भटिंडातील हवेबरोबर पंजाबमधील राजकीय हवादेखील भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या विरोधात गेलेली दिसते. पंजाबमध्ये हुसेनीवाला येथे हुतात्मा स्मारकाला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे पंजाबच्या दौ-यात आखण्यात आलेले सरकारी आणि पक्षाने आखलेले कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की केंद्रातल्या सत्ताधारी पक्षावर आली. ‘गिरा तो भी मेरी टांग उपर’ असाच नवशिक्या भाजपा बहुतेक नेत्यांचा आणि कार्यकत्यांचा खाक्या आहे हेही पंतप्रधानांनी पंजाबचा दौरा अर्धवट सोडल्याच्या घटनेवरून स्पष्ट झाले.
दिल्ली ते भटिंडा विमानाने आणि भटिंडाहून हेलीकाफ्टरने हुसेनीवाला आणि फिरोजपूरला जायचे त्यांचे
ठरले होते. परंतु वाईट हवामानामुळे त्यांना हेलिकाप्टरने न जाता रोडने जाण्याचा निर्णय
घ्यावा लागला. पंजाबच्या पोलिस प्रमुखांशी सुरक्षिततेची खातरजमाही त्यांनी करून घेतल्यानंतरच
मोदींच्या मोटारींचा ताफा फिरोजपूरकडे निघाला
होता. ह्या रस्त्यावर मोदींविरूध्द निदर्शने करणा-या शेतक-यांचा जमाव असल्याचे लक्षात
येताच हुसेनीवालापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या पुलावर त्यांचा ताफा अडवणे
पोलिसांना भाग पडले. एकूण परिस्थितीचा अंदाज घेत पंतप्रधानांनी दौरा रद्द केला आणि
ते दिल्लीला जाण्यासाठी मागे फिरले. पंतप्रधान, राष्ट्रपती वगैरे व्हीआयपींचे दौरे रद्द करण्याचे किंवा दौ-याचा कालावधी कमी करण्याचे
प्रसंग देशात ह्यापूर्वी अनेकदा घडले आहेत. अशा घटना घडण्याची शक्यता दिसत असते तेव्हा
किंवा घटना घडून गेल्यानंतर राज्याच्या गुप्तचर विभागाकडून अनेकदा अहवाल मागवण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या दौ-याप्रकरणी पंजाब सरकारकडून केंद्राने
अहवाल मागवला असेल तर त्यात नवे काहीच नाही. नवे असेल तर ते एवढेच की अर्धवट सोडण्यात
आलेल्या सुरक्षाव्यवस्थेवरून पंजाब भाजपाने केलेले राजकारण !
नेहरू आणि इंदिराजी ह्यांना देशात अनेक राज्यात काळे
झेंडे दाखवण्यात आले आहे. नुसते काळे झेंडे दाखवले असे नाही तर त्याची विरोधी पक्षांनी
आपल्या इराद्याच्या घोषणाही केल्या आहेत. निदर्शकांना काही अंतरावर अडवण्याचे पोलिसांचे
तंत्र जुनेच आहे. कधी ते निदर्शकांना व्हॅनमध्ये भरून लॉकअपमध्ये टाकतात आणि नंतर तासादोन
तासात सोडूनही देतात ! पंतप्रधानांच्या दौ-याच्या वेळी कदाचित् पंजाब पोलिसांनी
अशीच सौम्य स्वरूपाची कारवाई केली असती. निर्धारपूर्वक पुढे जाण्याऐवजी पंतप्रधान स्वतःच
दौरा अर्ध्यावर सोडत असतील तर पंजाब पोलिस तरी काय करणार ? कारण
उघड
आहे. पंजाबमध्ये शेतकरी मोर्चावर लाठीमार करण्यासारखा चुकून अनुचित प्रसंग आल्यास त्याचा
उत्तरप्रदेशाच्या निवडणुकीत प्रचार सभांवर गंभीर परिणाम होऊ शकेल ह्याची भयावह जाणीव पंतप्रधान मोदींना
झाली असावी. दुसरे म्हणजे सभेत ७०० जणांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली असता अवघे
७० लोक उपस्थित आहेत ही माहिती कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांपर्यंत पोहचवली असावी. म्हणूनच दौरा अर्धवट सोडण्याचा प्रशस्त मार्ग मोदींनी
पत्करला असावा. त्याचे खापर मात्र पंजाब सरकारवर
फोडून ते मोकळे झाले.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नींनी त्यांच्या
मार्गावर सुरक्षिता कडेकोट बंदोबस्त करण्यात आल्याचा दावा केला. पंतप्रधानांच्या वाहतूक
व्यवस्थेत ऐनवेळी बदर करण्यात आल्यामुळे राज्य पोलिसांची पंचाईत झाली असल्याचे चन्नी
ह्यांनी मान्य केले. बडे नेते, मंत्री, कलावंत इ्त्यादींच्या आयुष्यात असे प्रसंग येतातच ! लोकशाहीत
बाहेर शांततामय निदर्शने करण्यास आणि संसदेत आवाज उठवण्यास मज्जाव नाही. ह्या घटनेनंतर
‘मी भटिंडा विमानतळावरून
जिवंत परतलो त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद कळवा’ असे पंजाबच्या अधिका-यांना
पंतप्रधानांनी जाता जाता सांगितले. ‘माझ्या
रक्ताचा सांडलेला प्रत्येक थेंब देशाच्या कारणी लागेल’ असे
हत्येच्या काही दिवस आधी जाहीर सभेत बोलणा-या इंदिराजी कुणीकडे आणि मी जिवंत परतत आहे
असे सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणीकडे !
रमेश झवर
No comments:
Post a Comment