राहूल गांधींचे काँग्रेस अध्यक्षाच्या पदावरावरोहण सुरू होताच
त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला ह्यात काही नाविन्य नाही. असाच आरोप
इंदिरा गांधी आणि राजीव गांधींवरही करण्यात आला होता. देशभर सर्वच राजकीय पक्षात घराणेशाही
अस्तित्वात आली असल्याने आता काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप निरर्थक ठरतो. वस्तुतः गांधींना
इंदिरा नेहरू हयात असताना भरपूर उमेदवारी करावी लागली होती. इंदिरीजींची हत्त्या
झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत फारशी उमेदवारी करावी न लागताच पंतप्रधानपद त्यांच्याकडे आले. राजीव
गांधींना कमी उमेदवारी करावी लागली हे खरे असले तरी शीख अतिरेक्यांच्या बीमोड करून
राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना मोठेच यश आले. श्रीलंकेतील
तमिळ अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी श्रीलंका सरकारला मदत केली. त्यामुळे
त्यांच्यावर प्राणाची आहुती देण्याची पाळी आली.
राहूल गांधींसमोरील आव्हाने एका अर्थाने आव्हाने इंदिराजींसमोरील आणि
राजीव गांधींसमोरील आव्हानांपेक्षा अधिक बिकट आहेत. सत्ताच नव्हे तर विरोधी पक्ष
नेतेपदही गमावून बसलेल्या काँग्रेसला सत्तास्थानी आणण्याचे आणि पुन्हा पूर्व प्रतिष्ठा
प्राप्त करून देण्याचे आव्हान राहूल गांधींसमोर आहे. चारदोन वृध्द नेत्यांखेरीज काँग्रेसमध्ये कोणीही
अनुभवी नेता उरलेला नाही. निदान त्या नेत्यांची बूज राखण्यासाठी मार्गदर्शक मंडळ
नेमण्याचे घाटत आहे. सोनिया गांधी बव्हंशी अहमद पटेलांवर विसंबून होत्या. एकारलेल्या
व्यक्तीच्या सल्ल्यावर सोनिया गांधी विसंबून राहिल्यानंतर काँग्रेसला फटका बसणारच
होता. आणि तो बसलाही. तसा तो बसू नये म्हणून ह्यावेळी मार्गदर्शक मंडळाची योजना करण्यात
आलेली दिसते. त्याखेरीज काँग्रेस नेतृत्तवात तरूणांचा समावेश करण्याचा मनोदय त्यांनी
अनेकदा व्यक्त केला होता. काँग्रेस पक्षाच्या पुनरउभारणीच्या कामात त्यांना आडकाठी
राहणार नाही हे उघड आहे.
पप्पू, युवराज वगैरे नावाने संबोधून त्यांची गेल्या काही वर्षांपासून
खिल्ली उडवली जात आहे. अर्थात नेहरू परिवाराबद्दल कंड्या पिकवण्याचा धंदा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेली कित्येक वर्षे सुरू असून मत्सरभावनेपलीकडे त्यात
तथ्य नाही. त्यात तथ्य असते तर भाजपा कधीच सत्तेवर आला असता. राहूल गांधींना पप्पू काँग्रेसचे नुकसान होणार नाही. उत्तरप्रदेश
आणि बिहार ह्या राज्यात राहूल गांधींना काँग्रेस पक्षाला वरती काढण्यात यश आले
नाही. परंतु गुजरात निवडणूक प्रचारसभेत नोटबंदी आणि जीएसटीवरून त्यांची घणाघाती टीका
पाहता भाजपाला मिळणा-या जागा कमी होणार असे अंदाज वर्तवले जात आहेत. गुजरात विधानसभेतील
भाजपाच्या जागा कमी करण्यात राहूल गांधींना यश मिळाल्यानंतरच राहूल गांधींच्या
नव्या अवताराच्या नवलकथा ऐकायला मिळतील. गुजरात निवडणुकीनंतर संसद अधिवेशन
बोलावण्यात आले आहे. ह्याही अधिवेशनात राहूल गांधींच्या भाषणांकडे लोकांचे लक्ष
राहील. पुढील वर्षीं राजस्थानमध्ये निवडणुका होणार असून त्यानिमित्तानेही कर्तृत्व
गाजवण्याची संधी राहूल गांधींना मिळणार आहे. तात्पुरत्या अजेंड्यात त्यांना किती
यश मिळते ह्यावरच त्यांचे भावी यश अवलंबून राहील.
नोटबंदी आणि जीएसटीची सदोष अमलबजावणी ह्या दोन मुद्द्यांवरून मोदी
सरकारची त्रेधातिरपीट उडालेली स्पष्टच दिसली. ह्या प्रश्नांवरून जनमानसात असंतोष
आहे. त्या असंतोषाला राहूल गांधी फुंकर घालू शकले तर काँग्रेसला गुजरात ह्या मोदींच्या
घरातच त्यांच्यापुढे राहूल गांधी आव्हान उभे करू शकतील. मनमोहनसिंग सरकारविरूध्द भ्रष्टाराचा
तोच तोच आरोप करण्यात भाजपाला यश मिळाले. सत्ताही मिळाली. तीन वर्षांच्या भाजपाच्या
कारभारानंतर नेहरू-गांधी ह्यांच्यावरील वैयक्तिक टीकेखेरीज मोदींकडे स्वताःचा असा
कार्यक्रम नाही अशीही बहुसंख्यांची भावना झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे
संसदेत गैरहजर राहणे हेही लोकांना खटकू लागले आहे. मोदींना 'सुपर नेता' व्हायचे आहे हे ठीक आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षेला
आड येण्याचे कोणाला कारण नाही. परंतु आकाशवाणीवरील
केवळ 'मन की बात' ह्या त्यांच्या
भाषणांमुळे त्यांच्या सुपर नेतेपदाच्या वाटचालीचा मार्ग खुला होत नाही.
मोदींप्रमाणे राहूल गांधींनाही त्यांची स्वतःची आणि काँग्रेसची प्रतिमा
बदलण्याच्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. किंबहुना त्या परीक्षेत राहूल
गांधींना उत्तीर्ण व्हावेच लागेल. निवडणुका जिंकण्यासाठी बुध्दीबळाइतकेच द्रव्यबळही
आवश्यक असते. ह्या दृष्टीने विचार करता भाजपाचे पारडे काँग्रेसच्या पारड्यापेक्षा
कितीतरी जड आहे. अर्थात त्यावर मात करता येणारच नाही असे नाही. कित्येक श्रीमंत
आणि नाठाळ उमेदवारांना मतदारांनी धूळ चारल्याचा भारतातल्या निवडणुकींचा इतिहास
आहे. निडणुका जिंकण्यासाठी इंदराजींनाही जिवाचे रान करावे लागले होते. राहूल गांधींनाही
जिवाचे रान करावे लागेल. काँग्रेस अध्यक्षाची माळ कोणाच्या गळ्यात पडली हा
मुद्दा एरवी राजकारण्यांपुरता मर्यादित होता. आता त्या मुद्द्याचे महत्त्व
मर्यादित राहिलेले नाही. काँग्रेस पक्षाला समर्थ विरोधी पक्ष म्हणून उभा करण्याचा
प्रश्न आहे. तो जास्त महत्त्वाचा आहे.
रमेश झवर
www.rameshzawar.com
No comments:
Post a Comment