नाव बिहारी राजकारण! अलीकडे तर लोहियांचे नाव नाही घेतले तरी चालते. महागठबंधनातून
बाहेर पडण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार ह्यांनी बुधवार आणि गुरुवार ह्या
दोन दिवसात इरसाल बिहारी राजकारणाचा ताजा खेळ सादर केला. ह्या खेळात त्यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही सामील करून घेतले आणि तेही
मनमोकळेपणाने सामील झाले! 2019 सालच्या निवडणुकीत बिहारमध्ये भाजपाचे यश
पक्के करणे हा भाजपाचा हेतू तर लालूप्रसाद यादव ह्यांची अरेरावी संपुष्टात आणून काँग्रेसप्रणित
महागठबंधनाचा कायमचा निकाल लावणे हा नितीशकुमारांचा हेतू. भाजपा आणि जदयू ह्या दोघांचेही
हेतू ह्या खेळाने साध्य झाले.
लालूप्रसाद यादव ह्यांचे पुत्र तेजस्वी हे बिहारचे उपमुख्यमंत्री. हजार
कोटी रुपयांच्या संपत्ती प्रकरणी तेजस्वी आणि त्यांच्या बंधूभगिनींच्या घरी सक्तवसुली
संचालनालयाने धाडी घातल्या होत्या. ह्या घटनेचा उपयोग मुख्यमंत्री नितीशकुमार ह्यांनी
करून घेतला. परंतु हा उपयोग करून घेण्यामागे भ्रष्टाचाराबद्दल चीड वाटणे
महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे हे की आपल्याला सत्तेवरून खाली खेचण्याच्या
लालूप्रसादांनी सुरू केलेल्या कारवायांना आळा घालण्यासाठी तोडीस तोड प्रतिकारवाई
करण्याची खेळी करणे! त्याखेरीज लालूप्रसादांकडून परस्पर हुकूम घेणा-या राजदाच्या मंत्र्यांना
कायमची अद्दल घडवणे हाही महत्त्वाचा भाग आहेच. आपल्याविरूध्दची कारवाई रोखण्यासाठी
लालूप्रसादांनी काही केंद्रीय मंत्र्यांशी सौदेबाजी सुरू केली होती. भाजपाचे काही आमदार
फोडून नितीशकुमारांना खुर्चीवरून खाली खेचण्याचा डाव ते खेळत होते. नितीशकुमारांना
त्याची कल्पना होतीच.
नितिशकुमारही कच्च्या गुरूंचे चेले नाहीत. भाजपाच्या किरकोळ मंडळींशी
संपर्क ठेवण्यापेक्षा त्यांनी नोटबंदीच्या निर्णयास पाठिंबा देऊन थेट मोदींबरोबरच
संबंध प्रस्थापित केले. नरेंद्र मोदीही नितीशकुमारांना योग्य वेळी योग्य तेवढा प्रतिसाद
दिला. नितीशकुमारांनी मुख्यमंत्रिपदाचा दिलेला राजीनामा, बिहारमध्ये मुदतपूर्व निवडणुका
न घेण्याची भाजपाची घोषणा, त्यानंतर अजिबात वेळ न दवडता नितीशकुमारांच्या नव्या
सरकारला पाठिंबा देण्याची घोषणा, नितीशकुमारांची प्रेसकॉन्फरन्स, समजुतीची बोलणी करणा-या
लालूप्रसादांना नितीशकुमारांनी दाद न देणे हा सगळा घटनाक्रम पाहता नितिशकुमारांचा राजिनाम्याचा
खेळ खरोखरच सुपर्ब म्हटला पाहिजे.
तूर्तास तरी 2013 साली नरेंद्र मोदी ह्यांच्याशी घेतलेली काडीमोड नितीशकुमारांनी
संपुष्टात आणली. भाजपाचे सर्वेसर्वा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी बिहारमध्ये
नितीशकुमारांची बिहारमधली ताकद मान्य करण्याचा पवित्रा घेतला असून
नितीशकुमारांनीही देशाचे नेतृत्व करण्याच्या मोदींच्या मह्त्वाकांक्षेत आड न
येण्याचा पवित्रा घेला आहे. दोघात झालेला हा अलिखित राजकीय समझोता 2019 साल
उजाडेपर्यंत तरी अबाधित राहणार आहे. ह्या राजकीय समझोत्यात दोन्ही नेत्यांच्या
तत्त्वांचे काय झाले हा प्रश्न गैरलागू ठरतो. सत्ता हेच श्रेष्ठ तत्त्व एवढे लक्षात
ठेवले की पुरे. तूर्तास तरी भ्रष्टाचाराविरुध्दची लढाई लढणे हा उदात्त हेतू दोघांच्यातल्या
समझोत्यात आहे. त्या लढाईत राजदाचे लालू हा नितीशकुमारांचा प्रतिपक्ष तर काँग्रेस
नेते हा नरेंद्र मोदींचा प्रतिपक्ष! 2019 नंतरच्या
निवडणुकीनंतर देशाची सत्ता हातात ठेवणे हा भाजपाचा हेतू तर बिहारवरची पकड कायम टिकवणे
अन् संधी मिळताच देशाचे नेतृत्व हासील करण्याची संधी साधणे हा नितीशकुमारांचा अंतस्थ
हेतू! काँग्रेसच्या गरीब आणि गरीबीविषयक धोरणात छेडछाड
न करता आपले धोरण पुढे रेटण्यात नरेंद्र मोदी जसे यशस्वी झाले तसे आपणही यशस्वी
होऊ शकू असा आत्मविश्वास नितीशकुमारांकडे नक्की आहे.
का कोणास ठाऊक, उद्या लोहियावादी नेते म्हणून ओळखले जाणारे जदयुचे
सर्वेसर्वा नितीशकुमारदेखील पंतप्रधानाच्या खुर्चीसाठी फिट ठरतील! त्यांचा पक्ष अर्थात
भाजपाच्या तुलनेने लहान आहे. परंतु संधी मिळते तेव्हा राजकीय पक्षांचे लहानमोठेपण,
राजकीय तत्त्वज्ञान वगैरे निकष बिल्कूल महत्त्वाचे राहात नाही. हे निकष कधीच
कालबाह्य झाले आहेत. सध्या संख्याबळ आणि ते प्राप्त करण्यासाठी आवश्यक द्रव्यबळ
असले की पुरे हा एकमेव अपरिहार्य निकष मात्र अजूनही आहे. आणि राहणारही आहे. लोकसभेत
बहुमत मिळवून सरकार बनवण्याच्या दृष्टीने पावणेतीनशे - तीनशे खासदार निवडून आणण्याची
क्षमता जो दाखवू शकतो तो देशाचा नेता! नेतृत्वाची लढाई सुरू होईल तेव्हा होईल. कदाचित
होणारही नाही. केंद्रात सत्तेवर असलेल्यांबरोबर वाटचालदेखील कमी महत्त्वाची नाही.
शिखरस्थ नेत्यांच्या हातात हात घालून वाटचाल करत राहणेदेखील तितकेच महत्त्वाचे
आहे. सध्याच्या राजकारणाकडे पाहताना लालूप्रसाद आणि काँग्रेसचे राहूल गांधी
ह्यांचे वर्चस्व नेस्तनाबूत करण्याच्या बिहारी राजकाणाच्या खेळात नितीशकुमार
कमालीचे यशस्वी ठरले आहेत हे कबूल केलेच पाहिजे.
रमेश झवर
www.rameshzawar.com