आज मार्गशीर्ष शुध्द एकादशी! हा दिवस गीता जयंती म्हणून मानला जातो. महाभारतातील सुमारे १ लाख श्लोकात आलेली गीता अवघ्या ७०० श्लोकांची! त्या तुलनेने गीतेतली श्लोकसंख्या म्हणजे फारच कमी. स्वतंत्रपणे छापण्यात आलेली गीता पठण करण्याचा लाखों भारतीयांचा नित्यक्रम आहे. महाभारत युध्दाचा लेखन काळ कोणता ह्यावर पाश्चिमात्य आणि भारतीय संशोधकांनी विपुल संशोधन केले आहे. हिंदूंचा धर्मग्रंथ समजला गेलेल्या ह्या लहानशा ग्रंथावर अक्षर: हजारों भाष्ये लिहीली गेली आहेत
गीता केव्हा लिहली गेली हे शोधून
काढण्यासाठी प्रथम महाभारत युध्दाचा काळ निश्चित करावा लागेल. महाभारत युध्द सुरू
तेव्हा पहिल्याच दिवशी जरा वेळ आधीच अर्जुनाचे अवसान गळाले. बंधू,
मित्र, गुरूजनांना ठार मारून मी
राज्यप्राप्तीसाठी युद्ध का करावं ह्या विचाराने तो अस्वस्थ झाला. धनुष्बाण टाकून
देऊन तो खाली बसला. त्याला युध्दाला पुन्हा प्रवृत्त करण्यासाठी कृष्णाने जो उपदेश
केला तीच गीता. ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ ह्या सुप्रसिध्द प्रसंगावरून त्या दिवशी खंडग्रास ग्रहण असावे असा तर्क
लोकमान्य टिळकांनी केला. पुढे ज्योतिष गणिताचा उपयोग करून त्यांनी महाभारताचा
लेखनकाळ निश्चित करत आणला. चिंतामणराव वैद्यांनीही महाभारताचा लेखनकाळ आणि कृष्ण
चरित्रातल्या तारखा निश्चित केल्या. ज्या वर्षी युध्द सुरू झाले ते इसवी सन कोणते
होते हे शोधून काढले आहे. यासाठी त्यांनी ग्रेगोरियन कँलेंडरपूर्वी प्रचलित
असलेल्या ज्युलियन कॅलेंडरचा उपयोग करून घेतला. ( ज्युलियन कॅलेंडर हे भारतातील
नक्षत्र कालनिश्चितीच्या तंत्राला अधिक जवळ आहे. ) वैद्यांच्या मते, पांडवांचा अज्ञातवासाचा काळ इसवीसनपूर्व ३१४०, १
नोव्हेंबर रोजी संपला. महाभारत युध्द इसवीसनपूर्व ३२४१ साली मार्गशीर्ष महिन्यात
सुरू झाले. त्या वेळी नोव्हेंबर महिना होता. युध्दाच्या पहिल्याच दिवशी कृष्णाने
अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. प्रत्यक्ष
गीता लेखन नंतर केव्हा तरी केले गेले असावे. महाभारतात अनेक गोष्टी मागाहून
घुसडण्यात आल्या. मुळात हे सूतवा वाङ्मय!
विद्वानांनी केलेल्या संशोधनाचा
सारांशाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण ह्यांचे अर्जुनाशी काही तरी बोलणे चालले आहे,
असे युध्दभूमीवर सर्वांना पाहायला मिळाले. त्यांचे बोलणे
अर्जुनाखेरीज कोणालाही ऐकू आले नाही. संजयला व्यासांनी दिव्यदृष्टी दिलेली
असल्याने त्याला दिव्य प्रज्ञेचाही लाभ झाला. त्याला कृष्णार्जुन संवाद कळला. तोच
त्याने धृतराष्ट्राला कथन केला ! गीतेचा पहिला श्लोक धृतराष्ट्राच्या तोंडीही आहे.
त्यानंतरही आणखी काही श्लोक धृतराष्ट्राच्या तोंडी आले आहेत. निष्काम भावनेने आणि
अनासक्त बुध्दीने आपले कर्म करून जीवनाचे सार्थक करावे असे कृष्णाने अर्जनाला
सांगितले. पहिला अध्याय प्रस्तावनावजा आहे. युध्दात सहभागी झालेल्या दोन्ही
पक्षातील योध्यांची नावे वगैरे त्यात आली आहेत. त्यानंतर दुस-या अध्यायात
सांख्ययोग सांगितला आहे. तिस-या अध्यायापासून क्रमाने कर्मयोग, ज्ञानयोग, संन्यासयोग आणि भक्तीमार्ग ह्या तिन्ही
मार्गांची चर्चा करण्यात आली आहे. सहाव्या अध्यायात गीताकारांनी योगामार्गावर भर
दिला आहे. ७ आणि ८ ह्या अध्यात ज्ञानविज्ञानयोगाचे विवेचन करण्यात आले आहे. नववा
अध्यायात ईश्वरनिष्ठेवर संपूर्ण भर देण्यात आला आहे. दहाव्या योगात ईश्वराने
स्वतःच्या वेगवेगळ्या विभूती स्पष्ट केल्या आहेत. त्यात कीर्ती, संपत्ती, स्त्रियांचे मधुर वचन, धारणा शक्ती आणि क्षमाशील, परमेश्वराची अखंड स्मृती
आणि वृत्ती ह्या सात गुणांचाही समावेश केला आहे.
१३, १४, १५ अध्यायांचे स्वरूप
आधीच्या अध्यायांतील संकल्पना अधिक स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे अध्याय
१ ते १२ पर्यंतच्या अध्यायाला जोडण्यात आलेले परिशिष्ट स्वरूपाचे आहे असे म्हटले
तरी चालेल. हे सगळे स्पष्ट समजावून सांगूनही जर ते एखाद्याच्या कृष्णार्जुन
संभाषणाचे मर्म ध्यानात आले नसेल किंवा त्याला गीतेचा मार्ग अनुसरणे जमत नसेल तर
भगवंतांनी त्याला सांगितले, ‘मला तुम्ही शरण या, मी तुमचे जीवन सार्थक करीन.‘
ईश्वर प्रत्येकाच्या अंत:करणार आहे
असे गीतेचे सांगणे आहे. ‘मी तुमच्या ह्रदयात आहे’ असेही अठराव्या अध्यायात (
ईश्वर : सर्वभूतानां ह्रत्द्देशे तिष्ठति।
भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया ॥ )
श्रीकृष्णानेम्हटले आहे. संत एकनाथांनी तर प्रत्यक्ष समाधीच्या विवरात
उतरून ज्ञानेश्वरीच्या मूळ प्रतीवरू त्या काळातील प्रति शुध्द केल्या.
त्यानंतरच्या काळात मासाहेब दांडेकरांनीही
वेगवेगळ्या प्रती मिळवून ‘प्रमाण प्रत’ सिध्द केली. महाराष्ट्रात ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक
आणि अलीकडच्या काळातील विनोबांनी गीतेचा अर्थ आपापल्या परीने विषद केला आहे. ह्या
पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ज्ञानेश्वरदि संत मंडळीने आध्यात्मिक लोकशाहीची
स्थापना केली असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. गीता ग्रंथ केवळ लोकप्रियच ठरला
असे नाही तर गीता ही तर भगवान श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती म्हणून पूजनीय मानली
जाते !
रमेश झवर
No comments:
Post a Comment