Tuesday, October 1, 2019

गांधीजी आणि आतला आवाज

गांधीजींचा सत्य-अहिसेवरील लोकोत्तर विश्वास होता अशी एक आठवण रवींद्र केळेकर ह्यांनी त्यांच्या ज्ञाननिधीच्या सानिध्यात ह्या पुस्तकात दिली आहे. काकसाहेब गांधीजींच्या आश्रमात शिक्षक होते. महात्मा गांधीजींबरोबरच्या सहवासातल्या अनेक आठवणींना काकासाहेब कालेलकरांनी रवींद्र केळेकरांशी गप्पा मारताना उजाळा दिला. त्या आठवणींवर एक छोटेखानी पुस्तक रवींद्र केळेकरानी लिहले. ते पुस्तक १९७० साली प्रसिध्द झाले. त्या पुस्तकात गांधीजी आणि आतला आवाज ह्यावर काकासाहेबांनी कथन केलेली मजेशीर आठवण आहे.  गांधीजींच्या अनेक आठवणीचे लेखन केळेकरांनी केले आहे. मात्र, आतल्या आवाजासंबंधीची ही एक आठवण अतिशय मार्मिक आहे.
काकासाहेबांच्या हातात इव्हलीन अंडरहीलने लिहलेले Mysticism हे पुस्तक पाहताच केळेकरांनी त्यांना प्रश्न विचारला, सध्या हे पुस्तक वाचताय्...?’
त्यावर काकासाहेब म्हणाले, पुस्तक जुनेच आहे. पण सर्वमान्य आहे.
केळेकरांनी विचारले, गांधीजींच्या जीवनात Mysticism  होता असे आपण म्हणाला होता ना?
काकाकसाहेबांनी केळेकरांना मार्मिक उत्तर दिले. त्यांनी सांगितले, गांधीजींचा सत्य-अहिंसेवर लोकोत्तर विश्वास होता. जग मला खोटे म्हणो, पण मी अमुक गोष्ट करणार म्हणजे करणारच असा गांधीजींचा ठाम निर्धार होता. जगाच्या अनुभवाविरूध्द जाऊन तिच्याहून आपली श्रध्दा मोठी आहे असे मानणे ह्यालाच Mysticism म्हटले पाहिजे.
पण ही वृत्ती माणसाला अराजकवादी बनवणार नाही का? माणसाचे आचरण व निर्णय ह्यांना बांधणारी, मर्यादित ठेवणारी जी काही तत्त्वे आहेत ती सोडून आपल्या अंतरात्म्याच्या आवाजालाच सर्वोपरी मानणे म्हणजे एक प्रकारे त्याला विद्रोही बनवण्यासारखे नाही का?’ केळेकर
त्याला विद्रोही बनवण्यासारखे आहेच...पण त्याचबरोबर त्याच्यात एक अद्भूत शक्तीचा संचारही करण्यासारखे आहे,’ असे सांगून काकासाहेब म्हणाले, गांधीजींच्या मनात वयाने व अनुभावाने थोर असलेल्या लोकांबद्दल आदरबुध्दी होती. शास्त्रवचन आणि संतवचनाविषयी एक प्रकारची प्रामाण्यबुध्दीही गांधीजींत भरपूर होती. पण त्यांचा अंतिम आधार आत्मनिष्ठेवरच होता. अंतरात्म्याचा आवाज ऐकल्यावर लगेच ते आपली संपूर्ण निष्ठा त्याला अर्पण करून मोकळे होत. त्यानंतर त्यांच्या निर्णयात बदल घडवून आणणे कोणाच्याही हातात राहात नसे.’
मात्र, अंतरात्म्याच्या आवाजाच्या गांधीजींनी काही कसोट्या निश्चित केल्या होत्या, असे सांगून काकासाहेब म्हणाले, अंतरात्म्याचा आवाज पुढे करून मनुष्य स्वच्छंदतेच्या आहारी जाऊन त्याला कर्तव्यभावनेचा विसर पडू शकतो. म्हणूनच आतला आवाज ऐकताना चित्तशुध्दी आवश्यक असते असे गांधीजींना वाटत असे. शुध्द चित्तवृत्ती नसेल तर अंतरात्म्याचा आवाज त्याला ऐकू येणार नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते. अंतरात्म्याचा आवाज ऐकल्यावर ती व्यक्ती इतरांना त्यांच्या कर्तव्याची जाणून करून देत नाही तर तो स्वतःला स्वतःच्या कर्तव्याची जाणीव करून देतो. स्वार्थ, अहंकार, व्देष किंवा मत्सर इत्यादींच्या आहारी मनुष्य जेव्हा जातो तेव्हाच त्याला आतला आवाज ऐकू येत असतो. आतला आवाज माणसाला कर्तव्यबध्द करत असतो. मात्र, आतला आवाज त्याला कोणताही विशेषाधिकार मात्र देत नाही.
गांधीजींना आतला आवाज ऐकू येत होता असे कालेलकरांनी लिहले आहे. काकासहेब कालेलकर म्हणाले, असा एक प्रसंग आहे की त्या प्रसंगात गांधीजींना आतला आवाज ऐकू आला होता. तो प्रसंग म्हणजे. तुरूंगात उपास करण्याची गांधींजींच्या मनाची तयारी होत नव्हती. त्यावेळी अचानकपणे आपल्या आतल्या आवाजाशी गांधींजींचा संवाद सुरू झाला. आतला आवाज त्यांना सांगत होता, उपास कर.
गांधीजींनी स्वतःला विचारले, किती दिवसांचा?’
 २१ दिवसांचा, त्यांना उत्तर मिळाले.
केव्हापासून? ‘
लगेच.
गांधीजी पुरते सत्यवादी होते. त्यांची बुध्दी इतकी प्रखऱ होता की ते भ्रामक आतल्या आवाजाच्या आहारी जाणे शक्य नव्हते. विनोबांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केली. विनोबा त्यांना म्हणाले, ईश्वर जर श्राव्य असेल तर मग त्याचे दर्शन होणेदेखील अशक्य नसावे!
काकासाहेबांनी केळेकरंशी बोलताना हळुच एक पुस्ती जोडली. ते म्हणाले, आतल्या आवाजाची प्रचिती गांधीजींना एकदाच आली. आतल्या आवाजासंबंधी गांधीजींने केलेले विधान हे लोकोत्तर अशा सत्यनिष्ठ पुरूषाचे आहे. म्हणून त्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. आतला आवाज हे अध्यात्मशास्त्राच्या इतिहासातले हे एक कोडे आहे. म्हणूनच आतल्या आवाजाबद्दल बोलताना आपण आतल्या आवाजाच्या बाजूनेही बोलू नये आणि विरूध्दही बोलू नये, असे सांगून काकासाहेबांनी हा विषय संपवला.
काकासाहेब कालेलकर गांधीजींच्या आश्रमात आश्रमवासियांसाठी अनेक विषयांवर वर्ग घेत. दोघांनाही एकमेकांबद्दल नितांत आदर होता. म्हणून गांधीच्या स्वभावाच्या अनेक पैलूंवर बोलण्याचा आणि लिहण्याचा काकासाहेबांना अधिकार होता. तो सर्वमान्यही होता. काकासाहेब कालेलकर हे सुरूवातीला रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये होते. गांधींजींच्या विनंतीवरून ते शांतिनकेतन सोडून गांधीजींच्या काकासाहेब शांतिनिकेतनमध्ये असताना गांधींजींची त्यांची ओळख झाली. काकसाहेबांशी बोलल्यानंतर गांधीजींना वाटू लागले ही व्यक्ती आपल्या आश्रमात हवी. गांधीजींनी थेट रवींद्रनाथांकडे काकासाहेबांना मागणी घातली! अर्थात मागणी घालण्यापूर्वी गांधीजींनी काकासाहेबांचे मन जाणून घेतले होते. रवींद्रनाथांनीही काकासाहेबांचे मन जाणून घेऊन त्यांना गांधी आश्रमात जाण्यास सहर्ष संमती दर्शवली.
रमेश झवर

No comments: