Monday, November 5, 2018

नभ धूराने आक्रमिले!


दिवाळीच्या सगळ्या जणांना मनापासून शुभेच्छा! यंदा जरा जास्तच शुभेच्छा!! 'नभ मेघांनी आक्रमिले' ह्या नाट्यगीताने एक काळी मराठी मन हरखून जात होते! यंदाच्या दिवाळीत मात्र मन चिंतेने ग्रासले आहे तर असमंत धूराने ग्रासले आहे. हा धूर निव्वळ फटाक्यांचा नाही. पर्जन्यराजाने सुरूवातीला देशवासियांना खूश केले. धो धो कोसळणा-या पावसाने महाराष्ट्रभूमीवरची धूळ जरा खाली बसली न बसली तोच वेळेवर आलेला पाऊस वेळेआधी निघून गेला! नेहमीप्रमाणे निम्म्या महाराष्ट्राला संकटात टाकून गेला. अर्थात दुष्काळनिवारणाच्या यंत्रणेची कळ दाबण्यास महाराष्ट्राचे राज्यकर्ते विसरले नाहीत.
तसे आपल्याकडचे राज्यकर्ते सहसा विसरत नाहीच. लोकसभेपासून ग्रापंचायतीपर्यंतच्या कुठल्याही निवडणुका जवळ आलेल्या असतील तर राज्यकर्ते काही गोष्टी मुळीच विसरत नाही! आपला देश खरोखरच भाग्यशाली आहे. विभूतीपूजेत तो कितीही गुंग असला तरी एखाद्या सुज्ञ अधिका-याचे सरकारला अचानक मार्गदर्शन लाभते. हे अधिकारी प्रसंगी राज्यकर्त्यांची अवज्ञा करायलाही मागेपुढे पाहात नाही. त्यावेळी नकळतपणे त्यांच्या हातून एखादी अशी कृती घडते की राज्यकर्ते उघडे पडतात. 'सार्जनिक हिताची बाब' म्हणून एखादी बाब संसदेपासून गुप्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणा-यांना माघार घेऊन ती माहिती निदान कोर्टापुरती उघड करण्याची पाळी येते. खरे सार्वजिनक हित आपोआप साधले जाते ते असे! सार्वजनिक हिताचा विचार केला तर अगदी अलीकडे वित्त संस्था, अत्युच्च तपास यंत्रणा, अत्युच्च न्याययंत्रणा ह्यांचा देशाला सुखद अनुभव आला!

'जनता आयी है सिंगासन खाली करो' असे म्हणत आदळआपट करण्याची देशाला गरज राहिली नाही हे ह्या निमित्ताने दिसले हे निश्चितपणे बरे झाले. राजकारण्यांची विश्वासार्हता खूपच खाली आल्याचे हे द्योतक आहे! आधारकार्ड, डिजिटलायजेशन, मोबाईल इत्यादि नव्या नव्या साधनांमुळे भारत ही जणू पाश्चात्यांची 'डाटा वसाहत' होत चालली आहे. त्यापासून मनःपूत दैनंदिन जीवन जगण्याचे स्वातंत्र्य वाचले पाहिजे असे जनतेला वाटू लागले आहे. तरीही नव्या संसाधनांचा जरा जास्तच धोशा राज्यकर्त्यांनी लावला हेही जनतेला कळू लागले आहे.
विकास हा असा शब्द उच्चारला तर धडकी भरावी असे वातावरण सध्या देशात आहे. विकास म्हणजे बुलडोझर चालवून शेकडो एकर जमीन सफाचाट करून टाकणे! विकास म्हणजे गारेगार सावली आणि गोड फळे देणा-या आमराया, चिक्कूच्या बागा नष्ट करणे! विकासाचा साथ एवढ्यावर थांबत नाही. 'छत्तीस शिंगे बत्तीस पाय पाण्यातली मासळी उडत जाय' हा मासा कोणता असा जुना उखाणा घालण्यासाठी आधी तो मासा शिल्लक राहिला पाहिजे. परंतु दुर्दैवाने त्यासाठी आवश्यक असलेला निळाशार समुद्रच हटवण्याच्या खटपटी हादेखील विकासच. विकासकांच्या लेखी खारफुटी हा अनावश्यक चिखलच! शक्य तितक्या लौकर तो दूर करण्यासाठी त्यात भर घालून जमीन तयार करणे महत्त्वाचे! एकरदोन एकरची शेती करून काय मिळणार? त्यापेक्षा काही लाख रुपये घेऊन शहराकडे निघून जाणे कसे योग्य आहे हे पटवून देण्याची गावोगाव एजंट फिरत आहेत. हीसुध्दा सध्या विकाससाठीची खटपट! गरीबांच्या बँकखात्यात थेट पैसे जमा करण्याची योजना आता जुनी झाली. आता 'अनुदान', 'इंधनसाह्य, धान्यखरेदी साह्य' असली जुन्या योजनांची खुळचट नावे काढून टाकून ठोक 25-30 हजार रुपये त्यांच्या अंगावर फेकण्याची नवी कल्पना विकास संस्कृतीच्या पुरस्कर्त्यांनी मांडली. मात्र, ह्यावर जाहीर चर्चा करणे धोक्याचे ठरणार हे ओळखून तूर्त तरी 'अळीमिळी गुपचिळी' असा सावध पवित्रा त्यांनी घेतला आहे.
आगामी काळात निवडणुकीमुळे पाच राज्यांच्या आकाशात उसळलेला राजकीय धुरळादेखील लौकरच शांत होईल. मात्र, आकाशाला कार्बनडाय ऑक्साईडचा विळखा घातला जाण्याचे संकट येऊ घातले आहे. हा धूरळा साधा नाही. येऊ घातलेल्या संकटात प्रगत आणि प्रगती करू इच्छिणारे, पाश्चात्य आणि पौवार्त्य, रोमन कॅथलिक, मुस्लिम, हिंदू, बौध्द असा धर्मिक फरक किंवा कृष्चणवर्णीय आणि गौरवर्णीय असा कोणत्याही प्रकारचा वर्णभेद मानण्यास मुळी अवकाश उरणार नाही.  कोणते आहे ते संकट? 2030 पर्यंत पृथ्वीचे तपमान 2 अंशापर्यत वाढण्याची जागतिक पर्यावरणतज्ज्ञांनी वर्तवलेली शक्यता हेच ते संकट! ऑक्टोबर महिन्यात मुंबईसह बहुतेक शहरात तपमान 38 अंशावर गेले. धरणे आणि अन्य जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने पाणीसाठा कमी झाल्याचे तजज्ज्ञांचे म्हणणे आहे. पृथ्वीच्या वाढत्या तपमानामुळे अतिवृष्टी, अवर्षण, त्सुनामी, चक्री वादळे, हवामानतले अचानक बदल हे किंवा त्यापैकी एक अशी निरनिराळी संकटे वाढत राहतील असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. भारतासह जगातल्या कुठल्याही देशात ही संकटे उद्भवू शकतील! सध्याच्याच पध्दतीने सरकार विचार करत राहिले तर त्या संकटांना तोंड देणे त्यांना कितपत शक्य होणार हे सांगता येणार नाही. तज्ञांच्या मदतीविना ह्या संकटावर मात करणे तर सोडाच, राज्य चालवणेही राज्यकर्त्यांना अशक्यप्राय होऊन बसेल!
दिवाळीच्या दिवसात नभ धूरांनी आक्रमिले असतानाच पुढील 10 वर्षंच्या काळात येऊ घातलेल्या संकटातून भावी पिढीला वाचण्यासाठी आपल्या सगळ्यांनीच एकमेकांना शुभेच्छा देणे जास्त युक्त ठरेल!

रमेश झवर
rameshzawar.com

No comments: