Monday, October 1, 2018

फटके लगावणारे गांधी


1937 च्या प्रांतिक विधिमंडळांच्या निवडणुकात काँग्रेसला 11 पैक 6 प्रांतांत बहुमत मिळाले नि उरलेल्या 5 प्रांतांत सर्वात मोठा पक्ष म्हणून तिलाच मान मिळाला. 1585 जागांपैकी फक्त 657 जागा सर्वसामान्यांना खुल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसने ज्या 715 जागा जिंकल्या त्यांना विशेष महत्त्व होते. गांधीजींनी 1934 पासून काँग्रेसशी औपचारिक संबंध तोडले होते तरी संघटनेत नि विचारात त्यांचेच नेतृत्व मानले जात होते.

मध्यप्रांतात डॉ. ना. भा. खरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे मंत्रिमंडळ स्थापन झाले आणि लौकरच तिथे मराठी नि हिंदी मंत्री असा वाद उद्भवला. या वादातून खरे यांनी आपल्या दोन मराठी सहका-यांसह राजिनामा दिला; जेव्हा तीन हिंदी मंत्र्यांनी राजिनामा देण्याचे नाकारले तेव्हा गव्हर्नरने आपल्या अधिकारात त्यांना काढून टाकले आणि खरेंनी स्वतःच्या पसंतीच्या नव्या मंत्रमंडळासह मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सर्व कृतीत खरे यांनी काँग्रेसच्या अधिकारमंडळाचे मार्गदर्शन घेतले नव्हते, एवढेच नव्हे तर त्यांना जे मार्गदर्शन मिळाले होते तेही त्यांनी धुडकावून लावले होते. यानंतर काँग्रेसच्या कार्यसमितीने त्यांच्यावर ठपका ठेवला. त्यांनी मंत्रिमंडळाचा राजिनामा दिलाच होता, पण मध्यप्रांताच्या पक्षप्रमुत्वाचाही राजिनामा त्यांना द्यावा लागला. शुक्ला मग पक्षप्रमुख म्हणून निवडले गेले आणि मुख्य मंत्री झाले.
या प्रकरणातून सांसदीय नि घटनात्मक शिष्टाचाराचा बराच वाद मागून निघाला आणि काँग्रेसच्या विरोधकांनी असा आरोप केला, की कार्यकारिणीचे वर्तन हुकूमशाहीला शोभेसे झाले नि मुख्य मंत्री म्हणून ख-यांना अधिक स्वातंत्र्य मिळालायला हवे होते. खरे प्रकरण गांधीजींच्या पुढ्यात नि त्यांच्याशी सल्लामसलत होऊन झाले होते. खरे आणि काँग्रेसप्रमुख या उभयपक्षांनी शेगावला जाऊन बोलणी केली होती. तेव्हा, 6 ऑगस्ट 1938 या दिवशी, गांधीजींनी एका जोमदार लेखात भलभलत्या आरोपांना चोख उत्तर दिले. त्यांनी म्हटले, 'पार्लमेंटरी बोर्डाच्या पूर्वसूचना ख-यांनी धाब्यावर बसवल्या आणि गव्हर्नरच्या हातचे बाहुले बनून आपल्या नेतृत्वाचे दिवाळे वाजवले. कार्यकारी-मंडळाने आपल्या चुकांची कबुली देण्याचा सल्ला त्यांना दिला. पण तोही नाकारून त्यांनी पहिल्या बेशिस्तीत भर घातली. ख-यांनी मला मोलाची मदत केलेली आहे. माझा सल्ला घेतलेला आहे. मित्रांना मुक्त हस्ताने मदत ते पैशाची मदत करतात. "These are qualities of which anyone may be proud. But these qualities need not make the possessor a good prime minister or administrator." या वर्षी सुभाषचंद्र बोस काँग्रेसचे अध्यक्ष होते. 'आपली पदच्युती हा सैतानी सूड, मत्सर नि व्देष यांचा परिपाक होता,' अशा अर्थाचे  उद्गार पुण्याच्या एका सभेत ख-यांनी काढले होते. ते बहुधा लक्षात घेऊन बोस म्हणाले,  "कोणताही खरा सेनापती किंवा हाडाचा मंत्री आपलेच शासन किंवा आपलाच पक्ष यांची नालस्ती करीत, मध्यप्रांताच्या भूतपूर्व मुख्य मंत्र्यांसारखा बेजबाबदारपणे प्रतिष्ठा सोडून यापूर्वी हिंडला नसेल"
गांधीजी बोलायला मृदू, वागायला प्रेमळ होते. पण अनुशासनाचा किंवा सार्वजनिक शिस्तीचा प्रश्न आला की ते फार कठोर होत. त्यांचे मुलायम शब्द मग विजेच्या चाबकासाररखे फटका लगावीत नि अपराध्याला अर्धमेले करीत. त्यांचा हा विशेष खरे-प्रकरणात सहज प्रकाशात आला.

द. न. गोखले
( 'गांधीजी मानव आणि महामानव' या पुस्तकातून )


No comments: