ह्यावेळी १३०० वर्षांनंतर प्रथमच दक्षिण अमेरिकेचे जॉर्ज
बर्जोग्लिओ ह्याची पोपपदी निवड झाली. सोळावे पोप बेनेडिक्ट ह्यांनी अलीकडेच प्रकृती
स्वास्थ्याभावी पोपपदाचा त्याग केला होता. जगभरात पसरलेल्या दीड अब्ज ख्रिश्चन आहेत.
पोपची निवड करण्याची काटेकोर पद्धत दीडदोन हजाराहून अधिक वर्षांपासून ख्रिश्चनांनी
विकसित केली आहे. त्या पद्धतीनुसार अर्जेंटिनामध्ये ख्रिश्चन धर्मगुरू असलेले
जॉर्ज ह्यांची निवड झाली. जगभरातील ११५ कार्डिनल्सनी मिळून केलेल्या मतदानाच्या
पाचव्या फेरीत नव्या पोपची विधिवत् निवड करण्यात आली. रोममध्ये व्हॅटिकन ही
ख्रिस्ती मतानुयायांचे सर्वोच्च प्रशासन असून तेथेही निराळ्या प्रकारची का होईना,
पण लोकशाही अस्तित्वात आहे. त्या लोकशाहीचे काटेकोर पालन केले जाते हे पोपच्या
निवडीवरून स्पष्ट झाले.
नव्या पोपच्या निवडणुकीने एकच सिद्ध झाले की
व्हॅटिकन ह्या युनोचे सभासद नसलेल्या देशाने आपल्या प्रमुखाची निवड करताना
कोणत्याही प्रथा-परंपरांना छेद दिलेला नाही. ह्या निवडीचे ख्रिश्चन जगात, विशेषत: रोमन कॅथलिकांच्या जगात जोरदार स्वागत झाले असणार ह्यात शंका नाही. पण व्हॅटिकन
प्रमुखाच्याखाच्या निवडीच्या संदर्भात निधर्मी लोकशाही परंपरांचा आग्रह धरणा-या
मंडळींकडून असा युक्तिवाद केला जातो की पोपला मानतो कोण! जगभरातल्या रोमन कॅथलिक चर्चेसखेरीज पोपप्रशासन मुळात किती जणांना मान्य आहे? ख्रिश्चन धर्मात अनेक पंथोपंथ असून रोमन कॅथलिकांखेरीज पोप प्रशासनाला कोणीच
जुमानत नाही. मुळात धर्मच जिथे कोणी मानत नाही तिथे पाद्री काय सांगतो हे कोण
ऐकणार? ख्रिश्चनातही असंख्य पंथोपंथ असून खुद्द येशू
ख्रिस्त जर पुन्हा जन्माला आला तर आपण प्रेषित ह्या नात्याने स्थापन केलेल्या
ख्रिश्चन धर्मातले निरनिराळे पंथ पाहून गोंधळून जाईल!
जगात काहीही परिस्थिती असली तरी खुद्द पोपकडून सर्व
कार्डिनल्सचा यथायोग्य मान राखला जातो. विशेष म्हणजे पोपचे जगात दौरे आयोजित
करण्यात येतात तेव्हा त्या दौ-यात सहभागी होण्यासाठी पत्रकारांनाही निमंत्रण दिले
जाते. पॅपल टूरमध्ये पत्रकारांची चांगल्या प्रकारे बडदास्त ठेवली जाते.
पत्रकारांच्या कक्षात पोपमहाशय डोकावतात, प्रेसशी वार्तालापही करतात आणि त्या
वार्तालापाच्या वार्ताही प्रसारमाध्यमात झळकत असतातही! पोपच्या निवडीची बातमी कव्हर करण्यासाठी व्हॅटिकन प्रशासनाकडून पत्रकारांना सर्वतोपरी
सहकार्य केले जाते. पोप फ्रॅन्सिसच्या निवडीची बातमी ज्या तपशीलात जगभरातल्या
मिडियाने प्रसारित केली ती पाहता प्रेस सव्हरेजची व्यवस्था काटेकोरपणे करण्यात आली
असावी हे उघड आहे.
आपल्याकडे धर्म, धर्मप्रमुखांच्या बातम्या इत्यादि बाबतीत सगळा
आनंदीआनंद आहे. सनातन हिंदू धर्मात ख्रिश्चन, मुस्लिम इत्यादि धर्मात आहेत तितकेच
मतभेद आणि पंथभेद, त्यांच्यातील मतभेद हे समजण्यासारखे आहे, पण चार शंकारचार्यांची
बैठक होऊन त्यांनी कधी एखाद्या प्रशानाचा विचार केल्याची बातमी कधीच वाटायला
मिळाली नाही. धार्मिक क्षेत्रातील मतमतान्तरे पाहून भाविक मंडळी खूप अस्वस्थ होतात.
पण धार्मिक क्षेत्रातले स्वत:ला विचारवंत म्हणवणारे मात्र
ख्रिश्चन धर्माच्या अवस्थेकडे बोट दाखवता. आपल्याकडे अनेक बुवा, महाराज, साधूसंत
म्हणवणा-यांनी स्वत:चे चॅनेल्स सुरू केले आहेत. ह्या चॅनेलवरून ते सतत सरकार आणि
पत्रकारांविरूद्ध गरळ ओकत असतात.
जेव्हा ‘अधर्म’ माजतो तेव्हा धर्मस्थापना करण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर युगायुगात अवतार घेत
असतो, असे भगवद्गीतेत स्पष्ट आश्वासनच मुळी खुद्द परमेश्वराने दिले असल्याने
बुवा-महाराज वगैरेंचे धर्मस्थितीबद्दलचे म्हणणे ऐकण्याची हिंदूधर्मियांना गरजच
भासत नाही. वैदिक धर्माविरूद्ध बौद्ध, जैन इत्यादि पंथांनी बंड पुकारले तेव्हा शंकराचार्यांनी
ते मोडून काढले; इतकेच नव्हे तर उत्तरेत बदरीनारायण, पश्चिमेस व्दारका,
पूर्वेस जगन्नाथपुरी आणि दक्षिणेस कांचीपुरम् अशा चार ठिकाणी मठेही स्थापन केली. हिंदू
धर्म रक्षणार्थ स्थापन करण्यात आलेल्या ह्या छावण्याच आहेत असे म्हणायला हरकत
नाही. ह्या चारी मठांची पद्धतशीर व्यवस्थाही त्यांनी लावली होती. उत्तरेत
बदरीनारायणजवळ असलेल्या ज्योर्तिमठावर मोक्षमार्गियांना मार्गदर्शन करण्याची
जबाबदारीही शंकराचार्यांनी टाकली होती. त्याचप्रमाणे व्दारका पीठावर
ग्रंथसंवर्धनाची जबाबदारी तर पुरीधामच्या मठावर अन्नसंवर्धन, एकूणच जीवनसंवर्धनाची
निश्चित करण्यात आली होती. तसेच देवालयांची म्हणजे पर्यायाने भक्तीसंवर्धनाची
जबाबदारी कांचीपीठावर सोपवण्यात आली होती.
पण ह्या जबाबदा-या त्या मठांनी पार पाडल्या का? ! दिवसा मशाली पाजळून
मिरवणुका काढण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही.
ह्याउलट, देशभरातल्या सगळ्याच प्रांतात होऊन गेलेल्या
संतांनी मात्र गोविंद, गीता आणि गंगा ह्या हिंदू धर्माच्या तिन्ही वैशिष्ट्यांवर
भर देऊन धर्मप्रसाराचे अफाट कार्य केले. रामकृष्ण-विवेकानंदांसारख्या संतांनी
कोणत्याही प्रकारचे सहाय्य नसताना धर्मरक्षणाची जबाबदारी पार पाडली. महाराष्ट्रात ज्ञानेश्र्वर-तुकारामासारख्यांनी
धर्माचे खरे स्वरूप ओळखून त्यानुसार प्रत्यक्ष आचरण केले. आपल्या जीवनाचाच त्यांनी
धर्मध्वज फडकावला. त्याचा परिणाम असा झाला की मुसलमानी आक्रमणाच्या काळात हिंदू
धर्म तरला. धर्माने लोकांनाही तारले. ‘धर्मो रक्षति धर्म:’ हे वचन त्यांनी सार्थ करून दाखवले. मराठी संतांनी तर त्यांच्या काळात अध्यत्मिक
लोकशाहीच स्थापन केली. दामाजीपंतांनी दुष्काळपीडितांना स्वत:ची धान्यकोठारे खुली केली. पण आजच्या स्वत:ला महाराष्ट्रादि राज्यांत
पडलेला दुष्काळ अजून तरी दिसला नाही.
उलट, ख्रिश्चन धर्मात अनेक मिशनरी होऊन गेले. आजही आहेत.
त्यातले काही जण तर संत पदवीला पोचले. रूग्णसेवा, अन्नसेवा इत्यादि कार्य ते करत
असतात. त्यापैकी सगळ्यांनाच पोपकडून मान्यता दिली जाते किंवा मागितली जाते असे
मुळीच नाही. पण त्यांना लोकांचा पाठिंबा निश्चितपणे मिळतो. भारतात मदर टेरेसा
ह्यांना ‘व्हॅटिकन चर्च’ने संत म्हणून मान्यता
दिल्याचे अलीकडचे उदाहरण आहे. मदर टेरेसाला पोपटी मान्यता तर मिळालीच; खेरीज लोकमान्यताही मिळाली. किंबहुना ती आधी मिळाली आणि मागाहून व्हॅटिकन
चर्चने त्यांना संत म्हणून मान्यता दिली. हिंदू धर्मातल्या किती मठाधिपतींनी
राष्ट्रकारणात, समाजकारणात, धर्मकारणात, मानवतेच्या क्षेत्रात काम केले आहे? किती जणांना मदत केली? अनेकांनी आयुर्वेदिक
औषधांच्या फॅक्ट-या काढून जोरदार धंदा सुरू केला आहे.
अलीकडे अयोध्येतील रामजन्मभूमीच्या वादात कांचीपीठाच्या
जयेंद्र सरस्वतींनी मात्र एक वेगळा आदर्श जनतेसमोर ठेवला. नरसिंह रावांच्या
सांगण्यावरून त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना यश आले
नाही हा भाग वेगळा. देशाचा उद्धार केल्याखेरीज धर्माचा उद्धार होणार नाही, अशी
भूमिका बाळगणारे जयेंद्र सरस्वती हे एकमेव शंकाराचार्य आहेत. आपल्या कल्पना
प्रत्यक्षात आणण्यासाठी दंड टाकून देऊन ते काही काळ मठ सोडूनही निघून गेले होते. अशा
ह्या भगवद्भक्ताला तामिळनाडू सरकारने खुनाच्या आरोपाखाली खटला भरून तुरूंगातही
टाकले होते. त्यावेळी रामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी आंदोलन छेडणारी विश्व हिंदू
परिषद आणि भारतीय जनता पक्ष काय करत होते?
अध्यात्म ही भारतीय समाजमनाची प्रेरणा खरी; पण वैयक्तिक मोक्षप्राप्तीपुरतीच ती सीमित राहिलेली आहे हे दुर्दैवाने कटू
सत्य आहे. राष्ट्रमुक्ती हे त्यांचे ध्येय कधीच नव्हते. सध्या भूकमुक्ती,
व्यसनमुक्ती हेही ध्येय त्यांनी ठेवल्याचे ऐकिवात नाही. राष्ट्राचा विचार करणारे
एक फक्त समर्थ रामदासस्वामी होऊन गेले. शेसव्वाशे वर्षापूर्वी विवेकानंद ह्यांनी
राष्ट्रात चेतना जागवली होती ह्याची आठवण झाल्याखेरज राहत नाही!
पोपच्या निवडीच्या निमित्ताने ओघाने आले म्हणून धर्मकारणाचा
हा विचार!
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक लोकसत्ता
No comments:
Post a Comment