गुजरातच्या निवडणूक युध्दात भाजपा विजयी झाला परंतु भाजपाचा हा विजय लढाईत घायाळ झालेल्या सैनिकाला मिळालेल्या विजयासारखा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भुईसपाट झाली होती. देशाला काँग्रेसमुक्त करण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने घवघवीत यश मिळवले होते. आधीच्या अध्यक्षांच्या तुलनेने तरूण असलेल्या राहूल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीत मिळवलेले यश लक्षणीय म्हणावे लागेल. भाजपाची सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसने कितीही कसून प्रयत्न केला तरी काँग्रेसला गुजरातची सत्ता मिळणार नव्हतीच. देशातील बहुतेक निरीक्षकांचे ह्यावर एकमत होते. काँग्रेसला थोड्या जास्त जागा मिळतील एवढाच फक्त होरा होता. महत्त्वाचे म्हणजे गुजरातमध्ये हळुहळू का होईना काँग्रेसचा अन्तरप्रवाह निर्माण होऊ शकतो हे काँग्रेसने हेरले. नेमका त्याचाच फायदा जागा गुजरातमध्ये काँग्रेसच्या जागा वाढण्यात झाला.
मोदींच्या नेतृत्वाबद्दल वेडेवाकडे न बोलता भाजपाचे
धोरण फक्त मुठभर उद्योगपतींना कसे अनुकूल आहे हेच राहूल गांधी ह्यांनी मतदारांच्या
लक्षात आणून दिले. भाजपा सरकार फक्त मोजक्या 15-20 उद्येगपतींसाठीच काम करत
असल्याचा मुद्दा राहूल गांधींनी प्रचारसभातून मांडला. ह्या मुद्द्यामुळे मोदींच्या
'सबका साथ सबका विकास' ह्या
घोषणेतले वारे काही अंशी का होईना काढून घेतले. म्हणूनच की काय, गुजराती जनतेचे
आभार मानताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गाडी पुन्हा विकासाच्या मुद्द्यावर आणण्याचा
प्रयत्न केला.
हिमाचल प्रदेशात मात्र काँग्रेसचा दारूण पराभव
झाला. भाजपाला 18 जागा अधिक मिळाल्याने हिमाचलप्रदेशात भाजपाचा ध्वज फडकू लागणार
आहे. गुजरात आणि हिमाचलप्रदेशातील विजयामुळे भाजपाचा ताकद वाढणार ह्यात शंका नाही.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश ह्या दोन राज्यात कसलेही साम्य नाही. गुजरात नेहमीच बदल
घडवून आणण्यास अनुकूल तर हिमाचल प्रदेश एकगठ्ठा मते देण्यासाठी अनुकूल. इंदिराजींच्या
विरूध्द त्यांना हटवण्याचा पवित्रा जयप्रकाशजींनी घेताच गुजरातेत नवनिर्माण चळवळ सुरू
करून त्यांना साथ दिली. राहूल गांधींना अद्याप मोदीमय झालेल्या गुजरातची संपर्ण साथ
मिळाली नाही हे मात्र खरे. ती इतक्या मिळणारही नाही. परंतु विधानसभेतल्या
काँग्रेसच्या वाढलेल्या ताकदीमुळे क्षीण झालेल्या काँग्रेसच्या शिडात वारे भरले
आहे. पर्यायी पक्ष म्हणून वावरणा-या
काँग्रेसला तूर्तास इतकी ताकद पुरेशी ठरू शकेल.
हेही मान्य केले पाहिजे की, लागोपाठ तीस
वर्षें गुजरातची सत्ता टिकवून ठेवणे हा नरेंद्र मोदींचा विक्रम अभूतपूर्व आहे. तीन
वर्षापूर्वी केंद्रीय नेतृत्व हातात येताच त्यांना मिळालेल्या तीन वर्षांच्या
काळाचा नरेंद्र मोदींनी त्यांच्या मनाप्रमाणे पुरेपूर उपयोग करून घेतला.
निश्चलनीकरण आणि जीएसटीसारखे धाडसी निर्णय त्यांनी घेतले. विशेषतः
मनमोहनसिंगांच्या निष्क्रीय सरकारच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय राजकारणावर
आपली छाप पाडण्यासाठी असंख्य परदेश दौरे केले. हे सगळे करताना नेहरू आणि इंदिरा
गांधींची ऐतिहासिक प्रतिमा पुसून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हा त्यांचा
प्रयत्न जनतेला अश्लाघ्य वाटलेला असू शकतो. त्यामुळेच गुजरातमध्ये काँग्रेसबद्दल
सहानुभूतीची लाट आली. त्या लाटेचेच प्रतिबिंब
निकालात पडले आहे. संसदेला सरळ सामोरे जाण्याचेही मोदी टाळत आले आहेत हेही
जनतेच्या नजरेतून सुटलेले नाही. भारतीय जनतेची प्रतिक्रिया लगेच मतदानात दिसली
नाही, दिसणारही नाही हे लक्षात घेतले तरी केव्हा न केव्हा मोदींच्या चुकांबद्दल
मतदार त्यांना शिक्षा एक देणारच. ती वेळ 2019 च्या लोकसभा निवडणुकीत येईल. कदाचित
येणारही नाही. मात्र, भारतीय राजकारणाची वाटचाल
व्दिपक्षीय लोकशाही दिशेने जितकी होईल तितके चांगले अशीच भावना गुजरातच्या
निकालाने वाढीस लागणार आहे.
गुजरातचा कौल हा विकासाला दिलेला कौल असल्याचे
मोदींनी सांगितले असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र विकासाच्या मुद्द्यांपेक्षा
टिंगलटवाळी, जानवे, देवदर्शन असल्या बिनमहत्त्वाच्या तथाकथित हिंदुत्ववादी
मुद्द्यांवर भाजपाने भर दिला. मणीशंकर अय्यरनी मोदींना 'नीच' असे संबोधल्यामुळे मोदींना आणखी एक मुद्दा
मिळाला. परंतु राहूल गांधींनी मणीशंकर अय्यरना पक्षातून काढून टाकून बाजू सावरण्याचा
केलेला प्रयत्न यशस्वी ठरला. भाजपाच्या बाबतीत दिसणारे चित्र बरोबर त्याच्या उलट आहे.
तोंडाला येईल ते बरळत राहणा-या स्वपक्षातील दुय्यम तिय्यम नेत्यांना पंतप्रधान
नरेंद्र मोदी आवरू शकले नाहीत! ह्या पार्श्वभूमीवर राहूल
गांधींची परिपक्वता अधिक ठसठशीतपणे दिसून येते. मोदींनी पुढे केलेला विकासाचा
मुद्दा त्यांच्याच पक्षातील कुणी म्हणण्यासारखा
उचलून धरला नाही. विशेषतः विकासाच्या मुद्द्यात अधिक तपशील भरणे त्यांच्या सहकार-यांना
शक्य होते. पण हे त्यांच्या सहका-यांनी केले नाही. अरूण जेटली, व्यंकय्या नायडू,
राजनाथ हे फक्त त्यांच्या खात्यांतर्फे जे बोलत राह्यला पाहिजे तेच बोलत राहतात. त्यापलीकडे
ते कधी जाऊ इच्छित नाही. नरेंद्र मोदीच फक्त देश चालवत आहेत आणि अमित शहा हे
त्यांचे हेल्पर म्हणून काम करत आहेत असेच चित्र देशात दिसत आहे. नेमकी अशीच
परिस्थिती इंदिराजींच्या नेतृत्वाला ऑटोक्रसी वळण लागण्यास कारणीभूत ठरली होती ह्याची
आठवण होते.
खिल्ली आणि टीका सहन करणारे राहूल गांधींकडून
काँग्रेसला काय नेतृत्व मिळणार असे अनेक जण गृहित धरून चालले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाच्या वर्तुळात गेली अनेक वर्षे चालणारी नेहरू कुटंबाची टिंगलटवाळी राहूल
गांधींच्याही वाट्यालाला आली. फरक इतकाच की खासगीत चालणारी टिंगलटवाळी जाहीररीत्या
सुरू झाली! त्या टिंगलटवाळीमुळेच नेतृत्वावर
प्रश्ननचिन्ह निर्माण झाले. त्यांच्या नेतृत्वाबद्दल अंदाजअडाखे किती चुकीचे आहेत
हेही गुजरात निवडणुकीने दाखवून दिले. ह्यापूर्वी उत्तरप्रदेश, बिहार आणि
जम्मू-काश्मीर ह्या तीन राज्यात राहूल गांधींना यश मिळाले नाही हे खरे परंतु
राजकारणाच्या गुळगुळीत रस्त्यावर सांभाळून चालले नाहीतर आडवे होण्याची वेळ येणारच
हा धडा त्यांना निश्चितपणे शिकायला मिळाला असला पाहिजे. तो धडा ते शिकलेही. राजकारणात
हारजीत चालायचीच ! गुजरातच्या निकालाने पालटलेले वातावरण
काँग्रेस आणि राहूल गांधी ह्या दोघांना आश्वासक आहे ह्यात शंका नाही. सध्याच्या
परिस्थितीत देशातील लोकशाही मजबूत होण्यासाठी समर्थ विरोधी पक्ष हवा आहे. असा
समर्थ विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला उभे करण्यात राहूल गांधींना यश मिळाले तरा खूप
झआले.
रमेश झवर
www.rameshzawar.com
No comments:
Post a Comment