राज्य
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला 157 काँग्रेस महाआघाडीला १०४ आणि इतरांना २६ जागा मिळाल्या. वंचित आघाडीला एकही जागा मिळाली नाही. इतरात मनसे, बंडखोर आदीेंचा समावेश आहे. निकालाचा सरळ अर्थ जनादेश महायुतीच्या बाजूने
असून महाआघाडीला काँग्रेस आघाडीला जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा हुकूम दिला आहे. सत्तेवर
येण्याची काँग्रेस आघाडीची संधी ह्यावेळी तरी हुकली! तरीही महायुतीला खिंडार पाडण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ह्यांनी
चोख बजावले. भाजपाच्या उद्दाम नेतृत्वाला जनतेकडून मिळालेल्या पाठिंब्याच्या
जोरावर पवारांनी धडा शिकवला!
वैयक्तिक स्वार्थासाठी पाच वर्षे भांडत राहणा-या
दोन्ही पक्षांच्या नेत्यांना सणसणीत चपराक लगावण्याच्या विचारात जनता होतीच. ह्या जनभावनांना
प्रोत्साहित करण्याचे काम शरद पवारांनी केले. विशेष म्हणजे झोपी गेलेले काँग्रेस
नेतेही खडबडून जागे झाले! राष्ट्रीय नेत्यांच्या भरवशावर न राहता आपापल्या मतदारसंघात निवडून
येण्याचा काँग्रेसजनांनी कसून प्रयत्न केला!
‘इतर’ २६ जागांवर निवडून
आलेल्यांपैकी १५ जणांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा मनोदय व्यक्त केला. उरलेल्या
११ जणांनी महाआघाडीला आतून बाहेरून कसाही पाठिंबा दिला तरी काँग्रेस
महाआघाडी सत्तेवर येऊ शकणार नाही हे उघड आहे. एक मात्र खरे की राज्य विधानसभेच्या निवडणूक
भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्याचा घालवण्याचा काँग्रेस महाआघाडीचा संकल्प सिध्दीस
गेला नाही.
महायुतीला खिंडार
पडले तरी ते भाजपा नेते मान्य करायला तयार नाहीत. शिवसेना नेत्यांनी मात्र
निकालाने आमचे डोळे उघडले हे मान्य केले. शिवसेना नेते प्रगल्भ होत आहेत. भाजपा
नेत्यांची वक्तव्ये मात्र अजूनही एखाद्या कार्पोरेट कंपनीच्या चीफ
एक्झक्युटिव्हसारखी आहेत! कंपन्यांच्या बॅलन्सशीटमध्ये आकडे नफा फुगवून
सांगण्याची कंपनीप्रमुखांची स्टाईल लर्वांना परिचित आहे. आकडे अशा त-हेने
फुगवण्यात येतात ते कोणालाही खोटे आहेत असे सिध्द करता येऊ नये! नफा कमी का, असा प्रश्न विचारला तर ‘पाहा, आमची विक्री वाढली आहे’ असे उत्तर कंपनीप्रमुखांकडून
आकडेवारीनिशी दिले जाते! आकड्यांमुळे सत्ता मिळू शकते, पण त्यात
जनभावनेचे प्रतिबिंब पडतेच असे नाही, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या
यशाबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी दाखवलेली चलाखी कंपनीच्या
कार्यकारी अधिकारी दाखवतात त्यापेक्षा कमी नाही. अर्थात कमी जागा मिळाल्या हे सरळ
सरळ कबूल करण्यापेक्षा मिळालेल्या जागा, मतदानाची टक्केवारी अशी निरर्थक भाषा फ़डणविसांनी
केली. बंडखोरांमुळे महायुतीच्या जागा कमी झाल्या ह्याची कबुली फडणविसांनी देणे
जास्त योग्य ठरले असते. निदान त्यामुळे त्यांचा प्रामाणिक चेहरा दिसला असता! शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंच्या प्रेसकॉन्फरन्समध्ये
मात्र त्यांचा प्रामाणिकपणा दिसला. तरीही मोठ्या भावाला त्यांनी हुषारीपूर्वक
चिमटे काढले हे लपून राहिले नाही!
वेळोवेळी
केलेल्या वक्तव्यांमुळे भाजपा नेते उघडे पडले. प्रेसकॉन्फरन्समध्ये जे फडणवीस
मान्य करू इच्छित नव्हते ते मह्त्त्वाचे आहे. त्यांच्या सरकारच्या अपु-या आणि प्रभावशून्य
कामगिरीमुळे जनतेत नाराजी निर्माण झाली. ती निवडणुकीच्या निकालातही स्पष्टपणे व्यक्त
झाली. फ़डणविसांच्या महाजनादेश य़ात्रेपेक्षा उन्हापावसाची पर्वा न करता बुजूर्ग
नेते शरद पवार ह्यांनी घेललेल्या प्रचारसभा जनतेला अधिक भावून गेल्या. जरूर नसताना
अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्या.
बरे, घेतल्या तर घेतल्या! मराठी माणसांना खुळचट समजण्याची चूक त्यांनी
केली. ३७० कलम, राष्ट्रभक्ती-देशभक्ती वगैरेचा नेहमीचा डोस पाजला!
विधानसभा
निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळाल्या. परंतु महायुतीला मिळालेल्या जागा
कमी जागा मिळाल्या हे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे आहे ते हे की काँग्रेस आघाडीच्या
जागा वाढल्या. काँग्रेस आघाडीला जास्त जागा मिळणे हे राज्यातल्या राजकीय
बलाबलाच्या दृष्टीने तर महत्त्वाचे आहेच; शिवाय शहा-मोदी ह्या जोडगोळीच्या देशातील राजकीय
प्रभावावर वस्तरा चालवणारे ठरू शकते. ‘स्ट्राईकिंग रेट’ कमी झालेला नाही असे सांगण्याची वेळ उद्दामपणा मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीसांच्या स्वभावातच नाही. म्हणून ते राज्याचे नेते होण्यास सर्वथा पात्र आहेत.
इतकेच नव्हे तर त्यांना देशाच्या पातळीवर आणणे भाजपाच्या हिताचे ठरेल. सध्या
देशाच्या पातळीवर वावरणा-या अनेक भाजपा नेत्यांच्या स्वभावात उद्दामपणा पुरेपूर आहे.
त्यांचा हाच उद्दामपणा महाराष्ट्र विधानसभेच्या निकालामुळे ठेचला गेला! सत्तेची वाटचाल ‘आधी ठरवल्यानुसार करू’ हे शिवसेना नेते उध्दव ठाकरे ह्यांचे वक्तव्य
पुरेसे संयत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनीदेखील त्यांच्या वक्तव्याला
दुजोरा दिला. मात्र, दोन्ही पक्षात काय
ठरले हे सांगण्यास दोघेजण तयार नाहीत. परंतु वेगवेगळ्या वार्ताहरपरिषदा बरेच काही
सांगून गेल्या! म्हणूनच महाराष्ट्रातही ‘कर्नाटक प्रयोग’ करून पाहण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खडा टाकून
पाहिला असावा. अर्थात त्यांना प्रतिसाद देण्याइतके शिवसेनेचे नेते खुळे नाहीत. ह्याउलट
आघाडीच्या नेत्यात आपापासात चर्चा करण्याची शरद पवारांची भूमिका रास्त आहे. तरी
तूर्त तरी सत्तेचे राजकारण करायचे नाही असे त्यांनी ठरवले असावे. निवडणुकीचा निकाल
पाहून आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या बाबतीत भाजपा खळखळ करणार नाही
ह्याचाही पवारांना अंदाज असावा. त्याचे कारण सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया पुष्कळ
तर्कसंगत असते हे पवारांना जितके माहित आहे तितके अन्य राजकारण्यांना माहित नाही.
ह्या निवडणकीचा
एकच संदेश दिसतो, जनतेला गृहित धरण्याची चूक करणा-या राजकीय पक्षाला जनता धडा
शिकवल्याशिवाय राहात नाही! लोकशाहीत विरोधी नेत्यांविरूध्द कोर्टकचे-या लावण्याचे सूडाचे राजकारण
अंगलट येऊ शकते. एखादा पक्ष संपुष्टात आणण्याच्या मूर्खपणाच्या व्देषमूलक वल्गना
निदान देशाचे नेते म्हणवणा-यांनी तरी करू नये! अजूनही राज्याचा कौल सक्षम विरोधी पक्षाला आहे!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार